कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार चित्रपट क्षेत्रासाठी अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला.
याशिवाय मुंबईच्या कनक रेळे (नृत्य), साताऱ्याच्या चेतना सिन्हा (लोकसेवा), मुंबईचे डॉ. शशिकुमार चित्रे (विज्ञान), नाशिकचे डॉ. हितेंद्र महाजन व डॉ. महेंद्र महाजन (क्रीडा), अहमदाबादचे बाळकृष्ण दोशी (वास्तुशिल्प) हे पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
२१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९९२पासून गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण केले जाते. हे पुरस्कार द्वैवार्षिक आहेत.
अमेरिकेचे अंतराळवीर मिशेल यांचे निधन
अमेरिकेतील अंतराळवीर एडगर मिशेल (वय ८५) यांचे अल्प आजाराने फ्लोरिडा येथे निधन झाले.
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’च्या चांद्रमोहिमेत मिशेल सहभागी झाले होते. १९७१मध्ये ‘अपोलो १४’ यानातून ऍलन शेफर्ड (ज्युनिअर) व स्टुअर्ट रोसा या अंतराळवीरांबरोबर मिशेल चंद्रावर पोचले होते.
आतापर्यंत चंद्रावर पाऊल ठेवलेल्या १२ अंतराळवीरांपैकी मिशेल एक होते. त्यांच्या चांद्रस्वारीला ४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षे पूर्ण झाली.
‘अपोलो १४’च्या चांद्रमोहिमेत सहभागी अंतराळवीरांपैकी हयात असलेले मिशेल हे शेवटचे होते. रोसा यांचे १९९४ मध्ये; तर शेफर्ड यांचे १९९८ मध्ये निधन झाले.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून, त्यात ‘द वे ऑफ एक्स्प्लोरर’चा समावेश आहे.
‘आयपीएल-९’साठी खेळाडूंचा लिलाव
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला सर्वाधिक ९.५ कोटींची बोली लावून बंगळुरूने खरेदी केले.
युवराजला ७ कोटींमध्ये सनरायझर्स हैदराबादने, तर पवन नेगीला ८.५ कोटींत दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केले.
न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्तिल, द. आफ्रिकेचा हाशिम आमला, ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली, मायकेल हसी, भारताचा चेतेश्वर पुजारा यांना बोली प्रक्रियेत खरेदीदार मिळाला नाही.
आयपीएल बोलीत ३५१ खेळाडूंवर बोली लागली. यात आठ फ्रँचायझी टीमने ९४ खेळाडूंना खरेदी केले. या मोसमासाठी सहा फ्रॅंचाईजींकडून १०१ खेळाडू कायम ठेवण्यात आले आहेत.
हेल्मेटसक्तीचे आदेश जारी
अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २००३मधील एका आदेशानुसार मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम १२९ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने हे आदेश जारी केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनास बंधनकारक आहे. यासाठी दुचाकी खरेदी करतेवेळीच उत्पादक दोन हेल्मेट ग्राहकाला देतील असे निर्देशही परीवहन आयुक्तांनी दिले आहेत.
वाहन नोंदणी अधिकाऱ्यानेही वाहनाच्या कागपत्रांसोबत ग्राहकाला दोन हेल्मेट देण्यात आल्याची खातरजमा करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
गुजरात भूखंड वाटप प्रकरण
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार पटेल यांच्या व्यावसायिक भागीदारांना २५० एकर सरकारी जमीन स्वस्तात दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
गिरच्या अभयारण्याशेजारी असलेली ही जागा ‘वाईसवुल्ड्स रिसॉर्ट ऍण्ड रिऍलिटिज प्रा. लि.’ला केवळ १५ रुपये स्क्वेअर फूट म्हणजेच ६० हजार रुपये एकर या दराने दिल्याचे उघडकीस आले आहे.
गुजरात राज्य सरकारकडून आपण कोणताही लाभ घेतलेला नाही, असे स्पष्ट करून अनार हिने काँग्रेसने केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन केले आहे.
१.२५ लाख ट्विटर अकाउंट ब्लॉक
मायक्रो ब्लॉगिंगमधील आघाडीची वेबसाइट असलेल्या ट्विटरने दहशतवादाशी संबंधित असलेली १.२५ लाख अकाउंट ब्लॉक केली आहेत.
यापैकी बहुतांश अकाउंट इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, त्यावरून धमकी देण्याचे; तसेच दहशतवादाचा पुरस्कार करण्यात येत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
ट्विटरच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटना व व्यक्तींच्या अकाउंटवर मात्र वेबसाइटतर्फे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ट्विटर दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करत असून, ट्विटर अकाउंटवरून दहशतवादाचा प्रसार करणे किंवा हिंसक कारवायांची धमकी देणे याला वेबसाइटची परवानगी नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा