चालू घडामोडी : ०६ ऑक्टोबर

भारत-रशिया दरम्यान झालेले ८ करार

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यात झालेले ८ सामंजस्य करार.
  1. भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २०१९-२३ या काळासाठी सल्लामसलतीसाठी करार.
  2. रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यात सामंजस्य करार.
  3. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि फेडरल स्पेस एजन्सी, रशिया (ROSCOSMOS) यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार.
  4. भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार.
  5. आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा.
  6. परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार.
  7. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार.
  8. खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (आरडीआयएफ), आणि पीजेएससी फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्यात करार.

बिहारमध्ये स्थापन होणार राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र

  • बिहारमधील पटना विद्यापीठातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.
  • हे भारत आणि आशियामधील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र असेल. डॉल्फिन दिन म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी यासंबंधी घोषणा करण्यात आली.
  • डॉल्फिनची संख्या सतत कमी होत असल्याने, डॉल्फिन संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.
  • देशातील डॉल्फिनची संख्या सुमारे ३००० आहे. त्यापैकी अर्धे डॉल्फिन बिहार राज्यात आहेत.
गंगा नदीतील डॉल्फिन
  • गंगा नदीतील डॉल्फिन जगातील ताज्या (गोड्या) पाण्यात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या ४ प्रजातींपैकी एक आहेत. त्याचे शास्त्रीय नाव प्लॅटानिस्टा गॅंगेटिका आहे.
  • हे डॉल्फिन भारताव्यतिरिक्त यांगत्जी नदी, पाकिस्तानची सिंधू नदी आणि अमेझॉन नदीमध्ये आढळतात.
  • गंगा नदीत आढळणारे डॉल्फिन भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारत, नेपाळ आणि बांग्लादेशात गंगा नदीतील डॉल्फिन आढळतात.
  • हे डॉल्फिन जवळजवळ अंध असतात. शिकार शोधण्यासाठी, धोक्यापासून बचावासाठी ते अल्ट्रासॉनिक ध्वनिलहरींचा वापर करतात.
  • हे डॉल्फिन सहसा ५-८ मीटर खोल पाण्यात राहतात, जेथे त्यांना खाण्यासाठी पुरेसे मासे मिळतात.
धोका आणि संरक्षण
  • यांना माशांच्या जाळ्यात अडकण्याचा, तेल व मांसासाठी शिकारीचा आणि कृषी व औद्योगिक रसायनांमुळे होणाऱ्या जल प्रदूषणाचा धोका आहे.
  • नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमुळे या डॉल्फिन्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या धरणांमुळे डॉल्फिन्स विखुरले जातात आणि त्यामुळे त्यांच्या प्रजननाचा दर कमी होत आहे.
  • भारतीय वन्यजीवन (संरक्षण) कायदाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये गंगा नदीतील डॉल्फिनचा समावेश करण्यात आला आहे.
  • आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटनेनेही (आययूसीएन) या डॉल्फिनला लुप्तप्राय प्रजाती घोषित केली आहे.
  • १९९७मध्ये पर्यावरण मंत्रालयाने गंगा नदी संरक्षणाचा कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये या डॉल्फिनच्या संख्येसाठी वैज्ञानिक डेटाबेस तयार करण्याची योजना आखण्यात आली.
  • बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात विक्रमशिला गंगेटिक डॉल्फिन अभयारण्य आहे. तो देशातील एकमेव डॉल्फिन अभयारण्य असून, ते गंगा नदीत ५० किमीहून अधिक भागात पसरलेले आहे.

निधन: नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ. लियोन लेडरमन

  • गॉड पार्टिकल म्हणजेच हिग्ज बोसॉनच्या संशोधनात महत्वपूर्ण कार्य करणारे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ. लियोन लेडरमन यांचे ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.
  • हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकीत १९६४ मध्ये वर्तवण्यात आले होते.
  • जगभरातील अनेक वैज्ञानिक यासाठी काम करीत होते. डॉ. लियोन लेडरमन हे त्यातील एक होते.
डॉ. लियोन लेडरमन
  • लियोन यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर रसायनशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले.
  • दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ३ वर्षे त्यांनी अमेरिकी सैन्यात काढली. या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास सुरू केला.
  • नंतर सैन्यदलातील नोकरी सोडून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी संशोधन करून पीएचडी मिळविली.
  • १९५८मध्ये ते याच विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले. २ वर्षांनंतर त्यांनी आधी फोर्ड फाऊंडेशनचे फेलो म्हणून २ वर्षे काम केले.
  • तेथून ते फर्मिलॅबचे संचालक बनले. विज्ञानविषयक चळवळीतही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
  • १९९१मध्ये लियोन हे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’चे अध्यक्ष बनले.
  • शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांच्या तुलनेत भौतिकशास्त्राला प्राधान्य मिळावे यासाठी काही शास्त्रज्ञांनी ‘फिजिक्स फर्स्ट’ ही स्वतंत्र चळवळ अमेरिकेत सुरू केली. लियोन हे त्यातील एक प्रमुख होते.
  • ‘द गॉड पार्टिकल’ हे त्यांचे पुस्तक तेव्हा जगभरात गाजले.
  • १९८८मध्ये म्यूऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. या शोधात मेल्विन श्वार्त्झ व जॅक स्टीनबर्गर हेही सहभागी असल्याने या तिघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
  • याशिवाय त्यांना वूल्फ पारितोषिक, अर्नेस्ट ओ लॉरेन्स पदक असे अनेक प्रतिष्ठेचे मानसन्मान मिळाले.
  • अखेरच्या काळात त्यांना असाध्य रोगाने ग्रासले. यावरील उपचार खूपच महागडे असल्याने शेवटी त्यांना हा खर्च भागवण्यासाठी नोबेल पारितोषिकाचे पदकही विकावे लागले.
हिग्ज बोसॉन
  • हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. त्याला देवकण (गॉड पार्टिकल) असेही म्हणतात.
  • हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्यावरून ठेवण्यात आले आहे. कलकत्त्यातल्या बोस यांचे हे मूलकण शोधण्यात मूलभूत योगदान आहे.
  • डॉ. पीटर हिग्ज आणि फ्रँकस एंग्लर्ट यांनी या हा कण अस्तित्वात असावा असे भाकित १९६४मध्ये केले गेले होते.
  • ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले.
  • या कणांचा शोध लावणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज आणि बेल्जियमचे फ्रँकस एंग्लर्ट या शास्त्रज्ञांना २०१३चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

युएन निशस्त्रीकरण परिषदेसाठी पंकज शर्मा स्थायी प्रतिनिधी

  • संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून पंकज शर्मा यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते अमरदीप गिल यांची जागा घेतील.
  • पंकज शर्मा सध्या परराष्ट्र मंत्रालयातील निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण परिषद
  • स्थापना: १९८४
  • मुख्यालय: जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
  • सदस्य: ६५ देश
  • हा एक बहुराष्ट्रीय मंच आहे आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे शस्त्रांच्या वापरावरील नियंत्रण आणि निशस्त्रीकरण यासाठी वाटाघाटी केली जाते.
  • संयुक्त राष्ट्रांपासून जरी हा मंच स्वतंत्र असला तरीही इतर अनेक माध्यमातून तो संयुक्त राष्ट्रांशी जोडलेला आहे. हा मंच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला दरवर्षी त्याच्या कामाचा अहवाल सादर करतो.
  • जिनिव्हामधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाचे संचालक हे या मंचाचे पदसिद्ध सरचिटणीस असतात.

रेल्वे मंत्रालयाला स्वच्छता पंधरवड्यातील योगदानासाठी पुरस्कार

  • केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला स्वच्छता पंधरवड्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या श्रेणीमधील योगदानासाठी पुरस्कृत करण्यात आले.
  • सरकारी कार्यालये आणि आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने हा उपक्रम राबविला होता.
  • स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्धापन दिnaच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाला हा पुरस्कार देण्यात आला.
  • लोकांना शौचालय बांधणी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने २०१७मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
स्वच्छ भारत अभियान
  • भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेला हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
  • महात्मा गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी २ ऑक्टोबर २०१४ रोजी या मोहिमेची सुरूवात झाली.
  • भारताच्या शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला.
  • स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.
  • स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.
  • ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.

मध्यप्रदेशात राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्थेच्या स्थापनेस मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था मध्यप्रदेशमधील सिहोर जिल्ह्यात उभारण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी ही संस्था भोपाळ येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात देशात अशा प्रकारे उभारण्यात येणारी ही पहिली संस्था असेल.
  • या संस्थेची स्थापना सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६०च्या अंतर्गत केली जाईल. ही संस्था दिव्यांग सशक्तीकरण विभागांतर्गत काम करेल.
  • मानसिक आजार ग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी धोरण तयार करणे, मानसिक आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक संशोधनास चालना देणे, ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.
  • या संस्थेत मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात १२ अभ्यासक्रमांमध्ये डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल इत्यादी पदव्या प्रदान करण्यात येतील.
  • या संस्थेमुळे मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात मानव संसाधन आणि संशोधन क्षमता उभारणीला मदत होणार आहे.

संजय वर्मा स्पेनमधील भारताचे नवीन राजदूत

  • स्पेनमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संजय वर्मा १९९०च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
  • याव्यतिरिक्त अरिंदम बागची यांची क्रोएशिया प्रजासत्ताकमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. ते १९९५च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत.

दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रध्यक्ष ली म्यूंग बाक यांना शिक्षा

  • दक्षिण कोरियाच्या सेऊलस्थित न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्रध्यक्ष ली म्यूंग बाक यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
  • ली म्यूंग बाक २००८ ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्रध्यक्ष होते. तुरुंगवासाची शिक्षा झालेले ते दक्षिण कोरियाचे चौथे राष्ट्रध्यक्ष आहेत.
  • त्यांची उत्तराधिकारी आणि दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष पार्क ग्युन-हे यांनासुद्धा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
  • ली म्यूंग बाक यांच्यावर सॅमसंग आणि इतर मोठ्या कंपन्यांकडून अवैधरित्या १० दशलक्ष डॉलर्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.
  • याव्यतिरिक्त, ली म्यूंग बाक खाजगी वाहन निर्मात्या कंपनीकडून २१.७७ दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याप्रकरणी दोषी आढळून आले आहेत.
  • १५ वर्षे तुरुंगवासाव्यतिरिक्त त्यांना १३ अब्ज वोन (दक्षिण कोरियाचे चलन) इतका दंडही ठोठाविण्यात आला आहे.
ली म्यूंग बाक
  • दक्षिण कोरियाचे राजनेता ली म्यूंग बाक यांचा जन्म १९ डिसेंबर १९४१ रोजी झाला. २००८ ते २०१३ दरम्यान ते दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष होते.
  • त्यापूर्वी ते ह्युंडाई अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. १ जुलै २००२ ते ३० जून २००६ दरम्यान ते सेऊलचे महापौर होते.
  • डिसेंबर २००७मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८.७ टक्के मते मिळाली. २५ फेब्रुवारी २००८ त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारला.
  • २२ मार्च २०१८ रोजी त्यांना भ्रष्टाचार, लाच, पदाचा दुरुपयोग आणि कर चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा