अनियमित ठेव योजना प्रतिबंध विधेयक २०१८
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अनियमित ठेव योजना प्रतिबंध विधेयक २०१८मधील सुधारणांना मंजूरी दिली आहे.
- या सुधारणा वित्त विभागाच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत.
- देशातील बेकायदेशीर ठेव योजनांशी संबंधित क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांच्या कष्टाच्या कमाईचे रक्षण करणे, हा त्यामागील उद्देश आहे.
विधेयकाची वैशिष्ट्ये
- या विधेयकामध्ये अनियमित ठेव योजनांचा प्रचार आणि त्यांची जाहिरात करण्यावर तसेच लोकांकडून पैसे गोळा करण्यावर बंदी घालण्याची तरतूद आहे.
- अनियमित ठेवींशी संबंधित क्रियाकलापांना या विधेयकामध्ये गुन्हा ठरविण्यात आले आहे.
- या विधेयकात पुढील ३ प्रकारच्या गुन्ह्यांची तरतूद आहे. १) अनियमित ठेव योजना चालविणे. २) नियमित ठेव योजनांमध्ये फसवणूक करणे. ३) अनियमित ठेव योजनांचे आमिष दाखवून लोकांना भुलविणे.
- या विधेयकात नियमांचे उल्लंघन करण्याच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा योजना चालविणाऱ्यांकडून लोकांच्या पैशाची परतफेड करण्याची तरतूद यात आहे.
- या विधेयकात, अनियमित ठेव योजना चालविणाऱ्या लोकांची मालमत्ता जप्त करण्याचा व प्रसंगी त्या विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आला आहे.
- मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि ठेवीदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या विधेयकात कालमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
- या विधेयकात देशातील ठेवी स्वीकारणाऱ्या क्रियाकलापांविषयी माहितीचे संकलन करण्यासाठी ऑनलाइन केंद्रीकृत डेटाबेस स्थापन करण्याची तरतूदही आहे.
- या विधेयकात ‘ठेवी स्वीकारणारा’ आणि ‘ठेवी’ यांची व्यापक व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे.
आयकर व अप्रत्यक्ष करांसाठीची लोकपाल संस्था बंद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आयकर आणि अप्रत्यक्ष करांसाठीची लोकपाल संस्था बंद करण्यास मंजुरी दिली आहे.
- आयकराशी संबंधित लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी २००३मध्ये आयकर लोकपालाचे कार्यालय स्थापन करण्यात आले होते.
लोकपाल कार्यालय बंद करण्याची कारणे
- लोक ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा जास्त पसंत करतात.
- नवीन तक्रारींची संख्या कमी होऊन नगण्य झाल्यामुळे आता या संस्थेची गरज उरलेली नाही.
- विद्यमान समांतर तक्रार निवारण प्रक्रीयांपेक्षा लोकपाल संस्था अधिक प्रभावी नाही.
- केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली आणि आयकर सेवा केंद्रांसारख्या इतर यंत्रणांना लोक जास्त पसंटी देत आहेत.
केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली
- CPGRAMS: Centralized Public Grievance Redress & Monitoring System
- राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राद्वारे विकसित केलेली ही ऑनलाइन वेब-सक्षम प्रणाली आहे.
- वेब तंत्रज्ञानावर आधारित या मंचाद्वारे लोक कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणावरून तक्रार दाखल करू शकतात.
- दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित मंत्रालये / विभाग / संस्था या तक्रारींच्या जलद निवारणासाठी तपासणी आणि कारवाई करतात.
- तक्रार करणाऱ्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या अद्वितीय नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने त्या व्यक्तीस आपल्या तक्रारीचा मागोवा घेण्याची सुविधाही या प्रणालीद्वारे देण्यात येते.
- आयकर सेवा केंद्र
- आयकर विभागाच्या ‘सेवोत्तम’ योजनेचा भाग म्हणून आयकर सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
- या केंद्राचा उद्देश आयकर विभागाकडे फक्त अंमलबजावणी एजन्सी म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बदलून तो सेवा प्रदाता असा करण्याचा आहे.
- आयकर सेवा केंद्र करदात्यांना त्यांचा परतावा दाखल करण्यास सहाय्य करतात आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण करतात. सर्व टॅक्स सेवांसाठी हे केंद्र एक-खिडकी निरसन कार्य करते.
दरवाजा बंद अभियान-भाग २
- देशातील ग्रामीण क्षेत्रांना हागणदारी मुक्त (ODF: Open Defecation Free) करण्याच्या उद्देशाने ‘दरवाजा बंद अभियान-भाग २’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- ही मोहीम पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या उपक्रमांतर्गत सुरु करण्यात आली आहे.
- प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. तेच या मोहिमेचा प्रचार करणार आहेत.
- ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचा वापर जनजीवनाचा भाग बनावा या उद्देशाने या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.
- हागणदारीमुक्त आणि उघड्यावरील शौचमुक्त भारतासाठी सुरु करण्यात आलेले हे अभियान जागतिक बँकेद्वारे समर्थित आहे.
- सरकारच्या आकडेवारीनुसार, स्वच्छ भारत मिशन सुरु झाल्यापासून सुमारे ५० कोटी लोकांनी उघड्यावरील शौच करणे बंद केले आहे आणि सुमारे ५.५ लाख गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत.
स्वच्छ भारत अभियान
- हे भारताच्या ४०००हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
- हे अभियान महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झाले.
- महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
- स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.
- स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे. ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.
राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या स्थापनेस मंजुरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे.
- याचा उद्देश गायींच्या विकास, सुरक्षा आणि संरक्षणासाठी कार्य करणे हा आहे. अंतरिम अर्थसंकल्प २०१९-२०मध्ये या आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती.
- हा आयोग पशुवैद्य, पशु विज्ञान, कृषी विद्यापीठ आणि केंद्र व राज्य सरकारांचे विभाग आणि संघटनांच्या मदतीने कार्य करेल.
- यामुळे लहान आणि किरकोळ शेतकरी आणि स्त्रियांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- यामुळे देशातील गायींच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी धोरच्या आखणीसाठी बळ मिळेल.
- हा आयोग गायींच्या कल्याणासाठी केलेल्या नियमांची योग्य अंमलबजावणी देखील सुनिश्चित करेल.
रोहित शर्माचा ट्वेंटी-२०मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम
- भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला.
- या सामन्यात त्याने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
- यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या (२,२७२ धावा) नावावर होता. रोहितने २,२८८ धावांसह गप्टिलला मागे टाकत या विक्रमावर नाव कोरले.
- याबरोबरच रोहित शर्माने टी-२० सामन्यातील षटकारांचे शतकही पूर्ण केले. टी-२०मध्ये षटकारांचे शतक करणारा रोहित हा जगातील तिसरा तर भारताचा पहिलाच फलंदाज आहे.
- टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ख्रिस गेल आणि मार्टिक गप्टील यांनी सर्वाधिक १०३ षटकार ठोकले आहेत. त्यांनतर १०२ षटकारांसह रोहित शर्माचा क्रमांक लागतो.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर (अनुक्रमे शाहीद आफ्रिदी व ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम व सनथ जयसूर्या यांच्यानंतर) आहे.
मीराबाई चानूला इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदक
- विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक (वेटलिफ्टर) साइखोम मीराबाई चानू हीने दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना थायलंड येथे सुरु असलेल्या इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली.
- कमरेच्या दुखापतीमुळे चानू २०१८मध्ये ८ महिन्यांपेक्षा अधिक काळ विविध स्पर्धांपासून दूर राहिली होती.
- चानूने ४८ किलो वजनी गटात १९२ किलो वजन उचलून स्पर्धेत सुवर्ण मिळवले आहे. तिने स्नॅचमध्ये ८२ किलो व क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ११० किलो वजन उलचून अव्वल स्थान मिळवले.
- टोकियो २०२० ऑलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्या या स्पर्धेतील गुण महत्त्वपूर्ण ठरतील.
साइखोम मीराबाई चानू
- मीराबाई चानू हिने गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ४८ किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
- याशिवाय २०१७मध्ये तिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनी गटात १९४ वजन उचलून विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती.
- अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्वरी हिने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.
- क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल यापूर्वी तिला पद्मश्री आणि देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नने सन्मानित करण्यात आले आहे.
- कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर आहे.
फ्रानोईस लाबोर्डे यांना ‘लीजन डि ऑनर’ पुरस्कार
- पश्चिम बंगालचे पादरी ९२ वर्षीय फादर फ्रानोईस लाबोर्डे यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘लीजन डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- निराधार आणि दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी केलेल्या कामासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. फादर लाबोर्डे मूळचे फ्रान्सचे असून आता ते भारताचे नागरिक आहेत.
- फादर लाबोर्डे यांनी हावडा साऊथ पॉईंट नावाची एक संस्था सुरू केली आहे जी निराधार आणि दिव्यांग बालकांच्या कल्याणासाठी कार्य करते.
- लीजन डि ऑनर सन्मान मिळालेले सत्यजित रे आणि सौमित्र चॅटर्जी यांच्यानंतर पश्चिम बंगालचे ते तिसरे व्यक्ती आहेत.
लीजन डि ऑनर
- हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सम्मान आहे. नेपोलियन बोनापार्टने हा सम्मान १८०२मध्ये सुरु केला. हा सम्मान फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्याही देशाच्या नागरिकाला दिला जातो.
- या सम्मानाच्या ५ श्रेणी पुढीलप्रमाणे: शेवलिएर (योद्धा), ऑफिसिएर (ऑफिसर), कॉमोडोर (कमांडर), ग्रँड ऑफिसिएर (ग्रँड ऑफिसर) आणि ग्रँड क्रॉइक्स (ग्रैंड क्रॉस).
- २००७ आणि २०१४मध्ये अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना हा सम्मान देण्यात आला होता.
- याशिवाय अमर्त्य सेन, पंडित रवी शंकर, झुबिन मेहता, लता मंगेशकर, जेआरडी टाटा, रतन टाटा, अजीम प्रेमजी आणि सौमित्र चॅटर्जी यांनादेखील हा सम्मान देण्यात आला आहे.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेव्हिड मालपस
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेव्हिड मालपस यांना नामनिर्देशित केले आहे.
- ६२ वर्षीय डेव्हिड मालपस अमेरिकेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत. वॉल स्ट्रीट जर्नल व फोर्ब्स मासिकांमध्ये ते नियमित लिखाण करतात.
- डेव्हिड सध्या अमेरिकेतील ट्रेझरी विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अपर सचिव आहेत. मे २००१६मध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत वरिष्ठ अर्थ सल्लागाराची भूमिका त्यांनी पार पाडली होती.
- यापूर्वी ते राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात उपसहायक अर्थमंत्री तर माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात उपसहायक परराष्ट्रमंत्री राहिले आहेत.
- जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कामकाज व व्यावसायिक मॉडेलवर ते नेहमी टीका करत आले आहेत. डेव्हिड यांच्या मतानुसार जागतिक बँक मनमानी पद्धतीने जगभरात कर्ज वाटप करत आहे.
- कोलोरॅडो कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी डेन्व्हर विद्यापीठातून एमबीए केले. त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
- त्यांनी न्यूयॉर्कमध्ये एका मॅक्रो-इकोनॉमिक्स रिसर्च फॉर्मची त्यांनी स्थापना केली आहे. त्यांना इंग्रजीसह स्पॅनिश, रशियन, फ्रेंच भाषा येतात.
- जागतिक बँकेचे मावळते अध्यक्ष जिम योंग किम यांनी यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या ३ वर्षे आधीच अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला.
- किम हे मागील ६ वर्षांपासून जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांना २०१७मध्ये मुदतवाढ मिळाल्याने त्यांचा कार्यकाळ २०२२पर्यंत वाढला होता. सलग दोनवेळा त्यांची जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाली होती.
- जागतिक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तियाना जोर्जिएवा १ फेब्रुवारीपासून बँकेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत.
जागतिक बँक
- स्थापना: १९४४
- मुख्यालय: वॉशिंग्टन डीसी
- जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ती विकसनशील व अविकसित देशांना विकासासाठी कर्जपुरवठा करते. या बँकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
- विकसनशील व अविकसित देशातील सरकारांचे सबलीकरण, अर्थव्यवस्थांचा विकास, गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विशेष प्रयत्नशील आहे.
- जागतिक बँकेचे दोन प्रमुख भाग आहेत: आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय विकास संघ.
- १९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते.
६ फेब्रुवारी: स्त्रियांचे जननांग छेदन प्रतिबंध शून्य सहनशीलता दिन
- दरवर्षी ६ फेब्रुवारी रोजी स्त्रियांमधील जननांग छेदनाच्या (Female Genital Mutilation) प्रतिबंधासाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो.
- स्त्रियांच्या जननांगाचा भाग कापण्याच्या विकृत प्रथेच्या निर्मूलनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा वार्षिक जागरूकता दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम २००३मध्ये हा दिवस साजरा केला गेला होता.
- नायजेरियाच्या फर्स्ट लेडी आणि स्त्रियांमधील जननांग छेदनाविरुद्धच्या मोहिमेच्या प्रवक्त्या स्टेला ओबासंजो यांनी ६ फेब्रुवारी २००३ रोजी या प्रथेविरुद्ध शून्य सहनशीलता घोषणापत्र जाहीर केले.
- त्यामुळे पुढे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगाने ६ फेब्रुवारी हाच दिवस या संबधीचा आंतरराष्ट्रीय जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
स्त्रियांमधील जननांग छेदन
- स्त्रियांमधील जननांग छेदन (FGM: Female Genital Mutilation), ज्याला स्त्रियांमधील जननांग कापून काढणे व स्त्रीचा सुंता करणे असे देखील म्हणतात.
- वैद्यकीय नसलेल्या कारणांसाठी स्त्रियांचे बाह्य जननेंद्रिय आंशिक किंवा पूर्णपणे काढून टाकणे किंवा त्यास इजा करणे म्हणजे स्त्रियांमधील जननांग छेदन होय.
- वांशिक गट तसेच उप-सहारा आणि ईशान्य आफ्रिकेतील २७ देशांमध्ये आणि आशिया, मध्य पूर्व व इतर ठिकाणच्या स्थलांतरित समुदायामध्ये कमी प्रमाणात, एक सांस्कृतिक विधी म्हणून FGM करण्याचा प्रघात आहे.
- २०१२मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेम्ब्लीने FGMला मानवी हक्कांचे एक गंभीर उल्लंघन म्हणून मान्य केले आहे.
- ही प्रथा लैंगिकतेच्या आधारे महिलांशी भेदभाव करते, तसेच त्यांच्या आरोग्य, शारीरिक अखंडत्व, स्वातंत्र्य, अमानुष किंवा अपमानजनक वागणूक आणि जीवनाच्या हक्कावर गदा आणते.
- म्हणूनच या अमानुष प्रथा समाप्त करण्यासाठी, २०१५च्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये लिंग समानतेच्या ५व्या उद्दिष्टांतर्गत २०३०पर्यंत FGM नष्ट करण्याचे लक्ष्य संयुक्त राष्ट्रांनी ठेवले आहे.
- International Day of Zero Tolerance for Female Genital Mutilation
आसाम सरकारची अरुंधती योजना
- आसाम सरकारने सुरु केलेल्या ‘अरुंधती’ नावाच्या योजनेअंतर्गत लग्नाच्या वेळी मुलीला मोफत सोने दिले जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत, आसाम सरकार विवाहाच्या वेळी मुलींना १ तोळा सोने विनामुल्य देईल. या योजनेचा लाभ त्या सर्व समाजातील मुलींना होईल, ज्यामध्ये लग्न समारंभाप्रसंगी सोने देण्याची प्रथा आहे.
- अरुंधती योजनेसाठी आसाम सरकारने ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेष विवाह (आसाम) अधिनियम १९५४अंतर्गत विवाह नोंदणी करणे अनिवार्य असेल.
- ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
- आपल्या मुलींना सोन्याचे दागिने देऊ शकत नाही आणि त्यांच्यासाठी कर्ज घेतात अशा गरीब शेतकऱ्यांना मदत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- वसिष्ठ ऋषींच्या पत्नी अरुंधती यांच्या नावाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा