चालू घडामोडी : ११ ऑक्टोबर

नैसर्गिक आपत्तीमुळे भारताचे ५.८ लाख कोटींचे नुकसान

  • संयुक्त राष्ट्रांनी ‘आर्थिक नुकसान, गरिबी आणि आपत्ती: १९९८-२०१७’ या नावाने एक अहवाल प्रसिध्द केला.
  • या अहवालानुसार, हवामान बदलामुळे मागील २० वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भारताला ५.८ लाख कोटी रुपयांचे (७९.५ अब्ज डॉलर) आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
  • हा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती निवारण विभागाने तयार केला आहे.
  • यात हवामान बदलामुळे होणारे महत्वपूर्ण बदल किंवा मौसमी घटनांचे जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
अहवालातील ठळक मुद्दे
  • गेल्या २० वर्षांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे सुमारे ५.८ लाख कोटी रुपयांचे नुकसान.
  • १९९८ ते २०१७ दरम्यान हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे थेट होणाऱ्या नुकसानीत १५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
  • याचदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेचे २९०८ अब्ज डॉलरचे थेट नुकसान झाले आहे. हे मागील २ दशकात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत दुप्पट आहे.
  • एकूण आर्थिक नुकसानीत मोठ्या मौसमी घटनांमुळे होणारी हानी ७७ टक्के आहे. जी २२४५ अब्ज डॉलरच्या जवळ आहे.
  • यामध्ये अमेरिकेचे ९४४.८ अब्ज डॉलर, चीनचे ४९२.२ अब्ज डॉलर, जपानचे ३७६.३ अब्ज डॉलर आणि भारताचे ७९.५ अब्ज डॉलर नुकसान झाले आहे.
  • पूर, वादळ आणि भुकंपामुळे फ्रान्सला ४८.३ अब्ज डॉलर, जर्मनीला ५७.९ अब्ज डॉलर आणि इटलीला ५६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

११ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बालिका दिन

  • जगभरात ११ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
  • बालिकांच्या अधिकारांबद्दल जागृती पसरविणे आणि त्यांना शिक्षण, पोषण, आरोग्य सेवा, कायदेशीर अधिकार आणि भेदभावापासून संरक्षण प्रदान करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
  • जगात सुमारे २१ दशलक्ष बालिकांचा बालविवाह करण्यात येतो तर ६२ दशलक्ष मुली शिक्षणापासून वंचित आहेत.
  • अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि बालिकांशी संबंधित समस्यांविषयी जागरुकता पसरविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची संयुक्त राष्ट्रांनी केली होती. कॅनडाच्या मंत्री रोना एम्ब्रोस यांनी त्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.
  • संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९ डिसेंबर २०११ रोजी हा प्रस्ताव मंजूर केला व ११ ऑक्टोबर २०१२ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.

आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर

  • आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. ते लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत.
  • मुख्तार डिसेंबर २०१६पासून आयएसआयचे प्रमुख होते. ते २५ ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर मुनीर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील.
  • मुनीर यांना काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती दिली होती.
  • लष्करासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हिलाल-ए-इम्तियाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आयएसआय
  • स्थापना: १ जानेवारी १९४८
  • मुख्यालय: इस्लामाबाद
  • इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे.
  • पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी मुख्य सत्ताकेंद्र हे लष्कर आणि आयएसआयच आहे.
  • पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये आयएसआयची भूमिका महत्वाची असते.
  • आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा हात आहे. काश्मीरसह भारताच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी आयएसआयचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात.
  • पाकिस्तानचा मुख्य शत्रू भारत असून भारताला डोळयासमोर ठेऊन आयएसआय धोरण ठरवीत असते.

सोशल नेटवर्किंग मंच गुगल प्लस बंद होणार

  • गुगल कंपनीने ११ ऑक्टोबर रोजी आपला सोशल नेटवर्किंग मंच ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ऑगस्ट २०१९पर्यंत गुगल प्लस पूर्णपणे बंद करण्यात येईल. तोपर्यंत युजर्स गुगल प्लसवरील आपली माहिती डाऊनलोड करू शकतील.
  • समाजमाध्यमांतील फेसबुकच्या वाढत्या लोकप्रियतेला पर्याय म्हणून गुगलने २८ जून २०११ रोजी ‘गुगल प्लस’ची निर्मिती केली होती.
  • लोकांच्या पसंतीची मोहोर उमटवण्यात गुगल प्लसला अपयश आल्यामुळे ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • याशिवाय मार्च २०१८मध्ये गुगल प्लसवरून ५ लाख लोकांचा गोपनीय डेटा चोरीला गेल्याचे गुगलच्या निर्दशनास आले होते. २०१५पासून ही डेटा चोरी सुरू होती. ही गोष्टही गुगल प्लस बंद होण्यासाठी कारणीभूत ठरली.

तुषार मेहता यांची सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती

  • ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते ३० जून २०२०पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
  • डिसेंबर २०१७मध्ये रंजीतकुमार यांनी सॉलिसिटर जनरल पदाचा राजीनामा दिल्यापासून गेले ११ महिने हे पद रिक्त होते.
  • तुषार मेहता हे गुजरातचे आहेत. त्यांनी १९८७साली वकील म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली. २००७मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील बनले.
  • २००८मध्ये ते गुजरातचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनले. त्यांनी अनेक कायदेशीर बाबींमध्ये गुजरात सरकारची बाजू मांडली.
  • सध्या ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून कार्यरत आहेत. भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर २०१४मध्ये मेहता यांना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नेमण्यात आले होते.
  • मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६-अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.
सॉलिसिटर जनरल
  • सॉलिसिटर जनरल हे भारताचे महान्यायवादी (अटर्नी जनरल) यांच्या अंतर्गत कार्य करतात. सॉलिसिटर जनरलची नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते.
  • महान्यायवादी पदानंतर सॉलिसिटर जनरल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कायदा अधिकारी पद आहे. ते कायदेशीर बाबींमध्ये सरकारला सल्ला देतात.
  • ते महान्यायवादींचे सहाय्यक म्हणून काम करतात. तर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सॉलिसिटर जनरलला मदत करतात.
  • महान्यायवादी सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. तसेच ते सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य वकीलही असतात.
  • भारतीय राज्यघटनेच्या कलम ७६(१) अंतर्गत राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने महान्यायवादीची नियुक्ती करतात.
  • सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीलाच महान्यायवादी पदावर नेमण्यात येते.

आयडीबीआयचे नवे सीईओ व एमडी: राकेश शर्मा

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने राकेश शर्मा यांना आयडीबीआय बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्त केले आहे.
  • त्यांची नियुक्ती केवळ ६ महिन्यांसाठी करण्यात आली आहे. ते आयडीबीआयचे सध्याचे सीईओ व एमडी बी. श्रीराम यांची जागा घेतील.
  • राकेश शर्मा जुलै २०१८पर्यंत कॅनरा बँकेचे सीईओ होते. त्यापूर्वी लक्ष्मी विलास बॅंकचे एमडी होते.
आयडीबीआय (भारतीय औद्योगिक विकास बँक)
  • इंग्रजी: Industrial Development Bank of India
  • स्थापना: १ जुलै १९६४
  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • ही सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँक आहे. संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार १९६४मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली.
  • भारतीय उद्योगाच्या विकासासाठी कर्ज आणि इतर आर्थिक सेवा प्रदान करणे या बँकेच्या स्थापनेचा उद्देश होता. सध्या आयडीबीआयची ८५.९६ टक्के मालकी सरकारकडे आहे.

उदयन पाठक यांना प्रतिष्ठेचा एफएएसएम पुरस्कार

  • मूळ नागपूरचे उदयन पाठक यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा एफएएसएम (फेलो अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरिअल्स) पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • उदयन पाठक सध्या पुण्यात टाटा मोटर्सच्या अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.
  • पाठक यांनी टाटा मोटर्सपूर्वी जॉन डियर, डीजीपी हीनोदय, स्पायर इंडिया, भारत फोर्ज इत्यादी कंपन्यांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे.
  • एएसएम इंटरनॅशनल पुणे शाखेचे ते माजी सचिवही राहिलेले आहेत.
  • यावर्षी पाठक यांच्यासोबतच आयआयटी चेन्नईचे डॉ. कामराज यांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे.
  • या दोघांना येत्या १६ ऑक्टोबरला अमेरिकेतील ओहायो प्रांतातील कोलंबस येथे सोसायटीचे फेलो म्हणून गौरविण्यात येणार आहे. 
उदयन पाठक यांचे कार्य
  • वाहन उद्योगाला लागणाऱ्या निरनिराळ्या पारंपरिक मिश्र धातूऐवजी निकेल, मॉलिब्डेनम, क्रोमियम इत्यादी मिश्रणांचे प्रमाण कमी असलेल्या मिश्र धातूंचा वापर करणे.
  • तसेच ऊर्जा वाचवणाऱ्या आणि नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर करून या मिश्र धातूंवरील अनेक शाश्वत प्रक्रियांवर भारतात संशोधन करून त्या संस्थापित करणे.
  • प्रवासी वाहनांना सौरऊर्जा परावर्तित करणारा रंग वापरून आतील तापमान कमी करून प्रवास सुखकारक करणे.
  • थर्मोइलेक्ट्रिक पदार्थाचा वापर करून वाहनांच्या आसनाला गरम किंवा थंड करणे.
  • वंगणासाठी लागणाऱ्या तेल व ग्रिसचे आयुष्य २० किमीवरून १ लाख २० हजार किमीपर्यंत वाढवणे.
  • बहुराष्ट्रीय वाहन उद्योगांना लागणारे धातू देशात विकसित करून परकीय चलन वाचवणे.

सौरभ चौधरीला युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची

  • आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर भारताचा १६ वर्षीय युवा नेमबाज सौरभ चौधरी याने युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली.
  • १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी याने २४४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
  • भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिन्नुन्गाने, तर नेमबाजीमध्ये मनू भाकेरने सुवर्णपदकाचा वेध घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा