१२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी आणि शिलाँग येथे एकाचवेळी होत असलेल्या १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा केली.
- या स्पर्धेत भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे २६०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
- अनेक कारणांमुळे वारंवार लांबणीवर पडलेली ही स्पर्धा द. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येत आहे.
- २३ खेळांमध्ये विविध २२८ प्रकारात स्पर्धा होतील. सर्व खेळात पुरुष आणि महिला गटात सारखेच आयोजन होणार असून २२८ सुवर्ण, २२८ रौप्य आणि ३०८ कांस्य पदकांसाठी चढाओढ होणार आहे.
- स्पर्धेचे शुभचिन्ह असलेल्या ‘तिखोर’च्या नेतृत्वात सर्व देशांच्या संघांनी सुरेख पथसंचलन केले. यावेळी भारतीय ध्वजवाहक होण्याचा मान स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल याला मिळाला.
- प्रत्येक देशाच्या पथकापुढे एक मुलगा आणि मुलगी आपल्या देशातून नदीचे पाणी सोबत घेऊन आले होते. द. आशियाई देशांची एकजूट म्हणून हे पाणी ब्रम्हपुत्रा नदीत विसर्जित करण्यात येणार आहे.
ज्यूलियन असांजेला दिलासा
- विकिलिक्सचा संस्थापक ज्यूलियन असांजेला ब्रिटनने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीने असांजेच्या बाजूने निर्णय दिला आहे. ब्रिटन व स्वीडनने असांजेची तत्काळ मुक्तता करावी व त्याला नुकसानभरपाई द्यावी, असे या समितीने म्हटले आहे.
- लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्यानंतर असांजे याला स्वीडीश सरकारला हस्तांतरित करण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्याने २०१२मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासामध्ये राजकीय आश्रय मागितला होता.
- मात्र २०१४मध्ये असांजेने आपल्याला अटक न करता निव्वळ बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आल्याची तक्रार राष्ट्रसंघाकडे केली होती.
- लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपांतर्गत असांजे स्वीडनला हवा आहे. मात्र हजारो संवेदनशील राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करणाऱ्या असांजेला स्वीडनकरवी अमेरिकेच्या स्वाधीन केले जाण्याची भीती आहे.
असांजेने लिहिलेली पुस्तके | |
---|---|
स्टेट अँड टेररिस्ट कॉनस्पिरसीज (२००६) | कॉन्स्पिरसी ऍड गव्हर्नन्स (२००६) |
द हिडन कर्स ऑफ थॉमस पेन (२००८) | व्हॉट्स न्यू अबाऊट विकिलिक्स (२०११) |
असांजेवरील चित्रपट | |
---|---|
द वॉर यू डोंट सी (२०१०) | द सिम्पसन्स (२०१२) |
सिटीझनफोर (२०१४) | द येस मेन आर रिव्होल्टिंग (२०१४) |
पत्रकारांना सर्वाधिक धोकादायक असलेल्या देशांची यादी
- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पत्रकारांसाठी इराक हा सर्वांत धोकादायक देश असून भारत सातव्या क्रमांकाचा धोकादायक देश असल्याची माहिती समोर आली आहे.
- पत्रकारांना सर्वाधिक धोकादायक असलेल्या देशांची यादीही आयएफजेने प्रसिद्ध केली आहे. या यादीत पत्रकारांसाठी पाकिस्तान चौथ्या क्रमांकाचा धोकादायक देश आहे.
- गेल्या २५ वर्षांत पत्रकारांसह माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या २,२९७ व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. मागील वर्षभरात ११२ तर २००६ या एकाच वर्षात सर्वाधिक १५५ जणांची हत्या करण्यात आली आहे.
पत्रकारांसाठी धोकादायक असलेले ‘टॉप-१०’ देश | ||
---|---|---|
क्र. | देश | २५ वर्षात हत्या झालेले एकूण पत्रकार |
१. | इराक | ३०९ |
२. | फिलिपाईन्स | १४६ |
३. | मेक्सिको | १२० |
४. | पाकिस्तान | ११५ |
५. | रशिया | १०९ |
६. | अल्जेरिया | १०६ |
७. | भारत | ९५ |
८. | सोमालिया | ७५ |
९. | सिरीया | ६७ |
१०. | ब्राझील | ६२ |
कर्तृत्ववान व्यक्तींसाठी युपी सरकारची पेन्शन योजना
- उत्तर प्रदेशमधील ज्या कर्तृत्ववान व्यक्तींनी राज्याचा नावलौकिक वाढविला आहे अशांना उत्तर प्रदेश सरकारने पेन्शन योजना सुरू केली आहे.
- पद्म पुरस्कार, तसेच यश भारती पुरस्कार असे सन्मान मिळालेल्या व्यक्तींना आर्थिक साह्य करण्यासाठी या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये राज्य सरकार दरमहा ५० हजार रुपये वेतन देणार आहे.
- यश भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या १४१ व्यक्तींना सरकारच्या वतीने अर्ज पाठविण्यात आले होते. त्यापैकी १०८ जणांनी सरकारकडे अर्ज केला आहे.
- यामध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना, खासदार राज बब्बर, त्यांच्या पत्नी नादिरा, अभिनेते जिमी शेरगील, नवाजुद्दीन सिद्दीकी, शास्त्रीय गायिका गिरिजा देवी, रंगकर्मी राज बिसारिया, गायिका मालिनी अवस्थी, क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचाही समावेश आहे हे विशेष. यापैकी बहुतांश व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत.
अमित सिंघल गुगलमधून बाहेर
- गुगल सर्चचे गेली १५ वर्षे प्रमुख राहिलेले भारतीय वंशाचे अमित सिंघल (वय ४७) यांनी गुगल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील झांशी येथे जन्मलेले अमित सन २०००मध्ये गुगलमध्ये दाखल झाले होते.
- त्यांच्या जागी गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रमुख जॉन गियनान्द्रिया यांची नियुक्ती केली जाणार आहे.
कॉसमॉस सहकारी बँकेला उत्कृष्ट सामाजिक बँकिंगचा पुरस्कार
- सहकारी बँकिंग क्षेत्रातील सर्वात जुनी व आधुनिक बँक म्हणून ओळख असलेल्या सहकारी बँकेला असोचेम संघटनेतर्फे उत्कृष्ट सामाजिक बँकिंगचा पुरस्कार देण्यात आला.
- सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व स्थानिक बँका यांमधून कॉसमॉस बँकेची वरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी देशभरातून ८२ प्रवेशिका आल्या होत्या.
- असोचेम अर्थात असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया ही देशातील सर्वोच्च व्यापारी संघटना असून व्यापार व वाणिज्य धोरणांबाबत सरकार, उद्योजक व अन्य भागधारकांमध्ये मध्यस्थ म्हणून कार्यरत राहणारी संघटना आहे.
- कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष : मिलिंद काळे
- असोचेमचे अध्यक्ष : सुनील कनोरिया
दोन लाखांपेक्षा जास्त सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्ती
- केंद्र शासनाने दोन लाखांपेक्षा अधिक किमतीच्या सोने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती केली आहे. कोणत्या व्यक्तीने किती सोने खरेदी केले हे स्पष्ट होणार असल्याने आयकर बुडविणे कठीण जाणार आहे.
- पॅनकार्डमुळे सोने खरेदी करणाऱ्यांची माहिती मिळणार आहे. यामुळे सराफा व्यावसायिक पक्के बिल फाडणार नाही. उलट कच्चे बिल फाडले जातील.
- यामुळे शासनाचा कर मोठ्या प्रमाणात बुडण्याचा धोका आहे. यामुळेच पॅनकार्डची सक्ती १० लाख रूपयांच्या सोने खरेदीनंतर करण्यात यावी, अशी मागणी सुवर्णकार संघटनांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा