चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी


नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर

  Narendra Modi KP Oli meet
 • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी आले आहेत. पदावर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
 • ओली यांच्याबरोबर ७७ सदस्यांचे एक शिष्टमंडळही असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्वांचे विमानतळावर स्वागत केले.
 • मधेशींच्या आंदोलनामुळे सध्या दोन्ही देशांत काहीसे तणावाचे संबंध आहेत. तत्कालीन पंतप्रधान बाबूराम भट्टराय यांनी २०११ मध्ये भारताला भेट दिली होती, तर सुशील कोईराला पंतप्रधानपदी असताना मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमास आले होते.
 • यावेळी भारत आणि नेपाळदरम्यान विविध क्षेत्रांशी निगडित सात करारांवर सह्या करण्यात आल्या. 
 • सर्व बाजूंनी भूप्रदेशाने वेढलेल्या नेपाळला भारतातील विशाखापट्टणमसह काही बंदरे व्यापारासाठी खुली करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
 • याशिवाय भूकंपामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी डॉलर, रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, दोन्ही देशांमधील संगीत आणि नाटक अकादमींमध्ये करार, बांगलादेशमार्गे दळणवळण व्यवस्था निर्माण करणे या बाबींचा या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे.
 • ओली यांच्या उपस्थितीत मुझफ्फरपूर-धालकेबार वीज पारेषण मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे नेपाळला तत्काळ ८० किलोवॉट वीज मिळणे सुरू झाले आहे.

खवले मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर

 • ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे.
 • खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे.
 • महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 • दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी ‘जागतिक खवले मांजर दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
 खवले मांजर 
 • मुंगुसासारखा दिसणारा पण खवले असणारा हा प्राणी साधारणत: सर्व प्रकारच्या जंगलात आढळतो. फेलिडोटा कुटुंबातील हा प्राणी असून, तो निशाचर आहे. खवले मांजर हा खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.
 • तो मांसाहरी वर्गातील असून वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव हे त्याचे मुख्य खाद्य असते. खवले मांजराला दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते.
 • खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी ककडे वर्षभरात खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते. खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
 • भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते.
 • त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.
 • खवले मांजराच्या अशिया खंडात चार आणि आफ्रिकेत चार अशा आठ प्रजाती सापडल्या आहेत. भारतीय खवले मांजर हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळते.

फिजी देशास विन्स्टन वादळाचा फटका

 • प्रशांत महासागरामधील द्वीपकल्प असलेल्या फिजी देशास विन्स्टन या अत्यंत शक्तिशाली वादळाचा फटका बसला असून, या वादळात आतापर्यंत १० जणांचे निधन झाले आहे.
 • फिजीच्या इतिहासामधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असून यामुळे देशातील हजारो घरे अक्षरश: उध्वस्त झाली. याचबरोबर, देशामधील काही गावे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत.
 • विन्स्टनमुळे वाहिलेल्या वाऱ्यांचा वेग ताशी ३२० किमीपेक्षाही जास्त होता; तसेच किनारपट्टीवर सुमारे १२ मीटर (४० फुट) उंचीच्या लाटा उसळल्या.

इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे निधन

 • प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे १९ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते.
 • अम्बेर्टो इको यांची ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी खुप गाजली होती. अम्बेर्टो इको त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी नेहमीच वाचकांच्या आठवणीत राहतील.
 • त्यांनी लिहिलेल्या ‘फाउकॉल्ट्स पेन्डुलम’, ‘द आइलँड ऑफ द डे बिफोर’, ‘बाउदोलिनो’ आणि ‘द प्राग सेमेटरी’ या कादंबऱ्या खुपच लोकप्रिय झाल्या.
 • मात्र ‘द नेम ऑफ द रोज’  या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. ‘द नेम ऑफ द रोज’ या कादंबरीच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. याच कादंबरीवर आधारीत १९८६मध्ये चित्रपटदेखील बनवण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा