चालू घडामोडी : २६ मे

राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरण मंजूर

 • कारखानदारी क्षेत्राला गती देण्यासाठी, औद्योगिक उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रथमच भांडवली वस्तू क्षेत्रासाठी राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरण मंजूर केले आहे.
 या धोरणाचे उद्देश 
 • या धोरणाच्या अंमलबजावणीतून २०२५पर्यंत २.१ कोटी नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 • देशांतर्गत उद्योगधंद्यातून २०२५पर्यंत सध्याच्या २.३ लाख कोटी रुपये उत्पादनात वाढ करून ७.५ लाख कोटी रुपयांचे एकूण उत्पादन गाठणे.
 • सध्या या क्षेत्रात ८४ लाख लोकांना रोजगार दिला जात असून हे प्रमाण ३ कोटींवर घेऊन जाणे.
 • थेट देशी रोजगार १४ लाखांवरून ५० लाख करणे व अप्रत्यक्ष रोजगार सध्या ७० लाख आहेत ते २.५० कोटी करणे. 
 • भांडवली वस्तूंचे देशांतर्गत मागणीतील प्रमाण ६० टक्क्यांवरून २०२५पर्यंत ८० टक्क्यापर्यंत वाढवणे.
 • यंत्रसामग्रीची निर्यात सध्या २७ टक्के आहे. ही निर्यात वाढवून एकूण उत्पादनाच्या ४० टक्के करणे. 
 • एकूण उत्पादनात भांडवली वस्तूंचा वाटा १२ टक्के आहे तो २०२५ पर्यंत २० टक्के करणे.
 • भांडवली वस्तू क्षेत्रातील आतापर्यंत वापरले न गेलेले सामर्थ्य वाढवून देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनविणे.

पी. विजयन केरळचे १२वे मुख्यमंत्री

  P Vijayan
 • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. विजयन यांनी २६ मे रोजी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी. सदाशिवम यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 • विजयन के माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असून ते केरळचे १२वे मुख्यमंत्री आहेत.
 • विजयन यांच्यासह अन्य १८ मंत्र्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला. यामध्ये ‘माकप’चे ११ ‘भाकप’चे ४, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.
 • इलाथूर कोझीकोड मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. शशीधरन यांना विजयन यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
 • केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळाले असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली आहे. केरळमध्ये एलडीएफने ९१ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
 • नवे सरकार स्थापन होताच विजयन यांनी आर्थिक बचतीची घोषणा केली, यान्वये मंत्र्यांच्या घरांची डागडुजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच मंत्र्यांच्या मदतीस असणाऱ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० वरून २५ करण्यात आली आहे.
 • यापूर्वी ओमन चंडी यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि चेंबरचे लाइव्ह स्ट्रिमिंग होत असे, तेही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी

 • भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
 • जागतिक आणि आशिया खंडातील ६-रेड स्नूकरचे अजिंक्यपद पटकावणारा पंकज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
 • अंतिम लढतीत त्याने मलेशियाच्या किन होह मोहचा ७-५ असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताच्या आदित्य मेहतावर ६-१ असा विजय मिळवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा