चालू घडामोडी : २२ फेब्रुवारी


आर-अर्बन मिशन

  • गावांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आर-अर्बन मिशन’ला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे २२ फेब्रुवारीपासून प्रारंभ केला.
  • या माध्यमातून ३०० गावांचा शहरांच्या धर्तीवर विकास केला जाणार असून, २०२२ पर्यंत गरिबांसाठी पाच कोटी घरे बांधली जाणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली.
  • पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचीही घोषणा केली. आजही पाच कोटी लोकांकडे स्वत:चे घर नाही. पैसे आणि जमीन नसल्याने त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही; पण प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

पामपोर चकमकीत पाच जवान शहीद

  • श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गजवळ गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले.
  • परंतु या चकमकीत कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन, जवान ओम प्रकाश, १४४ बटालियनचे जवान जी. डी. भोला प्रसाद, ७९ बटालियनचे कॉन्स्टेबल-चालक आर. के. रैना हे पाच जवान शहीद झाले.
  • या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
  • पामपोर येथे १९ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला. त्यानंतर दहशतवादी ईडीआयच्या इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश केला तेव्हा तेथे १०० नागरिक होते. सुरक्षा दलांनी प्रथम सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

कालबाह्य कायदे रद्द करण्याचा निर्णय

  • स्वातंत्र्यपूर्व काळात अमलात आलेले आणि आता कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय महराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
  • त्या अनुषंगाने राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र कोडअंतर्गत सध्या वापरात नसलेल्या सुमारे १७० कायद्यांची यादी बनवली आहे. ते कायदे रद्द करावेत की नाही, यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
  • हे काम अंतिम टप्प्यात असून आगामी अधिवेशनात कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्याचा विधी व न्याय विभागाचा मानस आहे. यापूर्वी १९८३ मध्ये काही निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले होते. 
  • हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास ‘महाराष्ट्र कोड’मधील निम्मे कायदे रद्द होतील.

जाट आरक्षणासाठी एम. वेंकय्या नायडू समिती

  • जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंकष अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
  • राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
  • गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते.
  • जाट आंदोलनामुळे व्यापार, वाहतूक ठप्प पडल्याने उद्योगजगताचे अंदाजे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा असोचॅम या उद्योग आणि वाणिज्य संघटनेने केला आहे.
  • बस, खासगी वाहने, रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे, मॉल आणि अनेक हॉटेलची जाळपोळ करण्यात आल्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेने नमूद केले आले.

भारतातील वायु प्रदुषणाची पातळी चीनपेक्षा जास्त

  • जागतिक हवामानबदल व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेने २०१५ या वर्षात  भारतामधील वायु प्रदुषणाची पातळी ही चीनपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. 
  • ग्रीनपीसच्या विश्लेषकांनी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाच्या माहितीच्या विश्लेषणानंतर हा निष्कर्ष काढला आहे.
  • चीनने वायुप्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी राबविलेल्या कठोर उपाययोजनेमुळे येथील हवेमध्ये सुधारणा झाली; तर याउलट भारतामधील वायुप्रदुषणाने गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे. 
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, जगातील सर्वाधिक प्रदुषित २० शहरांपैकी १३ शहरांचा केवळ भारतामध्येच समावेश असल्याचे ग्रीनपीसने सांगितले आहे.

देशामध्ये सर्वाधिक बेरोजगार ख्रिश्चनधर्मीय

  • देशामध्ये सर्वाधिक बेरोजगार ख्रिश्चनधर्मीयांमध्ये असल्याचे केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ख्रिश्चनांच्या खालोखाल मुस्लिम धर्मीयांमध्ये बेरोजगार असल्याचे हा अहवाल सांगतो. 
  • २०११-१२ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भारतात ख्रिश्चन धर्मीयांमध्ये बेरोजगारीचा दर ४.५ टक्के इतका असून शहरी भागात तो ५.९ टक्के आहे.
  • मुस्लिमांमध्ये ग्रामीण भागात ३.९ टक्के, तर शहरी भागात २.६ टक्के इतकी बेरोजगारी आहे. ग्रामीण भागात सर्वधर्मीयांमध्ये बेरोजगारी वाढल्याचे या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.
  • २००४-०५ साली ग्रामीण भारतात सर्वसाधारण बेरोजगारीचा दर १.६ टक्के इतका होता. २०११-१२ मध्ये हा दर १.७ टक्के इतका झाल्याचे हे सर्वेक्षण करणाऱ्या नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशन (एनएसएसओ) या संस्थेने म्हटले आहे.
  • बेरोजगारीचे प्रमाण अधिक असले, तरी देशात सर्वाधिक पदवीधरही ख्रिश्चनधर्मीयांमध्ये असल्याचे हा अहवाल सांगतो. शहरी भागामध्ये शीखांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे १.३ टक्के इतके असून हिंदू धर्मीयांमध्ये हे प्रमाण ३.३ टक्के इतके आहे.
  • शहरांमध्ये स्वयंरोजगार कमावणाऱ्या पुरुषांमध्ये मुस्लिम आणि शीखांचे प्रमाण सर्वाधिक ५२.८ टक्के, तर महिलांमध्ये मुस्लिंमांचे प्रमाण सर्वाधिक ६१.३ टक्के इतके आहे.
  • नोकरदार वर्गामध्ये पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाण ख्रिश्चनांचे (४९.४ टक्के) असून महिलांमध्ये ख्रिश्चन नोकरदार (६४.७ टक्के) सर्वाधिक आहेत.

मोदींनी ‘बीएचयू’ची पदवी नाकारली

  • बनारस हिंदू विद्यापीठाने देऊ केलेली डॉक्टरेट ही पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाकारली आहे. अशा पदव्या स्वीकारणं, आपल्या धोरणामध्ये बसत नसल्याचे सांगत मोदी यांनी ही पदवी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला आहे.
  • याआधीही मोदींनी अशा प्रकारचा बहुमान स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. अमेरिकेमध्ये २०१४मध्ये मोदी गेले असता, लुईसियाना विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देण्याची ईच्छा व्यक्त केली होती.
  • गुजरातमध्ये महिलांच्या व अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट देण्याचा लुईसियाना विद्यापीठाचा मानस होता. परंतु, मोदींनी त्यांनाही नकार दिला होता.
  • तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदाने गौरवण्याचे प्रस्ताव आले होते, जे मोदींनी धोरणात्मक निर्णय म्हणून नाकारले होते.

‘फायर अ‍ॅट सी’ला गोल्डन बेअर पारितोषिक

  • युरोपमधील निर्वासितांच्या समस्येचे भीषण चित्रण असलेल्या ‘फायर अ‍ॅट सी’ या माहितीपटाने बर्लिन चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे सर्वोच्च पारितोषिक पटकावले आहे.
  • गेल्या दोन दशकांपासून युरोपात स्थलांतराच्या प्रयत्नात भूमध्य महासागरातील लॅम्पेडुसा या बेटावर आलेल्या हजारो लोकांच्या जीवनाचे चित्रण इटलीचे चित्रपट दिग्दर्शक गियानफ्रँको रोसी यांनी या माहितीपटात केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा