चालू घडामोडी : १२ मे
शशांक मनोहर यांची आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी निवड
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या दोनच दिवसांत शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदी (चेअरमनपदी) बिनविरोध निवड झाली.
- ते आयसीसीचे पहिले बिनविरोध स्वतंत्र चेअरमन आहेत. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.
- शशांक मनोहर हे २००८ ते २०११ या कालावधीत बीसीसीआयचे पहिल्यांदा अध्यक्ष बनले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर त्यांना ऑक्टोबर २०१५ मध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपद बहाल करण्यात आले.
- पारदर्शक कारभारासाठी शशांक मनोहर प्रसिद्ध आहेत. अध्यक्षपदाच्या त्यांचा पहिला कार्यकाळ स्वच्छ प्रतिमेचे आणि पारदर्शक कारभाचे प्रशासक म्हणून गाजला होता. दुसऱ्या टर्ममध्येही त्यांनी शिस्तीसाठी प्राधान्य दिले होते.
नौदलात ‘सी- हॅरिअर्स’च्या जागी आता मिग-२९ के
- एकेकाळी भारतीय नौदलाच्या हवाई युद्धक्षमतेतील प्रमुख अस्त्र मानले जाणारे आणि गेल्या ३३ वर्षांपासून नौदलाच्या सेवेत असलेल्या ‘सी- हॅरिअर्स’ विमानांची जागा आता मिग-२९ के या नव्या लढाऊ विमानांनी घेतली आहे.
- सी-हॅरिअर्सला दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर निरोप देऊन मिग-२९ के विमानाचे स्वागत करण्यात आले. यावेळी सी-हॅरिअर्स आणि मिग-२९ के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.
- मिग-२९ के विमानाची साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची क्षमता आहे. तसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
न्या. खानविलकर व न्या. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती
- मूळचे महाराष्ट्राचे असलेले मध्य प्रदेश मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अजय माणिकराव खानविलकर व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांची राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.
- यांच्याखेरीज केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या.अशोक भूषण आणि ज्येष्ठ वकील व माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एल. नागेश्वर राव यांचीही सर्वोच्च न्यायालयावर नेमणूक करण्यात आली आहे.
- न्या. चंद्रचूड आठ वर्षे तर न्या. खानविलकर सहा वषे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश राहतील.
- ‘कॉलेजियम’चे काम सुमारे १५ महिने ठप्प राहिल्यानंतर या नेमणुका होत आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या २८ होईल. पाच न्यायाधीश येत्या वर्षभरात निवृत्त होत आहेत.
दुष्काळासाठी आपत्ती निवारण निधी
- देशातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती निवारण निधी (डिझॅस्टर मिटिगेशन फंड) उभारावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे.
- स्वराज अभियान या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही सूचना केली आहे.
- महाराष्ट्र, बिहार, हरियाना आणि गुजरातसह देशातील दहा राज्यांत जनता भीषण दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे दुष्काळग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
- नैसर्गिक आपत्तीग्रस्त दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मिळत असलेल्या कमी नुकसानभरपाईबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून, कमी नुकसानभरपाई मिळत असल्यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेण्याकडे वळत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
- देशाच्या दहा राज्यांतील दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर किमान ६ लाख ५० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याचा अंदाज आहे. देशातील २५६ जिल्ह्यांमधील सुमारे ३३ कोटी लोक या गंभीर स्थितीचा सामना करत आहेत.
दुष्काळी राज्ये |
महाराष्ट्र |
कर्नाटक |
मध्यप्रदेश |
उत्तरप्रदेश |
आंध्रप्रदेश |
गुजरात |
ओडिशा |
हरियाना |
बिहार |
तेलंगण |
इराणतर्फे भारताला कच्च्या तेलाची होणारी मोफत वाहतूक बंद
- इराणने भारताला कच्चे तेल देण्याची मोफत वाहतूक बंद केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत दिली आहे.
- मंगळुरू रिफायनरी (एमआरपीएल) अर्थात एस्सार ऑइल सारख्या रिफायनरी कंपन्यांनी आपल्या वाहतुकीची व्यवस्था स्वत: करावी अशा सूचना खरेदीदार कंपन्यांना करण्यात आली आहे.
- पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या बंदीमुळे निर्यातीवर विपरित परिणाम झाल्यामुळे इराणने नोव्हेंबर, २०१३ मध्ये भारतीय रिफायनरी कंपन्यांना कच्च्या तेलाच्या मोफत वाहतुकीची ऑफर दिली होती.
- पाश्चिमात्य देशांच्या बंदीच्या भीतीमुळे शिपिंग क्षेत्राने इराणी कच्च्या तेलाची वाहतूक करण्यास नकार दिला होता. यामुळे इराणने तेलाच्या पुरवठ्यासाठी आपल्या शिपिंग क्षेत्राचा मोफत वापर करण्यास सुरू केले होते.
- एप्रिल २०१६पासून भविष्यातील फ्री ऑन बोर्ड (एफओबी) आधारावर तेलाचा पुरवठा केला जाणार असून वाहतुकीची व्यवस्था स्वत: खरेदीदार कंपनीला करावी लागेल असे राष्ट्रीय इराणी तेल कंपनीने (एनआयओसी) तेल आयात करणाऱ्या कंपन्या एमआरपीएल आणि एस्सार ऑइलला सूचित केले आहे.
- एफओबी एक ट्रेड टर्म आहे, ज्या अंतर्गत खरेदीदाराद्वारे पाठवण्यात आलेल्या तेलवाहू जहाजांवर विक्रेत्याला सामान लादावे लागते.
- गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत इराण भारतीय रिफायनरी कंपन्यांना खर्च, विमा आणि वाहतुकीच्या आधारे कच्चे तेल देत होता.
- सीआयएफ अंतर्गत विक्रेत्यावर आपल्या वाहतुकीची व्यवस्था करून खरेदीदाराच्या बंदरापर्यंत माल पोहोचवण्याची जबाबदारी असते.
- इराणने फ्री शिपिंगची ऑफर बंद करण्याबरोबर तेलाच्या किंमतीतील अर्धी रक्कम रुपयांमध्ये देण्याची तीन वर्षे जुनी व्यवस्थाही बंद करून टाकली आहे. आता राष्ट्रीय इराणी तेल कंपनीने आपली संपूर्ण रक्कम युरोत अदा करण्यास सांगितले आहे.
टोनी कोझियर यांचे निधन
- वेस्ट इंडिजचे क्रिकेट लेखक, समालोचक आणि पत्रकार टोनी कोझियर यांचे बार्बाडोस येथे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
- कोझियर यांनी आपल्या समालोचकपदाच्या कारकीर्दीला १९६५मध्ये प्रारंभ केला. कोझियर यांनी क्रिकेट खेळलेले नसतानाही या खेळाचे उत्कृष्ट समालोचन केले.
- रेडिओ, टीव्हीवर त्यांनी आपल्या समालोचनाची छाप सोडलीच पण पुस्तकरूपातही त्यांनी क्रिकेटचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल २६६ कसोटी सामने पहिले आणि त्यांचे विश्लेषण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा