चालू घडामोडी : ७ फेब्रुवारी
देशातील सर्वांत मोठ्या रिफायनरीचे लोकार्पण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारादीप येथील 'इंडियन ऑइल'च्या देशातील सर्वांत मोठ्या रिफायनरीचे लोकार्पण ७ फेब्रुवारी रोजी केले.
- या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आतापर्यंत ३४,५५५ कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. हा प्रकल्प जगभरातील मोजक्याच अत्याधुनिक रिफायनरींपैकी एक आहे.
- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते २४ मार्च २००० रोजी 'इंडियन ऑइल'च्या नवव्या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ झाला होता. वार्षिक १५ दशलक्ष टन उत्पादन क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाच्या निर्मितीला सोळा वर्षांचा कालावधी लागला.
- ओडिशाची राजधानी भुवनेश्वर पासून हा प्रकल्प १४० किलोमीटरवर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कच्च्या तेलातून सल्फर वेगळे करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सल्फर गाळपाची प्रक्रिया अतिशय कमी खर्चात होणार आहे.
- पारादीपच्या या प्रकल्पातून वार्षिक ५६ लाख टन डिझेल, ३७ लाख टन पेट्रोल आणि १९ लाख टनांहून अधिक केरोसिन आणि एअर टर्बाइन फ्युएलची निर्मिती होणार आहे. या शिवाय ७ लाख ९० हजार टन घरगुती गॅस आणि १२ लाख टन पेटकोकची निर्मिती करण्यात येणार आहे.
- पारादीपच्या अत्याधुनिक रिफायनरीच्या निर्मितीसाठी २.८ लाख टन पोलादाचा अर्थात स्टीलचा, ११.६ क्युबिक मीटर काँक्रिटचा आणि २ हजार ४०० किमी लांबीच्या पाइपचा वापर करण्यात आला आहे.
- पारादीपच्या प्रकल्यामुळे इंडियन ऑइल ही देशातील सर्वांत मोठी रिफायनरी बनली आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचे निधन
- प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग यांचे ६ फेब्रुवारी रोजी मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. ते दोन वर्षे कर्करोगाशी झुंज देत होते. तेलंग यांच्यावर २०१४ पासून उपचार सुरू होते. २६ फेब्रुवारीला ते वयाची ५६ वर्षे पूर्ण करणार होते.
- त्यांनी हिंदुस्तान टाइम्स, दी इंडियन एक्सप्रेस, दी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांत व्यंगचित्रकार म्हणून काम केले. २००४ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला.
- त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही.नरसिंहराव, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांना आपल्या कलेतून फटकारे दिले होते.
- तेलंग यांचा जन्म राजस्थानात २६ जानेवारी १९६० रोजी झाला व त्यांचे पहिले व्यंगचित्र १९७० मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी प्रसिद्ध झाले होते.
- १९८२ मध्ये त्यांना मुंबईत इलस्ट्रेटेड विकलीत काम करण्याची संधी मिळाली. लहान असताना त्यांना टिनटिन फँटम व ब्लाँडी या कॉमिक व्यक्तिरेखांचे आकर्षण होते.
- १९८३ मध्ये ते नवभारत टाइम्समध्ये दिल्लीत रूजू झाले व नंतर अनेक वर्षे हिंदुस्तान टाइम्समध्ये काम केले. ‘नो प्रायमिनिस्टर’ हे त्यांचे व्यंगचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
उत्तर कोरियाकडून उपग्रह प्रक्षेपण
- उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह क्वाँगमायाँग-४ यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे.
- या चाचणीमुळे आता उत्तर कोरिया अमेरिकेवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने मारा करू शकतो. या घटनेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन झाले असून उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती.
- आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक र्निबध आधीच लादले आहेत, त्यात आता भर पडणार आहे.
- अमेरिकेने उत्तर कोरियाचे अग्निबाणाने उपग्रह सोडण्याचे कृत्य अस्थिरताकारक व प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे तर जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी हे कृत्य असहनीय असल्याची टीका केली आहे.
- उत्तर कोरियावर अनेक र्निबध आधीही लादले असून त्यांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करू नये अशी अपेक्षा होती. अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया यांनी उत्तर कोरियाला आता जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानच्या यासिर शाहवर तीन महिन्यांची बंदी
- प्रतिबंधित उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्याप्रकरणी पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तीन महिन्यांची बंदी घातली आहे.
- आयसीसीच्या उत्तेजकविरोधी नियमावलीच्या कलम २.१चा भंग केल्याप्रकरणी यासिरवर कारवाई झाल्याचे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.
- १३ नोव्हेंबर २०१५ रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अबू धाबी येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेनंतर यासिरची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या शरीरात क्लोरॅडिडन या जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेतर्फे बंदी घालण्यात आलेले द्रव्य सापडले होते.
- कामगिरी उंचावण्यासाठी उतेजकांचा वापर केलेला नसून, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी घेण्यात आलेल्या औषधात प्रतिबंधित उत्तेजक असल्याची भूमिका यासिरने मांडली होती. त्याचा विचार करूनच यासिरला कमी कालावधीची शिक्षा केल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
- २७ मार्च २०१६ पासून यासिरला खेळण्याची परवानगी असेल.
सट्टेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूवर बंदी
- ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू पायपा क्लीअरी हिच्यावर सट्टेबाजी केल्यामुळे सहा महिन्यांदी बंदी घालण्यात आली.
- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पुरुष संघांची कसोटी मालिका नुकतीच झाली. गेल्या नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या कसोटीवर तिने १५.५० ऑस्ट्रेलियन डॉलरचा (११ डॉलर) सट्टा लावला
- ती १९ वर्षांची असून, महिला टी-२० मध्ये होणाऱ्या ‘बीग बॅश लीग‘मध्ये ती ‘पर्थ स्कॉर्चर्स‘कडून खेळते. अशी कारवाई झालेली ती ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
- यापूर्वी ‘सिडनी सिक्सर्स‘ची लेगस्पीनर अँजेला रिक्स हिच्यावर दोन वर्षांची प्रलंबित बंदी घालण्यात आली. २०१५च्या पुरुष क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर तिने नऊ डॉलरचा सट्टा लावला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा