चालू घडामोडी : २० फेब्रुवारी
कालिखो पुल अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री
- कॉंग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पुल यांनी अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. पी. राजखोवा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- राज्यातील राष्ट्रपतीराजवट उठल्यानंतर काही तासांतच पुल यांचा शपथविधी झाला. पुल यांनी याआधी राज्याचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
- सध्याच्या पुल सरकारला भारतीय जनता पक्षाचे ११, अपक्ष दोन आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा पाठिंबा आहे.
- राज्य विधानसभेत ६० सदस्य असून, काँग्रेसचे ४७ सदस्य आहेत. त्यातील २१ सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्यातील १४ जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
इस्रोची स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वीपणे घेतली आहे. क्रायोजेनिक सीई २० असे या इंजिनाचे नाव आहे.
- महेंद्रगिरी येथे घेण्यात आलेली ही चाचणी ६४० सेकंदांची होती. जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकासाठी हे इंजिन वापरले जाणार आहे.
- या इंजिनाच्या अल्पावधीच्या दोन चाचण्या यापूर्वी यशस्वी झाल्या आहेत. मिक्स्श्चर रेशो कंट्रोलरसह ही चाचणी केली आहे. या चाचणीमुळे भारतीय अवकाश संशोधनाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.
- इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार
मॅकलमचे कसोटीमधील सर्वात वेगवान शतक
- न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकलमने ५४ चेंडूत शतक झळकावित कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करण्याचा मान मिळविला आहे. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदविला.
- ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना मॅकलमच्या कारकिर्दीतील १०१वा व अखेरचा सामना आहे.
- या सामन्यात मॅकलमने आपल्या आक्रमक शैलीत ५४ चेंडूत १६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवताना ७९ चेंडूत २१ चौकार व ६ षटकारांसह १४५ धावा केल्या.
- मॅकलमने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक यांचा यापूर्वीचा ५६ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला.
- रिचर्ड्स यांनी १९८५-८६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ५६ चेंडूंत शतक केले होते. त्यांचा हा विक्रम गेल्या ३० वर्षांत कुणालाही मोडता आला नव्हता. मिस्बाहने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या विक्रमाशी बरोबरी केली होती.
- याबरोबरच मॅकलमने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मोडला आहे. त्याने आत्तापर्यंत १०६ षटकार मारले आहेत. हा विक्रम याआधी १०० षटकार मारणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.
- याशिवाय मॅकलमने न्यूझीलंडतर्फे अखेरच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमावरही त्याने नाव कोरले.
- मॅकलमने कसोटी कारकिर्दीत १२ शतके झळकाविली आहेत. त्यामध्ये एका त्रिशतकाची समावेश आहे. मॅकलमने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होत आहे.
द प्रेसिडेंन्शिअल अर्ली करिअर अॅवॉर्ड
- अमेरिकेतील तरुण संशोधकांसाठीच्या सर्वोच्च अशा ‘द प्रेसिडेंन्शिअल अर्ली करिअर अॅवॉर्ड’साठी सहा भारतीय वंशाच्या संशोधकांची निवड झाली आहे.
- स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या एकूण १०६ युवा संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार होणार करण्यात येईल.
- युवावस्थेतच संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
निवड झालेले सहा भारतीय |
मिलिंद कुलकर्णी |
पर्ड्यू विद्यापीठ |
किरण मुसुनुरू |
हार्वर्ड विद्यापीठ |
सचिन पटेल |
वॅंडरबिल्ट विद्यापीठ |
विक्रम श्याम |
नासा |
राहुल मंगारम |
पेनसिल्वानिया विद्यापीठ |
श्वेतक पटेल |
वॉशिंग्टन विद्यापीठ |
प्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती
- दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ (एआयआर)चे प्रसारण करणाऱ्या प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- ती नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्धवेळ सदस्य राहणार आहे. प्रसार भारतीची २४ फेब्रुवारीला बैठक होणार असून, या बैठकीला काजोल उपस्थित राहील.
उत्तर कोरियावर आणखी र्निबध
- उत्तर कोरियाने अलीकडेच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी तसेच उपग्रह सोडण्याच्या नावाखाली केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी या दोन घटनांमुळे त्या देशावर आणखी र्निबध जारी करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली आहे.
- दक्षिण कोरिया, फिलिपीन्स व जपान हे देश उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांनी संतप्त झालेले आहेत. त्याशिवाय अमेरिकेनेही तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
- ओबामा यांनी उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी काँग्रेसने मंजूर केलेल्या दंडात्मक उपायांच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार त्या देशाला महासंहारक अस्त्रे तयार करण्याची सामग्री व तंत्रज्ञान निर्यात तसेच आयात करणाऱ्या देशांवर कारवाई होऊ शकते.
- चीनने उत्तर कोरियाविरोधी कारवाईत जागतिक समुदायाला पाठिंबा देण्यात कुचराई केली आहे, त्यामुळे उत्तर कोरिया विरोधातील कारवाईत सुरक्षा मंडळातच मतैक्य नाही असे चित्र समोर आले आहे.
पुलित्झर विजेत्या नेली हार्पर ली यांचे निधन
- ‘टू कील अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीसाठी पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
- अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या १९४९ मध्ये न्यूयॉर्कला गेल्या. जुलै १९६० मध्ये त्यांच्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. या पुस्तकावर १९६२ मध्ये चित्रपटही निघाला.
- या पुस्तकाचा ‘गो सेट अ वॉचमन’ नावाचा दुसरा भाग २०१५ साली प्रसिद्ध झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा