‘फेसबुक’च्या ‘फ्री बेसिक्स’ आणि ‘एअरटेल’च्या ‘एअरटेल झिरो’ या योजनांना धक्का देत ‘ट्राय’ने देशात ‘नेट न्यूट्रॅलिटी’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंटरनेट सेवेसाठीच्या भेदभावपूर्ण दरआकारणीवर प्रतिबंध घालणारा ‘प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेटरी टेरिफ फॉर डेटा सर्व्हिसेज रेग्युलेशन, २०१६’ आदेश ‘ट्राय’ने जारी केला आहे.
कोणतीही इंटरनेट सेवा वापरणाऱ्यासाठी समान इंटरनेट स्पीड म्हणजे ‘नेट न्यूट्रॅलिटी’ आणि याच तत्वाच्या आधारे देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली गेली पाहिजे, अशा स्वरुपाची भूमिका ‘ट्राय’ने घेतली आहे.
उर्दूतील प्रख्यात कवी निदा फाजली यांचे निधन
‘कभी किसी को मुक्कमल जहां नहीं मिलता’ या सारख्या गीतांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले उर्दूतील प्रख्यात शायर कवी आणि गीतकार निदा फाजली यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
निदा फाजली यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी दिल्लीमध्ये झाला. वडीलही उर्दू शायरी आणि गीतलेखन करीत असल्याने त्यांच्यामुळेच निदा फाजली यांना या साहित्य प्रकाराबद्दल रुची निर्माण झाली.
सूरदास यांच्या एका काव्यसंग्रहामुळे प्रभावित होऊन निदा फाजली यांनी कवी होण्याचा निर्णय घेतला होता. ग्वालियर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते करिअर करण्याच्या उद्देशाने १९६४ मध्ये मुंबईत आले.
सुरुवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लिट्ज या नियतकालिकांमधून लेखन केले. मीर आणि गालिब यांच्या रचनांमुळे निदा फाजली विशेष प्रभावित होते. सत्तरच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करायला सुरुवात केली.
दहा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी १९८० मध्ये ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटासाठी लिहिलेले ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ हे गीत चांगलेच गाजले.
या गाण्यानंतर त्यांना अनेक मोठ्या चित्रपटांसाठी गीत लेखनाचे प्रस्ताव मिळू लागले. त्यामध्ये ‘बीबी ओ बीबी’, ‘आहिस्ता-आहिस्ता’ आणि ‘नजराना प्यार का’ या चित्रपटांचा समावेश होता.
गझलगायक दिवंगत जगजित सिंह यांनी निदा फाजली यांच्या अनेक रचना आपल्या कार्यक्रमांमधून लोकांसमोर सादर केल्या आणि त्या पसंतीसही उतरल्या.
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटांसाठी निदा फाजली यांनी लिहिलेले ‘होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है’ हे गाणेही चांगलेच गाजले.
राष्ट्रपती भवनात राज्यपालांची परिषद
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ९ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीमध्ये राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती भवनात होणारी ही राज्यपालांची ४७वी परिषद आहे.
देशातील २३ राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल या परिषदेला उपस्थित राहणार असून, यामध्ये दहशतवादविरोधी रणनीती आणि रोजगारनिर्मिती यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.
दहशतवादी कारवाया आणि घूसखोरी या प्रश्नांना अनुसरून अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षा यावर परिषदेतील चर्चेत प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास कार्यक्रमावर विशेष लक्ष देऊन युवकांसाठी रोजगारनिर्मितीवरही चर्चा केली जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियान, २०२२ पर्यंत सर्वाना निवारा आणि स्मार्ट सिटी यासह उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर परिषदेतील चर्चेत भर दिला जाणार आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाला गती देण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे.
या परिषदेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘आयएनएस विराट’ निवृत्त
भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण २९ वर्षे राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५७ वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.
‘आयएनएस विराट’ या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती इंग्लंडतर्फे १९४५ साली करण्यात आली. तिचे सुरुवातीचे नाव ‘एचएमएस हर्क्युलस’ होते. ४ मार्च १९६१ रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली.
त्यानंतर ‘एचएमएस हर्मिस’ भारताने ब्रिटनकडून विकत घेतली. १२ मे १९८७ रोजी ती भारतीय नौदलात रीतसर दाखल झाली. त्यानंतर १९९७ सालपर्यंत या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.
पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका अशी भारतीय नौदलाची गरज होती. मात्र त्यानंतर १९९७ पासून ‘आयएनएस विराट’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे उरली.
खरे तर ‘आयएनएस विराट’चे आयुष्यमान संपत आले होते, मात्र तिची डागडुजी करून वारंवार तिचे आयुष्यमान वाढविण्यात आले. आता मात्र यापुढे आयुष्यमान वाढविणे शक्य नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनानंतर ‘आयएनएस विराट’ची रवानगी कोची बंदरात करून तिला निवृत्त करण्याचा निर्णय नौदलाने घेतला आहे.
९ फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या ‘पासेक्स’ या निरोप देण्याच्या सोहळ्यात व युद्ध कवायतींमध्ये ती सहभागी होईल. हा तिचा अखेरचा सहभाग असेल.
निवृत्त होत असलेल्या आयएनएस विराटच्या सन्मानार्थ ब्रिटनच्या शाही नौदलातील ‘एचएमएस डिफेन्डर’ या युद्धनौकेवरील एक हेलिकॉप्टर विराटच्या डेकवर उतरून मानवंदना देणार आहे. विराट ही मूळची ब्रिटनच्या शाही नौदलातील युद्धनौका असल्याने तशी विनंती करण्यात आली होती, ती भारतीय नौदलाने मान्य केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा