नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी आले आहेत. पदावर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
ओली यांच्याबरोबर ७७ सदस्यांचे एक शिष्टमंडळही असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्वांचे विमानतळावर स्वागत केले.
मधेशींच्या आंदोलनामुळे सध्या दोन्ही देशांत काहीसे तणावाचे संबंध आहेत. तत्कालीन पंतप्रधान बाबूराम भट्टराय यांनी २०११ मध्ये भारताला भेट दिली होती, तर सुशील कोईराला पंतप्रधानपदी असताना मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमास आले होते.
खवले मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे.
खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारीजागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी ‘जागतिक खवले मांजर दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
फिजी देशास विन्स्टन वादळाचा फटका
प्रशांत महासागरामधील द्वीपकल्प असलेल्या फिजी देशास विन्स्टन या अत्यंत शक्तिशाली वादळाचा फटका बसला असून, या वादळात आतापर्यंत १० जणांचे निधन झाले आहे.
फिजीच्या इतिहासामधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असून यामुळे देशातील हजारो घरे अक्षरश: उध्वस्त झाली. याचबरोबर, देशामधील काही गावे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत.
विन्स्टनमुळे वाहिलेल्या वाऱ्यांचा वेग ताशी ३२० किमीपेक्षाही जास्त होता; तसेच किनारपट्टीवर सुमारे १२ मीटर (४० फुट) उंचीच्या लाटा उसळल्या.
इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे निधन
प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे १९ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते.
अम्बेर्टो इको यांची ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी खुप गाजली होती. अम्बेर्टो इको त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी नेहमीच वाचकांच्या आठवणीत राहतील.
त्यांनी लिहिलेल्या ‘फाउकॉल्ट्स पेन्डुलम’, ‘द आइलँड ऑफ द डे बिफोर’, ‘बाउदोलिनो’ आणि ‘द प्राग सेमेटरी’ या कादंबऱ्या खुपच लोकप्रिय झाल्या.
मात्र ‘द नेम ऑफ द रोज’ या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. ‘द नेम ऑफ द रोज’ या कादंबरीच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. याच कादंबरीवर आधारीत १९८६मध्ये चित्रपटदेखील बनवण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा