चालू घडामोडी : १३ मे
राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार धोरण मंजूर
- सर्जनशीलता, नवे शोध आणि उद्यमशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (Intellectual Property Rights) धोरण मंजूर केले आहे. देशातील या संदर्भातील हे पहिले धोरण आहे.
- भारतातील रचनात्मक आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रवाहांना अधिक चांगल्या आणि उज्ज्वल भवितव्याची दिशा देण्याच्या दृष्टीने हे धोरण उपयुक्त आहे.
- बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ याविषयी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
- सर्व प्रकारच्या बौद्धिक संपदा (IP), संबंधित नियम आणि संस्था यांमध्ये एकसंधता निर्माण करून त्याचा उपयोग करून घेण्यासाठी हे धोरण आखण्यात आले आहे.
- IPR बद्दल जनजागृती करणे, त्याची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, सक्षम व परिणामकारक कायदे करणे, अमंलबजावणी करणे आणि बौद्धिक संपदेची चोरी रोखण्यासाठी यंत्रणा उभारणे अशी या धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
- शासकीय, संशोधन आणि विकासात्मक संघटना, शैक्षणिक संस्था, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट अप आणि इतर भागिदारांसाठी नाविन्यपूर्ण पर्यावरण निर्माण करण्याचे काम या धोरणाद्वारे साध्य करता येईल.
- मंजूरी देण्यात आलेले राष्ट्रीय बौध्दिक संपदा हक्क धोरणामुळे “रचनात्मक भारत : अभिनव भारत” ही संकल्पना अधिक चांगल्या पध्दतीने साध्य करता येईल.
दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतून बाहेर
- जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हवेच्या दर्जाबाबत प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतून बाहेर पडण्यात यश मिळाले आहे.
- सध्या दिल्ली हे जगातील तीन हजार शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत अकराव्या स्थानावर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी दिल्लीतील प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.
- ‘डब्ल्यूएचओ’ने २०१४मध्ये जगभरातील १६०० शहरांचा अभ्यास केला होता. त्या वेळी दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत प्रथम स्थानावर होती.
- यंदा १०३ देशातील ३००० शहरांचा अभ्यास करून त्याबाबतच्या आकडेवारीनुसार दिल्लीने सुधारणा केल्याचे आढळून आले आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इराणमधील झाबोल हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.
- आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करता ग्वाल्हेर आणि अलाहाबाद ही भारतातील दोन शहरे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आली आहेत. पाटणा आणि रायपूर अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.
- जगातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांपैकी चार शहरे ही भारतातील असल्याचेही आढळून आले आहे. २०१४च्या आकडेवाडीनुसार जगातील ‘टॉप २०’ प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे ही भारतातील होती.
क्रमांक |
२०१६ |
२०१४ |
शहर |
देश |
शहर |
देश |
१ |
इराण |
झाबोल |
भारत |
दिल्ली |
२ |
भारत |
ग्वाल्हेर |
भारत |
पटना |
३ |
भारत |
अलाहाबाद |
भारत |
ग्वाल्हेर |
४ |
सौदी अरेबिया |
रियाध |
भारत |
रायपुर |
५ |
सौदी अरेबिया |
अल जुबैल |
पाकिस्तान |
कराची |
६ |
भारत |
पटना |
पाकिस्तान |
पेशावर |
७ |
भारत |
रायपुर |
पाकिस्तान |
रावळपिंडी |
८ |
कॅमेरून |
बमेंडा |
इराण |
खोरामाबाद |
९ |
चीन |
शिंग्ताई |
भारत |
अहमदाबाद |
१० |
चीन |
बाओडिंग |
भारत |
लखनौ |
११ |
भारत |
दिल्ली |
भारत |
फिरोझाबाद |
आयसीसीच्या समितीमध्ये अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड
- भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे‘च्या (आयसीसी) क्रिकेटविषयक समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे.
- याशिवाय, दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. या समितीची मुदत तीन वर्षे आहे.
- यापूर्वी, २०१५ मध्ये कुंबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. आता त्यांना मुदतवाढ मिळाल्याने ते २०१८ पर्यंत या पदावर असतील.
- द्रविडसह श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनाही क्रिकेटविषयक समितीवर संधी मिळाली आहे. या नव्या समितीची पहिली बैठक ३१ मे-१ जून या कालावधीत लंडन येथे होणार आहे.
- गेल्या समितीमध्ये श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगाकारा यांचा समावेश होता. त्यांची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर द्रविड यांची नियुक्ती झाली आहे.
- ‘क्रिकेटपटूंचे प्रतिनिधी‘ म्हणून द्रविड या समितीवर असतील. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांनी मिळून द्रविड यांची निवड केली आहे. ‘माजी खेळाडूंचे प्रतिनिधी‘ म्हणून जयवर्धने या समितीवर असतील.
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा दिल्मा रौसेफ पदमुक्त
- ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा दिल्मा रौसेफ यांची ब्राझीलमधील सत्ता संपुष्टात आली आहे. रौसफ यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मतदान झाले. त्यात त्यांच्या बाजूने २२ तर विरोधात ५५ मते पडली.
- त्यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून, आता त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालणार आहे.
- ब्राझील लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे. रौसेफ यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर होताच विरोधक सिनेटर्सनी टाळयांचा कडकडाट केला.
- बजेट कायद्याचे उल्लंघन करुन निधी वापरल्याचा रौसेफ यांच्यावर मुख्य आरोप आहे. ब्राझीलच्या प्रथम महिला अध्यक्षा असलेल्या रोसेफ यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन झाले आहे.
- रौसेफ पदभ्रष्ट झाल्यामुळे ब्राझीलमध्ये तेरा वर्षांपासून असलेली डाव्या विचारसरणीची सत्ता संपुष्टात येणार आहे.
- उपराष्ट्रपती आणि रौसेफ यांचे राजकीय विरोधक मायकल टिमर आता ब्राझीलचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज संभाळणार आहेत.
किंगफिशर व्हिला एसबीआयच्या ताब्यात
- विजय माल्या यांचा गोव्यातल्या कंडोलिम इथला किंगफिशर व्हिला कर्ज दिलेल्या बँकांच्या वतीने एसबीआय कॅपिटलने ताब्यात घेतला आहे.
- उत्तर गोव्याचे तहसीलदार व जिल्हा न्यायाधीश नीला मोहनन यांनी किंगफिशर व्हिला ताब्यात घेण्याची बँकांना अनुमती दिली होती.
- या आलिशान बंगल्याची किंमत ९० कोटी रुपये असून गोव्यामध्ये बड्या सेलिब्रिटींना पार्ट्या देण्यासाठी या बंगल्याचा वापर माल्या करत असत.
- बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेल्या माल्यांच्या या बंगल्याचा ताबा मिळावा अशी मागणी बँकांच्या समूहाच्या वतीने स्टेट बँकेने केली होती.
ताऱ्याला डॉ. भंवरलाल जैन यांचे नाव
- सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रगतीची बिजे पेरणाऱ्या दिवंगत उद्योजक डॉ. भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रातले अध्वर्यू डॉ. रे गोल्डबर्ग यांनी पुढाकार घेत नभातल्या ताऱ्याला त्यांचे नाव दिले आहे.
- इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या जगमान्य संस्थेने ‘लिरा रा १९एच १३एम २८एस डी ३६ ४५’ या ताऱ्याला आता भवरलाल जैन हे कायमचे नाव दिले आहे.
- हे नाव स्वित्झरलँडच्या ‘द रजिस्ट्रिज व्हॉल्ट’मध्ये आणि अमेरिकेमध्ये कॉपीराईट कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आले आहे.
- जागतिक पातळीवर व्यवस्थापन शास्त्रातील अध्वर्यू म्हणून ५१ वर्षीय प्रा.डॉ. रे गोल्डबर्ग हे ओळखले जातात.
- अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक असून कृषी व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे जागतिक प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
- जैन इरिगेशनने आपली व्यावसायिकता जपत सामाजिक कार्याद्वारे जो अपूर्व ठसा निर्माण केला त्याबाबत त्यांनी अभ्यास केला.
- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भंवरलाल जैन यांच्यावर स्वतंत्र अभ्यास करून एक विशेष असा अभ्यासक्रम अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा