चालू घडामोडी : १३ फेब्रुवारी


अमेरिका पाकला लढाऊ विमाने देणार

  • जगातील सर्वोत्तम लढाऊ विमानांपैकी एक म्हणून ओळख असणारी आठ एफ-१६ विमाने अमेरिकेने पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तब्बल ७०० मिलियन डॉलर्सच्या या करारानुसार अमेरिका पाकिस्तानला, एफ-१६ विमाने, रडार, अन्य सामुग्री आणि त्यासंदर्भातील प्रशिक्षणही देणार आहे.
  • या विमानांमुळे पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता वाढेल आणि देशातील दहशतवादाला आळा घालण्यास मदत होईल, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
  • अमेरिकी काँग्रेस व सिनेटच्या सदस्यांनी पाकिस्तानशी हा करार करण्यास कडाडून विरोध दर्शवला होता. या विरोधामुळे तब्बल ३० दिवस हा करार रखडला होता. परंतु बराक ओबामा प्रशासनाने खासदारांचा विरोध झुगारून करारावर शिक्कामोर्तब केले.

कविता राऊत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राची अव्वल मॅरेथॉन धावपटू कविता राऊतने गुवाहाटी येथे सुरु असलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ब्राझीलमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी जागा निश्चित केली. 
  • कविता राऊतने २ तास ३८ मिनिट ३८ सेकंदात अत्यंत सहजतेने महिला मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेली ती चौथी भारतीय धावपटू आहे. ओ.पी.जैशा, ललिता बाबर, सुधा सिंह याआधीच रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉनसाठी पात्र ठरल्या आहेत. 
  • श्रीलंकेची एनजी राजासेकरा दोन तास ५० मिनिट ४७ सेंकदाची वेळ नोंदवत दुसरी तर, बी.अनुराधी तिसरी आली. १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कविता राऊत एकमेव अॅथलीट आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरण

  • सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू करण्यात आलेला कनिष्ठ न्यायालयातील गुन्हेगारी खटला रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती त्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने सोनिया व राहुल यांची व्यक्तिगत उपस्थितीतून सूट देण्याची मागणी मान्य केली आहे. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी आता हे दोघे अनुपस्थित राहू शकतील.
  • मात्र न्यायालयाने त्यासाठी अट घातली असून न्यायदंडाधिकारी या दोघांना हवे तेव्हा केव्हीही व्यक्तिगत हजेरी लावण्यास सांगू शकतात.
  • उच्च न्यायालयाने काही ठाम व निष्कर्षांत्मक निरीक्षणे आरोपींविरोधात मांडली आहेत, त्याच्याशी मात्र सर्वोच्च न्यायालय सहमत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने नोंदलेली मते सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आहेत.

पाकचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी

  • पाकिस्तानचे वादग्रस्त पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाच वर्षांची बंदी घातली आहे.
  • भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब करणे आणि खेळाची प्रतिमा डागाळल्याप्रकरणी शिस्तपालन समितीने रौफ यांना दोषी ठरवले आहे.
  • ५९ वर्षीय रौफ हे आयसीसीचे एलिट पॅनेल पंच म्हणून गणले जायचे. २०१३च्या आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या काही सट्टेबाजांकडून रौफ यांनी महागड्या भेटी स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
  • बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आचारसंहितेच्या कलम २.२.२, २.३.२, २.३.३ आणि २.४.१ यांचा रौफ यांनी भंग केल्याचे सिद्ध झाले आहे.
  • अन्य कोणत्याही व्यक्तीला सामना किंवा स्पर्धेसंदर्भातील अंतर्गत माहिती पुरवल्याच्या आरोपासंदर्भातही रौफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.
  • २०१३च्या स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दोषी सापडलेला हरयाणाचा ऑफ-स्पिनर अजित चंडिलावर गेल्या महिन्यात बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे.
  • याचप्रमाणे सहकारी खेळाडूला भ्रष्टाचारास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंबईचा फलंदाज हिकेन शाहवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

ज्ञानपीठ विजेते कवी कुरुप यांचे निधन

  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मळ्याळी कवी ओएनव्ही कुरूप यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
  • कुरूप यांनी कवीतांसह अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहली आहेत. केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्य राहिलेल्या कुरूप यांना २००७ मध्ये प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
  • साहित्यातील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल केंद्र सरकराने त्यांचा पद्म भूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. कुरुप यांना १९८९मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. 
  • कुरुप यांचे A Dirge for the Earth, A Drop of Light आणि Peacock Feather हे काव्यसंग्रह लोकप्रिय आहेत.

‘फेसबुक’च्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांचा राजीनामा

  • काही दिवसांपूर्वी फेसबुकने रिलायन्स कम्युनिकेशन्सशी करार करून काही वेब सेवा मोफत (फ्री बेसिक्स) देण्याची घोषणा केली होती.
  • परंतु ट्रायच्या ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णयानंतर ‘फेसबुक’ने ‘फ्री बेसिक्स’ भारतात बंद करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘फेसबुक’च्या भारतातील प्रमुख कीर्तिगा रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे.
  • दूरसंचार कंपन्या कंटेंट, अॅप इत्यादींच्या वापरासाठी लोकांकडून वेगवेगळे शुल्क आकारू शकणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मोबाइल सेवाप्रदात्यांना दररोज ५० हजार रुपये दंड भरावा लागेल. ट्रायने नेट न्यूट्रॅलिटीचे समर्थन करताना हा आदेश दिला आहे.
  • कीर्तिगा रेड्डी या महाराष्ट्रातील नांदेड येथील आहेत. इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केले. ‘फार्च्युन’ने २०११ मध्ये जाहीर केलेल्या देशातील ५० प्रभावशाली महिलांमध्ये कीर्तिगा यांना स्थान देण्यात आले आहे.
  • ‘फेसबुक’मध्ये येण्यापूर्वी त्या मोटोरोला कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजमेंट डिपाटर्मेंटच्या डायरेक्टर होत्या. मोटोरोलाच्या आधी त्या सिलिकॉन ग्राफिक्स व फीनिक्स टेक्नॉलॉजीत काम करत होत्या.
 काय आहे फेसबुकची फ्री बेसिक्स सेवा? 
  • याचे जुने नाव इंटरनेट डॉट ओआरजी होते. यात इंटरनेटवरील निवडक संकेतस्थळे मोफत पाहावयास मिळतात. यात आरोग्य, प्रवास, नोकरीसह काही सरकारी सेवांचा समावेश आहे. तर इतर संकेतस्थळे पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात.
  • फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या मते फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गरिबांनाही इंटरनेटचा वापर करणे शक्य आहे.

आरबीआयचा ‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’सोबत करार

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने युनायटेड अरब अमरिताची (‘युएई’) मध्यवर्ती बँक असलेल्या ‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’शी चलन अदलाबदलीचा करार केला.
  • या करारावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन‘सेन्ट्रल बँक ऑफ युएई’चे गव्हर्नर मुबारक राशिद अल मन्सुरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
  • आगामी करारामुळे आखाती देश असलेल्या युनायटेड अरब एमिरेट्सशी असलेले भारताचे संबंध मजबूत होणार असून, उभय बाजूंनी तांत्रिक पातळीवर चर्चा झाल्यांनतर ‘करन्सी स्वॅप अग्रिमेन्ट’च्या अटींना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

पश्चिम बंगाल सरकारची ‘मुक्ती आलो’ योजना

  • देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्याला नवी झळाळी देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने ‘मुक्ती आलो’ (स्वातंत्र्याचा प्रकाश) नावाने एक योजना हाती घेतली आहे.
  • याअंतर्गत देहविक्री व्यवसाय सोडून नवा व्यवसाय करून सन्मानजनक आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या स्त्रिया व त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
  • याच योजनेंतर्गत देहविक्रय करणाऱ्या एका स्त्रियांच्या गटाला नृत्य, अभियन व गायनाचे प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून त्या क्षेत्रात काम करू शकतील. या महिला व मुलींना सन्मानजनक आयुष्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पश्चिम बंगाल सरकारचे प्रयत्न आहेत.
  • याच प्रयत्नांतून नवे आयुष्य घडविण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी कार्यशाळा घेतली जात आहे. या कार्यशाळेत अभिनय शिकवला जात आहे.
  • सोनागाछी रेड लाईट एरियात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. देहविक्री व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलेल्या अनेक मुलींना या संस्थांनी बाहेर काढले.

नेपाळ पंतप्रधानांचा भारत दौरा

  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे भारताचा सहा दिवसांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे १९ फेब्रुवारीपासून सहा दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत.
  • ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारतासोबत असणारे नाते दृढ करण्यासाठी ही सदिच्छा भेट असणार आहे.

‘स्टार्ट अप’ योजनांसाठी दोन कोटींचे पुरस्कार

  • नवउद्योजकांमधील नावीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ‘स्टार्ट अप’ योजनांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे.
  • ‘क्यु प्राइज मेक इन इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना कारखाना उत्पादन आणि पुरवठ्यात नवनवीन संकल्पना आणि बिझनेस मॉडेल विकसित करणाऱ्या ‘स्टार्ट अप’ना दोन कोटींचे पुरस्कार दिले जातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा