चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी


जीएसटीविषयक समितीच्या अध्यक्षपदी अमित मित्रा

 • वस्तू व सेवा करविषयक राज्यांच्या अर्थमंत्र्यांची कृती समितीचे अध्यक्ष म्हणून अमित मित्रा यांची नियुक्ती झाली आहे. 
 • पूर्वाश्रमीचे उद्योगपती मित्रा हे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) दाखल झाले होते. वस्तू व सेवा करासाठी केंद्र सरकार व राज्यांमधील संपर्क तसेच दोन पातळीवरील कर सामंजस्याकरिता ही समिती तयार करण्यात आली आहे. 
 • केरळाचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर या समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नोव्हेंबरपासून हे पद रिक्त होते.
 • मित्रा हे ‘फिक्की’ या उद्योग संघटनेचे काही वर्षे सरचिटणीस होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे शासन स्थापित होताच ते या पक्षात जाऊन राज्याचे अर्थमंत्रीही बनले.
 • मित्रा यांच्या रुपाने समितीवर चौथ्यांदा अध्यक्ष नेमण्यात आला आहे.

पाकिस्तान संसदचे संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर

 • पाकिस्तान संसदचे संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर चालविण्यात येत असून सौरऊर्जेवर कामकाज चालणारी ती जगातील पहिली संसद ठरली आहे.
 • पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अत्यंत साध्या समारंभात संसदच्या इमारतीमधील सौरऊर्जेची कळ दाबून ही सेवा सुरू केली.
 • राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन २०१४मध्ये करण्यात आली होती. यासाठी मित्र देश असलेल्या चीनकडून ५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.
 • संसदेमधील सौरऊर्जा प्रणाली ८० मेगावॉट ऊर्जानिर्मिती करणार आहे. संसदचे कामकाज चालण्यासाठी ६२ मेगावॉट विजेची गरज असून उर्वरित १८ मेगावॉट वीज राष्ट्रीय ग्रीडमध्ये देण्यात येणार आहे.

लावजीभाई बादशाह यांनी केले २०० कोटी रुपये दान

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केलेला वादग्रस्त सूट ४.३१ कोटी रुपयांना खरेदी करणारे उद्योगपती लावजीभाई बादशाह यांनी देशातील १० हजार मुलींना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे, म्हणजेच एकूण २०० कोटी रुपये दान करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 
 • लावजीभाई हे सूरतमधील बडे हिरे व्यावसायिक आहेत. बांधकाम क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. खासगी विमान कंपनीचे ते मालक आहेत.
 • येत्या १३ मार्चला सूरतमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात देशातील निवडक दहा हजार मुलींच्या पालकांना बोलावणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देणार असल्याचं लावजीभाईंनी सांगितले.
 • या आर्थिक मदतीमुळे गरीब, दुर्बल पालक आपल्या मुलींना चांगल्या पद्धतीने वाढवू शकतील, त्यांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च भागवू शकतील. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या केंद्र सरकारच्या योजनेसाठी दिलेला हा खारीचा वाटा असल्याचे ते म्हणाले.
 • गेल्या वर्षी त्यांनी गुजरातमधील पाटीदार समाजातील ५००० चिमुरड्या मुलींना त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बॉण्ड्स दिले होते. या मुली २१ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना ही रक्कम मिळणार आहे. त्यासाठीचा दोन कोटी रुपयांचा प्रीमिअम बादशाह यांनी भरला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा