ख्यातनाम शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या अवकाशकालातील (स्पेसटाईम) रचनेमधील गुरुत्वीय लहरी (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्) शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत.
२०१२ मध्ये लागलेल्या ‘हिग्ज बोसन’ (देवकण)च्या पाठोपाठ गेल्या शतकातील हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे.
या लहरींना शोधण्यासाठी अंतराळ पदार्थविज्ञान शास्त्रज्ञांच्या तुकडीने नव्याने सुधारीत आणि अत्यंत संवेदनशील असे उपकरण वापरले.
१.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च आलेले हे उपकरण (लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी-लिगो) गुरुत्वीयीय लहरी दोन कृष्ण विवरांतून शोधून काढण्यासाठी वापरण्यात आले. कृष्ण विवर खूप दूर अंतरावरून एकमेकांवर आदळले व त्यातून या लहरी तयार झाल्या.
अल्बर्ट आइनस्टाइन यांनी १९१६ साली मांडलेल्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांतामध्ये (जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) गुरुत्व तरंगांच्या अस्तित्वाचा दावा केला होता. परंतु प्रथमच वैज्ञानिक जगताला त्यांचे अस्तित्व पुराव्यानिशी सिद्ध करता आले आहे.
‘लिगो’चे व्यवस्थापकीय संचालक आणि कॅलटेकचे शास्त्रज्ञ डेव्हिड रिटझ यांनी वॉशिंग्टन डीसी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरय्या यांनी केले होते.
दिल्लीत ‘सम-विषम-२’
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सम-विषम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १५ ते ३० एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून याहीवेळी महिला, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि दुचाकी वाहनांना र्निबधांतून सूट दिली जाणार आहे.
सरकारला मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, बहुतांश नागरिक ही योजना पुन्हा राबवण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात पंधरा दिवसांसाठी ही योजना अमलात आणण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
सरकारच्या प्रदूषणविरोधी उपक्रमाचा भाग म्हणून यापूर्वी १ ते १५ जानेवारीदरम्यान ही योजना राबवली गेली होती. या योजनेत, विषम नोंदणी क्रमांक असलेली वाहने विषम तारखांना, तर सम नोंदणी क्रमांकाची वाहने सम तारखांना चालवण्याची परवानगी आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल
लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांचे निधन
सियाचेनमधील तीन फेब्रुवारीच्या हिमवादळातही आश्चर्यकारकरित्या बचावलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
कर्नाटकातील त्यांच्या बेटादूर या जन्मगावी सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ३३ वर्षे वयाचे हणमंतप्पा यांच्या पश्चात पत्नी महादेवी आणि नेत्रा ही दोन वर्षांची मुलगी आहे.
जगातील सर्वात उंचावरील युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन एक जेसीओ आणि नऊ जवान बर्फाखाली गाडले गेले होते.
मद्रास तुकडीतील या जवानांना वाचवण्यासाठी लष्करानं शर्थ केली होती. पण, दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, उणे ४० अंश सेल्सिअस तापमान आणि २५ फूट बर्फाखाली कुणी जिवंत सापडेल ही आशा मावळली होती.
परंतु बर्फाच्या ढिगाखालून हनुमंतप्पा सहा दिवसांनी जिवंत बाहेर आले होते. त्यांच्या या जिद्दीला सगळ्यांनीच सलाम केला होता.
फिफाच्या माजी सरचिटणीसांवर १२ वर्षांची बंदी
फिफा संघटनेतील महाघोटाळ्यात सहभागी झालेले फिफाचे माजी सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांच्यावर फुटबॉल संदर्भातील कोणत्याही कामकाजातील सहभागावर १२ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फिफाच्या आचारसंहिता समितीने हा निर्णय जाहीर केला.
दक्षिण व उत्तर कोरिया यांच्यात तणाव वाढला
उत्तर कोरियाने नुकत्याच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाचा निषेध म्हणून दक्षिण कोरियाने दोन्ही देशांतर्फे चालवण्यात येत असलेले कायेसाँग औद्योगिक क्षेत्र बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
यावर उ. कोरियाने कठोर भूमिका घेत, या क्षेत्रातील सर्व द. कोरियन नागरिकांना तातडीने हे क्षेत्र सोडून मायदेशी परतण्याचा आदेश देत औद्योगिक क्षेत्रच ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या दोन्ही शत्रू देशांमधील तणाव आणखी वाढीस लागण्याची शक्यता आहे.
कायेसाँग हे दोन्ही देशांच्या सीमेवरील शहर असून तेथे संयुक्तपणे हे औद्योगिक क्षेत्र चालवण्यात येत होते. दोन्ही देशांमधील नागरी सहकार्याचे ते शेवटचे प्रतीक होते.
या क्षेत्रात अनेक कंपन्या असून, त्यातील आपले कर्मचारीही उ. कोरियाने काढून घेतले आहेत. या औद्योगिक क्षेत्रातील सर्व मालमत्ता ताब्यात घेत असल्याचे सांगत, हा परिसर उ. कोरियाने लष्करी भाग म्हणूनही जाहीर केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा