न्या. धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे ४०वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते मूळचे गुजरातमधील राजकोटचे आहेत.
न्या. मोहित शहा ८ सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून राज्याच्या मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त होते व न्या. विजया कापसे ताहिलरामाणी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या.
सुरुवातीस गुजरात उच्च न्यायालयात नियुक्ती झालेले न्या. वाघेला गेली १७ वर्षे न्यायाधीश आहेत. मुंबईत येण्यापूर्वी न्या. वाघेला सात महिने ओडिशा उच्च न्यायालयाचे व त्याआधी दोन वर्षे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
येत्या ११ ऑगस्ट रोजी न्या. वाघेला यांची वयाची ६२ वर्षे पूर्ण होतील. त्याआधी सर्वोच्च न्यायालयावर बढती न झाल्यास ते जेमतेम सहा महिने मुख्य न्यायाधीश पदावर राहून निवृत्त होतील.
महानिर्मितीचे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात १.४६ लाख कोटींचे सामंजस्य करार
ऊर्जानिर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत महानिर्मितीने मुंबईत सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात ऊर्जानिर्मिती क्षेत्रात १.४६ लाख कोटींचे गुंतवणूक संदर्भातील सामंजस्य करार केले.
सौर, औष्णिक ऊर्जा क्षेत्रांबरोबरच कोळसा खाणी, वॉशरीज, सांडपाणी पुनर्वापर आदी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होणार आहे.
औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये सी. एम. ई. सी चायना (डायना ईपीएल), टेलर पॉवर, टोरंट पॉवर, डेल्टा मेकॉन्स इंडिया, तोशिबा-जी. एस. डब्ल्यू. या कंपन्यांशी करार करण्यात आले.
फ्लाय ऍशसंबधी भाटिया, गुप्ता ग्लोबल, थीम लॉजिस्टिक आणि सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पांमध्ये एस. एम. एस. इन्फ्रा या कंपनीकडून गुंतवणूक करण्यात आली आहे.
सर्व करारांची अंमलबजावणी करण्यासाठी महानिर्मितीने आराखडा तयार केला आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लागल्यानंतर राज्यातील ऊर्जानिर्मितीमध्ये आमूलाग्र बदल होईल व वीज उत्पादन वाढेल.
राज्याचे ऊर्जा मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे
महाराष्ट्रात सुमारे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानात ‘मेक इन इंडिया’ या सप्ताहात महाराष्ट्र राज्यात सुमारे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात २८ लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत.
या परिषदेत औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजकांनी उपस्थिती लावली. तसेच गोदरेज अँड बॉइस, सुदर्शन केमिकल्स, उत्तम गलवा, के. रहेजा कन्स्ट्रक्शन यांनी मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या.
‘पृथ्वी-२’ची चांदीपूरमध्ये यशस्वी चाचणी
अण्वस्त्रवाहू ‘पृथ्वी-२’ क्षेपणास्त्राची चांदीपूरमध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली. पाचशे ते एक हजार किलोग्रॅम वजनाची अण्वस्त्रे हे क्षेपणास्त्र वाहून नेते.
‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज’वर ही चाचणी झाली. ३५० किलोमीटरचा पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असून, ते द्रवरूप इंधनावर उडते.
यापूर्वी २६ नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘पृथ्वी-२’ची चाचणी झाली होती. ‘पृथ्वी २’ हे क्षेपणास्त्र २००३मध्ये लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले आहे.
अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक अरुण खोपकर यांना मराठी भाषेसाठीचा २०१५चा साहित्य अकादमी पुरस्कार १६ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये प्रदान करण्यात आला. तर कोकणी भाषेसाठी उदय भेंब्रे यांच्या ‘कर्ण पर्व’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
‘संस्मरणे’ या साहित्य प्रकारात अरुण खोपकर लिखित निबंध संग्रह ‘चलत चित्रव्यूह’ या मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकाची निवड करण्यात आली होती.
देशातील २३ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ उर्दू साहित्यिक गोपीचंद नारंग प्रमुख पाहुणे होते.
प्रसिद्ध साहित्यिक डॉ. दामोदर खडसे यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.
पीएफवर ८.८० टक्के व्याजदर
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफवर (प्रॉव्हिडंट फंड) २०१५-१६ या वर्षासाठी सध्याचा ८.७५ टक्के असलेला व्याजदर वाढवून तो ८.८० टक्के इतका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ईपीएफओच्या ‘फायनान्स ऑडिट अँड इन्व्हेस्टमेंट कमिटी’ने (एफएआयसी) सुरूवातीला सुधारीत व्याजदर ८.९५ टक्के इतका करावा असा सल्ला दिला होता. मात्र यावर एकमत होऊ शकले नाही.
नियमानुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ ( सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती व्याजदरात होणाऱ्या बदलाबाबतचा निर्णय घेत असते.
ईपीएफओच्या या नव्या निर्णयांमुळे सुमारे ५ कोटी खातेधारकांना फायदा मिळणार आहे.
केंद्रीय कामगारमंत्री : बंडारू दत्तात्रेय
गिलानी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक
भारतविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना तसेच दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
गिलानी यांनी प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
संसद मार्ग पोलिस ठाण्यात गिलानी यांची चौकशी करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांची आरएमएल रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
गिलानी यांनी अफजल गुरु आणि मकबूल बट यांना हुतात्मा सांगून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्याचा आरोप आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी प्राध्यापक गिलानी यांना १२ डिसेंबर २००१ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची सुटका केली होती.
पाकिस्तानमध्येही ‘मेक इन इंडिया’
मुंबईत सुरु असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या सप्ताहानिमित्त पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाने देखील अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात १५०हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते.
इस्लामाबाद येथे झालेल्या ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत उदघाटन सोहळ्यात केलेले भाषण दाखवण्यात आले.
त्याचबरोबर भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी पाकिस्तानमधील आघाडीच्या उद्योगपतीसोबत चर्चा केली. भारतात उद्योग करण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि अन्य गोष्टींची माहिती यावेळी देण्यात आली.
पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या उद्योगपतींसाठी आता व्हिसा मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. तसेच मल्टिपल एंट्री व्हिसाच्या मदतीने पाकमधील उद्योगपती एका वर्षासाठी अनेक शहरांना भेटी देऊ शकतील.
या व्हिसाद्वारे पाकिस्तानमधील उद्योजक भारतातील १० शहरांना भेटी देऊ शकतील. विशेष म्हणजे त्यांना प्रवासाची माहिती पोलिसांना देण्यापासून सूट देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा