चालू घडामोडी : १५ ऑक्टोबर

दृष्टीक्षेप: आशियाई पॅरा स्पर्धा २०१८

  • जकार्ता इंडोनेशियामध्ये आयोजित आशियाई पॅरा स्पर्धा २०१८ समारोप झाला. ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • आशियाई पॅरा स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती होती. यापूर्वीच्या आशियाई पॅरा स्पर्धा २०१०मध्ये ग्वांगझाऊ (चीन) आणि २०१४मध्ये इंचिऑन (दक्षिण कोरिया) येथे पार पडल्या. तर २०२२च्या स्पर्धा ग्वांगझाऊ (चीन) येथे आयोजित केल्या जातील
  • यंदाच्या स्पर्धेत १८ खेळांमध्ये ५४६ इव्हेंट्स आयोजित केले गेले. ४३ देशांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला.
  • या स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘The Inspiring Spirit and Energy of Asia’ हे होते.
  • या स्पर्धेसाठी भारताने ३०२ सदस्यांचा संघ पाठविला होता. त्यात ॲथलीट, प्रशिक्षक, अधिकारी व इतर कर्मचारी यांचा समावेश होता.
  • रिओ पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा थांगवेलु मारियप्पन या स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक होता.
  • या स्पर्धेतील पदकतालिकेमध्ये भारताने ७२ पदकांसह ९वे स्थान मिळविले. तर चीनने ३१९ पदकांसह प्रथम स्थान मिळविले.
  • यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धांमधील प्रदर्शन भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३३ कांस्यपदकांसह भारताने या स्पर्धेत एकूण ७२ पदके जिंकली.
  • यापूर्वी मागील २०१४च्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने ३३ पदकांची (३ सुवर्ण, १४ रौप्य व १६ कांस्य) कमाई केली होती.
  • पदकतालिकेतील सर्वोत्तम १० देश
    क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
    १. चीन १७२ ८८ ५९ ३१९
    २. दक्षिण कोरिया ५३ ४५ ४६ १४४
    ३. इराण ५१ ४२ ४३ १३६
    ४. जपान ४५ ७० ८३ १९८
    ५. इंडोनेशिया ३७ ४७ ५१ १३५
    ६. उझबेकिस्तान ३५ २४ १८ ७७
    ७. थायलंड २३ ३३ ५० १०६
    ८. मलेशिया १७ २६ २५ ६८
    ९. भारत १५ २४ ३३ ७२
    १०. हॉंगकॉंग ११ १६ २१ ४८
    भारताच्या पदकांचे विवरण
    क्र. खेळ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
    १. पॅरा ॲथलेटिक्स १३ १६ ३६
    २. बॅडमिंटन -
    ३. बुद्धिबळ
    ४. जलतरण
    ५. नेमबाजी
    ६. तिरंदाजी - -
    ७. भारोत्तलन -
    ८. टेबल टेनिस - -
    ९. सायकलिंग - -
    एकूण १५ २४ ३१ ७२

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री शहरी लीडर्स फेलोशिप कार्य्रक्रम

  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्ली सरकारच्या वतीने मुख्यमंत्री शहरी लीडर्स फेलोशिप कार्य्रक्रमाचा शुभारंभ केला.
  • शहरी भागातील आव्हाने व समस्या सोडवण्यासाठी देशभरातील तरुणांना आकर्षित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत देशभरातील युवकांना दिल्ली सरकारसोबत काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत दिल्लीच्या शहरी भागातील सर्वात महत्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्य केले जाईल.
  • या कार्यक्रमाद्वारे दिल्ली सरकारबरोबर २ वर्षांसाठी काम करण्यास तयार असलेल्या आणि सार्वजनिक सेवांमध्ये रस असलेल्या तरुणांना आकर्षित केले जाईल.
  • या फेलोंना १,२५,००० रुपये मासिक वेतन आणि असोसिएट फेलोला ७५,००० रुपये मासिक वेतन देण्यात येईल.

आयएचजीएफ-दिल्ली मेळावा

  • जगातील सर्वात मोठ्या हस्तकला प्रदर्शन आयएचजीएफ-दिल्ली मेळाव्याच्या ४६व्या आवृत्तीचे आयोजन १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले.
  • याचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टम्टा यांनी केले. या मेळाव्यात ३२००हून जास्त प्रदर्शक सहभागी झाले आहेत.
  • हस्तकला निर्यात संवर्धन परिषदेद्वारे (EPCH) आयएचजीएफ मेळावा प्रत्येक २ वर्षांनी आयोजित केला जातो.
  • परदेशी ग्राहकांना हस्तकला उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे.
  • हस्तकला निर्यात संवर्धन परिषद ही हस्तकला उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेली सर्वात मोठी संस्था आहे. ही एक ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे.
  • EPCH: Export Promotion Council for Handicrafts
  • IHGF: Indian Handicrafts & Gifts Fair

हजरतुल्लाहचे एका षटकात ६ षटकार

  • अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये काबुल जवानन संघाचे प्रतिनिधित्व करताना एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला.
  • हजरतुल्लाहने हे ६ षटकार अब्दुल्ला मझारीच्या गोलंदाजीवर मारले. मझारीच्या या एका षटकात ३७ धावा झाल्या.
  • त्याचबरोबर त्याने १२ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण करताना, १७ चेंडूंत ६२ धावांची तुफानी फलंदाजी केली.
  • या कामगिरीसह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
  • युवराजने २००७च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ५ षटकार मारले होते.
  • याव्यतिरिक्त गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज), रवी शास्त्री व रवींद्र जडेजा (भारत), हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका), अॅलेक्स हेल्स (इंग्लंड) आणि पाकिस्तानचा मिसबाह उल हक यांनी एका षटकात ६ षटकार मारले आहेत.
  • यापैकी युवराज सिंग (ट्वेंटी-२०) व हर्शल गिब्स (एकदिवसीय) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे.
  • यापूर्वी हजरतुल्लाहने ऑगस्ट २०१८मध्ये आयर्लंडविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. कोणत्याही अफगाणी खेळाडूसाठी हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक आहे.

१५ ऑक्टोबर: जागतिक विद्यार्थी दिन

  • भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो.
  • अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय राष्ट्रपती होते. २०१०पासून संयुक्त राष्ट्राने अब्दुल कलाम यांचा सन्मान करत त्यांचा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
  • डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम येथे झाला. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले.
  • ते भारताचे ११वे राष्ट्रपती होते. २००२ ते २००७ दरम्यान त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार पहिला.
  • त्यापूर्वी त्यांनी सुमारे ४ दशके संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे वैज्ञानिक म्हणून कार्य केले.
  • भारताचा नागरी अंतराळ कार्यक्रम आणि भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. १९९८च्या पोखरण-२च्या अणुचाचणीत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.
  • क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
  • त्यांना १९८१मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९०मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओमधील कामांबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने १९९७मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
  • २००९मध्ये त्यांना हूवर पदक प्रदान करण्यात आले आणि २०१३मध्ये त्यांना एनएसएस वॉन ब्राउन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • डॉ. कलाम एक प्रसिद्ध लेखकही होते. त्यांची पुस्तके विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
  • डॉ कलाम यांनी लिहिलेली प्रमुख पुस्तके: इंडिया २०२०, विंग्स ऑफ फायर, इग्नाइटेड माइंडस, द लुमिनस स्पार्क्स, मिशन इंडिया, इंस्पायरिंग थॉट्स, इन्डोमिटेबल स्पिरिट, टर्निंग पॉइंट्स, टारगेट ३ बिलियन, फोर्ज योर फ्यूचर, ट्रांसेंडेंस : माय स्पिरिचुअल एक्सपीरियंस विद प्रमुख स्वामीजी, एडवांटेज इंडिया : फ्रॉम चैलेंज टू अपोर्चुनिटी.

भारताच्या दोन्ही हॉकी संघांना रौप्यपदक

  • अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आयोजित युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने रौप्यपदक जिंकले.
  • अंतिम सामन्यात त्यांना यजमान अर्जेन्टिनाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.
  • तसेच भारताच्या पुरुष हॉकी संघाचाही अंतिम सामन्यात मलेशियाकडून २-४ ने पराभव झाल्यामुळे त्यांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने जिंकलेली ही पहिलीच पदके आहेत.
  • याशिवाय भारताची कुस्तीपटू सिमरनने या स्पर्धेत महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले.
  • अंतिम फेरीत अमेरिकेच्या एमिली शिल्सनने सिमरनवर ११-६ने मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

दिल्लीमध्ये आपत्कालीन प्रदूषण योजना सुरू

  • दिल्लीतील प्रदूषणाच्या खराब पातळीमुळे तेथे आपत्कालीन प्रदूषण योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचे नाव ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (GRAP) आहे. दिल्लीमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार जसजशी दिल्लीतील हवेची गुणवत्ता कमी होत जाईल, तसतसे क्रमाक्रमाने प्रदूषण रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाय योजण्यात येतील.
  • सध्या दिल्लीतील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कचरा जाळण्यावर प्रतिबंध, रस्ते सफाई, अधिक प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध, संवेदनशील ठिकाणी सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस तैनात करणे या उपायांचा समावेश आहे.
  • दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर सध्या ‘खराब’ या पातळीवर असल्यामुळे ते रोखण्यासाठी मध्यम स्तरावरील पावले उचलण्यात येत आहेत.
  • पुढील काळात वायू प्रदूषणात वाढ झाल्यास, पार्किंग फी वाढविणे, बांधकाम कार्यांवर बंदी आणि सम-विषम फॉर्म्युला यांसारखे उपाय योजण्यात येतील.
  • प्रदूषण पातळी अतिगंभीर झाल्यास, दिल्लीमध्ये अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल. तसेच शाळा बंद करणे यांसारख्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सचे गठन करण्यात येईल.
  • दिल्लीतील प्रदूषणाचे मुख्य कारण पिकांच्या अवशेषांचे ज्वलन आहे. या अवशेषांचा धूर धुक्यामध्ये मिसळल्यानंतर धुरके तयार होते. हिवाळ्यात दिल्लीत हे विषारी धुरके खूप प्रभावी असते.

खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार

  • संगीतकार, लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांना २०१८चा हृदयनाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.
  • हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८१व्या जन्मदिनी (२६ ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
  • खय्याम यांनी १९४३साली वयाच्या १७व्या वर्षी लुधियाना येथे आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.
  • त्यांनी संगीत दिग्दर्शक शर्माजी-वर्माजी यांच्यासह ‘हीर रांझा’ (१९४८) या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
  • १९६१मध्ये ‘शोला और शबनम’ या चित्रपटातील संगीत दिग्दर्शनामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
  • पुढे त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. ‘उमराव जान’ (१९८१) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला.
हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार
  • हृदयनाथ आर्ट या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने संगीतकार आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ २०११मध्ये हा पुरस्कार सुरू केला.
  • विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापूर्वी लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, हरिप्रसाद चौरसिया, ए. आर. रहमान यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • हृदयनाथ हे प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांचे पुत्र तसेच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे बंधू आहेत.

१५ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन

  • दरवर्षी जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
  • ग्रामीण स्त्रियांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो.
  • यावर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची संकल्पना ‘लैंगिक समानता आणि ग्रामीण स्त्रिया व मुलींच्या सशक्तीकरणासाठी सामाजिक सुरक्षा व शाश्वत पायाभूत सुविधा’ ही आहे.
  • ग्रामीण शेती, विकास, दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षेमध्ये सुधारणा व ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यामध्ये महिलांची भूमिका आणि योगदान या दिवशी अधोरेखित करण्यात येते.
  • आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाने डिसेंबर २००७मध्ये केली होती. १५ ऑक्टोबर २००८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन पाळण्यात आला.
  • संयुक्त राष्ट्रांच्या मते, शाश्वत विकास उद्दिष्टे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स: एसडीजी) साध्य करण्यासाठी ग्रामीण स्त्रियांचे सशक्तीकरण आवश्यक आहे.
  • जगातील लोकसंख्येमध्ये ग्रामीण स्त्रियांचे प्रमाण एक चर्तुथांश आहे. यापैकी बहुतेक स्त्रिया उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक स्रोत आणि शेतीसाठी अवलंबून आहेत.
  • आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाद्वारे अन्न सुरक्षा आणि दारिद्र्य निर्मूलनातील ग्रामीण महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा