चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी

भारत-अर्जेंटिना दरम्यान १० सामंजस्य करार

  • अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मौरिशियो मॅक्री यांच्या भारत दौऱ्यात (१८ फेब्रुवारी) भारत आणि अर्जेंटिना दरम्यान १० सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली.
  • मौरिशियो मॅक्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत-अर्जेंटिना यांच्यातील राजनयिक संबंधांच्या ७०व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले आहेत.
१० सामंजस्य करार
  • संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार.
  • पर्यटन क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार.
  • भारताची प्रसारभारती आणि अर्जेटिनातील फेडरल सिस्टिम ऑफ मीडिया अँड पब्लिक कॉन्टेन्टस यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार.
  • भारतातील केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संघटना आणि अर्जेंटिनातील औषधे, खाद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशासन यांच्यात सामंजस्य करार
  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, अर्जेंटिना आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत यांच्यात अंटार्क्टिकातील सहकार्यासाठी सामंजस्य करार.
  • कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत आणि उत्पादन व श्रम मंत्रालय, अर्जेंटिना यांच्यात २०१०मध्ये झालेल्या सामंजस्य कराराआधारे सहकार्यासाठी कार्य योजना.
  • २००६ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि उत्पादकता व श्रम मंत्रालय, अर्जेंटिनाच्या कृषी उद्योग राज्य सचिवांमध्ये वर्ष २०१९-२१ साठी कार्ययोजना.
  • इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच अर्जेंटिनातील आधुनिकीकरण खात्याचे सचिव यांच्यात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहकार्यासाठी संयुक्त घोषणापत्र.
  • भारतातील वैश्विक अणुऊर्जा भागीदारी केंद्र (जीसीएनईपी) आणि सीएनईए, ऊर्जा सचिवालय अर्जेंटिना यांच्यात सामंजस्य करार.
  • माहिती तंत्रज्ञानासाठी भारत- अर्जेंटिना उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासंबंधी करार.

आरबीआयकडून सरकारला २८,००० कोटींचा अंतरिम लाभांश

  • भारतीय रिझर्व्ह बँक अंतरिम लाभांश म्हणून २८,००० कोटी रुपये केंद्र सरकारकडे हस्तांतरित करणार आहे.
  • यापूर्वी, ऑगस्ट २०१८मध्ये आरबीआयने ४०,००० कोटी रुपये सरकारकडे हस्तांतरित केले होते.
  • अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारला आरबीआयकडून लाभांशाच्या स्वरूपात मिळालेली एकूण रक्कम ६८,००० कोटी रुपये झाली आहे.
  • आरबीआयने एका आर्थिक वर्षात केंद्र सरकारला दिलेली ही सर्वाधिक रक्कम असेल. याआधी वित्तीय वर्ष २०१५-१६मध्ये हा आकडा ६५,८९६ कोटी रुपये आणि वित्तीय वर्ष २०१७-१८मध्ये ४०,६५९ कोटी रुपये होता.
  • आरबीआयचे आर्थिक वर्ष जुलै ते जून असे आहे. त्यामुळे सामान्यतः ऑगस्टमध्ये आरबीआय लाभांश वितरीत करते.
  • आरबीआय सलग दुसऱ्या वर्षासाठी अंतरिम लाभांश प्रदान करीत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्येही आरबीआयने सरकारला अंतरिम लाभांश म्हणून १०,००० कोटी रुपये दिले होते.
  • हा अंतरिम लाभांश सरकारला सुधारित अर्थसंकल्पीय अंदाज पूर्ण करण्यास उपयुक्त ठरेल.
  • वित्तीय वर्ष २०१८-१९साठी सरकारने आरबीआय, राष्ट्रीयकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून ७४,१४० कोटी रुपयांचे लाभांश आणि अधिशेषांचे सुधारित अंदाज ठेवले आहेत.

अर्जेंटिनाची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारावर स्वाक्षरी

  • अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मौरिशियो मॅक्री यांच्या भारत दौऱ्यादरम्यान (१८ फेब्रुवारी) अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली.
  • अर्जेंटिनाच्या वतीने अर्जेंटीनाचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज फौरी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महानिरीक्षक उपेंद्र त्रिपाठी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.
  • माराकेश (मोरोक्को) येथे झालेल्या कोप-२२ परिषदेत १५ नोव्हेंबर २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा करार स्वाक्षरीसाठी सर्व देशांसाठी खुला करण्यात आला होता.
  • भारत, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, युके, जपान इत्यादी देशांनंतर या करारावर स्वाक्षरी करणारा अर्जेंटिना ७२वा देश ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • International Solar Alliance (ISA)
  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात भारताच्या पुढाकाराने पॅरिस येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणीय बदल या विषयावरच्या परिषदेदरम्यान (कोप-२१) नोव्हेंबर २०१५मध्ये करण्यात आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते या नव्या सौर-ऊर्जा संघटनेचे उद्घाटन झाले होते.
  • आयएसएचा फ्रेमवर्क करार डिसेंबर २०१७मध्ये लागू करण्यात आला होता तर ११ मार्च २०१८ रोजी आयएसएचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता.
  • आयएसएचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • ज्या देशांना ऊर्जेसाठी सौरशक्तीवर निर्भर राहण्याजोगी नैसर्गिक अनुकूलता आहे अशा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध सुमारे १२१ संभाव्य सदस्य-राष्ट्रांची ही संघटना आहे.
  • या देशांना सूर्याच्या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे आयएसएचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • २०३० पर्यंत १ टेरावॅट वीजनिर्मिती सौर-स्रोतातून करण्याचे मोठे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या संघटनेसमोर आहे.
  • याशिवाय एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे, हेदेखील आयएसएचे उद्दिष्ट आहे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी आयएसए प्रयत्नशील आहे.
  • आयएसएच्या माध्यमातून सदस्य देशांत सामूहिक संशोधन, माहिती व तंत्रज्ञान देवाणघेवाण, सौरऊर्जा क्षमता विकसित करणे आणि जागतिक सौर ऊर्जेचे जाळे निर्माण करणे इत्यादीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
  • जगातील इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे सहकार्य घेत आयएसए काम करणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा संस्था (IRENA), संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्था इत्यादींचा समावेश आहे.

७९व्या भारतीय इतिहास काँग्रेसचे भोपाळमध्ये आयोजन

  • ७९व्या भारतीय इतिहास काँग्रेसचे (आयएचसी) आयोजन मध्यप्रदेशमधील भोपाळ येथील बरकतुल्लाह विद्यापीठात २६ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.
  • आधी ७९व्या भारतीय इतिहास काँग्रेसचे आयोजन पुणे येथे प्रस्तावित होते, परंतु आर्थिक अडचणीमुळे हे शक्य झाले नाही.
  • मध्यप्रदेशमध्ये आयएचसीचे आयोजन केले जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०११मध्येही आयएचसीचे आयोजन मध्यप्रदेशमध्ये करण्यात आले होती.
  • या काँग्रेसमध्ये इतिहासाशी संबंधित १००० प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात.
भारतीय इतिहास काँग्रेस
  • भारतीय इतिहास काँग्रेसची (आयएचसी: इंडियन हिस्ट्री काँग्रेस) स्थापना १९३५ साली करण्यात आली.
  • १० हजारहून अधिक सदस्य असलेली ही भारतीय इतिहासकार व अध्यापकांची सर्वात मोठी व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्था आहे.
  • भारतीय इतिहासाच्या काँग्रेसचा मुख्य उद्देश ‘भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोत्साहन देणे’ हा आहे.
  • भारतीय इतिहास काँग्रेसमध्ये पुढील ५ वार्षिक सत्रांचे आयोजन केले जाते: प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, भारताव्यतिरिक्त अन्य देशांचा इतिहास आणि पुरातत्वशास्त्र.
  • भारतीय इतिहास काँग्रेस जगभरातील इतिहासकारांच्या सहकार्याने भारतामध्ये इतर देशांच्या इतिहासाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देते.

विदर्भाला सलग दुसऱ्यांदा इराणी चषकाचे जेतेपद

  • सलग दोनदा रणजी करंडक जिंकणाऱ्या विदर्भ संघाने यंदा सलग दुसऱ्यांदा इराणी चषकाचे जेतेपद कायम राखण्यातही यश प्राप्त केले.
  • पाच दिवसांची ही लढत अनिर्णीत राहिली असली तरी विदर्भाने पहिल्या डावातील ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर शेष भारत संघावर मात करत जेतेपदावर नाव कोरले.
  • विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विदर्भापुढे जिंकण्यासाठी २८० धावांचे आव्हान होते.
  • हे आव्हान पूर्ण करून विजय मिळविण्यासाठी विदर्भाला फक्त ११ धावांची गरज असताना ५ बाद २६९ धावसंख्येवर पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.
  • दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रमही विदर्भाने केला आहे. यापूर्वी फक्त मुंबई आणि कर्नाटक या दोनच संघांना इराणी करंडक राखता आला आहे.
  • अथर्व तायडे आणि गणेश सतीश यांची अर्धशतके शेवटच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. विदर्भाचा शतकवीर अक्षय कर्णेवार या सामन्याचा सामनावीर ठरला.
  • यजमान विदर्भचा संघ इराणी चषक स्पर्धेचे जेतेपद कायम राखणारा २०१४-१५ हंगामानंतरचा पहिलाच संघ ठरला. यापूर्वी २०१४-१५मध्ये कर्नाटकने असा पराक्रम केला होता.
  • विजेत्या विदर्भाच्या खेळाडूंनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम (१० लाख रुपये) पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली.
इराणी करंडक
  • झेड. आर. इराणी करंडक (जुने नाव इरानी ट्रॉफी) ही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. रणजी करंडक स्पर्धेला २५ वर्षे झाल्याच्या प्रसंगी १९५९-६० साली ही स्पर्धा सुरु करण्यात आली.
  • या स्पर्धेला झेड. आर. इराणी यांचे नाव देण्यात आले आहे. ते भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डशी या बोर्डच्या स्थापनेपासून (१९२८) त्यांच्या मृत्युपर्यंत (१९७०) सलंग्न होते.
  • ही स्पर्धा प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतातील निवडलेल्या खेळाडूंच्या संघांमध्ये खेळली जाते.

सुनील छेत्रीला प्रथम ‘फुटबॉल रत्न’ पुरस्कार

  • दिल्ली फुटबॉल असोसिएशनद्वारे भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यास प्रथम ‘फुटबॉल रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सुनील छेत्री भारतातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. अलीकडेच त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • सुनील छेत्री भारतीय संघात आणि बंगळुरू एफसी संघात स्ट्रायकर म्हणून खेळतो. त्याचा जन्म तेलंगाना राज्यातील सिकंदराबाद शहरात ३ ऑगस्ट १९८४ रोजी झाला.
  • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्री दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत त्याच्या पुढे आता फक्त पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे.
  • छेत्रीच्या नावार १०५ आंतरराष्ट्रीय सामन्यात ६७ गोल आहेत. मेस्सीच्या नावार १२८ सामन्यात ६५ गोल, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावार १५४ सामन्यात ८५ गोल आहेत.
  • छेत्रीने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत ५ गोल केले आहेत. २०११च्या या स्पर्धेत त्याने ३ गोल केले होते. तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू आहे.
  • सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ‘कॅप्टन फॅन्टॅस्टिक’ म्हणून ओळखला जातो.
  • भारतीय फुटबॉल फेडरेशनचा (एआयएफएफ) सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान त्याला एकूण ५ वेळा (२००७, २०११, २०१३, २०१४, २०१७) मिळाला आहे.

इराणच्या अत्याधुनिक ‘फतेह’ पाणबुडीचे अनावरण

  • इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी क्रुझ क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम अशा स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक ‘फतेह’ पाणबुडीचे अनावरण केले.
  • अमेरिकेसोबत इराणचे सध्याचे संबंध तणावपूर्ण असल्यामुळे या पाणबुडीच्या अनावरणास महत्व प्राप्त झाले आहे.
  • बंदर अब्बास शहरातील बंदरात या पाणबुडीचे अनावरण करण्यात आले.
  • फतेह हा एक फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘विजेता’ असा होतो. ही मध्यम वजनी श्रेणीतील इराणची पहिला पाणबुडी आहे.
  • या पाणबुडीचे वजन सुमारे ६०० टन असून, ती क्रुझ क्षेपणास्त्राव्यतिरिक्त टॉरपीडो आणि नौदल सुरुंगांनी सज्ज आहे.
  • यामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र तैनात आहे, ज्याचा पल्ला सुमारे २००० किमी आहे. यामुळे इस्रायल आणि तेथील अमेरिकेचा लष्करी तळ या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात.
  • ही पाणबुडी इराणचा गेल्या ४० वर्षांमधील सर्वात महत्वपूर्ण लष्करी प्रकल्पांपैकी एक आहे.
जागतिक तणाव अत्युच्च स्तरावर
  • गेल्या काही महिन्यांपासून इराण आक्रमकरीत्या नवीन शस्त्रास्त्रांच्या चाचण्या करीत आहे.
  • इराणने २ फेब्रुवारी २०१९ रोजी इस्लामिक क्रांतीच्या ४०व्या स्मृतिदिनानिमित्त होवेईझेह (Hoveizeh) या दीर्घ पल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
  • जमिनीवरील लक्ष्याचा भेद करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे १३५० किमी (८४० मैल) आहे.
  • त्यांनतर ७ फेब्रुवारी रोजी पुन्हा इराणने डेझ्फुल (Dezful) नावाच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या १००० किमी (६२० मैल) पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.
  • अमेरिकेने इराणसोबतच्या अणु करारातून घेतलेली माघार आणि इराणचे आक्रमक शस्त्रास्त्र धोरण यामुळे जागतिक तणावामध्ये सतत वाढ होत आहे.
अमेरिकेचे इराणवर निर्बंध
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मे २०१८मध्ये इराणबरोबर २०१५साली झालेल्या अणू करारातून (संयुक्त व्यापक कृती योजना) माघार घेत इराणवर निर्बंध लादले आहेत.
  • या करारानुसार, इराणवर संयुक्त राष्ट्रे, अमेरिका व युरोपियन युनियनने लावलेले निर्बंध हटविण्याच्या मोबदल्यात इराणने आपल्या आण्विक उपक्रमांवर अंकुश लावण्याचे आश्वासन दिले होते.
  • अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली व या कराराच्या इतर पक्षांनी (चीन, रशिया, युके, फ्रांस, जर्मनी) यांनी या कराराप्रती आपल्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला होता.

नासाचे SPHEREx मिशन

  • अमेरिकन अंतरीक्ष संस्था नासाने विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे उलगडण्यासाठी SPHEREx मिशन सुरू केले आहे.
  • Spectro-Photometer for the History of Universe, Epoch of Reionization and Ices Explorer हे SPHERExचे पूर्ण रूप आहे.
  • हे अंतराळ यान विश्वाच्या निर्मितीचा अभ्यास करेल. ते प्रत्येक ६ महिन्यांनी आकाशाचे मानचित्रण करेल. या मिशनद्वारे शास्त्रज्ञ ३०० दशलक्ष आकाशगंगांची माहिती गोळा करतील.
नासा
  • नॅशनल ॲरोनॉटिक्स ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा)ची स्थापना १९ जुलै १९४८ रोजी नॅशनल ॲडव्हायजरी कमिटी फॉर ॲरोनॉटिक्स (एनसीए)च्या जागी करण्यात आली.
  • १ ऑक्टोबर १९४८ या संस्थेने कार्य करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, अमेरिकेचे सर्व अंतराळ कार्यक्रम नासाद्वारे चालविले जातात.

लॉरियस क्रीडा पुरस्कार २०१९

  • क्रीडा क्षेत्रातील मानाच्या लॉरियस पुरस्कारांचे वाटप अलीकडेच करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर म्हणून लॉरियस पुरस्कार ओळखले जातात.
  • यंदा टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच आणि जिम्नॅस्ट सिमॉन बाईल्स यांची वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली.
  • जोकोव्हिचने मागील ३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून यात जानेवारीत संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदाचाही समावेश आहे.
  • लॉरियस पुरस्कार जिंकण्याची जोकोव्हिचची ही चौथी वेळ आहे. याबरोबरच तो ४ लॉरियस पुरस्कार मिळवणारे उसेन बोल्ट, सेरेना विल्यम्स व केली स्लॅटर यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने हा पुरस्कार विक्रमी ५ वेळा प्राप्त केला आहे.
  • जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा सन्मान प्राप्त झाला. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक जिंकले होते.
  • २०१७मध्येही या पुरस्काराची मानकरी ठरलेल्या बाईल्सने गतवर्षी सर्व ४ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.
  • सध्या अवघ्या २१ वर्षांच्या असलेल्या बाईल्सच्या खात्यावर विक्रमी १४ जगज्जेतेपदे आहेत.
  • याशिवाय आर्सेनल फुटबॉल क्लबचे माजी प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते २२ वर्षे आर्सेनल क्लबचे प्रशिक्षक होते. या क्लबच्या यशामध्ये त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.
  • यंदाच्या सर्वोत्कृष्ट पुनरागमन करणाऱ्या क्रीडापटूच्या लॉरियस पुरस्कारासाठी भारताच्या विनेश फोगाटलाही नामांकन मिळाले होते. परंतु जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाने हा पुरस्कार पटकावला.
पुरस्कार विजेत्यांची यादी
  • स्पोर्ट्समन ऑफ द ईयर: नोवाक जोकोव्हिच.
  • स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर: जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स.
  • स्पिरिट ऑफ सपोर्ट: स्किएर लिंडसे वोन.
  • लाइफटाइम अचीवमेंट: आर्सेन वेंगर.
  • कमबॅक (पुनरागमन) ऑफ द ईयर: अमेरिकेचे गोल्फर टाइगर वुड्स.
  • ब्रेकथ्रू ऑफ द ईयर: जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका. (तिने मागील वर्षी युएस ओपन आणि यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.)
  • स्पोर्ट्सपर्सन ऑफ द ईयर विथ डिसएबिलिटी: स्किएर हेनररिएटा फार्कसोवा.
  • एक्शन स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर: क्लो किम (स्नोबोर्डिंग).
  • टीम ऑफ द ईयर: फ्रांसचा राष्ट्रीय फुटबॉल संघ.
  • लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट ऑफ द ईयर: शिया बोयु.
  • एक्सेप्शनल अचीवमेंट अवार्ड: एलियुड किपचोगे (ॲथलेटिक्स).
  • सपोर्ट फॉर गुड अवार्ड: ‘युवा’ (झारखंडची महिला फुटबॉल टीम).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा