चालू घडामोडी : २ मे
विजय मल्ल्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
- देशातील १७ बँकांकडून तब्बल ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन परदेशात जाऊन बसलेल्या विजय मल्ल्या याने अखेर आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
- गेल्याच आठवड्यात राज्यसभेच्या शिस्तपालन समितीने मल्ल्याचं सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस केली होती. तसेच मल्ल्याला बाजू मांडण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
- कर्नाटकातून भाजप आणि जनता दल सेक्युलर यांच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या खासदार मल्ल्या याने आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज्यसभा सभापतींना पाठवला.
- ३ मार्च रोजी देश सोडून गेलेल्या मल्ल्याला भारतात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मल्ल्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.
- तसेच ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार करून मल्ल्याच्या प्रत्यर्पणाचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
माजी खासदार बलराज मधोक यांचे निधन
- भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले माजी खासदार बलराज मधोक यांचे २ मे रोजी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
- हिंदू राष्ट्राचे कट्टर समर्थक असलेले बलराज मधोक जनसंघाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेतही त्यांचे मोठे योगदान होते. दक्षिण दिल्ली मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.
- अयोध्येतील रामजन्मभूमी हिंदूंच्या स्वाधीन करावी, अशी मागणी आपण सर्वप्रथम १९६८ मध्ये केली होती, असा दावा ते करत.
- मधोक यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२० रोजी अविभाजित जम्मू-काश्मीरच्या स्कर्दू येथे झाला. लोकसभा निवडणुकीत १९६७ मध्ये त्यांनी जनसंघाला ३५ जागा मिळवून दिल्या होत्या.
- त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या उदयानंतर मधोक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची १९३७ मध्ये संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली.
जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा
- जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा देण्याविषयीची राजपत्रीय अधिसूचना केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने जारी केली आहे. यानुसार मालवाहतूक या गटात शिपयार्ड हा नवा गट समाविष्ट करण्यात आला आहे.
- यामुळे आता या क्षेत्रातील कंपन्यांना स्वस्त दरात व दीर्घ मुदतीने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या या कंपन्यांना १४ ते १५ टक्के दराने निधीचा पुरवठा होत आहे.
- एल अँड टी, रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनियरिंग शिपयार्ड तसेच एबीजी शिपयार्ड यासारख्या खासगी कंपन्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
- जहाज क्षेत्राचा समावेश झाल्यामुळे मालवाहतूक गटामध्ये एकूण सात उद्योगक्षेत्रे तयार झाली आहेत. यामध्ये रस्ते व पूल, बंदरे, शिपयार्ड, देशांतर्गत जलमार्ग, विमानतळ, रेल्वे ट्रॅक व नागरी सार्वजनिक परिवहन सेवा यांचा समावेश झाला आहे.
- जहाज क्षेत्राला पायाभूत उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे मेक इन इंडिया मोहिमेलाही याचा लाभ मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा