भारताच्या स्वदेशी सुपसॉनिक इंटरसेप्टर मिसाइलची यशस्वी चाचणी
भारताने क्षेपणास्त्राचा हल्ला भेदणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या सुपसॉनिक इंटरसेप्टर मिसाइलची (स्वनातीत छेदक क्षेपणास्त्र) ओडिशाच्या ‘अॅडव्हॉन्स्ड एअर डिफेन्स क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटा’वर यशस्वीपणे चाचणी घेतली.
हे क्षेपणास्र त्याच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही शत्रू क्षेपणास्राला हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय शास्त्रज्ञांचा बहुउद्देशीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार या नव्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.
नौदलाच्या एका जहाजावरून डागण्यात आलेल्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राचा नव्या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे भेद केला.
काळा पैसा जाहीर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत
केंद्र सरकारने देशांतर्गत अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करण्यासाठी येत्या १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत अशी चार महिन्यांची मुदत दिली आहे.
या कालावधीत स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करणारे लोक प्राप्तिकर कायद्याच्या किंवा संपत्ती कर कायदाअंतर्गत कोणत्याही छाननी आणि चौकशी दंडात्मक कारवाई होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतील.
त्यासाठी त्यांना अघोषित संपत्ती आणि काळ्या पैशाच्या ४५ टक्के रक्कम आणि दंड प्राप्तिकर विभागाकडे जमा करावा लागणार आहे.
३० सप्टेंबरनंतर काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर मात्र कर, अधिभार आणि दंड आकारला जाणार आहे.
सरकारने गेल्या आर्थिक वर्षात देखील अश्या प्रकारची मोहिम राबवली होती. त्यावेळी परदेशातील अघोषित संपत्तीबाबत माहिती देण्यासंबंधीच्या नवीन कायद्याअंतर्गत ६४४ लोकांनी ४१६४ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती.
पचौरी यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात समन्स
‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ म्हणजे टेरी या संस्थेचे माजी प्रमुख आर. के. पचौरी यांना दिल्ली न्यायालयाने लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी म्हणून समन्स पाठवले आहे.
माजी सहकारी महिलेचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेऊन समन्स काढण्यात आले.
त्यामुळे आरोपी आर. के. पचौरी यांनी पुढील तारखेला म्हणजे ११ जुलैला उपस्थित राहावे आहे.
पचौरी यांच्यावर लैंगिक छळ ३५४ ए, कलम ३५४ बी (महिलेवर बळजबरी करून हल्ला), कलम ३५४ डी (मागावर असणे), कलम ५०९ (हावभावातून विनयभंग), कलम ३४१ (बेकायदेशीर स्थानबद्धता) असे आरोप आहेत.
आरोपपत्रात २३ साक्षीदार फिर्यादी पक्षाने दिले आहेत. त्यात काही विद्यमान तर काही माजी कर्मचारी आहेत. पचौरी यांना गेल्या वर्षी २१ मार्चला अटकपूर्व जामीन मिळाला होता.
एलईडी बल्बचे वाटप करण्यात महाराष्ट्र दुसरा
पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी करत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरातमध्ये या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
जानेवारी २०१५ मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्यावरनंतर आंध्रप्रदेशमध्ये १.८९ कोटी एलईडी बल्बचे वाटप झाले आहे, तर महाराष्ट्रात १.६२ कोटी बल्बचे वाटप करण्यात आले आहे.
या दोन राज्यांनंतर उत्तर प्रदेश (१.०१ कोटी), झारखंड (६०.५९ लाख), हिमाचल प्रदेश (५९.५२ लाख) यांचा क्रमांक लागतो. पंजाब या यादीत सर्वांत शेवटी असून, तेथे केवळ २,५४४ बल्बचे वाटप झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा