सियाचेनमध्ये हिमकडा कोसळून त्याखाली गाडल्या गेलेल्या लष्कराच्या १० जवानांपैकी लान्स नाइक हनुमंतप्पा सहा दिवसांनी जिवंत आढळले असून, त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हनुमंतप्पा यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असून, रुग्णालयात त्यांच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. हनुमंतप्पा हे कर्नाटकमधील असून ते २५ फूट बर्फाखाली जवळपास पाच दिवस गाडले गेले होते.
हिमस्खलन झाल्यानंतर हनुमंतप्पा बर्फात ३५ फूट खोलवर तयार झालेल्या हवेच्या पोकळीत सापडले. याच पोकळीतून त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत राहिल्यामुळे ते जिवंत राहू शकले.
लष्कराच्या तळावरील एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य नऊ जण या दुर्घटनेत मरण पावले आहेत. अन्य आठ जवानांचे मृतदेह मदतकार्य पथकाने बाहेर काढले आहेत.
दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली याने अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या ‘मोका’ न्यायालयात साक्ष दिली. हेडलीकडून समोर आलेली धक्कादायक माहिती खालीलप्रमाणे:
नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांचे निधन
नेपाळचे माजी पंतप्रधान आणि भारत नेपाळ मैत्री संबंधांचे पुरस्कर्ते सुशील कोईराला (वय ७९) यांचे ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री न्यूमोनियाने निधन झाले.
नेपाळमधील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले सुशील कोईराला हे फेब्रुवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१५ या काळात नेपाळचे पंतप्रधान होते. त्यांनी भारताशी कायमच चांगले संबंध ठेवले होते.
सत्तेवर येताच त्यांनी देशात स्थैर्य आणण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या नव्या राज्यघटनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. २३९ वर्षांची राजसत्ता जाऊन नेपाळमध्ये २००६ मध्ये लोकशाही सरकार आल्यापासून देशाला राज्यघटना नव्हती.
पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला येणाऱ्या सार्क नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. नेपाळमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपानंतर बचाव कार्याला उशीर लागल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली होती.
सुशील कोईराला यांच्या अंत्यविधीला हजर राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेपाळला गेले आहे.
कौस्तुभ घुले याचा जागतिक स्तरावर गौरव
पिंपरी-थेरगाव येथील कौस्तुभ घुले या तरुणाने इटलीतील स्पर्धेत ‘सोलर पॅनेल क्लीनिंग’ या विषयांतर्गत पाठविलेला प्रकल्प (संकल्पना) सर्वोत्कृष्ट ठरला असून, सर्वांत तरुण विजेता म्हणूनही त्याचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.
‘ऊर्जा विकास आणि व्यवस्थापन’ क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या इटलीतील ‘एनाल ग्रीन पॉवर’ या कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘सौरऊर्जा’ या विषयाशी निगडित ‘नावीन्यपूर्ण संकल्पना’ (इनोव्हेशन कॉम्पिटिशन) असे स्पर्धेचे स्वरूप होते.
एकूण पाच विषयांत ही स्पर्धा विभागण्यात आली होती. पाच विषय घेऊन जगभरातून २५० स्पर्धक यात सहभागी झाले होते.
तथापि, ‘सर्वांत अभिनव आणि सहजसोपी’ संकल्पना या कसोटीवर कौस्तुभचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला. जागतिक स्तरावर पारितोषिक पटकावणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय ठरला. तसेच एकूण पाच विजेत्यांमधीलही सर्वांत तरुण विजेता म्हणूनही त्याची कंपनीने नोंद केली.
बक्षीसापोटी कंपनीने सात लाख सहा हजार रुपये (दहा हजार युरो) एवढी रक्कम जाहीर केली आहे. तसेच, जुलैमध्ये रोम येथे होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी कौस्तुभला आमंत्रित केले आहे.
कौस्तुभ औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी नुकतीच उत्तीर्ण झालां आहे.
हिंदू विवाह विधेयक पाकच्या संसदीय समितीमध्ये मंजूर
सरकारच्या अनुत्साहामुळे अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेले हिंदू विवाह विधेयक पाकिस्तानमधील संसदीय समितीने एकमताने मंजूर केले आहे.
कायदा आणि न्याय विषयावरील स्थायी समितीने ‘हिंदू विवाह विधेयक, २०१५’चा मसुदा मंजूर केला. या वेळी पाच हिंदू खासदारांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
या विधेयकाला शेवटपर्यंत काहींचा विरोध असतानाही स्थायी समितीने विवाहासाठी किमान वय १८ करण्याची दुरुस्ती करत एकमताने हा मसुदा मंजूर केला. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर तो संपूर्ण देशभरासाठी लागू असेल.
पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा कतार दौरा
कतार व पाकिस्तानमधील संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशार्थ पाक पंतप्रधान नवाझ शरीफ हे कतारला भेट देणार असून या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध महत्त्वपूर्ण करार केले जाणार आहेत.
या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान कतारकडून पाकिस्तानला सुमारे १५ वर्षांपर्यंतच्या काळासाठी द्रवरुपात नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यासंदर्भातील करार केला जाण्याचीही शक्यता आहे. या कराराची किंमत १५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
याबरोबरच आरोग्य, शिक्षण, संशोधन, रेडिओ अशा विविध क्षेत्रांतील अनेक महत्त्वपूर्ण करार या भेटीदरम्यान होणार आहेत.
क्षेत्रासहितच व्यापार व गुंतवणूक, संरक्षण या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा शरीफ यांचा प्रयत्न आहे. कतारमध्ये सध्या एक लाखपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक कार्यरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा