चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१५


    INS Tarangini
  • भारतीय नौदलाची प्रशिक्षणार्थी शिडाची नौका ‘आयएनएस तरंगिनी’ आठ महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर जात आहे. ही नौका युरोपमध्ये आयोजित उंच नौकांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल. 
  • ‘सेल ट्रेनिंग इंटरनॅशनल’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ब्रिटन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलॅंडच्या किनाऱ्यांवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आकाराच्या तीनशे शिडाच्या नौका या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
  • आठ महिन्यांच्या अवधीमध्ये ही नौका तब्बल सतरा हजार मैलांचा प्रवास करेल, अशी माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही नौका ओमान नौदलाच्या शिडाच्या नौकेसोबतही स्पर्धा करणार आहे. 
  • भारताची तरंगिनी ही शिडाची नौका ‘अ’ श्रेणीतील नौका आहे. ही नौका गोवा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली असून, ११ नोव्हेंबर १९९७ मध्ये ती भारतीय नौदलामध्ये सहभागी झाली होती. 
  • परकीय राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांची निर्मिती करणे आणि तसेच सागरी प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्मितीचा पुरस्कार करत ही नौका शांततेचा संदेशही देईल. 

  • जगभरातल्या प्रगत कृषी क्षेत्राचे लक्ष लागलेल्या ‘ऍग्रिटेक २०१५’ या जागतिक कृषी प्रदर्शनास तेल अवीव, (इस्राईल) येथे प्रारंभ झाला. 
  • जगभरातून आलेले शेतकरी, कृषी व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या सहभागामुळे सकाळी १० पासूनच प्रदर्शनस्थळ फुलले. विशेष म्हणजे यामध्ये भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री व अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही येथे दाखल झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्साहात भर पडली.

  • सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुला अझीझ यांनी आपला वारसदार बदलत गृहमंत्री मोहंमद बिन नायफ यांना नवा वारसदार म्हणून घोषित केले. 
  • जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाचे राजे किंग अब्दुल्ला यांच्या निधनानंतर सलमान बिन अब्दुल्ला अझीझ यांनी जानेवारी महिन्यामध्ये राजसत्तेची सूत्रे स्वीकारली होती. 
  • वारसदाराच्या शर्यतीत राजे अझीझ यांचा मुलगा मोहंमद बिन सलमान हा होता. पण, त्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. 
  • राजे अझीझ यांनी ५५ वर्षीय मोहंमद बिन नायफ यांना वारसदार म्हणून घोषित करत त्यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी ठेवली आहे. तसेच ते राजकीय आणि सुरक्षा समितीचे प्रमुख असणार आहेत.

  • पनामा कालव्यातील जलप्रवाह नियंत्रित करण्यासाठी शेकडो कोटी डॉलर्स खर्च करून उभारण्यात येणाऱ्या १६ महादरवाजांपैकी शेवटचा दरवाजा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
  • प्रशांत महासागराच्या बाजूच्या प्रवेशावर हा ४ हजार २३२ टन एवढ्या वजनाचा हा महादरवाजा बसविण्यास सुरवात करण्यात आली. या दरवाजामुळे पनामा कालव्याच्या विस्ताराला आगामी काही दिवसांमध्ये सुरवात होणार आहे.
  • पनामा कालव्यातून वाहतूक करणाऱ्या जहाजांची सध्याची क्षमता अडीच पटींनी वाढविण्यासाठी या कालव्याच्या मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय २००६ मध्ये घेतला होता. 

  • बिहारच्या अनेक जिल्ह्यांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर, शेकडो जण जखमी झाले आहेत. 
  • दरभंगा येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या भूकंप पीडितांच्या कपाळावर भूकंप असे स्टिकर्स लावून त्यांना स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले आहे. 
  • भूकंप पीडितांची अशी छायाचित्रे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख शंकर झा यांनी माफी मागितली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी पीडीतांना अशी वागणूक देणे, निषेधार्थ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

  • नेपाळमध्ये हाहाकार माजविणाऱ्या भूकंपामुळे भारतीय उपखंडाच्या भौगोलिक स्थानामध्येही मोठा बदल झाला असून भारताचा बराच भाग उत्तरेकडे दहा फुटांनी सरकला असल्याचे अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे. 
  • तसेच नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडू शहराच्या भौगोलिक स्थानामध्येही बदल झाला असून हे शहर तीन मीटरने दक्षिणेकडे सरकले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूस्तरामध्ये बदल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
  • या भौगोलिक बदलांमुळे माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर मात्र कसलाही परिणाम झालेला दिसून येत नाही. काही संशोधकांनी एव्हरेस्टच्या उंचीमध्ये बदल झाल्याचे म्हटले आहे. पण तो बदल नेमका किती आहे, हे मात्र सांगणे कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. 

    MPSC
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मध्येच प्रशिक्षण कालावधी किंवा नोकरीवर रुजू झाल्यानंतर सेवा सोडणाऱ्या वर्ग एक आणि दोन संवर्गातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • अशा अधिकाऱ्यांनी किमान पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र द्यावे लागणार आहे. त्यासाठी वर्ग एकच्या अधिकाऱ्यांकडून पाच; तर वर्ग दोन संवर्गातील अधिकाऱ्यांकडून तीन लाखांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे.

  • परकी चलन विनिमय कायदा (एफसीआरए)चे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील सुमारे नऊ हजार स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) नोंदणी रद्द केल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. 
  • परदेशातून ८,९७५ स्वयंसेवी संस्थांना निधी मिळाला होता; परंतु त्यांनी यासंदर्भातील विवरणपत्र तेही २००९ पासून सादर केले नव्हते. विलंबाचे कारणही दिले नव्हते. परिणामी त्यांची नोंदणी तत्काळ रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

  • रवींद्रनाथ टागोर यांच्या लघुकथेमधील ‘काबुलीवाला’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानचे ब्रॅंडिंग केले. अब्जावधी डॉलर खर्च करूनदेखील जे शक्य झाले नसते ते या कथेने केले, असे गौरवोद्गार भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे अध्यक्ष महंमद अश्रफ घानी यांनी काढले. 
  • त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. 
  • या वेळी घानी यांनी जगासमोरील दहशतवादाचा धोका ठळकपणे अधोरेखित करत दहशतवादाचा कायम बीमोड करण्यासाठी आमचा देश कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. घानी यांनी भारतामधील लोकशाहीचे आणि टागोरांच्या कवितेचेही मनापासून कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा