चालू घडामोडी : १ फेब्रुवारी

मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्राचे उद्घाटन

  • बंगळूरूमधील इस्रोच्या मुख्यालयात मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्राचे (एचएसएफसी: ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर) उद्घाटन करण्यात आले.
  • इस्रोच्या पहिल्या मानवी अंतरीक्ष मोहिमेसाठी (मिशन गगनयान) या केंद्राचा वापर केला जाणार आहे.
  • मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र सध्या उपलब्ध असलेल्या इस्रो सेंटरच्या मदतीने गगनयानच्या पहिल्या डेव्हलपमेंट फ्लाईटची अंमलबजावणी करेल.
  • या केंद्राचा वापर मिशन नियोजन, अंतराळात चमूच्या संरक्षणासाठी अभियांत्रिकी प्रणालीचा विकास, चमूची निवड व प्रशिक्षण आणि इतर संबंधित कार्यासाठी केला जाईल.
गगनयान अभियानाबद्दल
  • १५ ऑगस्ट २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही योजना आखण्यात येणार आहे.
  • या अभियानांतर्गत २०२२मध्ये ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात ५ ते ७ दिवस मुक्काम करणार आहेत.
  • ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने गगनयान मिशनसाठी अलीकडेच १० हजार कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिली आहे.
  • गगनयान उपक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग यांच्याशी इस्रो समन्वय साधेल. तसेच या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.
  • २०२२पर्यंत गगनयान अंतराळात पाठविले जाणार आहे. त्याआधी २०२० आणि २०२१मध्ये २ मानवरहित यान इस्रो अवकाशात पाठविणार आहे.
  • गगनयान मोहीमेसाठी ३ अंतराळवीरांच्या चमूची निवड भारतीय वायुसेना व इस्रोद्वारे संयुक्तपणे केली जाईल व नंतर या चमूला २-३ वर्षे प्रशिक्षण दिले जाईल.
  • गगनयान मिशनसाठी जीएसएलव्ही मार्क-३ उपग्रह प्रक्षेपण यान वापरले जाणार आहे. हे अंतरीक्षयान आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. ते १६ मिनिटात अपेक्षित उंचीवर पोहचेल.
  • मिशन गगनयानच्या स्पेस क्राफ्टमध्ये एक क्रू मॉड्यूल आणि एक सर्व्हिस मॉड्यूल असेल. त्याचे वजन सुमारे ७ टन असेल.
  • हे अंतरिक्षयान पृथ्वी कनिष्ठ कक्षेत ३००-४०० किमीच्या उंचीवर स्थापित केले जाईल, जेथे अंतराळवीर विविध प्रयोग करतील.
  • यातील क्रू मॉड्यूलचा आकार ३.७ मीटर असेल आणि सर्व्हिस मॉड्यूलचा आकार ७ मीटर असेल. अंतराळवीरांना घेऊन जाणारे क्रू मॉड्यूल हे सर्व्हिस मॉड्यूलला जोडलेले असेल.
  • परतीसाठी मॉड्यूल्सचा वेग कमी करून त्यांना उलट दिशेने फिरवले जाईल. जेव्हा हे दोन्ही मॉड्यूल्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२० किमीपर्यंत पोहोचतील, तेव्हा सेवा मॉड्यूल विलग क्रू मॉड्यूलपासून केले जाईल. केवळ क्रू मॉड्यूल पृथ्वीवर पोहोचेल.
  • पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी यास सुमारे ३६ मिनिटे लागतील. इस्रो गुजरातमधील खाडीमध्ये किंवा गुजरातजवळ अरबी समुद्रात क्रू मॉड्यूल लँड करण्याची योजना आखत आहे.
  • हे मिशन भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या सुमारे ६ महिने आधी कार्यान्वित केले जाईल. यासाठी एकूण १० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
  • इस्रोच्या या मोहिमेचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनीयर करणार आहेत. त्या गेल्या ३० वर्षांपासून इस्रोमध्ये काम करीत आहेत.
  • या अभियानाची तयारी इस्रोने २००४मध्येच सुरु केली होती. मिशन गगनयानमुळे सुमारे १५००० रोजगारही निर्माण होणार आहेत.

इस्रोचे लिथियम-आयन तंत्रज्ञान हस्तांतरण

  • इस्रोने आपल्या लिथियम-आयन विद्युतघट तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी १० कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या खालीप्रमाणे:
    1. अमर राजा बॅटरीज लिमिटेड, चित्तूर
    2. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे
    3. कार्बोरंडम यूनिवर्सल लिमिटेड, गुरुग्राम
    4. जीओसीएल कारपोरेशन लिमिटेड, हैदराबाद
    5. ज्योति सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड, राजकोट
    6. नेशनल एल्युमीनियम को. लिमिटेड, भुवनेश्वर
    7. सुखबीर एग्रो एनर्जी लिमिटेड, नई दिल्ली
    8. टाटा केमिकल्स लिमिटेड, मुंबई
    9. थरमैक्स लिमिटेड, पुणे
    10. लिथियम-आयन तंत्रज्ञान
  • इस्रोची रॉकेट विज्ञान शाखा विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC)इस्रोच्या विविध अंतराळ मोहिमांसाठी लिथियम-आयन विद्युतघट तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • लिथियम-आयन विद्युतघटाचे उत्पादन प्रकल्प उभारून देशाची उर्जा साठवणुकीची गरज भागविण्यासाठी VSSCने हे तंत्रज्ञान यशस्वी भारतीय उद्योग, स्टार्ट-अप्स यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • याशिवाय स्वदेशी इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाचा विकास करणे आणि आयात केल्या जाणाऱ्या लिथियम-आयन तंत्राचा अवलंब कमी करणे, हादेखील यामागील उद्देश आहे.
  • इस्रोद्वारे केल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे देशात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यास मदत मिळेल. ज्यामुळे विविध आकार, क्षमता, ऊर्जा घनता आणि शक्ती असलेल्या बॅटरीज चे उत्पादन केले जाऊ शकेल.
  • सध्या या बॅटरीजची देशांतर्गत मागणी चीन, दक्षिण कोरिया व तैवानमधून आयात केलेल्या बॅटरीद्वारे पूर्ण केली जाते.
  • केंद्र सरकारचे २०३०पर्यंत देशात १०० टक्के वाहने इलेक्ट्रिक करण्याचे ध्येय आहे. लिथियम-आयन बॅटरी उत्पादनाचा हा उपक्रम याच मोहिमेचा एक भाग आहे.

भारत बांधणार ६ नवीन पाणबुडया

  • संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने ६ पाणबुडया बांधण्याच्या ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.
  • याशिवाय लष्करासाठी फ्रान्सकडून ५,००० मिलान २ टी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या प्रकल्पालाही मंत्रालयाने मंजुरी दिली.
  • संरक्षण मंत्रालयाच्या महत्वकांक्षी रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत हा दुसरा प्रकल्प आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वाचे आहेत.
  • रणनितीक भागीदारी मॉडेल अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमातंर्गत भारतीय खासगी कंपन्यांना मूळ परदेशी संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून काम करता येणार आहे.
  • या प्रकल्पाला ७५ (आय) हे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत भारतीय नौदलाची ६ डिझेल इलेक्ट्रीक पाणबुडयांची निर्मिती करण्याची योजना आहे.
  • ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह टॉरपीडो आणि शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने या पाणबुडया सज्ज असतील.
  • हिंद महासागरात चिनी नौदलाच्या वाढलेल्या हालचाली भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारवर सागरी संरक्षण सिद्धतेवर भर देण्यासाठी दबाव वाढला आहे.
संरक्षण खरेदी परिषद
  • संरक्षण खरेदी परिषद ही संरक्षण साहित्य विकत घेण्यासंबंधी निर्णय घेणारी संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च समिती आहे.
  • २००१मध्ये ही परिषद स्थापन करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात. ही परिषद सैन्य उपकरणाच्या खरेदीसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करते.
मिलान-२ टी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
  • अत्यंत सुरक्षित वाहनांचा नाश करण्यासाठी मिलान-२ टी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
  • मिलान हे एक प्रकारचे पोर्टेबल क्षेपणास्त्र आहे. हे एक मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, फ्रेंच कंपनी युरोमिसाईलद्वारे त्याची निर्मिती केली जाते.
  • संरक्षण संशोधन विकास संघटनेद्वारे तयार केले जात असलेले स्वदेशी रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र ‘नाग’ अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही, त्यामुळे सध्या भारताला अशा रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची गरज आहे.

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी चंदा कोचर दोषी

  • व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • या संशयास्पद कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बँकेच्या लेखापाल समितीने नेमलेल्या निवृत्त न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी अहवाल सादर केला.
  • या कर्ज प्रकरणात कोचर यांनी बँकेच्या अंतर्गत धोरणांचे, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा ठपका या समितीने कोचर यांच्यावर ठेवला.
  • यामुळे कोचर यांनी दिलेला राजीनामा ‘चुकीच्या कृत्याबद्दल कंपनीतून केलेले निलंबन’ या आधारावर स्वीकारण्याचा निर्णय बँकेच्या संचालकांनी घेतला आहे.
  • यामुळे त्यांना नोकरी पश्चात सेवांचा फायदा मिळणार नसून, त्यांना कोणताही भत्ता किंवा बोनस दिला जाणार नाही. बँकेकडून देय असलेली सर्व रक्कम थकीत ठेवण्याचा येणार आहे.
  • त्याचप्रमाणे बँकेच्या निर्णयानुसार २००९ ते २०१७-१८ या कालावधीत कोचर यांना दिलेला सुमारे १० कोटी रुपयांची बोनसची रक्कम कोचर यांना परत करावी लागणार आहे.
  • याशिवाय कोचर यांना दिलेले समभागही बँकेकडून परत घेतले जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी ९४ लाख रुपये किमंतीच्या या समभागांचे मूल्य सद्यस्थितीत ३४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
नेमके प्रकरण काय?
  • चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज समितीवर असताना २०१२मध्ये व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते.
  • त्याबदल्यात व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रीनीवेबल्स या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता.
  • या कर्ज प्रकरणातील कोचर यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी बँकेच्या लेखापाल समितीने जून २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांची समिती नेमली होती.
  • १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीतील संबंधित व्यवहार तपासणे व या प्रकरणाची सर्वसमावेशक चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी या समितीवर होती.
  • सीबीआयने या प्रकरणी कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्याविरोधतही गुन्हा दाखल केला आहे.
चंदा कोचर
  • चंदा कोचर यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९६१ रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. त्या देशातील आघाडीच्या महिला बँकर आहेत.
  • त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेज मधून बीकॉम पदवी प्राप्त केली. तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली. १९८४ मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या आयसीआयसीआय बँकेत रुजू झाल्या.
  • १९५५मध्ये आयसीआयसीआय बँकेची स्थापना भारतीय उद्योगांना प्रकल्प आधारित अर्थसहाय्य मिळावे यासाठी केली होती.
  • १९९४मध्ये आयसीआयसीआयचे रुपांतर संपूर्ण स्वायत्तता असलेल्या बँकेत झाले. आयसीआयसीआय ही देशातील तिसरी मोठी बँक आहे.
  • २००९मध्ये कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झाली.
  • चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालीच बँकेने रिटेल क्षेत्रात पदार्पण केले. बँकेला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात कोचर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
  • त्यांच्या या कार्यासाठी सरकारने २०११साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फोर्ब्स मासिकाच्या १०० शक्तिशाली महिलांमध्येही त्यांचा समावेश होता.
  • व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी बँकेने अंतर्गत चौकशी सुरु केल्यानंतर कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. नंतर ऑक्टोबर २०१८मध्ये कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

१ फेब्रुवारी: कल्पना चावला स्मृतीदिन

  • अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि देशातील कोट्यवधी मुलींचे प्रेरणास्थान असलेल्या कल्पना चावला यांचा १ फेब्रुवारी योजी स्मृतीदिन आहे.
  • अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांच्यासह ६ अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
  • अवकाश यानाच्या डाव्या विंगमधील एल्युमिनियम हिट इन्सुलेटिंग टाइलमधील खराबीमुळे हा अपघात झाला होता.
  • ही कोलंबिया अवकाश यानाची २८वी अवकाश मोहीम होती. हे यान पृथ्वीवर लँडिंगपासून केवळ १६ मिनिटे दूर होते.
कल्पना चावला
  • कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील करनाल येथे झाला. त्यांनी पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधील पदवी प्राप्त केली होती.
  • त्यानंतर १९८२मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. १९८४मध्ये त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवली.
  • नंतर त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवली.
  • १९८८मध्ये कल्पना चावला यांनी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’मध्ये आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. १९९१मध्ये त्या अमेरिकेच्या नागरिक झाल्या.
  • १९९६मध्ये त्यांची पहिल्यांदा अंतराळ उड्डाणासाठी निवड करण्यात आली. १७ नोव्हेंबर १९९७ रोजी त्यांची पहिली अवकाश मोहीम सुरु झाली.
  • या मोहिमेसाठी ६ अंतराळवीरांचा चमू असलेल्या कोलंबिया अवकाशयानाचा वापर करण्यात आला होता. याबरोबरच कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
  • मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७वर काम केले. अवकाशात तिने ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.
  • १६ जानेवारी २००३ रोजी पुन्हा त्या अंतराळात गेल्या आणि १ फेब्रुवारी २००३ रोजी अवकाशातून परतताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
  • कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ देशात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. हरियाणा सरकारने कर्नालमध्ये सरकारी हॉस्पिटलचे नाव 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज' ठेवले.
  • अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

२०१९: आंतरराष्ट्रीय आवर्तसारणी वर्ष

  • आवर्त सारणीच्या शोधाला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युनेस्कोने २०१९ हे वर्ष रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे आंतराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे.
  • मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.
  • १८६९साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव्हने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली होती.
  • मेंडेलीव्हने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्याची आवर्त सारणी त्याच्या खालील नियमावर आधरित होती.
  • मेंडेलीव्हचा आवर्ती नियम: मूलद्रव्यांचे तसेच संयुगांचे गुणधर्म व संयुगांची रेणुसुत्रे हे त्या मुलद्रव्याच्या अनुभारांची आवर्तीफले असतात.
  • मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्या.
  • १९१३मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे.
  • मोस्लेने मेंडेलीवच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्तसारणी तयार केली.
  • मोस्लेचा आधुनिक आवर्ती नियम: मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात.
आधुनिक आवर्तसारणीची वैशिष्ट्ये
  • अणुअंक हा आधुनिक आवर्तसारणीचा पायाभूत गुणविशेष (आधार) आहे. आवर्त सारणीतील मूलद्रव्याचे स्थान हे त्या मुलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरुपणाशी निगडीत आहे.
  • या आवर्तसारणीचे स्वरूप दीर्घ आहे. यामध्ये ७ आडव्या ओळी म्हणजेच आवर्त आहेत, तर १८ उभे स्तंभ म्हणजेच गण आहेत.
  • प्रत्येक आवर्ताची सुरुवात ज्याच्या अणुच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे अशा आम्लारी धातूने होतो. तर शेवट ज्या अणूच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉनचे स्थिर अष्टक पूर्ण झाले आहे अशा उदासीन वायुने होतो.
  • प्रत्येक आवर्तातील सर्व मूलद्रव्यांच्या अणुमध्ये त्या आवर्ताच्या क्रमांकाइतक्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात.
  • प्रत्येक गणातील मूलद्रव्यांतील अणूच्या बाह्यतम कक्षेत त्या गणाच्या क्रमांकाइतके इलेक्ट्रॉन असतात.
  • सातव्या आवर्तच्या तळाशी सारणीत लँथेनाईड आणि ॲक्टीनाईड मालिकेतील मूलद्रव्ये स्वतंत्रपणे दाखविली आहेत.
  • संपूर्ण आवर्तसारणी एस, पी, डी आणि एफ अशा ४ खंडात विभागलेली आहे.
  • एकाच आवर्तातील मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म डावीकडून उजवीकडे क्रमाक्रमाने बदलत जातात.
  • एखाद्या विशिष्ट गणातील मूलद्रव्यांच्या संयुजा, संयुजांची रेणुसुत्रे, रासायनिक अभिक्रिया अशा रासायनिक गुणधर्मात साम्य दिसते.
  • या आवर्तसारणीत धातू आणि अधातू स्वतंत्रपणे दिसतात.

नवी दिल्लीमध्ये पेट्रोटेक २०१९चे आयोजन

  • १३वी आंतरराष्ट्रीय तेल व गॅस परिषद आणि प्रदर्शन ‘पेट्रोटेक २०१९’चे आयोजन नवी दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत होईल.
  • या संमेलनाचे आयोजन १० ते १२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान होणार आहे. पेट्रोटेक २०१९चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.
  • या संमेलनासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९५ भागीदार देशांच्या ऊर्जा मंत्र्यांना आमंत्रित केले आहे.
  • या ३ दिवसीय कार्यक्रमादरम्यान, भारतातील तेल व वायू क्षेत्रात गुंतवणूकदार-अनुकूल उपक्रमांविषयी माहिती देण्यात येईल.
  • या संमेलनामध्ये ८६ प्रतिष्ठित वक्ते आणि सुमारे ७० देशांमधील ७०००हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

संत गुरु पद्मसंभव आंतरराष्ट्रीय परिषद

  • नवी दिल्लीमध्ये ८व्या शतकातील हिमालयीन संत गुरु पद्मसंभव यांच्यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
  • भारत आणि भूतानमधील राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • गुरु पद्मसंभव यांचा जन्म भारतामध्ये झाला आणि हिमालयात सर्वत्र प्रवास करत बौद्ध आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीचा प्रसार केला.
  • भूतानमध्ये गुरु पद्मसंभव अत्यंत आदरणीय आहेत. त्यांना गुरु रिंपोचे म्हणूनही ओळखले जाते. त्याला न्यिन्गमा परंपरेचा संस्थापक मानले जाते.
  • तिबेट, भूतान, नेपाळ आणि भारताच्या हिमालयीन राज्यांमधील तिबेटीयन बौद्ध अन्यायी त्यांचा ‘दुसरे बुद्ध’ म्हणून आदर करतात.
भारत-भूतान राजनैतिक संबंध
  • भारत आणि भूतानमधील राजनैतिक संबंधांना १९६८मध्ये सुरुवात झाली. भारताने १९६८मध्ये भूटानची राजधानी थिम्फू येथे एक विशेष कार्यालय स्थापन केले.
  • त्यापूर्वी भूतानबरोबर भारतीय राजनयिक संबंधांचे व्यवस्थापन सिक्किममधील भारतीय राजकारणी अधिकारी करीत होते.
  • भारत-भूतान द्विपक्षीय संबंधांचे नियमन १९४९मध्ये झालेल्या मैत्री आणि सहकार संधीद्वारे केले जाते. फेब्रुवारी २००७मध्ये या संधीमध्ये सुधारणा करण्यात आल्या.
  • भारत-भूतानमधील राजनयिक संबंधांना २०१८मध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे भारत-भूतानमधील राजनयिक संबंधांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

हरियाणा हॅमर्सला प्रो रेसलिंग लीगचे विजेतेपद

  • हरियाणा हॅमर्सने प्रो रेसलिंग लीगच्या चौथ्या आवृत्तीचे विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात हरियाणाने दोन वेळच्या विजेत्या पंजाब संघाचा ६-३ असा पराभव केला.
  • प्रो रेसलिंग लीगमधील हरियाणाचे हे पहिले विजेतेपद आहे. यापूर्वी हरियाणाला ३ वेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळाले होते.
  • प्रो रेसलिंग लीग ही कुस्ती स्पर्धा आहे. प्रो-स्पोर्टफाई आणि भारतीय कुस्ती महासंघ यांनी २०१५मध्ये या स्पर्धेला सुरुवात केली. या कुस्ती स्पर्धेत, भारत आणि जगभरातील कुस्ती खेळाडू भाग घेतात.
  • या स्पर्धेत ६ संघ आहेत: दिल्ली सुल्तान्स, हरियाणा हॅमर्स, मुंबई महारथी, एनसीआर पंजाब रॉयल्स, युपी दंगल आणि एमपी योद्धा.
  • २०१५मध्ये मुंबई गरुडा संघाने प्रो रेसलिंग लीगची पहिली आवृत्ती जिंकली होती. त्यानंतर २०१७ आणि २०१८मध्ये एनसीआर पंजाब रॉयल्सने दोनदा ही स्पर्धा जिंकली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा