चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी (२)

धनुष तोफांच्या उत्पादनाला मंजुरी

  • आयुध निर्मिती कारखाने मंडळाला भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला ११४ लांब पल्ल्याच्या धनुष तोफांच्या उत्पादनासाठी मंजुरी दिली आहे.
  • धनुष तोफ ही १५५ बाय ४५ एमएमची आर्टीलरी गन (तोफ) आहे. यांना देशी बोफोर्स म्हणूनही ओळखले जाते.
  • भारताने १९८०मध्ये मिळविलेल्या स्वीडिश १५५-एमएम बोफोर्स होवित्झर या तोफांची धनुष ही सुधारित आवृत्ती आहे.
  • भारतीय लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन कोलकत्ता स्थित आयुध निर्मिती कारखाने मंडळाने या तोफा विकसित केल्या आहेत जबलपूर येथील गन कॅरिज फॅक्टरीद्वारे त्या उत्पादित केल्या आहेत.
  • या तोफा ४० किमीच्या पल्ल्यापर्यंत (आयात बोफोर्स तोफांपेक्षा ११ किमी अधिक) अचूक मारा करू शकतात. एका मिनिटाला ८ तोफगोळे डागण्याची तिची क्षमता आहे.
  • या तोफांमधील ८१ टक्के भाग स्वदेशी आहेत. २०१९ अखेरपर्यंत हे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत वाढविले जाणार आहे.
  • हल्ल्याची अचूकता व गती वाढविण्यासाठी आणि विविध प्रकारच्या दारुगोळासह सुसंगतता प्रदान करण्यासाठी धनुष इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे.
  • या प्रत्येक तोफेची किंमत १४.५० कोटी रुपये आहे. यात ऑल-इलेक्ट्रिक ड्राइव्ह, उच्च गतिशीलता, वेगवान उपयोजन, स्वयंचलित कमांड, नियंत्रण प्रणाली असे अनेक महत्त्वपूर्ण उपकरणे आहेत.
भारतीय आयुध निर्मिती कारखाने
  • भारतीय आयुध निर्मिती कारखाने (ऑर्डनन्स फॅक्टरीज) ही ४१ आयुध निर्मिती कारखान्यांचा समूह असून, त्याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.
  • हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. या कारखान्यांमध्ये स्वदेशी संरक्षण उपकरणे व हार्डवेअर तयार केले जातात.
  • सशस्त्र सेनांना स्वदेशी निर्मित शस्त्रे उपलब्ध करुन देणे व या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणे हा ऑर्डनन्स फॅक्टरीजचा मुख्य उद्देश आहे.

मेरी कोम प्युमा कंपनीची ब्रॅण्ड अँबेसेडर

  • सहा वेळा विश्वविजेतेपद जिंकणारी भारतीय बॉक्सर एम सी मेरी कोमला प्युमा या कंपनीने ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
  • तिची निवड २ वर्षांकरिता झाली असून, महिला प्रशिक्षण श्रेणीमध्ये ती कंपनीची ब्रॅण्ड अँबेसेडर असेल.
मेरी कोम
  • मेरी कोम आघाडीची भारतीय बॉक्सिंगपटू आहे. तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपूरमधील दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा झाला.
  • मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पधेचे विजेतेपद विक्रमी ६ वेळा जिंकले आहे. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर ६ सुवर्ण व १ रौप्य पदक जमा आहे.
  • नोव्हेंबर २०१८मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
  • लंडन ऑलिंपिक (२०१२) स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या स्पर्धेतील फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. बॉक्सिंगमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
  • २०१४च्या इंचिऑन आशियाई स्पर्धेमध्ये मेरी कोमने सुवर्णपदक जिंकले होते. २०१७मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
  • २०१३साली तिचे ‘अनब्रेकेबल’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते.
  • २०१४साली तिच्या जीवनावर आधारित ‘मेरी कोम’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
  • तिच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तिला पद्मश्री (२००६), पद्मभूषण (२०१३), अर्जुन पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

निधन: प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह

  • प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ९३ वर्षाचे होते.
  • नामवर सिंह यांचा जन्म २८ जुलै १९२६ रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले.
  • विविध विद्यापीठांमध्ये प्रदीर्घ काळ अध्यापन केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
  • त्यांनी कम्युनिस्ट पार्टीतर्फे १९५९मध्ये चकिया-चंदौली मतदारसंघामधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
  • प्रेमचंद और भारतीय समाज, छायावाद- प्रसाद, निराला, महादेवी और पंत, काशी के नाम, इतिहास और आलोचना, दूसरी परंपरा की खोज अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
  • पण ‘कविता के नए प्रतिमान’ हा त्यांचा ग्रंथ हिंदी समीक्षेतील मैलाचा दगड मानला जातो.
  • त्यांना १९७१ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्याना शलाका सम्मान, साहित्य भूषण सम्मान, कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशमध्ये देशातील पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा

  • आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहरात देशातील पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा (डीस्ट्रीक्ट कूलिंग सिस्टम) सुरु करण्यात येणार आहे.
  • यासाठी आंध्रप्रदेश सरकारने संयुक्त अरब अमिरातमधील आंतरराष्ट्रीय शीतकरण प्रदाता, नॅशनल सेंट्रल कूलिंग कंपनीसह (तबरिद) ३० वर्षांच्या सवलत कराररावर स्वाक्षरी केली आहे.
  • जिल्हा शीतकरण यंत्रणा एका केंद्रीय प्लांटममध्ये अतिथंड किंवा गरम पाणी तसेच वाफ निर्माण करते. त्यांनतर ही उर्जा इमारतींना वातानुकीत यंत्रांसाठी, पाणी गरम करण्यासाठी पुरविली जाते.
  • या कराराअंतर्गत २०,००० रेफ्रिजरेशन टनची शीतकरण क्षमता विकसित केली जाईल. ही भारताची पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा असेल. हा प्रकल्प २०२१ पासून सेवा पुरविणार आहे.
  • इतर शीतकरण प्रणालींच्या तुलनेत, जिल्हा शीतकरणासाठी फक्त ५० टक्के ऊर्जा वापरते, यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होते.
  • ही जिल्हा शीतकरण यंत्रणा आंध्रप्रदेश सरकारच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकासांसह रोजगार निर्मिती आणि गृहनिर्मितीच्या लक्ष्याचा एक भाग आहे.
  • राज्याचे सभागृह, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर सरकारी इमारती ज्यांचे बांधकाम सध्या सुरु आहे, अशा ठिकाणी ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे आणि २०२१पासून सेवा पुरविणार आहे.

अब्दुल अझीझ मुहमत मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार

  • सुदानी शरणार्थी अब्दुल अझीझ मुहमत यांना २०१९चा मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • ऑस्ट्रेलियन सरकारच्या क्रूर निर्वासित धोरणाचा खुलासा करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहकारी शरणार्थींच्या परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य अब्दुल अझीझने केले आहे.
  • शरणार्थींच्या समस्यांसाठी कार्य करणाऱ्या व स्वतःच्याच मानवाधिकारांचे हनन झालेल्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • ऑस्ट्रेलियाने २०१३मध्ये त्यांची बोट ताब्यात घेतली होती. तेव्हापासून त्यांना पापुआ न्यू गिनी येथील मॅनस बेटावर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्विस व्हिसा मिळाल्यानंतर त्यांना बेट सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार
  • ब्रिटिश मानवाधिकार कार्यकर्ते व नोबेल शांतता पुरस्कार विजेते मार्टिन एन्नल्स यांच्या नावे हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
  • त्यांचा जन्म २७ जुलै १९२७ रोजी स्टॅफोर्डशायर, इंग्लंड येथे झाला. १९६८ ते १९८० पर्यंत ते अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे महासचिव होते.
  • त्यांच्या कार्यकाळात ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला शांततेचा नोबेल पुरस्कार, इरॅस्मस प्राइज आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गुजरातमध्ये तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना

  • तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी गुजरात सरकारने एक विशेष मंडळ स्थापन केले आहे.
  • हे तृतीयपंथीय कल्याण मंडळ तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी विशेष योजना सुरू करु शकते. ते तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी कार्य करेल.
  • या मंडळाचे अध्यक्ष राज्याचे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री असतील. या मंडळात १६ सदस्य असतील, ज्यामध्ये प्रत्यकी २ महिला व पुरुष तृतीयपंथीय व्यक्ती, तसेच २ किन्नर समुदायाचे सदस्य असतील. उर्वरित सदस्य गैर-सरकारी संस्था आणि सरकारी अधिकारी असतील.
  • सर्वोच्च न्यायालयने २०१४मध्ये तृतीयपंथीयांना तिसरे लिंग म्हणून घोषित केले होते व सर्व राज्यांना तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
  • याशिवाय तृतीयपंथीयांना इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्यासही सांगितले होते, त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणही मिळू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा