फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पराभूत करत आयपीएलच्या नवव्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करून २०८ धावा उभारल्यानंतर त्यांनी बँगलोरला २०० धावांवर रोखले. त्यामुळे २००९ व २०११ नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आयपीएलच्या नवव्या सत्राचा हा अंतिम सामना २९ मे रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला.
कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, तर युवराज सिंग व बेन कटिंग यांनी केलेला तुफानी हल्ला या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बँगलोरला २०९ धावांचे मजबूत आव्हान दिले.
गेलच्या केवळ ३८ चेंडूंत ७६ धावा व कोहलीच्या ३५ चेंडूंत ५४ धावांव्यतिरिक्त बँगलोरचे इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना २०० धावांपर्यंतच मजल गाठता आली.
‘आयपीएल’चे आतापर्यंतचे विजेते
वर्ष
विजेता
उपविजेता
२०१६
सनरायजर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२०१५
मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्ज
२०१४
कोलकाता नाईट राईडर्स
किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१३
मुंबई इंडियन्स
चेन्नई सुपर किंग्ज
२०१२
कोलकाता नाईट राईडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
२०११
चेन्नई सुपर किंग्ज
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२०१०
चेन्नई सुपर किंग्ज
मुंबई इंडियन्स
२००९
डेक्कन चाजर्स
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२००८
राजस्थान रॉयलर्स
चेन्नई सुपर किंग्ज
सॉफ्टबॅंक भारतात १० अब्ज डॉलर गुंतवणूक
जपानमधील दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॉफ्टबॅंक भारतात १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक आगामी ५ ते १० वर्षांत करणार आहे.
भारतातील सौरऊर्जा प्रकल्पामध्ये पहिल्यांदा ३५० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल.
आतापर्यंत कंपनीने २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, आणखी गुंतवणूक करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.
सॉफ्टबॅंक ही जपानमधील आघाडीची मोबाईल सेवा कंपनी आहे. अमेरिकेतील स्प्रिंट कॉर्पोरेशनमध्ये तिची भागीदारी आहे.
गेल्या वर्षी कंपनीने भारती एंटरप्रायझेस आणि तैवानमधील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप यांच्याशी एकत्रितपणे २० अब्ज डॉलरचा २० गिगावॉटचा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
फिनमेक्कानिकाबरोबरील सर्व संरक्षण करार रद्द
ऑगस्टा-वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरीची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ही हेलिकॉप्टर बनविणारी कंपनी फिनमेक्कानिकाबरोबरील सर्व प्रकारचे संरक्षण करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर सरकारने फिनमेक्कानिका आणि या कंपनीच्या नियंत्रणाखालील अन्य कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
एखाद्या कंपनीला काळ्या यादीत टाकल्यानंतर ती कंपनी पुढील अनेक वर्षे संबंधित देशात भांडवल खरेदी करू शकत नाही.
फिनमेक्कानिका आणि तिच्या नियंत्रणाखालील कंपन्यांबरोबरचे खरेदीसंबंधीचे सर्व करार रद्द केले जाणार असून, कोणताही नवा संरक्षण करार केला जाणार नाही.
फिनमेकॅनिका व उपकंपन्यांची भांडवल खरेदी बंद करण्यात आली आहे. सुट्या भागांची आयात व निगा दुरुस्ती हे काम कंपनीकडे आधीच दिलेले काम तूर्त कायम ठेवण्यात आले आहे.
भारताच्या पोलाद उत्पादनात वाढ
पोलाद उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताची लवकरच सर्वाधिक पोलाद आयात करणाऱ्या ‘टॉप टेन’ देशांत गणना होण्याची चिन्हे असल्याचे ‘वर्ल्ड स्टील असोसिएशन’ने (डब्ल्यूएसए) म्हटले आहे.
२०१५मध्ये भारत आणि चीनने अनुक्रमे १.३३ कोटी टन आणि १.३२ कोटी टन पोलादाची आयात केली.
‘डब्ल्यूएसए’च्या आकडेवारीनुसार २०१५पर्यंत युरोपीय संघाने एकूण ३.७७ कोटी टन पोलादाची आयात करून अग्रक्रम पटकावला.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात पोलाद आयातीमध्ये २५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते १.१७ कोटी टनांवर पोहोचले आहे.
याच वर्षात भारताने ७० लाख टन पोलादाची निर्यातही केली. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९३ लाख टन पोलादाची आयात करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा