मुंबईत होणाऱ्या 'मेक इन इंडिया' सप्ताहातील 'महाराष्ट्र नाइट' या कार्यक्रमाचे गिरगाव चौपाटीवर आयोजन करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ५६ देशांचे प्रतिनिधी व इतर पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
येत्या १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'मेक इन इंडिया' सप्ताहादरम्यान गिरगाव चौपाटीवर १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच चार देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्र नाइट' या चार तासांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्या. एम. वाय. इक्बाल व अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर महाधिवक्ता मुकुल रोहतगी रांनी राज्याची बाजू मांडली.
दहा वर्षांपूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत गणपती आणि दुर्गा विसर्जनाव्यतिरिक्त गिरगाव चौपाटीवर शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसल्याचे सांगून २८ जानेवारी रोजी मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली होती.
परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणून औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेक इन इंडिया‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन २०१६
भारतीय नौदलातर्फे आयोजित दुसऱ्या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू २०१६ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी ५३ देशांच्या ९० युद्धनौका विशाखापट्टणम नौदल बंदरात दाखल झाल्या आहेत.
भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
संचलनासाठीची रंगीत तालीम विशाखापट्टणम बंदरापासून आतमध्ये खोल समुद्रात पार पडली. एकूण ९० युद्धनौका, सहा रांगांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या युद्धनौका याच रचनेमध्ये उभ्या असतील.
सध्या येथे येऊन दाखल झालेल्या नौदलांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदिव, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे. अमेरिकेचे नौदल १० हजार टन वजनाच्या मिसाईल गायडेड क्रूझर युद्धनौकेसह दाखल झाले आहे.
भारतीय नौदलातील दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या निमित्ताने प्रथमच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
रशियासोबतचा हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार पूर्ण
रशियाच्या रोस्टेक स्टेट कार्पोरेशनच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट या कंपनीशी आधी केलेल्या करारानुसार कझान हेलिकॉप्टर प्रकल्पातून एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टर्सचा शेवटचा टप्पा भारताला देण्यात आला. एकूण १५१ हेलिकॉप्टर्स भारताने विकत घेतली आहेत.
रशियन हेलिकॉप्टर्सचा भारत हा महत्त्वाचा ग्राहक आहे. रशियाकडून भारताने ४०० हेलिकॉप्टर्स घेतली आहेत.
आता भारतीय हवाई दल आणखी ४८ हेलिकॉप्टर्स घेणार असून त्यांचा वापर वाळवंटी व पर्वतीय प्रदेशात केला जाणार आहे.
रेल्वेसाठी विशेष संयुक्त कंपनी
रेल्वेचे राज्यांमधील रखडलेले पायाभूत प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्यांशी भागीदारी असलेली विशेष संयुक्त कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्य सरकारे आपापल्या भागातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेशी संयुक्त कंपनीचा करार करू शकतील.
ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालय
युरोपियन वास्तूरचनेचा सुंदर अविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक पाटणा उच्च न्यायालयाच्या वास्तूने शंभराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. कोलकात्याच्या ‘मार्टीन अँड कंपनी’ने या इमारतीची उभारणी केली होती.
पल्लेडियन डिझाइनवर आधारित ‘निओ क्लासिकल’ शैलीमध्ये या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीच्या उभारणीचे काम १ डिसेंबर १९१३ मध्ये पूर्ण झाले होते, त्यानंतर ३ फेब्रुवारी १९१६ रोजी तत्कालीन व्हाइसराय लॉर्ड चार्ल्स हार्डिंग्ज यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले होते.
पं. राम नारायण यांना पं. भीमसेन जोशी पुरस्कार
स्व. पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा सन २०१५-१६ चा पुरस्कार ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे.
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
रुपये ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडीत जसराज आणि श्रीमती प्रभा अत्रे यांना प्रदान करण्यात आला आहे.
दाऊद इब्राहिमवर आर्थिक निर्बंध
आर्थिक निर्बंध घालण्यात आलेल्या व्यक्तींची नवी यादी ब्रिटिश सरकारने जाहीर केली असून, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम या एकमेव भारतीयाचा यादीत समावेश आहे. या निर्बंधांमुळे दाऊदला इंग्लंडमध्ये आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, त्याच्या मालमत्ता आढळल्यास जप्त होतील.
भारताने ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या दाऊदच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिटनने जाहीर केलेल्या आर्थिक निर्बंधांबाबतच्या यादीत दाऊदच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
यादीत दाऊदचे नागरिकत्व भारतीय असल्याचा उल्लेख असून, त्याच्या चार घरांचे पत्ते दिले आहेत. हे सर्व पत्ते कराचीतील आहेत.
जानेवारी २०१६मध्ये जारी केलेल्या या यादीत लिट्टे, खलिस्थानवादी संघटना आणि हिजबुल मुजाहिदीनचा समावेश आहे.
संजीव राजपूतचा रिओ ऑलिम्पिक प्रवेश निश्चित
संजीव राजपूतने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चौथे स्थान पटकाविले. याबरोबरच त्याने आगामी रिओ ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. संजीवने यापूर्वी दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
आतापर्यंत भारताच्या बारा नेमबाजांनी रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली आहे. आतापर्यंत भारताच्या बारा नेमबाजांनी रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली आहे.
राजपूतच्या या कामगिरीनंतर क्रीडासंग्रामात आता भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. चार वर्षांपूर्वी लंडन येथे भारताने ११ नेमबाजांची टीम पाठविली होती.
आयोवामध्ये डोनाल्ड ट्रम्प पराभूत
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी आयोवा राज्यातील प्राथमिक फेरीत (कॉकस) धक्कादायक मात करीत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आक्रमक मोर्चेबांधणी करणारे ट्रम्प वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्या तुलनेत टेक्सासचे सिनेटर क्रूझ आपली मोहीम शांततेत राबवीत आहेत.
अशा परिस्थितीत आयोवातील निवडणुकीत क्रूझ यांनी २८ टक्के मते मिळवून ट्र्म्प यांना कडवे आव्हान निर्माण केले आहे. ट्रम्प यांना २४ टक्के मते मिळाली. तर तिसरे रिपब्लिकन उमेदवार मार्को रुबिओ यांनीही २३ टक्के मते मिळवत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.
‘साईप्रसाद’ला ६१५ कोटी रुपये परत करण्याचे आदेश
बेकायदेशीर गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये गोळा करणाऱ्या साईप्रसाद कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला ‘सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) गुंतवणूकदारांचे सुमारे ६१५ कोटी रुपये परत करण्याचा आदेश दिला आहे.
तसेच कंपनी आणि तिचे संचालक बाळासाहेब भापकर, शशांक भापकर आणि वंदना भापकर यांना चार वर्षांसाठी भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे.
ही कंपनी जमीन विकसनासाठी संयुक्त भागीदारी प्रकल्प राबविण्याच्या नावाखाली बेकायदेशीर गुंतवणूक योजना चालवत होती. त्यासाठी ‘सेबी’कडून कुठल्याही परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या.
कंपनीने नियमांचा भंग केल्यामुळे या योजना गुंडाळण्याचे व गुंतवणूकदारांचे पैसे हमी परताव्यासह तीन महिन्यांत परत करण्याचे निर्देश देण्यात आला आहे. तसेच, यासंदर्भातील अहवाल त्यापुढील पंधरा दिवसांत सादर करण्याबाबतही कंपनीला बजावण्यात आले आहे.
‘सेबी’ने २०१४मध्येच या कंपनीवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी याच समूहाच्या साईप्रसाद प्रॉपर्टीज व साईप्रसाद फूड या कंपन्यांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा