चालू घडामोडी - १० व ११ डिसेंबर २०१४

·        ९ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

·        १० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार दिन

·        येत्या ६, ७, ८ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन होत आहे.

·        संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७७ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.

·        भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.

·        या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७७ देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले.

·        विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत

·        ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक टाळून हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 'ग्राहक संरक्षण कायद्या'त दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

·        ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे

·        सोशल मिडीयाचा अतिशय खुबीने वापर करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकारणाप्रमाणे आता ट्विटरवर देखील लाट निर्माण झाली असून सर्वाधिक रिट्विटचा 'गोल्डन ट्विट' किताब लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मोदींनी केलेल्या ट्विटला मिळाला आहे.

·        वर्षभरातील सर्वाधिक रिट्विटसाठी हा पुरस्कार दिला जातो.  लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी  'India has won! भारत की जय! अच्छे दिन आनेवाले है' असे ट्विट केले होते, जे ७० हजारांपेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आले. त्यामुळेच मोदींच्या ट्विटला 'गोल्डन ट्वीट २०१४’ हा किताब मिळाला आहे. वर्षाच्या अखेरीस ट्विटरकडून २०१४ इयर ऑन ट्विटर हा अहवाल घेण्यात आला.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये झालेल्या वार्षिक शिखर परिषदेत तेल, वायू, संरक्षण, गुंतवणूक, व्यापार, ऊर्जा आदी महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्यासाठी एकूण २० करार झाले.

·        उभय देशांनी अणुऊर्जा क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले असून, रशियाची रुस्तम कंपनी २०३५ पर्यंत भारतात १२ अणुभट्ट्या बांधणार आहे. भारतासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टरची निर्मिती करण्याची तयारीही रशियाने दर्शवली आहे.

·        अणुऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांनी विकासाचा रोडमॅप केला आहे. रशिया येत्या काळात भारतात २० अणुभट्ट्यांचा बांधणार आहे. त्यापैकी रशियाची रुस्तम कंपनी २०३५ पर्यंत १२ अणुभट्ट्यांचा बांधणार आहे.

·        महत्त्वपूर्ण बाबी:

·        येत्या २० वर्षांत रशियाकडून भारतामध्ये बारा अणुभट्ट्या

·        ‘रोसनेफ्ट’चा ‘इस्सार ऑइल’बरोबर १० वर्षांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचा करार

·        लढाऊ विमान निर्मिती, बहुउद्देशीय मालवाहू विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टरसंबंधी करार

·        रशियातील तेल उत्खनन प्रकल्पांत भारताचा सहभाग

·        तामिळनाडूमधील कुडनकुलम २०१५ मध्ये दुसरी अणुभट्टी.

·        कुडनकुलम येथे एकूण सहा अणुभट्ट्या. याखेरीज आणखी सहा अणुभट्ट्यांची जागा निश्चित नाही.

·        दिल्लीतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकाने एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने दिल्ली सरकारने शहरातील उबेर कंपनीच्या सर्व टॅक्सींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

·        उबेर या खासगी कंपनीकडून दिल्लीत टॅक्सीसेवा चालविली जाते, पण यापुढे www.uber.com याच्याशी संबंधित सर्व घडामोडींवर बंदी घालण्यास वाहतूक विभागाला सांगण्यात आल्याचे, दिल्ली सरकारने सांगितले आहे.

·        प्रवासी महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर सरकारने तातडीने पाऊल उचलत या कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

·        आंध्र प्रदेशसाठी नवी राजधानी तयार करण्यासाठी राज्याने सिंगापूरबरोबर सामंजस्य करार केला आहे. आंध्रसाठी जागतिक दर्जाची राजधानी निर्माण करण्यासाठीचा “मास्टर प्लॅन” सहा महिन्यांत तयार होणार.

·        या प्रकल्पामध्ये सिंगापूरमधील अनेक कंपन्याचा सहभाग आहे.

·        पाकिस्तानातील जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा नेता हफीझ सईद याला आता ट्‌विटरच्या माध्यमामधून भारताविरुद्ध गरळ ओकण्याची संधी मिळणार नाही. सईद याचे ट्विटर अकाऊंट कंपनीकडून बंद करण्यात आले आहे.

·        मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यामागचा (२६/११) प्रमुख सूत्रधार असलेला सईद याने ट्विटरच्या माध्यमामधून भारतविरोधी विखारी प्रचार सुरु ठेवला होता. या चिथावणीखोर व वादग्रस्त ट्विट्‌सच्या माध्यमामधून सईद हा भारतविरोधी वातावरण तयार करत होता.

·        बांगलादेश युद्धाचा पाकिस्तान सूड घेईल व काश्‍मीर “स्वतंत्र” करेल, अशा आशयाचे ट्विट त्याने नुकतेच केले होते. या पार्श्‍वभूमीवर ट्विटरने आता सईद याचे अकाऊंट बंद केले आहे.

·        राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे 'द ड्रामॅटिक डिकेड : दी इंदिरा गांधी ईयर्स' हे पुस्तक अलीकडेच रूपा प्रकाशनने प्रकाशित केले आहे.

·        उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात येत्या दोन वर्षांत टाइम्स समूहाच्यावतीने जागतिक दर्जाचे बेनेट विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेतील जॉर्जिया टेक विद्यापीठासह देशातील नावाजलेल्या अनेक विद्यापीठांशी या विद्यापीठाचा करार होणार आहेत.

·        ६८ एकरांवर उभारण्यात येत असलेले हे विद्यापीठ जुलै २०१६ मध्ये प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

·        या विद्यापीठात १० हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार असून पहिल्या टप्प्यात इंजिनीअरिंग, मेडिकल, उद्योजकता, लिबरल आर्ट्‍स आदींशी संबंधित कोर्स उपलब्ध केले जातील.

·        आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्ह्यांच्या श्रेणीतून लवकरच हटवण्यात येणार आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्रातील सरकारने आयपीसी कलम ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

·        आयपीसीच्या कलम ३०९ नुसार आतापर्यंत आत्महत्येच्या प्रयत्न हा गुन्हा ठरत असल्याने संबंधिताला एक वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे.

·        आत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून बघावं आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ते हटवलं गेलं पाहिजे, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती.

·        चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राष्ट्रीय नेत्याचा फोटो छापण्यास रिझर्व्ह बँकेच्या पॅनेलने नकार दिला आहे. लोकसभेतील लेखी उत्तरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.

·        रिझर्व्ह बँकेने भविष्यातील नोटा छापण्याविषयी ऑक्टोबर २०१० मध्ये या पॅनेलची स्थापना केली होती.

·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आता महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवर मोफत 'वाय-फाय' सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्ली रेल्वे स्टेशनवर 'वाय-फाय' सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

·        दिल्ली स्टेशनवरच्या सर्व १६ प्लॅटफॉर्मवर ‘वाय-फाय’ सेवा अर्धा तासासाठी मोफत मिळेल. त्यानंतर अधिक 'वाय-फाय' वापरायचे झाल्यास प्रवाशांना ३० मिनिटांसाठी २५ रुपयांचे, तर एक तासासाठी ३० रुपयांचे स्क्रॅच कार्ड घेता येईल.

·        ‘वाय-फाय’ हेल्पडेस्कवर मिळणारी ही कार्ड २४ तासांसाठी वैध असणार आहेत.

·        अमेरिकेच्या सिनेटने भारतातील पुढचे राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली.

·        वर्मा ४६ वर्षांचे असून पहिलेच भारतीय वंशाचे अमेरिकी राजदूत आहेत.

·        वर्मा यांनी नागरी अणुकरार घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. भारत-अमेरिका यांच्या मजबूत संबंधाचे ते पुरस्कर्ते आहेत.

·        'सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस' या संस्थेत त्यांनी काम केले आहे. परराष्ट्र खात्यात ओबामा प्रशासनात २००९ ते २०११ दरम्यान विधिमंडळ खात्याचे राज्यमंत्री होते. सध्या ते स्टेपटो व जॉनसन व अलब्राइट स्टोनब्रीज समूह या कंपनीचे वरिष्ठ सल्लागार होते.

·        दळणवळणासाठी सोडण्यात आलेल्या “जीसॅट- १६” या उपग्रहाची कक्षा  बदलण्यात आली.

·        “लिक्विड अपोजी मोटर” प्रज्वलित करून ही कक्षा बदलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. हा उपग्रह ३६ हजार किलोमीटर उंचीवर स्थिर करण्यात येणार असून, आणखी तीन टप्प्यांत ही उंची गाठली जाणार आहे. या उंचीवर उपग्रह भूस्थिर कक्षेत दाखल होईल, असेही या फेसबुक पेजवर नमूद करण्यात आले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा