देशभरातील पाच कोटी गरीब कुटुंबांना मोफत घरगुती गॅस जोडण्या देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील बलिया येथून सुरुवात झाली.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ८ हजार कोटी रु.ची तरतूद केली आहे.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील.
पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील. येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल.
२०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे.
‘रिअल इस्टेट २०१६’ कायद्याची अंमलबजावणी सुरु
गृहबांधणी क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्याची आणि बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला पायबंद घालण्याची हमी देणारा ‘रिअल इस्टेट (विनियमन व विकास) २०१६’ कायदा १ मेपासुन अंमलात आला आहे.
या कायद्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घराचे घराचे मालकी हक्क वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी नियोजित वेळेपेक्षा उशिरा प्रकल्प पूर्ण केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूदही या कायद्यात आहे.
तसेच येत्या वर्षभरात राष्ट्रीय रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाची स्थापना केली जाणार आहे.
डिझेल टॅक्सींवर दिल्लीमध्ये बंदी
सर्वोच्च न्यायालयाने डिझेल वाहनांवर ग्रीन सेस लागू करण्यासंदर्भात सुनावणी करताना राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) येथे ३० एप्रिलनंतर डिझेल टॅक्सी चालविण्यास मनाई केली आहे.
न्यायालयाने या मोटारींना ३० एप्रिलपर्यंत सीएनजी मोटारीत रूपांतरीत करून देण्यासाठी अवधी दिला होता. या प्रकरणाची सुनावणी ९ मेपर्यंत स्थगित केली आहे. तोपर्यंत २००० सीसीवरील वाहनांवरील नोंदणीला बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे आता ओला आणि उबेर यांसारख्या फ्लीट टॅक्सींसह दिल्ली आणि राजधानी परिसरातील रस्त्यांवर डिझेल टॅक्सींना १ मेपासून प्रवेश बंद झाला आहे.
राष्ट्रीय परमिट असलेल्या वाहनांना या सीएनजीमध्ये रुपांतरित होण्याच्या सक्तीतून वगळण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत डिझेल मोटारीच्या नोंदणीवरील निर्बंध हठविले आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना २००० सीसीवरील १९० डिझेल मोटारीवर ग्रीन सेस लावून खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
न्या. ठाकूर यांच्यासह न्या. ए. के. सिक्री आणि आर. बानुमती यांच्या पीठाने ३१ मार्च रोजी सीएनजी रुपांतरासाठीची मुदत एक महिन्याने वाढवली होती.
दिल्लीत सध्या ६० हजार टॅक्सी असून त्यातील २१ हजार डिझेलवर चालणाऱ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा