चालू घडामोडी : ४ फेब्रुवारी

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकविरुद्ध प्रतिबंधात वाढ

  • मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक देशाविरुद्ध प्रतिबंध वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने प्रस्तावाचा (प्रस्ताव क्र. २४५४) स्वीकार केला आहे.
या प्रस्तावातील ठळक मुद्दे
  • या प्रस्तावावाद्वारे मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकवरील प्रतिबंध एक वर्षासाठी वाढविण्यात आले आहेत.
  • हा प्रस्तावाद्वारे शस्त्रास्त्रे आयातीवर बंदी, प्रवासावरील बंधने आणि गोठवलेल्या मालमत्ता यांचा कालावधी ३१ जानेवारी २०२०पर्यंत वाढविण्यात आली आहेत.
  • सुरक्षा परिषदेला या प्रतिबंधांच्या अंमलबजावणीसाठी मदत करणाऱ्या तज्ञांच्या पॅनेलची मंजूरी २९ फेब्रुवारी २०२०पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  • एप्रिल २०१९पर्यंत शस्त्रास्त्रे आयातीवर प्रतिबंधांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते.
मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकविरुद्ध प्रतिबंध
  • मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमधील मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातील हिंसाचाराची समस्या अतिशय गंभीर आहे. ही हिंसा धर्म आणि जातीयतेवर आधारित आहे.
  • २०१३मध्ये मुस्लिम बंडखोरांनी ख्रिश्चन राष्ट्रपतीला पदावर हटवून सत्तेवर कब्जा केला होता. त्याविरोधात अँटी बलाका बंडखोरांनी लढा सुरू केला.
  • यामध्ये हजारो लोकांचा यात मृत्यू झाला आणि असंख्य लोकांना घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले. परिणामी यातील बरेच लोक चाड आणि कॅमेरून देशांमध्ये गेले.
  • केंद्रीय अफ़्रीकी प्रजासत्ताक मधील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अराजकतेची स्थिती लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने २०१३मध्ये २१२७ प्रस्ताव मसुदा मंजूर केला. या प्रस्तावाद्वारे मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमधील शस्त्र व्यापारावर प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींचा जम्मू-काश्मीर दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जम्मू-काश्मीर भेटीदरम्यान खालील विकास कार्यांचे उद्घाटन केले.
  • विजयपुर (जम्मू) आणि अवंतीपोरा (श्रीनगर) येथे २ एम्सची पायाभरणी केली.
  • जम्मूच्या भारतीय जन संचार संस्थेच्या उत्तरी क्षेत्रीय केंद्राच्या कॅम्पसची पायाभरणी केली.
  • लडाखमधील पहिले विद्यापीठ ‘लडाख विद्यापीठ’ सुरू केले.
  • राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानांतर्गत अनेक प्रकल्पांचे अनावरण केले.
  • किश्तवार, कुपवाडा आणि बारामुल्ला येथे ३ मॉडेल डिग्री महाविद्यालयांची पायाभरणी केली.
  • केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
  • किश्तवारच्या चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या ६२४ मेगावॅट क्षमतेच्या किरू जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली.
  • त्यांनी ९ मेगावॅट क्षमतेच्या दाह जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले.
  • त्यांनी ४०० केव्ही डीसी जालंधर-सांबा-राजौरी-शोपियान-अमरगड (सोपोर) आणि २२० केव्ही श्रीनगर-अलुस्तेंग-द्रास-ल्कार्गील-लेह या ट्रान्समिशन लाइनचे उद्घाटन केले.
  • त्यांनी सजवलमध्ये चिनाब नदीवर बांधल्या जाणाऱ्या १६४० मीटरच्या दुहेरी लेनच्या पुलाची पायाभरणी केली.
मोदींकडून दोन एम्सची पायाभरणी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील विजयपुर (जम्मू) आणि अवंतीपोरा (श्रीनगर) येथे २ एम्सची पायाभरणी केली.
  • हे एम्स राज्यातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देतील. या एम्समध्ये ७०० खाटांची व्यवस्था केली जाईल. यासाठी ७५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
  • एम्स (AIIMS): ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
  • एम्स ही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अधिनियम १९५६अंतर्गत स्थापन करण्यात आलेली स्वायत्त संस्था आहे. एम्सला राष्ट्रीय महत्वाची संस्था घोषित करण्यात आले आहे.
  • एम्समध्ये अवलंब करण्यात आलेल्या पद्धती आणि शैक्षणिक तत्त्वे देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
एम्सची उद्दिष्टे
  • सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि भारतातील इतर संबंधित संस्थांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उच्च राखण्यासाठी सर्व शाखांमध्ये पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची अध्यापनाचा आकृतीबंध विकसित करणे.
  • आरोग्य क्षेत्रातील सर्व महत्वाच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा एकाच ठिकाणी एकत्र आणणे.
  • पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे.
एम्सची कार्ये
  • वैद्यकीय व संबंधित भौतिक जैविक शास्त्रांमध्ये पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण देणे.
  • नर्सिंग आणि दंत चिकित्सा शिक्षण देणे.
  • शिक्षणामध्ये नवकल्पना विकसित करणे.
  • देशासाठी वैद्यकीय शिक्षक तयार करणे.
  • वैद्यकीय आणि संबंधित विज्ञान क्षेत्रात संशोधन करणे.
  • आरोग्य सेवा पुरविणे. (प्रतिबंधात्मक, प्रोत्साहक आणि उपचारात्मक; प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयांश अशा सर्व सेवा.)
  • समुदाय आधारित शिक्षण आणि संशोधनास चालना देणे.

आयएनएफ संधीचे रशियाकडून निलंबन

  • इंटरमीडिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस संधीमधून (ट्रीटी) अमेरिकेने माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आता रशियानेही या संधीचे निलंबन केले आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच रशियासोबत ३ दशकांपूर्वी केलेल्या या संधीमधून विलग होण्याची घोषणा केली होती. शीतयुद्धादरम्यान या संधीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
इंटरमीडिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस (INF) संधी
  • ही एक महत्त्वपूर्ण संधि होती. डिसेंबर १९८७मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन आणि सोव्हिएत युनियनचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव यांनी या ठरावावर स्वाक्षरी केली होती.
  • याद्वारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियनवर ५०० ते ५००० किमी पल्ला असलेल्या जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्रांची निर्मिती व चाचणी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते.
  • या संधीद्वारे सर्व आण्विक आणि पारंपरिक क्षेपणास्त्रांच्या (ज्यांची मारा करण्याची क्षमता ५०० ते १००० किमी व १००० ते ५५०० किमी) लाँचवर बंदी घालण्यात आली होती.
  • यामधून हवेतून आणि पाण्यातून मारा करणाऱ्या ५०० ते ५००० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना वगळण्यात आले होते.
  • या संधीअंतर्गत अमेरिका आणि रशियाने अनुक्रमे ८४६ आणि १८४६ क्षेपणास्त्रे नष्ट केली.
  • या संधीने २ महाशक्तींमधील शस्त्र निर्मितीच्या शर्यतीला आळा घातला. तसेच युरोपमधील अमेरिकेच्या नाटो सहकाऱ्यांचे रशियाच्या आक्रमणापासून संरक्षणही केले.
  • युरोपमध्ये स्थिरता आणण्यासाठी ही संधी तयार करण्यात आली होती.
संधीमधून माघार घेण्याचे कारण
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया या कराराचा भंग करत असल्याचा आणि यापूर्वीही रशियाने अनेक वेळा या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
  • रशियाने त्यांचे कथित क्षेपणास्त्र नोवातोर ९एम७२९ (एसएससी-८) विकसित आणि तैनात केल्याची माहिती समोर आल्यानंतर हे आरोप करण्यात आले. हे क्षेपणास्त्र अल्पावधीतच युरोपवर हल्ला करण्यास सक्षम आहे.
  • बराक ओबामा यांनीही २०१४मध्ये आपल्या कार्यकाळात हा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु रशियाने या आरोपांचे खंडन करत, अमेरिकेवर युरोपमध्ये मिसाईल सिस्टम स्थापन केल्याचा आरोप केला होता.
परिणाम
  • या संधीचे निलंबन करण्यात आल्यामुळे आता अमेरिका प्रशांत महासागर क्षेत्रातील चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्यासाठी नवीन अण्वस्त्रे विकसित करू शकते.
  • यामुळे रशिया व अमेरिका यांच्यामध्ये पुन्हा शस्त्र निर्मितीसाठी स्पर्धा सुरु होण्याची शक्यता आहे.

४ फेब्रुवारी: जागतिक कर्करोग दिन

  • दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.
  • कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंध, निदान आणि उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मदतीने जागतिक कर्करोग दिन साजरा करत आहे.
  • जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेने ‘आय एम अँड आय विल’ (I Am and I Will) ही ३ वर्षीय (२०१९-२०२१) मोहीम सुरु केली आहे.
  • अधिकाधिक लोकांना कर्करोगाविषयी जागरुक करणे आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी कार्य करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे.
जगातील कर्करोगाचा प्रभाव
  • २०१८मध्ये जगातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे १८.१ दशलक्ष होती. याच वर्षी कर्करोगाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या सुमारे ९.६ दशलक्ष होती.
  • जगात साधारणतः सरासरी ५ पुरुषांपैकी एका पुरुष आणि ६ महिलांपैकी एका महिला कर्करोगग्रस्त आहे.
  • तसेच जगातील ८ पैकी एका पुरुषाचा व ११ पैकी एका महिलेचा मृत्यू कर्करोगामुळे होतो.
  • भारतात कर्करोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या अंदाजे २.२५ दशलक्ष आहे. भारतात दरवर्षी सुमारे १ लाख नवे कर्करोग रुग्ण आढळतात. २०१८मध्ये कर्करोगामुळे भारतात ७ लाख लोकांचा मृत्यू झाला.
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंदाजानुसार २०२०पर्यंत भारतात १७ लाख नवे कर्करोगाचे रुग्ण आढळतील तर कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ७ लाखांवर पोहचेल.
  • कर्करोगाशी लढण्यासाठी योग्य पावले उचलण्यात आली नाही तर २०४०पर्यंत कर्करोगग्रस्तांची संख्या ३० दशलक्षपर्यंत पोहोचू शकते.
  • कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून देशभरात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम १९७५-७६पासून राबवविला जात आहे. प्रतिबंध, निदान, उपचार आणि पुनर्वसन हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना
  • युआयसीसी: युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल
  • स्थापना: १९३३
  • मुख्यालय: जिनीव्हा (स्वित्झर्लंड)
  • ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी संघटना आहे. जगभरात १५५ देशांमधील ८०० संस्था या संघटनेच्या सदस्य आहेत.
  • जगातील प्रमुख कर्करोग संस्था, आरोग्य मंत्रालये, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्णाचे समूह या संघटनेचे सदस्य आहेत.
  • ही गैर-सरकारी संघटना जागतिक आरोग्य समुदायाला कर्करोगाविरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्यास मदत करते.
  • या संघटनेचे ध्येय: जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी कर्करोग समुदायाला एकत्र आणणे, जागतिक आरोग्य व विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी समानतेला प्रोत्साहन देणे व कर्करोग नियंत्रण एकीकृत करणे.

मिताली राज: २०० वन-डे खेळणारी पहिली महिला

  • भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज २०० एकदिवसीय क्रिकेटसामने खेळणारी पहिली महिला ठरली आहे.
  • हॅमिल्टनमध्ये १ जानेवारी पार पडलेला न्यूझीलंड विरुध्दचा तिसरा सामना मिताली राजचा २००वा एकदिवसीय सामना होता.
  • भारतीय महिला संघाने आतापर्यंत खेळलेल्या एकूण २१३ सामन्यांपैकी १३ सामने वगळता सर्व सामन्यांमध्ये मितालीचा संघांत समावेश होता. गेली १९ वर्षे २१८ दिवस; इतका प्रदीर्घ काळ ती भारतीय संघात खेळतेय.
  • मितालीने २०० एकदिवसीय सामन्यात ७ शतकांसह ५१.६६ च्या सरासरीने ६ हजार ६२२ धावा केल्या आहेत.
  • मितालीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जून १९९९मध्ये आर्यलंडविरुद्धच्या सामन्यात पदापर्ण केले होते. कर्णधार म्हणून हा तिचा १२३वा सामना होता. हादेखील एक जागतिक विक्रम आहे.
  • मागील वर्षी तिने इंग्लंडची माजी कर्णधारी चार्लोट एडवर्डसचा १९१ एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढला होता.
मितालीच्या नावावरील इतर विक्रम
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६,६२२ धावांचा विक्रम.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६,००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू.
  • टी-२० क्रिकेटमध्ये २,००० धावा करणारी पहिली भारतीय (महिलाच नाही तर पुरुष क्रिकेटपटूतही तीच अव्वल आहे.)
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ७ अर्धशतके झळकावणारी पहिला खेळाडू.
  • महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके.
  • आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या २ अंतिम सामन्यांमध्ये (२००५ व २०१७) भारताचे कर्णधारपद भूषविणारी एकमेव खेळाडू.
  • २००३मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५मध्ये पद्मश्री व २०१७मध्ये युथ स्पोर्ट्स आयकॉन ऑफ एक्सिलेन्स पुरस्काराने सन्मानित.

तुलसी गब्बार्ड यांचा राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रचार सुरु

  • पहिल्या हिंदू अमेरिकन महिला काँग्रेस सदस्य तुलसी गब्बार्ड यांनी २०२०च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुक लढणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
  • या निवडणुकीसाठी त्यांनी अमेरिकेतील हवाई या शहरातून औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
  • एलिझाबेथ वॉरेन यांच्यानंतर डेमोक्रेटीक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या तुलसी गब्बार्ड या दुसऱ्या महिला उमेदवार ठरणार आहेत.
  • २०२०च्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी १२ पेक्षा अधिक डेमोक्रेटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. मात्र तुलसी गब्बार्ड या अमेरिकन नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
  • डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार निवडण्यासाठी प्राथमिक मतदानास फेब्रुवारी २०२०मध्ये इवोहा राज्यातून सुरुवात होईल. उमेदवाराची अंतिम निवड त्या वर्षीच्या उन्हाळ्यात पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात होईल.
तुलसी गब्बार्ड
  • तुलसी या हिंदू आहेत पण भारतीय नाहीत. तुलसी गबार्ड यांचा जन्म १२ एप्रिल १९८१मध्ये अमेरिकेतील समोआ येथे एका कॅथलिक परिवारात झाला.
  • माईक गबार्ड आणि कॅरल पोर्टर हे त्यांचे आई-वडील होते. त्यांच्या आईने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.
  • त्यांनी हवाई पॅसिफिक युनिव्हसिटीतून सायन्स इन बिजनेस ॲडमिनची पदवी संपादन केली आहे.
  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या त्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत.
  • २००२मध्ये वयाच्या २१व्या वर्षी पहिल्यांदा अमेरिकन प्रतिनिधीगृहात निवडून येत त्या अमेरिकेतील सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.
  • तसेच अमेरिकन प्रतिनिधीगृहात भगवद्‌गीतेवर हात ठेवून पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्याच अमेरिकन राजकारणी आहेत.
  • त्या भारतीय नसल्या तरी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अमेरिकत भारतीय-अमेरिकन संप्रदाय अतिशय प्रभावशाली मानला जातो.
  • अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये गेल्या ६ वर्षांपासून हवाई बेट क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत.
  • त्या हवाई प्रांतातून सलग २ वेळा (२०१२ व २०१६) अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.
  • तुलसी हवाई राज्यातून एकूण ४ वेळा जिंकून आल्या असून, प्रत्येक वेळेला विक्रमी मतांनी त्या यशस्वी झाल्या आहेत.
  • राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या सैन्यात होत्या. सैन्याकडून त्या १२ महिने इराकमध्ये तैनात होत्या.

जर्मनी, फ्रांस व युकेची इंस्टेक्स पेमेंट यंत्रणा

  • जर्मनी, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डमने इराणसह इंस्टेक्स (INSTEX) नामक पेमेंट यंत्रणा सुरू केली आहे.
  • याच्या सहाय्याने इराणवर अमेरिकेचे निर्बंध असतानाही युरोपियन कंपन्यांना इराणसोबतचा व्यापार सुरु ठेवता येईल.
  • इंस्टेक्सचे पूर्ण रूप इंस्ट्रूमेंट ईन सपोर्ट ऑफ एक्सचेंज असे आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून इराण युरोपियन कंपन्यांसह व्यापार करू शकेल.
  • या यंत्रणेची नोंदणी ३००० युरो भांडवलासह फ्रान्समध्ये करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या पर्यवेक्षक मंडळात जर्मनी व फ्रांसचे सदस्य आहेत तर युकेकडे या मंडळाचे अध्यक्षपद आहे.
  • इंस्टेक्स कार्यरत होण्यासाठी इराणला देखील याचप्रकारची स्वतःची समांतर यंत्रणा सुरु करावी लागणार आहे.
  • भविष्यात इराणसोबत व्यापार करू इच्छिणारे इतर देशही इंस्टेक्स यंत्रणेचा वापर करू शकतील.
अमेरिकेचे इराणवर निर्बंध
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मे २०१८मध्ये इराणबरोबर २०१५साली झालेल्या अणू करारातून (संयुक्त व्यापक कृती योजना) माघार घेत इराणवर निर्बंध लादले होते.
  • या करारानुसार, इराणवर संयुक्त राष्ट्रे, अमेरिका व युरोपियन युनियनने लावलेले निर्बंध हटविण्याच्या मोबदल्यात इराणने आपल्या आण्विक उपक्रमांवर अंकुश लावण्याचे आश्वासन दिले होते.
  • अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली व या कराराच्या इतर पक्षांनी (चीन, रशिया, युके, फ्रांस, जर्मनी) यांनी या कराराप्रती आपल्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला होता.
इराण ट्रेड प्रमोशन प्लान
  • युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनीने सादर केलेला इराण व्यापार प्रोत्साहन योजनेचा प्रस्ताव म्हणजे इराण अणुकरार वाचविण्यासाठीचा या देशांचा प्रयत्न आहे.
  • या योजनेअंतर्गत, देयके स्वीकारण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकलचा वापर केला जाईल.
  • यामुळे इराण आणि युरोपियन कंपन्यांमध्ये व्यापार करताना थेट निधी हस्तांतरण करण्याऐवजी त्याबदल्यात तेलाची आयात अथवा परवानगी असलेल्या खाद्य व औषधांसारख्या वस्तूंचा व्यापार केला जाईल.
  • थेट निधी हस्तांतरण थेट निधी हस्तांतरण न झाल्यामुळे अमेरिकेला त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड लादता येणार नाही.
  • या योजनेमुळे इराणशी व्यापार करण्यास इच्छुक असलेल्या युरोपातील कंपन्यांना अमेरिकी निर्बंधांपासून संरक्षण मिळेल.

इराणकडून होवेईझेह क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • इराणने होवेईझेह (Hoveizeh) या दीर्घ पल्ल्याच्या क्रुझ क्षेपणास्त्राची २ फेब्रुवारी रोजी इस्लामिक क्रांतीच्या ४०व्या स्मृतिदिनानिमित्त यशस्वी चाचणी घेतल्याची घोषणा केली.
  • होवेईझेह हे सौमार क्षेपणास्त्र प्रकारातील क्रुझ क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला सुमारे १३५० किमी (८४० मैल) आहे. जमिनीवरील लक्ष्याचा भेद करण्यासाठी हे विकसित करण्यात आले आहे.
  • इराणच्या एरोस्पेस इंडस्ट्रीज ऑर्गनायझेशनने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी वेळात डागण्यास तयार केले जाऊ शकते, तसेच अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करू शकते.
१९७९ची इस्लामिक क्रांती
  • ही इराणमध्ये १९७८-७९ दरम्यान घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना होती. या क्रांतीमुळे राजतंत्राऐवजी इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली.
  • इराणी जनतेने केलेल्या या क्रांतीदरम्यान १९२५पासून चालू असलेली पेहलवी घराणेशाही बरखास्त केली गेली व मोहम्मद रझा पेहलवी या इराणच्या शेवटच्या शहाचे राजतंत्र संपुष्टात आले.
  • अमेरिका व ब्रिटनच्या पाठिंब्यावर १९४१सालापासून इराणच्या शहापदावर असलेल्या मोहम्मद रझा पेहलवीविरुद्ध ऑक्टोबर १९७७ साली बंडाला सुरू झाली.
  • १९७८ साली या चळवळीने देशव्यापी स्वरूप घेतले आणि अनेक संप व निदर्शनांमुळे इराणचे कामकाज व अर्थव्यवस्था ठप्प झाली.
  • घाबरलेल्या पेहलवीने १६ जानेवारी १९७९ रोजी देशामधून पळ काढला आणि १९६३ पासून देशाबाहेर हकालपट्टी झालेल्या रुहोल्ला खोमेनीने १ फेब्रुवारी १९७९ रोजी पुन्हा इराणमध्ये प्रवेश केला.
  • ११ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या चकमकीत बंडखोरांनी विजय मिळवून शहाची सत्ता संपुर्णपणे संपुष्टात आणली.
  • डिसेंबर १९७९ मध्ये रुहोल्ला खोमेनीची इस्लामिक अयातुल्ला (सर्वोच्च पुढारी) ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
  • त्यानंतर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून अबोलहसन बनीसद्र इराणचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
  • इराणी क्रांतीनंतर अमेरिका व इराणदरम्यान असलेले संबंध संपुष्टात आले. इराण-इराक युद्धाच्या कारणांपैकी इराणी इस्लामिक क्रांती हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा