चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी

नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान

  • भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सेऊल शांतता पुरस्कार २०१८’ प्रदान करण्यात आला.
  • द सेऊल पीस प्राइझ कमिटीने (कल्चरल फाऊंडेशन) या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली असून, हा पुरस्कार जिंकणारे ते १४वे व्यक्ती आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्काराची २ दशलक्ष डॉलर्स (१.४० कोटी रुपये) रक्कम नमामि गंगे कार्यक्रमासाठी समर्पित केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय सहकार्य, जागतिक आर्थिक वृद्धी, लोकशाही बळकट करणे, मानव विकास यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
  • मोदींनी भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढवून मानव विकास साधण्याचा केलेले प्रयत्न व भ्रष्टाचारविरोधी चालवलेल्या मोहिमांचे समितीने कौतुक केले आहे.
  • गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसाही या समितीने केली आहे.
  • द सेऊल पीस प्राइझ कमिटीने विश्वशांतीसाठी ‘मोदी सिद्धांत’ आणि ॲक्ट ईस्ट धोरणांचेही कौतुक केले आहे.
  • सप्टेंबर २०१८ संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण आमसभेत मोदींना ‘चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड’ हा पर्यावरण विषयक पुरस्कारही मिळाला होता. (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह)
सेऊल शांतता पुरस्कार
  • या पुरस्कारांची सुरुवात १९९०मध्ये दक्षिण कोरियातील सेऊल येथे आयोजित २४व्या ऑलिम्पिक खेळांच्या स्मृतीप्रीत्यर्थ करण्यात आली होती.
  • हा पुरस्कार प्रत्येक २ वर्षांनी जागतिक शांतता आणि सद्भावना यांना प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना दिला जातो.
  • यापूर्वी हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचे महासचिव कोफी अन्नान, जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल इत्यादी व्यक्तींना तर डॉक्टर्स विदआउट बॉर्डर्स आणि ऑक्सफेम अशा संस्थांना प्रदान करण्यात आला आहे.

जवानांना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निशुल्क हवाई सेवा

  • पुलवामासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांच्या सर्व जवानांना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी निशुल्क हवाई सेवेचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
  • यात कर्तव्यावर असतांनाच्या प्रवासासोबतच सुट्टीसाठी घरी जाताना आणि घरुन परततानाचा प्रवासही समाविष्ट आहे.
  • याचा तात्काळ फायदा सीएपीएफच्या कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि एएसआय अशा ७.८० लाख जवानांना होणार आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त इन्स्पेक्टर आणि त्यावरील पदांकरिता देण्यात येत होती.
  • यामुळे आता निमलष्करी दलांचे जवान कोणत्याही व्यावसायिक विमान कंपनीचे तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात. नंतर सरकारद्वारे त्यांना तिकिटाच्या रकमेची परतफेड केली जाणार आहे.
  • हा निर्णय म्हणजे निमलष्करी दलांसाठी आधीच उपलब्ध हवाई कूरियर सेवेचे विस्तारित स्वरूप आहे. याअंतर्गत दिल्ली, जम्मू आणि काश्मीरमधील सैनिकांच्या वाहतूकीसाठी संपूर्ण विमान आरक्षित केले जाते.
पुलवामा हल्ला
  • जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट करत भीषण हल्ला केला. यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
  • पाकिस्तानातील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २०१६मध्ये उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे.

भारत-स्पेन द्विपक्षीय चर्चा

  • परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी माद्रिद (स्पेन) येथे स्पेनचे समपदस्थ जोसेफ बॉरेल यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली.
  • या बैठकीचे आयोजन माद्रिदमधील विअना पॅलेसमध्ये करण्यात आले होते. या बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीतील महत्वाचे मुद्दे
  • भारत आणि स्पेन यांनी बहुपक्षीयतेचे आणि नियम-आधारित मुक्त व्यापाराचे समर्थन केले.
  • या बैठकीत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा झाली.
  • दोन्ही देशांनी संभाव्य आर्थिक आणि औद्योगिक संबंध आणि तांत्रिक सहकार्यावर चर्चा केली. परमाणु उर्जेचा नागरी वापर, वाहतूक, रेल्वे आणि नुतनीकरणक्षम उर्जेच्या बाबतील स्पेन अग्रणी आहे.
  • या बैठकीद्वारे आंतरराष्ट्रीय स्थिरता आणि शांततेवर भारताचा वाढणारा प्रभाव स्वीकारला गेला.
  • पुलवामातील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पेनने निषेध केला व शहीद झालेल्या सैनिकांप्रति शोक व्यक्त केला.
ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ सिव्हिल मेरिट मेडल
  • भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ सिव्हिल मेरिट मेडल हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्पेनला मदत करणाऱ्या विदेशी नागरिकांना दिला जातो.
  • २०१५मध्ये नेपाळमधील भूकंपाच्या वेळी स्पॅनिश पीडितांना मदत करण्यासाठी सुषमा स्वराज यांना हा सन्मान देण्यात आला.

भारत- सौदी अरेबिया द्विपक्षीय चर्चा

  • सौदीचे अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान बिन अब्दुल सऊद यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा झाली.
या चर्चेतील ठळक मुद्दे
  • दहशतवादाला प्रोत्साहन देणारे व पाठिंबा देणाऱ्यांवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे, यावर उभय देशांत सहमती झाली. सलमान यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
  • दहशतवादाचा वापर राष्ट्रीय धोरणाचे एक साधन म्हणून केला जाऊ नये, असे वक्तव्य पाकिस्तानचा उल्लेख न करता सलमान यांनी केले.
  • सौदी अरेबियाने भारताच्या कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्धता व्यक्त केली.
  • तसेच सौदी अरेबियाने भारताच्या हज कोट्यामध्ये २५,०००ने वाढ केली आहे. आता भारताचा हज कोटा वाढून २ लाख झाला आहे.
  • सलमान यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या २०१६मधील सौदी अरेबियाच्या दौऱ्यानंतर सौदीने भारतात आतापर्यंत ४४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
  • येत्या काही वर्षांमध्ये उर्जा, पेट्रोकेमिकल आणि उत्पादन क्षेत्रात आणखी १०० अब्ज डॉलर्स सौदी अरेबिया गुंतविण्याची शक्यता आहे.
  • जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची मोहम्मद बिन सलमान यांनी निंदा केली.

करीना कपूर स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया मोहिमेची राजदूत

  • स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया मोहिमेची राजदूत म्हणून अभिनेत्री करीना कपूरची निवड करण्यात आली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि नेटवर्क-१८द्वारे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
  • स्वस्थ इम्युनाईज्ड इंडिया मोहिमेचा हेतू लोकांना लसीकरणाविषयी जागृत करणे हा आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांच्या मनातील लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर केले जातील.
  • या मोहिमेद्वारे लसीकरणाचे फायदे, त्याचे महत्त्व व देशात लसीकरणाचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.
  • या मोहीमेमुळे सरकारच्या लसीकरणाविषयी प्रयत्नांना मदत मिळेल.

लॉकहीड मार्टिनकडून एफ-२१ या विमानाचे अनावरण

  • संरक्षण उपकरणे निर्माता कंपनी लॉकहीड मार्टिनने आशियातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन ‘एरो इंडिया २०१९’मध्ये एफ-२१ या बहुद्देशीय लढाऊ जेट विमानाचे अनावरण केले.
  • भारताचा महत्वाकांक्षी कार्यक्रम मेक इन इंडियाच्या अंतर्गत टाटा ॲडव्हान्स सिस्टम्सच्या सहकार्याने लॉकहीड मार्टिन भारतातच या लढाऊ विमानाचे उत्पादन करणार आहे.
  • लॉकहीड मार्टिनने भारतीय हवाई दलाची गरज लक्षात घेऊन एफ-२१ या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. यामुळे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार आहे.
  • या विमानाची तंत्रज्ञान व मारक क्षमता अजोड आहे.
  • एफ-२१ भारताच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करेल आणि भारत जगातील सर्वात मोठ्या लष्करी विमान पारिस्थितिक तंत्रज्ञानात सामील होईल.
  • या विमानांचे भारतात उत्पादन होणार असल्याने, यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल आणि भारत व अमेरिकेदरम्यान प्रगत तंत्रज्ञान सहकार्य वाढेल.
भारताकडून ११० लढाऊ विमानांची मागणी
  • भारताने आपल्या हवाई दलासाठी ११० लढाऊ विमानांची मागणी केली आहे.
  • बोईंग (सुपर हॉर्नेट), लॉकहीड माटिर्न (एफ-२१), दसौल्ट एविएशन (राफेल), युरोफायटर (टायफुन), साब (ग्रिपेन), रशियन युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (मिग-३५) या जगातील ६ मोठ्या संरक्षण उपकरणे निर्मात्या कपन्यांनी भारताच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. 
  • भारताच्या अटीनुसार ११० लढाऊ विमानांपैकी १५ टक्के विमाने तयार अवस्थेत असावीत, तर उर्वरित ८५ टक्के विमानांची निर्मिती संबंधित कंपनीला भारतात धोरणात्मक भागीदारीमध्ये करावी लागेल.
  • लॉकहीड माटिर्नने एफ-२१ विमानांच्या निर्मितीसाठी टाटा अॅडव्हान्स सिस्टम्सशी करार केला आहे. तर बोईंगने सुपर हॉर्नेट विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान ॲरोनॉटीक्स लिमिटेड व महिंद्रा डिफेन्स सिस्टमसोबत करार केला आहे.

नेपाळमध्ये ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ सुरु

  • नेपाळमध्ये एक महिना चालणारा ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ सुरु झाला आहे. नेपाळचे सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री रबिन्द्र अधिकारी यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
  • काठमांडू येथील भारतीय दूतावासातील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केद्राद्वारे भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • भारत-नेपाळचे अनेक वर्षांपासूनचे सबंध आणि दोन्ही देशांमधील लोकांमधील सांस्कृतिक संबंध दृढ करणे, हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. 
  • तसेच भारत व नेपाळ दरम्यान परस्पर सामंजस्य कायम राखण्यासाठी आणि वाढविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव उपयुक्त आहे.
  • या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुमित रॉय ग्रुपने संगीत आणि नाटकाद्वारे बुद्धांच्या जीवनाचे दर्शन घडविले.
  • या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अले असून, महात्मा गांधींवर प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त गांधीजींवर भाषण स्पर्धा आयोजित केली जाईल.
स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र
  • भारताच्या सांस्कृतिक वारशाबाबत जागरुकता पसरविणे व जगभरातील भारताच्या सांस्कृतिक संबंधांना बळकट करणे, हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
  • हे केंद्र भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते.

डिजिटल भारत, सक्षम भारत

  • इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘डिजिटल भारत, सक्षम भारत’ या डिजिटल इंडिया संग्रहाचे प्रकाशन झाले.
  • जनतेपर्यंत डिजिटल इंडियाचे यश पोहोचवणे हा संग्रहाचा उद्देश आहे. या संग्रहात २ भाग आहेत – ‘डिजिटल प्रोफाइल ऑफ इंडिया’ आणि ‘डिजिटल प्रोफाइल ऑफ स्टेटस ॲण्ड यूटीज्‌’.
  • डिजिटल प्रोफाइल ऑफ इंडियामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाचे सखोल विश्लेषण आहे.
  • तर डिजिटल प्रोफाइल ऑफ स्टेटस ॲण्ड यूटीजमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आहे.
  • डिजिटल समावेशन, डिजिटल सक्षमीकरण आणि डिजिटल दरी कमी करुन डिजिटलदृष्ट्या सक्षम समाज आणि भारताचे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत रुपांतर हा डिजिटल इंडिया उपक्रमाचा हेतू असून, त्यावर संग्रहात भर देण्यात आला आहे.

भारताचा कोलंबिया विद्यापीठासोबत सामंजस्य करार

  • हवामान बदल, वन संसाधन व्यवस्थापन आणि वन्यजीव यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर कार्य करण्यासाठी भारत सरकारने कॅनडा स्थित ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठासोबत (युबीसी) सामंजस्य करार केला आहे.
  • पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाने पुढील १० वर्षांसाठी वन्य विज्ञानात सहकार्य करण्याच्या संधी शोधण्यासाठी या एमओयूवर स्वाक्षरी केली आहे.
  • भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद, भारतीय वन्यजीव संस्था, भारतीय वन सर्वेक्षण, इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी आणि वनशिक्षण संचालनालय (उत्तराखंड) आणि युबीसी या संस्था सहकार्य करण्याच्या संधी शोधण्याचे कार्य करतील.
  • या एमओयूमुळे विद्यार्थी, संशोधक आणि फॅकल्टी यांचे आदानप्रदान सुलभ होईल, ज्यामुळे संशोधन प्रकल्प विकसित होतील, उपजीविकेच्या संधी व वन-आधारित समुदायांचे उत्पन्न वाढविण्यासाठीचे कार्य केले जाईल.
  • या एमओयूमुळे तंत्रज्ञांच्या सहाय्याने वन संसाधनांच्या योग्य वापरासाठी उद्योगांना मदत केली जाईल.
  • या सामंजस्य करारांतर्गत वन संसाधने व्यवस्थापन, हवामान बदल, वन्यजीव, पर्यावरण, रिमोट सेन्सिंग, वनस्पती संरक्षण, जैवतंत्रज्ञान, जैविक-अर्थव्यवस्था इत्यादी विषयांवर संशोधन केले जाईल. 
  • याशिवाय या करारांतर्गत संयुक्त परिषदा, सेमिनार, कार्यशाळा आणि प्रदर्शनदेखील आयोजित केले जातील.

२१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

  • बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी व सर्व मातृभाषांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
  • यंदाच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची मुख्य संकल्पना: ‘Indigenous languages matter for development, peace building and reconciliation.’
  • १७ नोव्हेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (यूनेस्को) २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला होता. 
  • बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून २१ फेब्रुवारी १९५२ रोजी निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
  • या घटनेच्या त्या स्मृतीप्रीत्यर्थ युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
  • भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत.

सिंधू पाणी वाटप करार

  • पाकिस्तानातील जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा थेंब अन् थेंब रोखण्याचा इशारा केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
  • पण त्यासाठी दोन्ही देशांत १९६०मध्ये झालेला सिंधू पाणी वाटप करार मोडीत काढावा लागेल. उरी येथील हल्ल्यानंतरही भारताने असाच इशारा दिला होता.
  • त्यानिमित्ताने सिंधू पाणी वाटप कराराची पार्श्वभूमी, स्वरूप याबाबतचे विवेचन.
कराराबद्दल
  • हा करार १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला. त्या वेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी कराचीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
  • सिंधू पाणी वाटप करार होण्यास ९ वर्षे लागली. त्यानंतर ६ नद्यांचे पाणी दोन देशांत वाटण्यात आले.
  • सिंधू नदी व्यवस्थेत सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या नद्यांचा समावेश होतो. सिंधू नदीचे खोरे प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले असून, चीन आणि अफगाणिस्तान यांचाही थोडा वाटा आहे.
  • सिंधू पाणी वाटप कराराअंतर्गत रावी, सतलज व बियास या पूर्ववाहिनी नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले तर सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले.
  • पूर्वेकडील नद्यांचे पाणी वापरण्यासाठी भारताने सतलजवर भाक्रा नांगल, बियासवर पोंग व पंडोह, रावीवर थेह ही धरणे बांधली आहेत. भारताने पूर्वेकडील नद्यांचे ९५ टक्के पाणी वापरात आणले.
  • तसेच प्रस्तावित शाहपूर-कांडी धरण प्रकल्प, सतलज-बियास जोडकालवा, उझ धरण प्रकल्प भारताच्या वाट्याचे पाणी पुरेपूर वापरण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
  • या करारानुसार सिंधू नदीचे केवळ २० टक्के पाणी भारताला वापरता येईल.
  • १९४८मध्ये भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले होते. नंतर जागतिक बँकेने हस्तक्षेप करून सिंधू पाणी वाटप करार घडवून आणला.
  • या करारावर भारत व पाकिस्तानच्या जलआयुक्तांची दर २ वर्षांनी बैठक होत असते. त्यात तांत्रिक बाबी व नद्यांवरील प्रकल्पांचा विचार केला जातो. पाण्याचा नेमका किती वाटा वापरला जातो याची माहिती यात दिली जाते.
पाणी रोखणे कितपत शक्य
  • उरी हल्ला २०१६मध्ये झाला त्या वेळी भारताने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा इशारा दिला होता.
  • भारत एकतर्फी सिंधू पाणी वाटप कराराचे उल्लंघन करून पाणी रोखू शकत नाही. केवळ पाकिस्तानकडे जाणारे पाणी कमी करू शकतो.
  • हा करार एकतर्फी मोडण्यासाठी दोन्ही देशांत मतैक्य घडून त्यासाठी वेगळ्या करारास मान्यता द्यावी लागेल.
  • हा करार मोडला तर भारताच्या नेपाळ व बांगलादेशबरोबरच्या पाणी करारांवर त्याचे सावट येईल.
  • तसेच भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान मिळवायचे असल्याने हा द्विपक्षीय करार मोडणे भारतासाठी अयोग्य ठरेल.
  • याशिवाय भारताने हा करार मोडून पाकिस्तानचे पाणी रोखले तर पाकिस्तानचा मित्र असलेला चीन ब्रह्मपुत्रेचे भारताकडे येणारे पाणी रोखू शकतो.
  • तसेच हा करार करताना सिंधू नदी ज्या चीनमधील तिबेटमधून उगम पावते त्याला चर्चेतून दूर ठेवण्यात आले होते. चीनने ठरवले तर तो सिंधूच्या पाण्याचा प्रवाह वळवून भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना अडचणीत आणू शकतो.

चालू घडामोडी : २२ फेब्रुवारी

तेजसला मिळाले अंतिम परिचालन निर्दोषत्व प्रमाणपत्र

  • संरक्षण संशोधन व विकास संघटनेकडून (डीआरडीओ) हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजसला लष्करी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज जेट विमान म्हणून भारतीय हवाई दलात सामील करून घेण्यास अंतिम परिचालन निर्दोषत्व प्रमाणपत्र (FOC: Final Operational Clearance Certificate) प्राप्त झाले आहे.
  • डीआरडीओकडून मिळालेले हे प्रमाणपत्र तेजस विमान युद्धासाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र आहे.
  • द सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस ॲण्ड सर्टीफिकेशन (CEMILAC) ही लष्करी विमाने आणि हवाई उपकरणांना प्रमाणित करणारी डीआरडीओची अधिकृत प्रयोगशाळा आहे.
  • हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडे बंगळूर येथील एरो-इंडिया शोदरम्यान मंजुरीबाबतचा दाखला सुपूर्द करण्यात आला.
  • तेजस या लढाऊ विमानाचा हवाई दलात होणारा समावेश म्हणजे ’मेक इन इंडिया’ या अभियानाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
तेजस
  • तेजस कमी वजनाचे सिंगल सीट लष्करी विमान आहे, त्यात केवळ एक इंजिन आहे. या श्रेणीतील हे जगातील सर्वात लहान आणि सर्वात हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान आहे.
  • १९८३साली निवृत्तीकडे निघालेल्या मिग-२१ विमानांची जागा घेण्यासाठी स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तयार करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती.
  • याचे ‘तेजस’ हे नाव तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठेवले होते. हे विमान तयार करण्यासाठी सुमारे २० वर्षाचा कालावधी लागला.
तेजसची वैशिष्ट्ये
  • डीआरडीओच्या एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या स्वायत्त संस्थेद्वारे तेजस हे विमान देशातच विकसित करण्यात आले आहे. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनीद्वारे त्याचे उत्पादन करण्यात आले आहे.
  • ४२ टक्के कार्बन फायबरचे संमिश्र, ४३ टक्के ॲल्युमिनियम धातूंचे मिश्रण व उर्वरित टायटॅनियम धातूंच्या मिश्रणातून तेजसची बांधणी करण्यात आली आहे.
  • लहान आकार आणि कार्बन कंपोजिट्सचा वापर केल्यामुळे हे विमान रडारद्वारे पकडणे कठीण होते.
  • तेजसमध्ये क्वाड्रुप्लेक्स डिजिटल फ्लाय बाय वायर उड्डाण नियंत्रण प्रणालीचा वापर केला जातो, ज्यामुळे तेजसला नियंत्रित करणे सोपे होते.
  • यामध्ये डिजिटल संगणक आधारित हल्ला यंत्रणा आणि ऑटोपायलट मोडदेखील आहे. तसेच यात आधुनिक एव्हीयॉनिक सॉफ्टवेअरचा वापरही करण्यात आला आहे.
  • तेजस विमान ३५० ते ४०० किलोमीटरच्या परिसरात १ तासापर्यंत सक्रिय राहू शकते आणि ३ टन शस्त्रास्त्र वाहून नेण्याची विमानाची क्षमता आहे.
  • हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, जहाजविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेट्स वाहून नेण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे.
  • दोन वर्षापूर्वी तेजसला हवाई दलात सामील करण्यात आले होते. जुलै २०१८मध्ये तमिळनाडूच्या सुलूर हवाई तळावर या विमानाने कार्य सुरु केले होते. भारतीय हवाईदलाच्या ४५व्या स्क्वाड्रनच्या ‘फ्लाइंग डॅगर्स’चा ही विमाने भाग आहेत.

ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथे ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ केला.
  • शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी १९८७मध्ये सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लॅकबोर्डच्या धर्तीवर देशात डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी ऑपरेशन डिजिटल बोर्ड सुरु करण्यात आले आहे.
  • ऑपरेशन डिजिटल बोर्ड क्रांतिकारी पाऊल असून, यामुळे शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया संवादात्मक आणि आवडीची होईल.
  • देशातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ९वी पासूनच्या इयत्तांमध्ये डिजिटल बोर्ड असेल. या प्रक्रियेला २०१९च्या आगामी सत्रापासून सुरुवात होईल.
  • या अभियानाअंतर्गत ९वी, १०वी आणि ११वी इयत्तेचे ७ लाख वर्ग आणि २ लाख महाविद्यालय आणि विद्यापीठातील वर्ग पुढील ३ वर्षात डिजिटल बोर्डने सुसज्ज करण्यात येतील.
  • यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात स्वारस्य निर्माण होईल. डिजिटल शिक्षण सामग्रीमुळे देशातील शिक्षण प्रणालीमध्ये क्रांतिकारक बदल होऊ शकतात.
  • शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि शिक्षणाच्या व शिकविण्याच्या नवीन संधी आणि पद्धती विकसित करणे, हे या उपक्रमाचे ध्येय आहे.
  • ऑपरेशन डिजिटल बोर्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोग कार्यान्वयन संस्था असेल. वर्ष २०२२पर्यंत देशातल्या प्रत्येक वर्गापर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी आयोगाने २९ जून २०१८ला ठराव मंजूर केला आहे.

स्वदेशी ‘सचेत’ या गस्ती नौकेचे जलावतरण

  • संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या स्वदेशी बनावटीच्या ‘सचेत’ या गस्ती नौकेचे जलावतरण करण्यात आले.
  • भारतीय तटरक्षक दलासाठी बांधल्या जाणाऱ्या ५ गस्ती नौकांपैकी ही पहिली नौका असून ती तटरक्षक दलाच्या ताफ्यात जानेवारी २०२०मध्ये दाखल होईल.
  • पंतप्रधानांच्या हस्ते १३ नोव्हेंबर २०१६ रोजी या ५ गस्तीनौका बांधणी प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले होते.
  • तर २० मार्च २०१७ रोजी तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक के नटराजन यांच्या हस्ते या गस्तीनौकेचा पायाभरणी सोहळा पार पडला होता.
  • सचेत गस्तीनौकेचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, जानेवारी २०२०मध्ये ती भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आलेली गस्तीनौका २४०० टन वजनाची असून बोटींच्या सुटकेसाठी जलद प्रतिसाद प्रणाली, चाचेगिरीला आळा घालणारी आहे.

१२ बँकांना ४८,२३९ कोटी भांडवली अर्थसाहाय्य

  • सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांना ४८,२३९ कोटी रुपयांचे भांडवली अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.
  • सरकारच्या गुंतवणुकीमुळे या बँकांना आवश्यक भांडवली पर्याप्तेची मर्यादा राखण्यास आणि वित्तीय नियोजनाद्वारे व्यावसायिक प्रगती करण्यास मदत होणार आहे.
  • या नव्याने होत असलेल्या भांडवली साहाय्यातून सरकारी बँकांसाठी चालू आर्थिक वर्षांतील एकूण भांडवली मदत ही नियोजित १.०६ लाख रुपयांच्या तुलनेत १,००,९५८ कोटी रुपयांवर जाईल.
  • उर्वरित ५,००० कोटी रुपयेही नजीकच्या काळात देना बँक व विजया बँकेबरोबर विलीनीकरण होत असलेल्या बँक ऑफ बडोदासाठी आकस्मिक गरज उद्भवल्यास अथवा वृद्धी भांडवल म्हणून वापरात येईल.
  • या टप्प्यांतील भांडवली पुनर्भरणाची कॉर्पोरेशन बँक ही ९,०८६ कोटी रुपयांसह सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे, त्या खालोखाल अलाहाबाद बँकेला ६,८९६ कोटी रुपयांची भांडवली मदत मिळणार आहे.
  • सध्या या दोन्ही बँका जरी आरबीआयच्या पीसीए निर्बंधाखाली असल्या तरी चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. निर्बंधातून बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त भांडवली पुनर्भरण या बँकांसाठी खूपच उपकारक ठरेल
  • भांडवली गुंतवणूक करण्यात येणाऱ्या अन्य बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाला ४,६३८ कोटी रुपये व बँक ऑफ महाराष्ट्रला २०५ कोटी रुपये मिळणार आहेत. या दोन्ही बँका नुकत्याच आर्थिक निर्बंधातून बाहेर पडल्या आहेत.
  • याशिवाय पंजाब नॅशनल बँक ५,९०८ कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडिया ४,११२ कोटी रुपये, आंध्र बँक ३,२५६ कोटी रुपये आणि सिंडिकेट बँकेमध्येही १,६०३ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मिळून केंद्र सरकार १२,५३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारने डिसेंबरमध्ये ७ सार्वजनिक बँकांमध्ये रोख्यांच्या माध्यमातून २८,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
  • आर्थिक कामगिरी सुधारल्याने बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया व ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स या बँका २०१९च्या सुरुवातीला पीसीए निर्बंधांतून मुक्त झाल्या आहेत.
  • सध्या पीसीए निर्बंधांअंतर्गत ८ बँका आहेत: देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक, यूको बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.

माजी न्यायाधीश डी. के. जैन बीसीसीआयचे पहिले लोकपाल

  • सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे. ते बीसीसीआयचे पहिले लोकपाल असतील.
  • खेळाडूंच्या संदर्भातील, तसेच नियुक्त लोकपालाची कार्यकक्षा निश्चित करताना बीसीसीआयचे आर्थिक प्रश्‍नांबाबत निर्णय लोकपालने घ्यावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
  • न्यायाधीश एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. या पदासाठी संभाव्य ६ नावांची यादी पी. एस. नरसिंहा यांनी सादर केली होती.
  • लोढा समितीच्या शिफारशींप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही नियुक्ती करण्यात आली. बीसीसीआयमधल्या प्रशासकीय सुधारणांसाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशीत लोकपालच्या नियुक्तीचाही समावेश आहे.
  • बीसीसीआयवर लोकपालची नियुक्ती करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ९ ऑगस्ट २०१८ रोजी दिला होता.
  • लोकपाल या नात्याने डी. के. जैन बीसीसीआय आणि राज्यांमधील क्रिकेट संघटना यांच्यामधील वाद सोडविण्याचा प्रयत्न करतील.
  • तसेच हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या संदर्भात असलेला वाद सोडविण्याचे कार्यही लोकपाल करणार आहेत. पंड्या आणि राहुल यांच्यावर ‘कॉफी विथ कारण’ या टीव्ही शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय) ही भारतातील क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे.
  • बीसीसीआयची स्थापना १९२८ साली करण्यात आली होती. देशातील क्रिकेटच्या नियमांसाठी ही सर्वोच्च राष्ट्रीय शासकीय संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
  • या संस्थेमधील भ्रष्टाचार आणि एकाधिकाराशी संबंधित गोंधळ निस्तरण्यासाठी निवृत्त न्यायाधीश लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
  • या समितीच्या शिफारसींनुसार बीसीसीआयच्या सर्व सभासदांना जानेवारी २०१७ मध्ये निवृत्त करण्यात आले व बीसीसीआयसाठी एका प्रशासक समितीची स्थापना करण्यात आली होती.
  • या समितीचे अध्यक्ष देशाचे माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय असून, विक्रम लिमये, डायना एडलजी आणि रामचंद्र गुहा हे या समितीचे सदस्य आहेत.

त्रिपुरामधील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन

  • केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आगरताळा येथील तुलाकोना गावात सिकरीया मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले. हे भारतातील १७वे आणि त्रिपुरामधील पहिले मेगा फूड पार्क आहे.
  • हे मेगा फूड पार्क ५० एकर जमिनीवर ८७.४५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे.
  • या मेगा फूड पार्कमध्ये संकलन केंद्रे, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, केंद्रीय प्रक्रिया केंद्रे, शीत साखळी आणि उद्योजकांसाठी ३०-३५ पूर्ण विकसित प्लॉटसहित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याची सोय आहे.
  • या मेगा फूड पार्कद्वारे दरवर्षी ४५०-५०० कोटी रूपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या मेगा फूड पार्कमुळे ५००० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. २५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या फूड पार्कचा फायदा होईल.
मेगा फूड पार्क योजना
  • अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.
  • संकलन केंद्र, प्राथमिक प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून शेतीपासून प्रक्रियेपर्यंत आणि नंतर ग्राहक बाजारपेठेपर्यंत थेट संबंध जोडण्यासाठी मेगा फूड पार्क या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.
  • अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि किरकोळ विक्रेत्यांना एकत्र आणून कृषी उत्पादन बाजारपेठेशी जोडण्यासाठी मेगा फूड पार्कची निर्मिती करण्यात येत आहे.
  • भारत सरकार ४२ मेगा फूड पार्क उभारत आहे, त्यापैकी ३५ मंजूर झालेले आहेत. सध्या ३५ मंजूर मेगा फूड पार्क पैकी १७ मेगा फूड पार्क कार्यरत असून, केंद्र सरकार प्रत्येक फूड पार्कसाठी ५० कोटी रुपयांची आर्थिक मदत पुरवते.
योजनेची मुख्य उद्दिष्टे
  • अन्न प्रक्रियेसाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन वाढविणे.
  • अन्नाचा अपव्यय कमी करणे.
  • उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांची क्षमता वाढवीणे.
  • उत्पादनात वाढ करणे. विशेषतः ग्रामीण भागातील रोजगार वाढविणे.
  • ग्रेडिंग, पॅकेजिंग, वेअरहाउस, कोल्ड स्टोरेज, आयक्यूएफ, रायपनिंग चेंबर्स, क्यूसी लॅब इ. ची निर्मिती करणे.
  • औद्योगिक भूखंड, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाण्याची उपलब्धता विजेची गरज भागविणे इ. पायभूत सुविधा उपलब्ध करणे
  • ट्रेनिंग सेंटर, कॅंटीन, वर्कशॉप हॉस्पिटल इ. ची निर्मिती करणे.

एप्रिल-डिसेंबर २०१८ दरम्यान भारतातील एफडीआय

  • अलीकडेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एप्रिल-डिसेंबर २०१८ दरम्यान थेट परकीय गुंतवणुकीशी (एफडीआय) संबंधित माहिती प्रकाशित केली.
  • यातील काही ठळक मुद्दे
  • एप्रिल-डिसेंबर २०१८ दरम्यान भारतात थेट परकीय गुंतवणूकीत ७ टक्क्यांची घट झाली आणि ती ३३.४९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.
  • एप्रिल-डिसेंबर २०१७ दरम्यान भारतातील थेट परकीय गुंतवणूक ३५.९४ अब्ज डॉलर्स होती.
  • सर्वाधिक एफडीआय सेवा (५.९१ अब्ज डॉलर), कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर (४.७५ अब्ज डॉलर), दूरसंचार (२.२९ अब्ज डॉलर), व्यवसाय (२.३३ अब्ज डॉलर), रसायने (६.०५ अब्ज डॉलर) आणि वाहन उद्योग (१.८१ अब्ज डॉलर) इत्यादींमध्ये करण्यात आला.
  • एप्रिल-डिसेंबर २०१८ दरम्यान १२.९७ अब्ज डॉलर गुंतवणुकीसह सिंगापूर सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूकदार देश ठरला.
  • त्याखालोखाल मॉरिशस (६ अब्ज डॉलर), नेदरलँड्स (२.९५ अब्ज डॉलर), जपान (२.२१ अब्ज डॉलर), अमेरिका (२.३४ अब्ज डॉलर) आणि युनायटेड किंगडम (१.०५ अब्ज डॉलर) हे सर्वात मोठे गुंतवणूकदार देश होते.
  • एफडीआयमध्ये झालेल्या घटीचे विपरीत परिणाम भारताच्या व्यापारतोलावर आणि रुपयांच्या मूल्यावर होण्याची शक्यता आहे.

८वी जागतिक सीएसआर परिषद

  • ८व्या जागतिक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) परिषदेचे आयोजन मुंबईत झाले.
  • यामध्ये इनोवेटिव्ह फायनान्शियल अॅडव्हायझर्स प्रा.लि.चे सौमित्रो चक्रवर्ती यांना ‘सीईओ ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • जागतिक सीएसआर परिषदेमध्ये कॉर्पोरेट धोरण, नवोन्मेष व धोरणात्मक भागीदारी यासंबंधी शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांच्या एकत्रीकरणावर भर देण्यात आला. या परिषदेमध्ये ३३ देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)
  • कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत समजावयाचे झाले तर औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकी.
  • पर्यावरण आणि सामाजिक कल्याणकारी उपक्रमांमध्ये कंपन्यांच्या स्वैच्छिक योगदानासाठी याची सुरुवात करण्यात आली.
  • सीएसआर हे एखाद्या निसर्गचक्राप्रमाणे असते. जे काही समाज, पर्यावरणाकडून मिळाले तेच पुन्हा त्यांना अर्पण करणे हे त्याचे उदात्त तत्त्व असते.
  • कंपनी अधिनियम २०१३च्या कलम १३५मध्ये सीएसआरची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या नियमानुसार, सीएसआरबद्दल निर्णय घेण्याची क्षमता कंपनीच्या मंडळाकडे आहे.
  • यानुसार ५०० कोटी रुपये मूल्य असलेल्या किंवा १००० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या किंवा ५ कोटी रुपयांहून अधिक निव्वळ नफा असलेल्या कंपन्यांना गेल्या ३ वर्षांतील सरासरी निव्वळ नफ्यापैकी २ टक्के रक्कम सीएसआरशी संबंधित उपक्रमांवर खर्च करणे बंधनकारक आहे.
  • केंद्रीय कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने या मंत्रालयाचे सचिव इंजीती श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर २०१८मध्ये सीएसआरसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.
  • ही समिती सध्याच्या सीएसआर रचनेचे पुनरावलोकन करेल व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवरील धोरणासाठी रोडमॅप तयार करेल.

४थी भारत-आसियान परिषद आणि प्रदर्शन

  • २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे चौथ्या भारत-आसियान परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
  • वाणिज्य विभागाने फिक्कीच्या साहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा वाणिज्य विभागाचा प्रमुख कार्यक्रम आहे.
  • भारत-आसियान यांच्या प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोनाला आकार देण्यासाठी धोरणकर्ते व उद्योजक यांना मंच या परिषदेमुळे उपलब्ध होईल.
  • या प्रदर्शनामध्ये २०० पेक्षा जास्त प्रदर्शक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’चा भाग आहे.
दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना (आसियान)
  • आसियान (ASEAN): असोसिएशन ऑफ साउथइस्ट एशियन नेशन्स
  • आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  • ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  • सदस्य देशांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व व स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि त्यासोबतच विवादांवर शांततेने तोडगा काढणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  • स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे ५ देश सदस्य होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  • नंतर १९९५साली व्हिएतनाम, १९९७साली लाओस व म्यानमार आणि १९९९साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  • जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  • सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
  • आसियान देश भारताचे चीनपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व्यापारी भागीदार असून भारत-आसियान द्विपक्षीय व्यापार ८१.३३ अब्ज डॉलर्स आहे.

द. भारत हिंदी प्रचार सभेत महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

  • दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
  • महात्मा गांधी यांनी १९१८साली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेची स्थापना केली होती. अलीकडेच या संस्थेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली होती.
  • गैर-हिंदी भाषिक दक्षिण भारतातील हिंदी साक्षरता दर सुधारणे, हे दक्षिण भारत हिंदी सभेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • १९१८ साली महात्मा गांधी यांनी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा स्थापन केली होती आणि ते मृत्युपर्यंत या सभेचे अध्यक्ष होते.
  • दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडु येथे स्थित आहे. केंद्र सरकारने १९६४मध्ये या संस्थेला महत्वपूर्ण राष्ट्रीय संस्थेचा दर्जा दिला होता.
  • ही संस्था ४ मंडळांमध्ये विभागलेली असून, प्रत्येक राज्य आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडुसाठी प्रत्येकी एका मंडळ विभागण्यात आले आहे.

श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिष्यवृत्ती

  • श्रीलंकेच्या १५० विद्यार्थ्यांना भारतात अभ्यासासाठी प्रतिष्ठित महात्मा गांधी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.
  • श्रीलंकेचे शिक्षण मंत्री अकीला विराज कारयावासम आणि भारतीय उच्चायुक्त या तरनजीत सिंह संधू यांनी कोलंबो येथे ही शिष्यवृत्ती प्रदान केली.
  • महात्मा गांधी शिष्यवृत्ती ही गुणवत्ता आधारित शिष्यवृत्ती २००६-०७मध्ये सुरू करण्यात अली असून, भारतीय उच्चायुक्त श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने सहकार्याने दरवर्षी प्रदान केली जाते.
  • या शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २ वर्षांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • याअंतर्गत भारताच्या उच्चायुक्ताद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा २००० ते २५०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. २००६पासून ११०० श्रीलंकन विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घेतला आहे.
  • श्रीलंकेतील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी भारत श्रीलंकेत २७ नवीन वर्गखोल्या उभारत आहे. श्रीलंकेच्या दक्षिणेकडील रूहुना विद्यापीठातील मोठे ऑडिटोरियम भारताने श्रीलंकेला दिले आहे.
  • पोलोंनारुवा व सरस्वती महाविद्यालय कँडीतील त्रिभाषीय शाळांच्या स्थापनेसाठीही भारत श्रीलंकेला सहाय्य प्रदान करीत आहे.

अमेरिका करणार मिलिटरी स्पेस फोर्सची निर्मिती

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलिटरी स्पेस फोर्सच्या (अंतराळ लष्करी दल) निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली आहे.
  • या मार्गदर्शक तत्त्वांनी पेंटागॉनला स्पेस फोर्सच्या स्थापनेसाठी निर्देश दिले आहेत. हे अमेरिकन लष्कराचा ६वा भाग असेल. (अमेरिकन लष्कराचे इतर भाग: भूसेना, नौदल, हवाई दल, मरीन आणि कोस्ट गार्ड.)
  • मिलिटरी स्पेस फोर्सचा मुख्य उद्देश अंतराळामध्ये अमेरिककेचे वर्चस्व कायम राखणे आणि जतन करणे हा आहे.
  • याअंतर्गत सैनिकांना अंतराळात पाठविण्याऐवजी ही लष्करी सेना राष्ट्रीय सुरक्षा, आणि आंतरराष्ट्रीय दळवळणासाठीच्या देशाच्या उपग्रहांचे रक्षण करण्याचे कार्य करेल.
  • अंतराळ भविष्यातील एक नवीन युद्धक्षेत्र असू शकते आणि अमेरिका मिलिटरी स्पेस फोर्सद्वारे कोणत्याही युद्धासाठी तयार राहू इच्छिते.
  • अंतराळातील धोक्यांपासून बचाव करणे आणि सैनिकांना अंतराळासाठी प्रशिक्षण देणे हे मिलिटरी स्पेस फोर्सचे कर्तव्य असेल.
  • मिलिटरी स्पेस फोर्स प्रत्यक्षात आणण्यासाठी या प्रस्तावाला अमेरिकन कॉंग्रेसची मान्यता आवश्यक आहे.

चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी

राष्‍ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण २०१९

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रस्‍तावित राष्‍ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण २०१९ला (एनपीई २०१९) मंजुरी दिली आहे.
  • या धोरणात चिप सेटसह महत्‍वपूर्ण सुटे भाग देशात विकसित करण्याच्या क्षमतांना प्रोत्‍साहन देऊन, तसेच जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी पोषक वातावरण तयार करून भारताला इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रणाली संरचना आणि निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
एनपीई २०१९ची ठळक वैशिष्ट्ये
  • जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ईएसडीएम क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण तयार केले जाईल. ईएसडीएमच्या संपूर्ण मूल्य साखळीत देशांतर्गत उत्पादन निर्मिती आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल.
  • प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक सुट्या भागाच्या निर्मितीसाठी प्रोत्‍साहन आणि साहाय्य दिले जाणार आहे.
  • अत्‍यंत उच्च तंत्रज्ञान आणि ज्यात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे अशा सेमी कंडक्‍टर सुविधा, डिस्‍प्‍ले फॅब्रिकेशन सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी प्रोत्साहनाचे विशेष पॅकेज दिले जाईल.
  • नवीन कारखान्याना प्रोत्साहन व सध्याच्या कारखान्यांचे विस्‍तारीकरण करण्यासाठी उपयुक्‍त योजना व प्रोत्‍साहन देण्याशी संबंधित व्‍यवस्‍था आखल्या जातील.
  • इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या सर्व उप-क्षेत्रांमध्ये उद्योगप्रणित संशोधन व विकासाला प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये ५-जी, आयओटी, सेंसर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, व्हर्चुअल रियलिटी (वीआर), ड्रोन, रोबोटिक्‍स, एडिटिव मॅन्‍युफॅक्‍चरिंग, फोटोनिक्‍स, नॅनो आधारित उपकरणे आदी क्षेत्रात प्रारंभिक टप्प्यातील स्‍टार्ट-अप्‍सचा समावेश आहे.
  • कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रोत्‍साहन व सहाय्य दिले जाईल. यामध्ये कामगारांचे कौशल्य पुन्हा सुनिश्चित करणे समाविष्ट आहे.
  • फॅबलेस चिप डिजाइन उद्योग, वैद्यकीय इलेक्‍ट्रॉनिक उपकरण उद्योग, ऑटोमोटिव इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योग आणि मोबिलिटी व धोरणात्मक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगासाठी पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍सवर विशेष भर दिला जाईल.
  • ईएसडीएम क्षेत्रात आईपीचा विकास आणि अधिग्रहण यांना प्रोत्साहन देण्यासाठी सार्वभौम स्वामित्व निधी (एसपीएफ) स्थापन केला जाईल.
  • राष्‍ट्रीय सायबर सुरक्षा व्‍यवस्‍था सुधारण्यासाठी विश्वासार्ह इलेक्‍ट्रॉनिक्‍स मूल्‍य श्रृंखला (वैल्‍यू चेन) संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
  • २०२५पर्यंत १ अब्ज मोबाईल हँडसेट तयार करण्याचा ध्येय, ज्यामुळे १९० अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्तीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यापैकी ६०० दशलक्ष मोबाईल हँडसेट निर्यात केले जाणार आहेत.
  • ईएसडीएम: इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिस्टम डिझाईन ॲण्ड मॅन्‍युफॅक्‍चरिंग

अवकाश विभागाअंतर्गत नवी कंपनी सुरु करण्यास मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाश विभागाअंतर्गत नवी कंपनी सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने केलेल्या संशोधन आणि विकास कामांचा व्यावसायिक वापर करून घेण्यासाठी अवकाश विभागाच्या अखत्यारीतच हे एक वेगळे कार्यालय सुरु केले जाणार आहे
  • इस्त्रोच्या विविध संशोधनांचा व्यवसायिक कामांसाठी वापर करण्याच्या संधी देणारे मार्ग पुढीलप्रमाणे -
  • छोट्या उपग्रहांच्या तंत्रज्ञानाचे उद्योगक्षेत्राला हस्तांतरण, ही नवी कंपनी अवकाश विभाग किंवा इस्त्रोकडून परवाना घेईल आणि उद्योगांना उप-परवाने जारी करेल.
नव्या कंपनीची कार्ये
  • खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून लहान उपग्रह प्रक्षेपक वाहनांची निर्मिती.
  • उद्योग क्षेत्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनांची निर्मिती.
  • अवकाश-संबंधित उत्पादने व सेवा, ज्यात प्रक्षेपक आणि उपकरणे यांचा समावेश असेल, त्यांची निर्मिती करणे.
  • इस्त्रो केंद्रांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि अवकाश विभागांच्या वेगळ्या घटकांची/कार्यालयांची स्थापना.
  • भारत आणि परदेशात नवनवे तंत्रज्ञान व उत्पादने यांचे विपणन (मार्केटिंग) करणे.
  • अलीकडेच इस्रोने लिथियम-आयन विद्युतघटाच्या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला मंजुरी दिली होती. या नव्या कंपनीच्या स्थापनेमुळे अंतराळ विभागाला महसुलाची प्राप्ती होईल.

७वे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार

  • माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ७वे राष्ट्रीय छायाचित्र पुरस्कार प्रदान केले.
  • या समारोहाच्या व्यावसायिक श्रेणीची मुख्य संकल्पना ‘महिलांच्या नेतृत्वामध्ये विकास’ ही होती. तर हौशी श्रेणीची मुख्य संकल्पना ‘भारतातील मेळावे व उत्सव’ ही होती.
  • छायाचित्रणाच्या तंत्रज्ञानाला व कलेला चालना देणे आणि देशातील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे.
  • या समारोहात एकूण १३ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ३ लाख रुपये रोख रकमेचा जीवनगौरव पुरस्कारही समाविष्ट आहे.
  • वर्षातील सर्वोत्तम व्यावसायिक छायाचित्रकाराला १ लाख रुपये रोख रकमेचा तर सर्वोत्तम हौशी छायाचित्रकाराला ७५ हजार रुपये रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • व्यावसायिक आणि हौशी दोन्ही गटात प्रत्येकी ५ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांची अनुक्रमे रक्कम ५० हजार आणि ३० हजार आहे.
पुरस्कार विजेते
  • जीवनगौरव पुरस्कार: अशोक दिलवाली
  • सर्वोत्तम व्यावसायिक छायाचित्रकार: एसएल शांथ कुमार
  • सर्वोत्तम हौशी छायाचित्रकार: गुरुदीप धीमण
  • विशेष उल्लेखनीय पुरस्कार (व्यावसायिक): अरुण श्रीधर, कैलाश मित्तल, मिहीर सिंग, पी.व्ही. सुंदरराव, रणिता रॉय
  • विशेष उल्लेखनीय पुरस्कार (हौशी): रवी कुमार, एस. निलीमा, मनीष जैती, महेश लोणकर, अविजित दत्ता

स्टार्ट-अप्ससाठीची सवलत प्रक्रिया अधिक सुलभ

  • स्टार्ट-अप्ससाठीची सवलत प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाला वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली आहे.
  • या अधिसूचनेद्वारे स्टार्ट-अप्सच्या व्याख्येसाठीचे नियम सरकारने काही प्रमाणात शिथिल केले आहेत. यामुळे स्टार्ट-अप्सची व्याख्या अधिक विस्तृत होणार आहे.
नियमांमधील बदल
  • पूर्वीच्या ७ वर्षांच्या कालावधीऐवजी व्यवसाय संस्था आता स्थापना दिनांक आणि नोंदणीपासून १० वर्षांच्या कालावधीसाठी स्टार्ट-अप म्हणून गणली जाईल.
  • तसेच स्थापना दिनांक आणि नोंदणीपासून कुठल्याही वित्तीय वर्षात उलाढाल १०० कोटी रुपयांवर गेली नाही ती कंपनी स्टार्ट-अप म्हणून मानली जाईल. पूर्वी ही मर्यादा २५ कोटी होती.
  • एंजल इन्व्हेस्टरसाठी आयकर कायदा १९६१ अंतर्गत सुत मिळण्यास पात्र ठरणाऱ्या गुंतवणुकीची मर्यादा १० कोटीवरून २५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रस्तावित सवलती
  • स्टार्ट-अप इमारत व जमिनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, परंतु या इमारत अथवा जमिनीचा वापर भाड्याने देण्यासाठी किंवा व्यवसायासाठी करत असेल असे स्टार्टअप यात गुंतवणूक करू शकते.
  • ज्यांचा व्यवसाय पैसे कर्जाने देण्याशी संबंधित आहे, अशा स्टार्ट-अप व्यतिरीक्त इतर स्टार्ट-अप कर्जे प्रदान करू शकत नाही.
  • स्टार्ट-अप स्टॉक, कार किंवा वाहतूक या माध्यमातून १० लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. तसेच स्टार्टअप इतर कंपनीमध्ये भांडवली अंशदान करू शकत नाही.
  • भारतात उद्योजकतेच्या संस्कृतीला आणि व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सरकारकडून या सवलती देण्यात आल्या आहेत.
  • तसेच स्टार्ट-अपचा वापर करचोरी किंवा आर्थिक गैरव्यवहारांसाठी केला जाऊ नये, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या शिफारशींनुसार हे बदल करण्यात आले आहेत.
  • एंजल इन्व्हेस्टमेंट: धनाढ्य व्यक्तींद्वारे नव्या व्यावसायिक कंपनीच्या सुरुवातीच्या काळात केली गेलेली गुंतवणूक.

डिझेलहून विजेवर परिवर्तीत झालेले पहिले रेल्वे इंजिन

  • वाराणसीतल्या डिझेल लोकोमोटिव वर्क्स येथे डिझेलहून विजेवर परिवर्तीत झालेल्या पहिल्या रेल्वे इंजिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.
  • या प्रकारचे रेल्वे इंजिन किफायतशीर असून, यामुळे रेल्वेच्या गतीमध्येही वाढ होणार आहे.
  • डिझेलवर चालणारी सर्व इंजिने येत्या काळात विजेवर परिवर्तीत करण्याचे भारतीय रेल्वेने ठरवले आहे. यामुळे देशातील रेल्वे विद्युतीकरणाला गती मिळेल.
  • संकर्षण ऊर्जेच्या खर्चात बचत करणे व कार्बन उत्सर्जनात कपात करणे, यादृष्टीने हा प्रकल्प एक पाऊल पुढे आहे.
  • डिझेल लोकोमोटीव वर्क्सने प्रत्येकी १० हजार अश्वशक्तींची २ इंजिने केवळ ६९ दिवसात परिवर्तीत केली आहेत.
  • हा प्रकल्प भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण या अभियानाचा भाग आहे. हे संपूर्ण काम ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत करण्यात आले असून भारतीय संशोधन आणि विकासातून हे करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वे
  • भारतीय रेल्वे जगातील सर्वोत्तम रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेला १६० वर्षांचा इतिहास आहे.
  • १६ एप्रिल १८५३ रोजी बोरी बंदर आणि ठाणे यादरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली.
  • १.५१ लाख किमी ट्रॅक, ७००० स्टेशन्स, १३ लाख कर्मचारी असा भारतीय रेल्वेचा प्रचंड विस्तार आहे. देशाच्या आर्थिक विकासात रेल्वेची भूमिका फार महत्वाची आहे.
  • मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येच्या दळणवळणासाठी हा ऊर्जा-कार्यक्षम वाहतूक मार्ग उपयुक्त आहे. लांब अंतरावर मोठ्या प्रमाणात वस्तूंची ने-आण करण्यासाठी हा योग्य मार्ग आहे.
  • भारतीय रेल्वे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि सरकारी मालकीचे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.

सौदी अरेबियाची आयएसएच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी

  • सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली.
  • माराकेश (मोरोक्को) येथे झालेल्या कोप-२२ परिषदेत १५ नोव्हेंबर २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा करार स्वाक्षरीसाठी सर्व देशांसाठी खुला करण्यात आला होता.
  • भारत, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, युके, जपान, अर्जेन्टिना इत्यादी देशांनंतर या करारावर स्वाक्षरी करणारा सौदी अरेबिया ७३वा देश ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
  • International Solar Alliance (ISA)
  • आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात भारताच्या पुढाकाराने पॅरिस येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणीय बदल या विषयावरच्या परिषदेदरम्यान (कोप-२१) नोव्हेंबर २०१५मध्ये करण्यात आली.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या हस्ते या नव्या सौर-ऊर्जा संघटनेचे उद्घाटन झाले होते.
  • आयएसएचा फ्रेमवर्क करार डिसेंबर २०१७मध्ये लागू करण्यात आला होता तर ११ मार्च २०१८ रोजी आयएसएचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता.
  • आयएसएचे मुख्यालय गुरूग्राम, हरियाणा येथे राष्ट्रीय सौर उर्जा संस्थेमध्ये स्थित आहे. भारतात मुख्यालय असलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
  • ज्या देशांना ऊर्जेसाठी सौरशक्तीवर निर्भर राहण्याजोगी नैसर्गिक अनुकूलता आहे अशा कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानच्या सौर ऊर्जेच्या दृष्टीने समृद्ध सुमारे १२१ संभाव्य सदस्य-राष्ट्रांची ही संघटना आहे.
  • या देशांना सूर्याच्या पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे आयएसएचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • २०३० पर्यंत १ टेरावॅट वीजनिर्मिती सौर-स्रोतातून करण्याचे मोठे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या संघटनेसमोर आहे.
  • याशिवाय एकत्रित प्रयत्नांद्वारे सौर उर्जेच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा खर्च कमी करणे, हेदेखील आयएसएचे उद्दिष्ट आहे.
  • मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी २०३०पर्यंत या क्षेत्रात १,००० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी आयएसए प्रयत्नशील आहे.
  • आयएसएच्या माध्यमातून सदस्य देशांत सामूहिक संशोधन, माहिती व तंत्रज्ञान देवाणघेवाण, सौरऊर्जा क्षमता विकसित करणे आणि जागतिक सौर ऊर्जेचे जाळे निर्माण करणे इत्यादीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
  • जगातील इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे सहकार्य घेत आयएसए काम करणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय नूतनीकरणक्षम ऊर्जा संस्था (IRENA), संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्था इत्यादींचा समावेश आहे.

२० फेब्रुवारी: जागतिक सामाजिक न्याय दिन

  • दरवर्षी २० फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन (World Day for Social Justice) म्हणून साजरा केला जातो.
  • गरिबी, बेरोजगारी यांसारख्या समस्यांशी निगडित प्रयत्नांना चालना देण्याची गरज लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • यंदाच्या सामाजिक न्याय दिनाची संकल्पना ‘तुम्हाला जागतिक शांतता हवी असेल तर सामाजिक न्यायासाठी कार्य करा’ अशी आहे.
  • सामाजिक न्यायासाठी लैंगिक समानता, सामाजिक सुरक्षा आणि स्थलांतरितांच्या हक्कांचे संरक्षण आवश्यक आहे.
  • जेव्हा लिंग, वय, वंश, धर्म किंवा संस्कृती याद्वारे लोकांमध्ये भेदभाव केला जात नाही, तेव्हाच सामाजिक न्याय सुनिश्चित केला जाऊ शकतो.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २६ नोव्हेंबर २००७ रोजी २० फेब्रुवारी हा दिवस प्रतिवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यास मंजुरी दिली. २००९ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला.
  • महाराष्ट्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन म्हणजेच २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.

कुसुम योजना

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (कुसुम योजना) सुरु करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
  • २०२२पर्यंत २५.७५ गिगावॅट सौरउर्जा क्षमतेचा वापर करून शेतकऱ्यांना आर्थिक आणि जल सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात येत आहे.
या प्रस्तावित योजनेचे ३ घटक आहेत
  • घटक ए: १०,००० मेगावॅटच्या भूमीवरील विकेंद्रीकृत ग्रीडशी जोडलेली नवीकरणीय उर्जा सयंत्रे निर्माण करणे.
  • घटक बी: सौर उर्जेवर चालणारे १७.५० लाख कृषी पंप बसवणे.
  • घटक सी: १० लाख ग्रीडशी जोडलेल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचे सौरकरण करण्यास सहाय्य करणे.
योजनेची वैशिष्ट्ये
  • या योजनेतील घटक ए व घटक सी प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. सुरुवातीला घटक ए अंतर्गत १००० मेगावॅट निर्मिती तर घटक सी अंतर्गत १ लाख कृषी पंप ग्रीडशी जोडले जाणार आहेत.
  • घटक बी पूर्णपणे लागू करण्यात येणार असून, याअंतर्गत शेतकऱ्याला ७.५ एचपी क्षमतेचे सौरपंप बसवण्यासाठी सहाय्य केले जाईल.
  • या योजनेंतर्गत ५०० किलोवॅट ते २ मेगावॅट क्षमतेची नवीकरणीय उर्जा सयंत्रे शेतकरी, सहकारी संस्था, पंचायत अथवा शेतकरी संस्थांद्वारे त्यांच्या पडीक जमिनीवर बसविण्यात येईल.
  • यातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा वापर शेतकरी त्यांच्या सिंचनाच्या कार्यांसाठी करू शकतो. तर अतिरिक्त उर्जा वितरण कंपन्यांद्वारे (डीस्कॉम) संबंधित राज्याच्या विद्युत नियमन आयोगाने ठरविलेल्या किंमतीने खरेदी केली जाईल.
  • यामुळे पडीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना स्थिर आणि सतत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल आणि राज्यांना त्यांची नवीकरणीय खरेदी दायित्वाची उद्दिष्टे सध्या करण्यास मदत होईल.
  • वितरण कंपन्यांना ४० पैसे प्रतियुनिट दराने प्रदर्शन आधारित प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल.
  • ०२२पर्यंत २५,७५० मेगावॅट सौर क्षमतेची भर घालण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी केंद्राकडून एकूण ३४,४२२ कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे.
  • या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच या योजनेमधे थेट रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.
  • या योजनेमुळे रोजगारात वाढ करण्याबरोबरच कुशल व अकुशल कामगारांसाठी ६.३१ लाख नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिल्ली-मेरठ अतिजलद परिवहन प्रणाली

  • केंद्र सरकारने राजधानी दिल्लीला गाझियाबादद्वारे मेरठशी जोडणाऱ्या क्षेत्रीय अतिजलद परिवहन प्रणालीच्या (आरआरटीएस: रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टम) बांधकामाला मंजूरी दिली आहे.
  • या बांधकामासाठी ३०,२७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आरआरटीएसच्या मदतीने, हायस्पीड व हरित सार्वजनिक ट्रांझिटच्या सहाय्याने ८२ किमीचे अंतर ६० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.
  • या प्रकल्पावर स्पेशल पर्पज व्हेईकल प्रकल्प विशेष वाहन राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाद्वारे (NCRTC) काम करण्यात येईल. या प्रकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे समान योगदान असेल.
  • रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (आरआरटीएस) ही रेल्वे आधारित हायस्पीड क्षेत्रीय वाहतूक व्यवस्था आहे.
  • भारतात नवी दिल्ली-मेरठ दरम्यान प्रथमच ही व्यवस्था लागू केली जाईल. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये प्रवासासाठी जलद, आरामदायक आणि सुरक्षित माध्यम प्रदान करणे हा त्यामागील उद्देश आहे.
  • या आरआरटीएसची एकूण लांबी ८२.१५ किमी आहे, ज्यापैकी ६८.०३ किमी मार्ग एलिव्हेटेड (उंचीवर) आहे आणि १४.१२ किमी भूमिगत आहे.
आरआरटीएसचे फायदे
  • प्रदूषण कमी होईल.
  • आरआरटीएसमुळे रस्त्यावरील १ लाख वाहने कमी होतील. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका होईल.
  • प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
  • जलद वाहतूकमुळे आर्थिक-सामाजिक विकासालाही चालना मिळेल आणि आर्थिक व्यवहारही वाढतील.
  • मोदिपुरम आणि दक्षिण मेरठ मेरठ स्थानका दरम्यान येथील स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीची गरजही पूर्ण केली जाईल.
  • दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस कॉरीडॉर हा या प्रकारचा पहिला कॉरीडोर आहे. यासह आणखी २ असेच कॉरिडोर दिल्ली-गुरुग्राम-अलवर आणि दिल्ली पानिपत दरम्यान बांधण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रामीण आजीविकेसाठीच्या राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प या नव्या योजनेला मंजुरी दिली. हा प्रकल्प दीनदयाल अंत्योदय योजना: राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत राबविण्यात येईल.
राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प (एनआरईटीपी)
  • या योजनेची अंमलबजावणी जागतिक बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्जाद्वारे केली जाईल.
  • या प्रकल्पाद्वारे उपलब्ध करण्यात येणाऱ्या तांत्रिक सहाय्यामुळे व प्रकल्प सुलभतेसाठीच्या उच्च स्तरीय उपायांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविका आणि वित्तीय सुविधेत वाढ होईल.
  • या प्रकल्पांतर्गत गरीब आणि वंचित समुदायावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्यांच्या वित्तीय समावेशनावर भर येणार आहे.
  • एनआरईटीपी अंतर्गत वित्तीय समावेशनासाठी पर्यायी माध्यमांचे मार्गदर्शन, ग्रामीण उत्पादनासाठी मूल्य शृंखला, उपजीविका संवर्धन संबंधी कल्पक प्रकल्प, डिजिटल वित्त सुविधा यांना प्रोत्साहन देणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरु केले जातील.
दीनदयाल अंत्योदय योजना: राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (DAY NRLM)
  • हा ग्रामीण भागातील गरिबी निर्मुलानासाठीचा भारत सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमांपैकी एक आहे.
  • ग्रामीण गरीबांसाठी शाश्वत उपजीविका वाढीद्वारे आणि आर्थिक सेवांमध्ये सुधारित प्रवेशाद्वारे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी संस्थात्मक मंच तयार करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वतःच्या संस्था, बचत गट किंवा इतर संस्थामध्ये संघटीत करण्यास, तसेच त्यांच्या उपजीविका व वित्तीय समावेशनासाठी सहाय्य करण्यात येईल.
  • गरीब ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार आणि मजुरी आधरित रोजगारासाठी प्रशिक्षण देणे, हादेखील या योजनेचा एक हेतू आहे.
  • यासाठी केंद्र सरकार दीनदयाल अंत्योदय योजना: राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत दीनदयाल उपाध्याय: ग्रामीण कौशल्य योजना लागू करीत आहे.
  • दीनदयाल उपाध्याय: ग्रामीण कौशल्य योजना रोजगाराशी संबंधित योजना असून, ग्रामीण युवकांच्या कौशल्याचा विकास करणे आणि त्यांना जास्त मजुरी असलेल्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • या योजनेचे पूर्वीचे आजीविका: राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन हे नाव २०१५मध्ये बदलून दीनदयाल अंत्योदय योजना: राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन असे करण्यात आले.
  • दिल्ली आणि चंदीगड वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना लागू करण्यात आली असून, गरिबांच्या आजीविकेमध्ये सुधारणा करण्यासाठीची हा जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे.

चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी (२)

धनुष तोफांच्या उत्पादनाला मंजुरी

  • आयुध निर्मिती कारखाने मंडळाला भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाला ११४ लांब पल्ल्याच्या धनुष तोफांच्या उत्पादनासाठी मंजुरी दिली आहे.
  • धनुष तोफ ही १५५ बाय ४५ एमएमची आर्टीलरी गन (तोफ) आहे. यांना देशी बोफोर्स म्हणूनही ओळखले जाते.
  • भारताने १९८०मध्ये मिळविलेल्या स्वीडिश १५५-एमएम बोफोर्स होवित्झर या तोफांची धनुष ही सुधारित आवृत्ती आहे.
  • भारतीय लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन कोलकत्ता स्थित आयुध निर्मिती कारखाने मंडळाने या तोफा विकसित केल्या आहेत जबलपूर येथील गन कॅरिज फॅक्टरीद्वारे त्या उत्पादित केल्या आहेत.
  • या तोफा ४० किमीच्या पल्ल्यापर्यंत (आयात बोफोर्स तोफांपेक्षा ११ किमी अधिक) अचूक मारा करू शकतात. एका मिनिटाला ८ तोफगोळे डागण्याची तिची क्षमता आहे.
  • या तोफांमधील ८१ टक्के भाग स्वदेशी आहेत. २०१९ अखेरपर्यंत हे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत वाढविले जाणार आहे.
  • हल्ल्याची अचूकता व गती वाढविण्यासाठी आणि विविध प्रकारच्या दारुगोळासह सुसंगतता प्रदान करण्यासाठी धनुष इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे.
  • या प्रत्येक तोफेची किंमत १४.५० कोटी रुपये आहे. यात ऑल-इलेक्ट्रिक ड्राइव्ह, उच्च गतिशीलता, वेगवान उपयोजन, स्वयंचलित कमांड, नियंत्रण प्रणाली असे अनेक महत्त्वपूर्ण उपकरणे आहेत.
भारतीय आयुध निर्मिती कारखाने
  • भारतीय आयुध निर्मिती कारखाने (ऑर्डनन्स फॅक्टरीज) ही ४१ आयुध निर्मिती कारखान्यांचा समूह असून, त्याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.
  • हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. या कारखान्यांमध्ये स्वदेशी संरक्षण उपकरणे व हार्डवेअर तयार केले जातात.
  • सशस्त्र सेनांना स्वदेशी निर्मित शस्त्रे उपलब्ध करुन देणे व या क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणे हा ऑर्डनन्स फॅक्टरीजचा मुख्य उद्देश आहे.

मेरी कोम प्युमा कंपनीची ब्रॅण्ड अँबेसेडर

  • सहा वेळा विश्वविजेतेपद जिंकणारी भारतीय बॉक्सर एम सी मेरी कोमला प्युमा या कंपनीने ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
  • तिची निवड २ वर्षांकरिता झाली असून, महिला प्रशिक्षण श्रेणीमध्ये ती कंपनीची ब्रॅण्ड अँबेसेडर असेल.
मेरी कोम
  • मेरी कोम आघाडीची भारतीय बॉक्सिंगपटू आहे. तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपूरमधील दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा झाला.
  • मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पधेचे विजेतेपद विक्रमी ६ वेळा जिंकले आहे. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर ६ सुवर्ण व १ रौप्य पदक जमा आहे.
  • नोव्हेंबर २०१८मध्ये नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
  • लंडन ऑलिंपिक (२०१२) स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या स्पर्धेतील फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. बॉक्सिंगमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
  • २०१४च्या इंचिऑन आशियाई स्पर्धेमध्ये मेरी कोमने सुवर्णपदक जिंकले होते. २०१७मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
  • २०१३साली तिचे ‘अनब्रेकेबल’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते.
  • २०१४साली तिच्या जीवनावर आधारित ‘मेरी कोम’ नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
  • तिच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तिला पद्मश्री (२००६), पद्मभूषण (२०१३), अर्जुन पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

निधन: प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह

  • प्रसिद्ध हिंदी लेखक नामवर सिंह यांचे २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले आहे. मृत्युसमयी ते ९३ वर्षाचे होते.
  • नामवर सिंह यांचा जन्म २८ जुलै १९२६ रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले.
  • विविध विद्यापीठांमध्ये प्रदीर्घ काळ अध्यापन केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
  • त्यांनी कम्युनिस्ट पार्टीतर्फे १९५९मध्ये चकिया-चंदौली मतदारसंघामधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
  • प्रेमचंद और भारतीय समाज, छायावाद- प्रसाद, निराला, महादेवी और पंत, काशी के नाम, इतिहास और आलोचना, दूसरी परंपरा की खोज अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.
  • पण ‘कविता के नए प्रतिमान’ हा त्यांचा ग्रंथ हिंदी समीक्षेतील मैलाचा दगड मानला जातो.
  • त्यांना १९७१ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्याना शलाका सम्मान, साहित्य भूषण सम्मान, कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशमध्ये देशातील पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा

  • आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहरात देशातील पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा (डीस्ट्रीक्ट कूलिंग सिस्टम) सुरु करण्यात येणार आहे.
  • यासाठी आंध्रप्रदेश सरकारने संयुक्त अरब अमिरातमधील आंतरराष्ट्रीय शीतकरण प्रदाता, नॅशनल सेंट्रल कूलिंग कंपनीसह (तबरिद) ३० वर्षांच्या सवलत कराररावर स्वाक्षरी केली आहे.
  • जिल्हा शीतकरण यंत्रणा एका केंद्रीय प्लांटममध्ये अतिथंड किंवा गरम पाणी तसेच वाफ निर्माण करते. त्यांनतर ही उर्जा इमारतींना वातानुकीत यंत्रांसाठी, पाणी गरम करण्यासाठी पुरविली जाते.
  • या कराराअंतर्गत २०,००० रेफ्रिजरेशन टनची शीतकरण क्षमता विकसित केली जाईल. ही भारताची पहिली जिल्हा शीतकरण यंत्रणा असेल. हा प्रकल्प २०२१ पासून सेवा पुरविणार आहे.
  • इतर शीतकरण प्रणालींच्या तुलनेत, जिल्हा शीतकरणासाठी फक्त ५० टक्के ऊर्जा वापरते, यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होते.
  • ही जिल्हा शीतकरण यंत्रणा आंध्रप्रदेश सरकारच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकासांसह रोजगार निर्मिती आणि गृहनिर्मितीच्या लक्ष्याचा एक भाग आहे.
  • राज्याचे सभागृह, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर सरकारी इमारती ज्यांचे बांधकाम सध्या सुरु आहे, अशा ठिकाणी ही यंत्रणा वापरण्यात येणार आहे आणि २०२१पासून सेवा पुरविणार आहे.

अब्दुल अझीझ मुहमत मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार

  • सुदानी शरणार्थी अब्दुल अझीझ मुहमत यांना २०१९चा मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • ऑस्ट्रेलियन सरकारच्या क्रूर निर्वासित धोरणाचा खुलासा करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सहकारी शरणार्थींच्या परिस्थितीकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य अब्दुल अझीझने केले आहे.
  • शरणार्थींच्या समस्यांसाठी कार्य करणाऱ्या व स्वतःच्याच मानवाधिकारांचे हनन झालेल्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • ऑस्ट्रेलियाने २०१३मध्ये त्यांची बोट ताब्यात घेतली होती. तेव्हापासून त्यांना पापुआ न्यू गिनी येथील मॅनस बेटावर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. स्विस व्हिसा मिळाल्यानंतर त्यांना बेट सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मार्टिन एन्नल्स मानवाधिकार पुरस्कार
  • ब्रिटिश मानवाधिकार कार्यकर्ते व नोबेल शांतता पुरस्कार विजेते मार्टिन एन्नल्स यांच्या नावे हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
  • त्यांचा जन्म २७ जुलै १९२७ रोजी स्टॅफोर्डशायर, इंग्लंड येथे झाला. १९६८ ते १९८० पर्यंत ते अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे महासचिव होते.
  • त्यांच्या कार्यकाळात ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला शांततेचा नोबेल पुरस्कार, इरॅस्मस प्राइज आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

गुजरातमध्ये तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना

  • तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी गुजरात सरकारने एक विशेष मंडळ स्थापन केले आहे.
  • हे तृतीयपंथीय कल्याण मंडळ तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी विशेष योजना सुरू करु शकते. ते तृतीयपंथीय समुदायाच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी कार्य करेल.
  • या मंडळाचे अध्यक्ष राज्याचे सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री असतील. या मंडळात १६ सदस्य असतील, ज्यामध्ये प्रत्यकी २ महिला व पुरुष तृतीयपंथीय व्यक्ती, तसेच २ किन्नर समुदायाचे सदस्य असतील. उर्वरित सदस्य गैर-सरकारी संस्था आणि सरकारी अधिकारी असतील.
  • सर्वोच्च न्यायालयने २०१४मध्ये तृतीयपंथीयांना तिसरे लिंग म्हणून घोषित केले होते व सर्व राज्यांना तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
  • याशिवाय तृतीयपंथीयांना इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्यासही सांगितले होते, त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणही मिळू शकेल.

चालू घडामोडी : २० फेब्रुवारी

भारत-अर्जेंटिना अणुउर्जा सहकार्यासाठी सामंजस्य करार

  • अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मौरिशियो मॅक्री यांच्या भारत दौऱ्यात (१८ फेब्रुवारी) भारत आणि अर्जेंटिना दरम्यान अणुउर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • भारताचा अणुउर्जा विभाग आणि अर्जेंटिनाचा राष्ट्रीय अणुउर्जा आयोग यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • अर्जेंटिनाकडे लहान क्षमतेच्या अणुभट्ट्या बनविण्याची क्षमता आहे. या करारामुळे आता अर्जेंटिना व भारत तिसऱ्या देशात त्रिपक्षीय प्रकल्पावर एकत्रितपणे काम करू शकतात.
  • भारतातील वैश्विक अणुऊर्जा भागीदारी केंद्राच्या (जीसीएनईपी: ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लियर एनर्जी पार्टनरशिप) फ्रेमवर्क अंतर्गत सहकार्यासाठी या कराराद्वारे नागरी आण्विक संशोधन, विकास आणि क्षमता निर्मितीस प्रोत्साहन देण्यात येईल.
  • हा करार आरोग्य, शेती, औद्योगिक वापर, प्रशिक्षण व क्षमता निर्मिती यामधील अणुउर्जेच्या सामाजिक वापरास प्रोत्साहन देईल.
भारत-अर्जेंटिना आण्विक संबंध
  • भारत आणि अर्जेंटिना दरम्यान २०१०मध्ये अणुउर्जेच्या शांततामय वापरासाठी एक करार झाला होता.
  • इन्वॅप नावाची अर्जेंटिनाची कंपनी मुंबईतील मॉलिब्डेनम प्लांट उभारण्यासाठी फिशन मोली प्रकल्पावर कार्य करीत आहे.
  • याशिवाय अर्जेंटिना भारतीय अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही आण्विक उपकरणांची निर्यातही करते.

एनसीएफएल आणि सायपॅडचे उद्घाटन

  • अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा (NCFL) आणि सायपॅड (CyPAD: Cyber Prevention, Awareness & Detection Centre) यांचे उद्घाटन झाले.
  • राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा ही भारतीय सायबर अपराध सहकार केंद्राच्या (I4C) उपक्रमाचा एक भाग आहे. तर सायपॅड हे दिल्ली पोलिसांचे सायबर क्राइम युनिट आहे.
  • सायपॅड व एनसीएफएल या दोन्ही संस्था सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्था यांना मदत करणार आहेत.
सायपॅड (CyPAD)
  • सायपॅड अर्थात सायबर प्रतिबंध, जागरुकता आणि शोध केंद्र नागरिक, पोलीस आणि दिल्लीच्या एजन्सी यांना सायबर सुरक्षा, फोरेन्सिक व सुरक्षितता यांच्याशी संबंधित सेवा प्रदान करेल.
  • हे केंद्र क्रिप्टोकरन्सी फसवणूक, तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय फसवणूक तसेच सायबर सुरक्षेशी संबंधित विविध पैलूंवर कार्य करेल.
राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा
  • राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर अपराध सहकार केंद्राच्या (I4C) उपक्रमाचा भाग आहे.
  • या प्रयोगशाळेत मेमरी फोरेन्सिक लॅब, इमेज एन्हांसमेंट लॅब, नेटवर्क फोरेन्सिक लॅब, मालवेअर फोरेन्सिक लॅब, क्रिप्टोकरन्सी फोरेन्सिक लॅब, खराब हार्ड डिस्क व प्रगत मोबाइल फोरेन्सिक लॅब समाविष्ट आहेत.
भारतीय सायबर अपराध सहकार केंद्राचे प्रमुख ७ विभाग
  • राष्ट्रीय सायबर अपराध धमकी विश्लेषण युनिट (टीएयू).
  • राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग.
  • सायबर गुन्हेगारीसाठी संयुक्त अन्वेषण मंच.
  • राष्ट्रीय सायबर फोरेन्सिक प्रयोगशाळा.
  • राष्ट्रीय सायबर अपराध ट्रेनिंग सेंटर.
  • सायबर गुन्हे इकोसिस्टम व्यवस्थापन युनिट.
  • राष्ट्रीय सायबर संशोधन आणि नवोन्मेष केंद्र.

आयटीएसएसओ आणि सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टल

  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लैंगिक शोषण तपास ट्रॅकिंग प्रणाली (ITSSO) व सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टल सुरू केले.
लैंगिक शोषण तपास ट्रॅकिंग प्रणाली
  • आयटीएसएसओ: इन्वेस्टीगेशन ट्रॅकिंग सिस्टम फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस
  • हे एक ऑनलाइन मॉड्यूल असून, सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व स्तरांवरील (राष्ट्र, राज्य, शहर, जिल्हा, पोलीस ठाणे इ.) संस्थांना ते उपलब्ध आहे.
  • याद्वारे राज्यांना बलात्कार प्रकरणांची देखरेख व व्यवस्थापन करण्यास आणि २ महिन्यात या प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यास मदत मिळेल.
  • आयटीएसएसओमुळे पूर्वीपासून असलेल्या राष्ट्रव्यापी गुन्हा आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणालीच्या पातळीत वाढ होईल.
  • आयटीएसएसओमुळे गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम २०१८च्या प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळेल. या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणांचा तपास २ महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टल
  • सेफ सिटी इम्प्लिमेंटेशन मॉनिटरिंग पोर्टल
  • ८ शहरांमध्ये सुरु केलेल्या ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’चे निरीक्षण करण्यासाठी सुरक्षित शहर अंमलबजावणी देखरेख पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
  • ही ८ शहरे आहेत: अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कलकत्ता, लखनऊ आणि मुंबई.
  • या पोर्टलद्वारे मालमत्ता आणि पायाभूत सुविधांच्या वापराचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
  • सेफ सिटी प्रोजेक्टसाठी निर्भया निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा प्रकल्प शहरी पोलिस आणि शहर प्रशासनाचा संयुक्त प्रयत्न आहे.
  • या प्रकल्पाअंतर्गत गुन्ह्यांचे हॉटस्पॉट्स चिन्हांकित करण्यात येतात व त्यानंतर, त्या स्थळांवर ड्रोन, स्वयंचलित नंबरप्लेट रीडिंग उपकरणे, सीसीटीव्ही कॅमेरे याद्वारे नजर ठेवली जाते. हे सर्व स्मार्ट कंट्रोल रूमद्वारे नियंत्रित केले जाते.

१६ राज्यांमध्ये ‘११२ हेल्पलाईन’ सुरु

  • यापूर्वी हिमाचल प्रदेश आणि नागलँडमध्ये सुरु करण्यात आलेली ‘११२ हेल्पलाईन’ गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीअंतर्गत सुरु केली आहे.
  • ही १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत: आंध्रप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पुद्दूचेरी, लक्षद्वीप, अंदमान, तेलंगाना, तामिळनाडू, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, जम्मू-काश्मीर.
  • आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीमुळे (ईआरएसएस) पोलीस (१००), अग्निशमन (१०१) व महिला सहाय्य हेल्पलाईन क्रमांक (१०९०) इत्यादी आपत्कालीन सेवांना ११२ या आपत्कालीन मदत क्रमांकामध्ये एकत्रित करण्यात आले आहे.
  • लवकरच आरोग्य आपत्कालीन क्रमांकदेखील (१०८) यात समाविष्ट केला जाणार आहे.
  • अमेरिकेतील ९११ या आपत्कालीन फोन क्रमांकाच्या धर्तीवर भारतात ११२ हा फोन क्रमांक सुरु करण्यात आला आहे.
या प्रणालीचा वापर कसा करणार?
  • कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन सेवांची गरज भासल्यास फोनवरून ११२ क्रमांक डायल करावा लागणार आहे.
  • आपत्कालीन प्रतिसाद केंद्राला पॅनिक कॉल पाठविण्यासाठी व्यक्ती त्वरीत ३ वेळा स्मार्टफोनचे पॉवर बटण दाबून किंवा सामान्य फोनवरून ५ किंवा ९ हे बटन जास्त वेळ दाबून ठेवू शकते.
  • ईआरएसएसचा उपयोग ‘११२’ इंडिया मोबाईल ॲपद्वारेदेखील केला जाऊ शकतो. हे ॲप Google Play Store आणि Apple Storeवर विनामूल्य उपलब्ध आहे.
  • संबंधित राज्यांच्या ईआरएसएस वेबसाइटचा वापर करूनही आपत्कालीन ईमेल किंवा एसओएस अलर्ट राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्रांना पाठविला जाऊ शकतो.
  • ईआरएसएस: इमरजन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम

नवी दिल्लीमध्ये हस्तशिल्प संकुलाची पायाभरणी

  • केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति ईरानी यांनी नवी दिल्लीमध्ये हस्तशिल्प संकुलाची पायाभरणी केली.
  • दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मरणार्थ या संकुलाचे नाव दीनदयाल आंतरराष्ट्रीय हस्तशिल्प भवन असे ठेवण्यात येईल.
  • हा संकुलात सर्व शिल्पकारांना आळीपाळीने स्थान देण्यात येईल. यामध्ये दिव्यांग शिल्पकारांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे शिल्पकारांपर्यंत पोहचण्यास मदत मिळेल.
  • या संकुलात नामशेष होत असलेले शिल्प तसेच नवीन आणि उदयोन्मुख हस्तकला उत्पादनांसाठी एक स्वतंत्र संशोधन कक्ष असेल.
  • या हस्तशिल्प भवनात शिल्पकारांसाठी २३ दुकाने असतील. तसेच सार्क देशांच्या शिल्पकारांसाठी १ शोरूमही असेल. याव्यतिरिक्त, या भवनात कियोस्क, ५ गॅलऱ्या आणि १ हॉल असेल.
  • या संकुलाच्या मदतीने भारतातील आणि सार्क देशांमधील शिल्पकारांना अधिक सुलभता मिळेल. या संकुलामुळे शिल्पांशी संबंधित विविध ठिकाणी स्थित कार्यालये एकाच ठिकाणी येतील.
  • या संकुलामध्ये शिल्पकारांसाठी वसतिगृहाची सोयदेखील असेल.
  • एनबीसीसीद्वारे हे हस्तशिल्प भवन बांधले जात आहे. त्याच्या बांधकामासाठी सुमारे ११३.५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण होईल.

एएसआयच्या अध्यक्षपदी डॉ. जी. सी. अनुपमा

  • भारतीय खगोलशास्त्रीय सोसायटीच्या (एएसआय: ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया) अध्यक्षपदी डॉ. जी. सी. अनुपमा यांची निवड झाली आहे.
  • एएसआयच्या कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत डॉ. अनुपमा २०१९ ते २०२२ अशा ३ वर्षांकरिता अध्यक्षपदावर निवडून आल्या.
  • देशातील अग्रगण्य खगोल शास्त्रज्ञांच्या या प्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.
  • डॉ. अनुपमा सध्या बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये (आयआयए) डीन आणि वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
  • त्यांनी आयआयए बॅँगलोरमधून पीएचडी प्राप्त केली आहे. १९९४पासून त्या आयएए बॅँगलोरमध्ये कार्यरत आहेत.
  • वर्ष २०००मध्ये त्यांना तरुण वैज्ञानिकांकरिता देण्यात येणाऱ्या सर सी. व्ही. रमण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • अनुपमा लेह, लडाखमधील हिमालयीन दुर्बिणीच्या डिझाईन व निर्मिती प्रकल्पाच्या संचालक होत्या.
  • याशिवाय, त्या हवाई (अमेरिका) येथील ३० मीटर दुर्बिण (टीएमटी: थर्टी मीटर टेलिस्कोप) निर्मितीमधील आंतरराष्ट्रीय संघातील भारतीय चमूच्या सदस्य देखील आहेत. या दुर्बिणीसाठी १ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.
भारतीय खगोलशास्त्रीय सोसायटी
  • एएसआय: ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया
  • भारतीय खगोलशास्त्रीय सोसायटी ही देशातील अग्रगण्य खगोल शास्त्रज्ञांची एक प्रमुख संघटना आहे. या संघटनेचे १००० पेक्षा अधिक सदस्य आहेत.
  • खगोलशास्त्र व त्या संबंधीत इतर विज्ञान शाखांना प्रोत्साहन देणे, हा भारतीय खगोलशास्त्रीय सोसायटीचा प्रमुख हेतू आहे.
  • ही संस्था वैज्ञानिक बैठकी, तसेच खगोलशास्त्राच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते.