जागतिक रंगभूमीचा महाकुंभमेळा असे वर्णन केला जाणारा १८वा भारत रंग महोत्सव राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे (एनएसडी) राजधानी दिल्लीत १ फेब्रुवारीपासून सुरु झाला.
२१ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे सन्माननीय अतिथी (गेस्ट ऑफ ऑनर) अभिनेते नाना पाटेकर असतील. अस्सल मराठी संस्कृतीचे निदर्शक असलेला जागरण-गोंधळ; तसेच चार मराठी नाट्यप्रयोग यंदा होतील.
देशविदेशांतील नाट्यरसिकांना आणि रंगकर्मींना आकर्षित करणाऱ्या या महोत्सवाची सुरवात १९९९मध्ये झाली.
यंदाच्या महोत्सवात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, पोलंड व पाकिस्तानसह १० देशांतील विख्यात रंगकर्मी आपापल्या नाट्यकृतींसह महोत्सवात सहभागी होतील.
आशियातील पहिल्या क्रमांकाचा व जगात एडिंबरा व एबिम्नॉन (फ्रान्स) यापाठोपाठ तिसरा भव्य नाट्यमहोत्सव अशी ख्याती असलेल्या या महोत्सवात यंदा भारतीय व विदेशी भाषांतील १६० नाट्यप्रयोग व लोककलांसह २०० पेक्षा जास्त कलाकृती सादर होतील.
दिल्लीत मुख्य भारत रंग महोत्सव होईल व त्यापाठोपाठ अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, जम्मू व भुवनेश्वर येथे चार सॅटेलाइट महोत्सवही होतील.
एसएसबीच्या महासंचालकपदी अर्चना रामसुंदरम
वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे निमलष्करी दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
तमिळनाडू केडरच्या अधिकारी असलेल्या रामसुंदरम या सध्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या संचालक आहेत. पुढील वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत ‘एसएसबी’च्या महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती असेल.
भारताला लागून असलेल्या नेपाळ आणि भूतान सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी ‘एसएसबी’वर आहे.
‘एसएसबी’सह केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस अशी पाच निमलष्करी दले आहेत. या पाचपैकी एकाही दलाचे नेतृत्व महिलेने आतापर्यंत केले नव्हते, त्यामुळे रामसुंदरम यांच्या नियुक्तीमुळे निमलष्करी दलामध्ये नवा इतिहास निर्माण झाला आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त संचालक म्हणून २०१४मध्ये त्यांची निवड झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले होते.
रामसुंदरम यांच्याशिवाय के. दुर्गप्रसाद आणि के. के. शर्मा या आयपीएस अधिकाऱ्यांची अनुक्रमे केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे तिघेही अधिकारी या महिनाअखेरीस पदभार स्वीकारतील.
कोहली ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी
सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताचा फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खेळीमुळे ऍरॉन फिंचला मागे टाकून पहिले स्थान मिळविले. विराटने या मालिकेत नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशी सलग तीन अर्धशतके झळकाविली होती. या खेळींमुळे त्याच्या गुणात ४७ गुणांची भर होत तो थेट पहिल्या स्थानी पोचला.
याबरोबरच सुरेश रैनानेही १३ गुणांची प्रगती करत क्रमावारीत तिसरे स्थान गाठले आहे.
राजस्थानचे ‘मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान’
राजस्थानने आता दुर्मिळ होत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी लोक चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान’ (एमजेएसए) असे या चळवळीचे नामकरण करण्यात आले असून, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्घाटन झाले.
जमिनीची उत्पादकता वाढवून राज्यातील प्रत्येक खेड्याला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेच्या माध्यमातून समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी राजस्थान सरकार ३० जूनपर्यंत तीन हजार ५६८ कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे.
विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या झलवार मतदारसंघातून या मोहिमेचा प्रारंभ झाला. विविध टप्प्यांमध्ये राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक गावे या चळवळीत सामावून घेतली जाणार आहेत.
या मोहिमेसाठी खासगी व्यक्ती- संस्था, बिगर सरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांसह सामाजिक, धार्मिक आणि विविध जातींच्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
जगभरातील भारतीय महिलांचा विश्वविक्रम
जगभरातील भारतीय महिलांनी ११,१४८ चौरस मीटरचे मोठे ब्लॅंकेट बनवून विश्वविक्रम केला. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.
जगातील सर्वांत मोठे लोकरीचे ब्लॅंकेट विणण्याचा विक्रम या महिलांनी मोडला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर, गुरगाव, हैदराबादसह सिंगापूर, ओमान, मस्कत, बहारीन, यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील भारतीय महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
ऑगस्ट २०१५ पासून हे ब्लॅंकेट विणण्याचे काम सुरू होते. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील महिलांनी ३,३७७ चौरस मीटरचे ब्लॅंकेट विणून गिनेस बुकमध्ये नोंद केली होती.
सुमारे एक हजार महिलांनी क्रोशाने विणलेल्या सर्व शाली १६ जानेवारीपर्यंत चेन्नई येथे एकत्र करण्यात आल्या होत्या. तेथे या शाली जोडण्याची मोहीम सुरू झाली. ही मोहीम पूर्ण झाली आणि ३१ जानेवारीला चेन्नई येथे सर्वांत मोठे ब्लॅंकेट विणण्याच्या विश्वविक्रमाची नोंद झाली.
के. श्रीकांत सईद मोदी ग्रांप्री. स्पर्धेचा विजेता
भारताच्या के. श्रीकांतने सईद मोदी ग्रांप्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याने अंतिम लढतीत चीनच्या हुअँग युक्झिअँगवर मात केली.
अंतिम लढतीत अव्वल सीडेड श्रीकांतने हुअँगचे आव्हान २१-१३, १४-२१, २१-१४ असे परतवून लावले आणि विजेतेपद मिळवले.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या श्रीकांतचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पाचवे जेतेपद आहे. याआधी श्रीकांतने थायलंड ग्रां.प्रि., चीन सुपर सीरिज, स्विस ग्रां.प्रि आणि इंडिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
ऋषभ पंतचे अंडर-१९ मध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतक
भारताच्या ऋषभ पंतने अंडर १९ क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा (१८ चेंडूंत) नवा विक्रम केला आहे. त्याने हा पराक्रम नेपाळविरुद्ध शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर अंडर १९ विश्वकप सामन्यात केला.
क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करणाऱ्या भारताने ड गटातील अखेरच्या साखळी सामन्यात नेपाळला १७९ चेंडू शिल्लक ठेवून ७ विकेटने नमवत विजयाची नोंद केली. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ऋषभ पंतने २४ चेंडूंत ७८ धावा केल्या.
ऋषभच्या आधी अंडर १९ मध्ये सर्वाधिक वेगवान अर्धशतकाचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ट्रेवोन ग्रिफिथच्या नावे होता. त्याने २०१० मध्ये १९ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीने २००२ मध्ये अंडर १९ मध्ये २१ चेंडूंत अर्धशतक काढले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा