चालू घडामोडी : १८ फेब्रुवारी

पाकिस्तानच्या आयात वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क

  • जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आता पाकिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या हल्याच्या निषेधार्थ भारताने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन (एमएफएन) दर्जा काढून घेतला होता.
  • पाकिस्तानकडून भारताला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू: ताजी फळे, सिमेंट, खनिजे, चमड्याची उत्पादने, रसायने, कापूस, मसाले, लोकर, रबर उत्पादने, मद्य पेये, वैद्यकीय उपकरणे, सागरी उत्पादने, प्लास्टिक, रंग आणि क्रीडासाहित्य.
  • सीमाशुल्क वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारतात केल्या जाणाऱ्या निर्यातीवर वाईट परिणाम पडणार आहे.
  • वर्ष २०१७-२०१८मध्ये भारताला पाकिस्तानमधून भारतात ३४८२.३ कोटी रुपयांची (४८.८५ कोटी डॉलर) निर्यात करण्यात आली होती.
  • विदेशी व्यापार (विकास व नियमन) अधिनियमानुसार भारत सरकार देशात एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या देशातील वस्तूंची आयात आणि निर्यात प्रतिबंधित किंवा नियंत्रित करू शकते.
पुलवामा हल्ला
  • जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट करत भीषण हल्ला केला. यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले.
  • पाकिस्तानातील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०१६मध्ये उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.

वायु शक्ती २०१९

  • राजस्थानमधील पोखरण येथे पाकिस्तान नजीकच्या सीमेवर भारताने ‘वायु शक्ती २०१९’ या मोठ्या स्तरावरील युद्ध सरावाचे आयोजन केले.
  • या युद्ध सरावात १४० लढाऊ विमाने आणि हेलीकॉप्टर सहभागी झाले होते. या युद्ध सरावातून भारतीय वायुदलाने आपल्या प्रचंड सामर्थ्याचे प्रदर्शन केले.
  • भारतीय वायुसेनेने कमी वजनाचे लढाऊ विमान तेजस, ॲडव्हान्स लाइट (अतिशय कमी वजनाचे) हेलीकॉप्टर, जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश क्षेपणास्त्र आणि हवेतून हवेत मारा करणारे अस्त्र क्षेपणास्त्र यासारख्या स्वदेशी बनावटीच्या उपकरणांची विध्वंसक क्षमता प्रदर्शित केली.
  • वायु शक्ती २०१९च्या माध्यमातून ॲडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर (एएलएच) आणि आकाश क्षेपणास्त्र यांनी प्रथमच एखादी लष्करी सरावात भाग घेतला.
  • सुखोई-३०, मिराज २०००, जॅग्वार, मिग-२१ बायसन, मिग-२७, मिग-२९, आयएल ७८, हरक्यूलिस आणि एएन-३२ विमान अशा १३७ विमानांनी या युद्धसरावात सहभाग नोंदविला.
  • वायु शक्ती आणि गगन शक्ती हे भारतीय वायुदनेचे २ महत्वपूर्ण युद्ध सराव आहेत. वायु शक्ती अभ्यासाद्वारे वायुसेना शत्रूचे रणगाडे, रडार स्टेशन, रेल्वे यार्ड आणि लष्करी मुख्यालये विध्वंस करण्याचा सराव करते.

केरळमधील इको सर्किट प्रकल्पाचे उद्घाटन

  • केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अलफोंस यांनी केरळमधील वागामोन येथे ‘इको सर्किट: पथानाम्थिथा–गावी-वागामोन-थेक्कडी’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
  • हा प्रकल्प स्वदेश दर्शन योजनेचा एक भाग आहे. डिसेंबर २०१५ हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. तसेच यासाठी ७६.५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली होती.
  • या प्रकल्पाचा विकास १५० किलोमीटरच्या परिसरात करण्यात येणार आहे. यात वागामोन येथे ईको-ॲडवेंचर पर्यटन पार्क, कदमानित्ता येथे सांस्कृतिक केंद्र, पीरुमेडू (इद्दुकी) येथे ईको लॉग हट्स, पाइन व्हॅली जंगलात संपर्क मार्ग व वर्षा आश्रालय, थेक्कडी, कुमिली, मूजियार धरण, पेनस्टॉक आणि काक्की यांचा समावेश आहे.
  • या प्रकल्पांतर्गत पथानाम्थिथा आणि इद्दुकी जिल्ह्यातील वनसंपदा आणि जैव विविधतेचे संवर्धन करण्याचा उद्देशदेखील आहे.
स्वदेश दर्शन योजना
  • देशात विषय (थीम) आधारित पर्यटन परिक्रमा (सर्किट) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन योजना’ ९ मार्च २०१५ रोजी सुरू करण्यात आली.
  • या पर्यटन प्रकल्पांना एका एकात्मिक पद्धतीने उच्च पर्यटन मूल्य, स्पर्धात्मकता आणि स्थायित्व अशा सिद्धांतांवर विकसित केले जाणार आहे.
  • देशाच्या पर्यटनासाठी पायाभूत घटकांचा विकास करणे आणि देशातील पर्यटनाला चालना देणे, हे या योजनेचे मुख्य हेतू आहे.
  • या योजनेंतर्गत विकासासाठी सुरुवातीला पुढील १३ पर्यटन परिक्रमा प्रकल्प निवडण्यात आले: बुद्धिस्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
  • ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. या प्रकल्पांसाठी राज्यांना त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार निधी देण्यात येणार आहे.

८३व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल विजयी

  • आसाम येथे पार पडलेल्या ८३व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली.
  • स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला २१-१८, २१-५ असे पराभूत केले. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे हे सायनाचे चौथे जेतेपद ठरले. यापूर्वी तीन वेळा (२००६, २००७, २०१७) सायनाने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
  • राष्ट्रीय स्पर्धेत सायनाने दुसऱ्यांदा सिंधूला पराभूत केले. यापूर्वी २०१७ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतही सायनाने सिंधूवर मात केली होती.
  • लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदकाची कमाई केली होती. तर सिंधूने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
  • राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद सिंधूने आतापर्यंत २ वेळा (२०११ व २०१३) पटकावले आहे.
इतर विजेते
  • पुरुषांच्या एकेरी विभागात सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करत जेतेपद पटकावले. सौरभचे हे कारकीर्दीतील तिसरे जेतेपद असून, त्याने यापूर्वी २०११ व २०१७ साली राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
  • पुरुषांच्या दुहेरीमध्ये प्रवण चोप्रा आणि चिराग शेट्टी यांनी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रवण चोप्राने पुरुष दुहेरी तिसऱ्यांदा, तर एकूण चौथ्यांदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकली.
सायना नेहवाल
  • सायना नेहवालचा जन्म १७ मार्च १९९० रोजी हिस्सार (हरयाणा) येथे झाला. ती आघाडीची भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
  • ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे.
  • जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.
  • ऑलिंपिक (लंडन ऑलिंपिक २०१२) खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
  • सायनाला २००९-१०मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • ती २०१५मध्ये बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे.
  • तिने आपल्या कारकिर्दीत २३ आंतरराष्ट्रीय खिताब जिंकले आहेत. त्यात १० सुपरसिरीज विजेतेपदांचादेखील समावेश आहे.

चंद्रमौली रामनाथन यांची युनोमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती

  • संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या व्यवस्थापन रणनीती, धोरण व अनुपालन विभागातील (डीएमएसपीसी) सर्वोच्च पदावर भारतीय अधिकारी चंद्रमौली रामनाथन यांची नियुक्ती केली आहे.
  • चंद्रमौली रामनाथन नियंत्रक, कार्यक्रम नियोजनाचे सहाय्यक सरचिटणीस, बजेट व वित्तव्यवस्थेतील व्यवस्थापन स्ट्रॅटजी आणि धोरण व अनुपालन विभागाचा कार्यभार ते उरुग्वेच्या बेट्टीना तुक्की बर्टसीओतस यांच्याकडून स्वीकारतील.
चंद्रमौली रामनाथन
  • रामनाथन यांनी यापूर्वी भारताचे सहाय्यक महालेखापरीक्षक (१९९३-१९९५) तसेच भारताच्या महालेखापरीक्षकांसाठी लेखाचे संचालक (१९८९-१९९३) म्हणून काम केले आहे.
  • त्यांनी लेखा विभागाचे डेप्युटी कंट्रोलर आणि चीफ ऑफ सर्व्हिस, आयटी सर्व्हिसेस विभागाचे प्रमुखपदही सांभाळले आहे.
  • एन्टरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगसाठी ते २०१६पासून सहाय्यक सेक्रेटरी जनरल व २०१८पासून नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत.
  • वित्त आणि बजेट, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानातील विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचा ४० वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
डीएमएसपीसी
  • व्यवस्थापन रणनीती, धोरण व अनुपालन विभाग (डीएमएसपीसी) १ जानेवारी २०१९ रोजी सुरु करण्यात आला.
  • जागतिक व्यवस्थापन धोरणाद्वारे व्यवस्थापनाच्या सर्व क्षेत्रात रणनीतिक धोरण नेतृत्व प्रदान करणे, या उद्देशाने हा विभाग सुरु करण्यात आला आहे.

फैजल इस्माइल नेल्सन मंडेला स्कूल ऑफ पब्लिक गव्हर्नन्सचे संचालक

  • भारतीय वंशाचे प्राध्यापक फैजल इस्माइल यांना दक्षिण आफ्रिकेने नेल्सन मंडेला स्कूल ऑफ पब्लिक गव्हर्नन्सचे संचालक म्हणून नियुक्त केले आहे. ते जुलै २०१९ मध्ये पदभार स्वीकारतील.
  • प्राध्यापक फैजल इस्माइल यांना दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक सामंजस्य चर्चा करण्याचे श्रेय दिले जाते.
  • त्यांनी दक्षिण अफ्रिकन सीमा शुल्क संघटना आणि युरोपियन युनियनसह व्यापार आणि विकास करारासाठी सामंजस्य चर्चा केली होती.
  • ते २०१५ ते २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रशासन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याच पदावर २०२३पर्यंत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ते यूसीटी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधेही प्राध्यापक आहेत.
  • यापूर्वी त्यांनी जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्ल्यूटीओ) राजदूत तसेच व्यापार व उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे.

ख्रिस गेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

  • वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने २०१९च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • ३९ वर्षीय ख्रिस गेलने आत्तापर्यंत २८४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३७.१२च्या सरासरीने ९,७२७ धावा केल्या आहेत. २३ शतके आणि ४९ अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत.
  • याशिवाय त्याने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४२च्या सरासरीने ७,२१५ धावा आणि ५६ टी-२० सामन्यांमध्ये १,६०७ धावा केल्या आहेत.
  • वेस्टइंडीजसाठी द्विशतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे, तर विश्वचषकात द्विशतकी खेळी करणारा तो पहिला फलंदाज आहे. २०१५च्या विश्वचषकात झिंबाब्वेविरुद्ध त्याने २१५ धावा केल्या होत्या.
  • कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शतक झळकवाणारा ख्रिस गेल जागतिक स्तरावरील एक उत्कृष्ट खेळाडू आहे.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (ICC) दर ४ वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते.
  • कसोटी व एकदिवसीय सामने खेळणाऱ्या देशांव्यतिरिक्त आयसीसी ट्रॉफीतील काही देश या स्पर्धेत सहभागी होतात.
  • क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९ ही १२वी जागतिक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळण्यात येईल.
  • याआधी इंग्लंड आणि वेल्सकडे १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद होते.
  • यापूर्वीची विश्वचषक स्पर्धा २०१५ साली ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकवले होते.

एलीस मर्टेन्सला कतार ओपनचे जेतेपद

  • बेल्जियमची महिला टेनिसपटू एलीस मर्टेन्सने कतार ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये रूमानियाच्या अव्वल मानांकित सिमोना हालेपला पराभूत करत स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.
  • मर्टेन्सच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय ठरला. तिने हालेपवर ३-६, ६-४, ६-३ अशा तीन सेटमध्ये मात केली.
  • सध्या जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानी असलेल्या मर्टेन्सने यापूर्वी ५ वेळा एकेरी आणि ६ वेळा दुहेरी डब्ल्यूटीए विजेतेपद आणि २४ आयटीएफ विजेतीपदे मिळवली आहेत.
  • जागतिक क्रमवारीत ३ऱ्या स्थानी असलेल्या हालेपने २०१४ साली ही स्पर्धा जिंकली होती.
कतार ओपन
  • कतार ओपन ही हार्ड कोर्टवर खेळली जाणारी एक व्यावसायिक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल वर्ल्ड टूरच्या एटीपी वर्ल्ड टूर २५० मालिकेचा भाग आहे.
  • १९९३पासून दरवर्षी दोहा (कतार) येथील खलिफा आंतरराष्ट्रीय टेनिस व स्क्वाश कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते.
  • या स्पर्धेच्या २०१९च्या आवृत्तीत झेकोस्लोव्हाकियाच्या टी. बर्डिचला पराभूत करून स्पेनच्या आर. बॉटीस्ता ॲगटने पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

इन्फोसिसचे InfyTQ ॲप

  • देशातील आघाडीची माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी InfyTQ नामक एक ॲप लॉन्च केले आहे.
  • विशेषतः तिसऱ्या आणि चौथ्या वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हे एकप्रकारचे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे.
  • विद्यार्थी याद्वारे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करू शकतात, ज्याचा फायदा त्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीसाठी होऊ शकतो.
  • InfyTQ ॲप मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. यावर विविध प्रकारचे अभ्यासक्रम, साहित्य उपलब्ध आहे.
  • याद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून कौशल्य हस्तांतरण केले जाईल. याद्वारे विद्यार्थी व्यावहारिक जीवनात कौशल्याचा वापर शिकण्यास सक्षम होतील. या ॲपमध्ये प्रगत शिक्षण सामग्री प्रदान केली गेली आहे.
  • भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचा दर अत्यंत चिंताजनक आहे, InfyTQ ॲपद्वारे हा दर सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
इन्फोसिस
  • इन्फोसिसची स्थापना एन. आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या ६ सहकाऱ्यांनी पुण्यात २ जुलै १९८१ रोजी केली.
  • १९८३मध्ये या कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात ९ सॉफ्टवेअर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत.
  • इन्फोसिसमध्ये २.२५ लाखांपेक्षा जास्त लोक कार्यरत असून, महसूलाच्या आधारे २०१७मध्ये ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा