चालू घडामोडी : ९ मे
शशांक मनोहर यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
- बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबरोबरच शशांक यांनी आयसीसीमधील बीसीसीआयच्या प्रतिनिधीपदाचा आणि आशियाई क्रिकेट काउंसिल (एसीसी)मधील प्रतिनिधीपदाचाही राजीनामा दिला आहे.
- नव्या नियमांनुसार आयसीसीच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय वा राज्यस्तरीय क्रिकेट संघटनेच्या पदावर राहता येणार नाही.
- आयसीसीच्या चेअरमनपदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून शशांक निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे.
- आयसीसीमधील एका मोठ्या गटाचा मनोहर यांना पाठिंबा आहे. तसेच त्यांना या पदावर चार वर्ष राहता येईल.
- गेल्या वर्षी जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर मनोहर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मनोहर हे दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
केंद्र सरकारचा जाहिरातीसाठी ३५० कोटी रुपये खर्च
- भारत सरकारने स्वच्छ भारत आणि इतर अभियानाच्या जाहिरातीसाठी २०१५-१६मध्ये ३५० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने लोकसभेत दिली.
- सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विविध योजनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या अभियानांचा समावेश आहे.
- या योजनांची लोकांना व्यवस्थित माहिती व्हावी आणि ती गावागावात, शहराशहरात पोहोचावी यासाठी जाहिरातींवर विशेष भर देण्यात आला
- स्वच्छ भारत अभियानासाठी २०१४-१५ या वर्षामध्ये २१२ कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसेच, २०१५-१६ या वर्षामध्ये या खर्चात वाढ करून २९३ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 'निर्मल भारत' अभियानाच्या जाहिरातीसाठी केलेल्या खर्चाची ही पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे.
मॉरिशसमधून होणाऱ्या गुंतणुकीवर भांडवली कर
- भारत व मॉरिशस या दोन देशांमधील दुहेरी कर प्रणालीसंदर्भातील करारात सुधारणा केली आहे. त्यानुसार १ एप्रिल २०१७ पासून मॉरिशसमधून होणाऱ्या गुंतणुकीवर भांडवली कर आकारला जाणार आहे.
- भारतातील परकीय गुंतवणुकीमध्ये मॉरिशसमधून येणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. १९८३ मध्ये भारताने करसंदर्भात मॉरिशसशी करार केला होता.
- कर संदर्भातील धोरण अधिक सुस्पष्ट करण्यासाठी दुहेरी कर टाळण्यासंदर्भातील करारात सुधारणा करण्यात आल्या आहेत. यानुसार मॉरिशसमधील कंपनीला भारतात शेअरविक्री करताना भांडवली कर द्यावा लागणार आहे.
- १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान भारतीय कंपन्यांच्या शेअरविक्रीवर ५० टक्क्यांपर्यंत भांडवली कर आकारण्यात येणार आहे.
उत्तर कोरियातील सत्ताधारी पार्टीच्या अध्यक्षपदी किम जोंग उन
- उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या अध्यक्षपदी किम जोंग उन यांची निवड करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- पक्षाच्या कार्यकारिणीच्या क्वचित होणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत ही नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- किम जोंग उन यांच्याकडे आत्तापर्यंत पक्षाचे सचिवपद होते. १९४८पासून किम यांच्या घराण्याकडे सत्ता आहे. पक्षाच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत किम यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षाच्या सुमारे चाळीस वर्षांनंतर झालेल्या कार्यकारिणीच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीमध्ये देशाची अण्विक ताकद वाढविण्याच्या धोरणाला सर्वानुमते संमती देण्यात आली.
पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी मिकी आर्थर यांची नियुक्ती
- दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आर्थर यांच्या नियुक्तीबाबत पीसीबीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.
- आर्थर यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा