अमेरिकी प्रतिनिधीगृहात पाकिस्तानविरोधी ‘एनडीएए २०१७’ विधेयक मंजूर
व्हाइट हाउसच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करताना रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधीगृहाने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले.
रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधिगृहात प्राबल्य असतानाही हा कायदा मंजूर झाला आहे. एनडीएए २०१७ (एचआर ४९०९) हा कायदा अमेरिकी प्रतिनिधिगृहाने २७७ विरूद्ध १४७ मतांनी संमत केला आहे.
या विधेयकांतर्गत हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईमध्ये अपयशी ठरल्यास पाकिस्तानला मिळणारी ४५ कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अमेरिकेतील कायदेमंडळ सदस्यांमध्ये पाकविरोधी भावना तीव्र असून त्यामुळे खालील तीन सुधारणा विधेयकांना मंजुरी मिळाली आहे, ज्या पाकिस्तानच्या विरोधात आहेत.
राष्ट्रीय संरक्षण मान्यता विधेयक आता सिनेटमध्ये मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सहीसाठी हे विधेयक व्हाइट हाउसकडे पाठविले जाऊ शकेल. ओबामांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा बनेल.
भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन यांच्याकडे नासाच्या मोहिमेचे नेतृत्त्व
आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.
नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एनईआयडी’ (नेड) या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने निवड केली आहे.
नेडची बांधणी २०१९मध्ये पूर्ण होणार आहे. अरिझोना येथे ३.५ मीटर डब्ल्यूआयवायएन दुर्बिणीवर हे उपकरण लावले जाईल. या प्रकल्पासाठी अमेरिकेने ९७ लाख डॉलर्सचा निधी दिला आहे.
नवी दुर्बिण डॉपलर रडारच्या मदतीने काम करणार आहे. ही दुर्बिण जगात पृथ्वीसारखाच एखादा दुसरा ग्रह आहे का?, याचा शोध घेईल.
ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांवर होणारे सौम्य कंपन (शास्त्रीय नाव वोबल) मोजण्याचे काम ‘नेड’ या उपकरणाद्वारे केले जाईल.
मागील २० वर्षात संशोधकांनी आपल्या सूर्यमालेबाहेरच्या ३ हजारांपेक्षा जास्त ग्रहांचा शोध लावला आहे. मात्र यातील एकही ग्रह मानवी जीवनासाठी योग्य नाही. या पार्श्वभूमीवर आता नव्या पद्धतीने हा शोध सुरू केला आहे.
बिहारमध्ये गुटखा व पानमसाल्यावर बंदी
दारुबंदीनंतर बिहार सरकारने आता गुटखा व पानमसालाच्या विक्री, वितरण, साठवण व प्रसिद्धिवर बंदी घातली आहे.
बिहार सरकारने अधिकाऱ्यांना छापे टाकुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्यास होणारी हानी टाळण्यासाठी तंबाखु असलेले खाद्यपदार्थांवरील ही बंदी पुढील वर्षभरासाठी असणार आहे. या आदेशाचा परिणाम लहान व्यावसायिक व विक्रेत्यांवर होणार आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने १ एप्रिल रोजी बिहारमध्ये दारुबंदी लागु करुन देशीदारु व हातभट्ट्यांवर विक्री व वापर बंदी जाहीर केली होती.
बिहारव्यतिरिक्त भारतात गुजरात, नागालँड, लक्षद्वीप व मणिपुरमध्ये दारुबंदी आहे. केरळमध्ये २०१४ पासून टप्प्या-टप्प्याने दारुबंदी लागू करण्यात येत आहे.
पेमेंट बँक स्थापनेतून दिलीप संघवी यांची माघार
नव्या धाटणीच्या ११ पेमेंट बँक परवान्यांसाठी रिझर्व्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी मिळविणाऱ्यांपैकी एक असलेल्या दिलीप संघवी फॅमिली अँड असोसिएट्स (डीएसए) यांनी या प्रयत्नातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.
अन्य दोन भागीदारांसह सामूहिकपणे घेतला गेलेला हा माघारीचा निर्णय रिझर्व्ह बँकेलाही कळविण्यात आला आहे.
भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले दिलीप संघवी हे औषधनिर्मिती क्षेत्रातील सन फार्मा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
गेल्या वर्षी त्यांनी पेमेंट बँकेसाठी रिझर्व्ह बँकेकडे व्यक्तिगत स्वरूपात अर्ज दाखल केला होता. सप्टेंबर २०१५ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून मंजुरीनंतर, त्यांनी टेलिनॉर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आयडीएफसी बँक अशा त्रिपक्षीय भागीदारीतून पेमेंट बँक स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते.
जागतिक कीर्तीच्या जाहिरात संस्थांमध्ये मुंबईची ‘फेमस इनोव्हेशन्स’
सर्जनाच्या क्षेत्रात कार्यरत जागतिक कीर्तीच्या १४ निष्पक्ष जाहिरात संस्थांमध्ये राज कांबळे यांनी स्थापित केलेल्या मुंबईस्थित ‘फेमस इनोव्हेशन्स’ या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे.
‘द नेटवर्क वन’ने लंडनस्थित कॅम्पेन मॅगेझिनच्या सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणाअंती २०१६ सालासाठी ही जागतिक अग्रणी संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे.
रेड ब्रिक रोड (ब्रिटन), द सीक्रेट लिटिल एजन्सी (सिंगापूर) आणि द ज्युपिटर रूम (दक्षिण आफ्रिका) वगैरे अग्रणी कंपन्यांच्या सूचित स्थान मिळविणारी फेमस इनोव्हेशन्स ही एकमेव भारतीय जाहिरात कंपनी आहे.
अलीकडेच कॅम्पेनतर्फे दक्षिण आशियातील वर्षांतील सर्वोत्तम जाहिरात संस्था आणि यंग कान्स लायन यासारखे प्रतिष्ठेचे सन्मान मिळविणाऱ्या फेमस इनोव्हेशनला लाभलेला तिसरा बहुमान आहे.
डिसेंबर २०१२मध्ये सुरुवात करणाऱ्या या कंपनीची सध्या दोन कार्यालये आणि ७५ सर्जनशील (creative thinking) मनुष्यबळाचा ताफा आहे.
वास्को द गामा भारतात येण्याच्या घटनेला ५१८ वर्ष पूर्ण
युरोपातून थेट भारत भूमीवर दाखल झालेले वास्को द गामा पहिले युरोपियन प्रवासी आहेत. २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारतात दाखल झाले होते. या घटनेला ५१८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
अटलांटिक महासागरातून प्रवास करत आलेले त्यांचे जहाज सर्वप्रथम कालिकत बंदरात थांबले. त्यांच्या आगमनानंतर युरोप आणि भारतामध्ये व्यापारी संबंधांची सुरुवात झाली.
वास्को-द-गामा मूळचे पोर्तुगीज होते. जुलै १४९७ रोजी पोर्तुगालच्या लिसबनमधून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती.
कालिकत बंदरात उतरल्यानंतर तिथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांकडून वास्को-द-गामाला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही. १४९९ मध्ये पुन्हा पोर्तुगालला परतताना त्यांची मुस्लिम व्यापाऱ्यांबरोबर लढाईही झाली होती.
१५०२साली झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वास्को-द-गामा जहाजांचा ताफा घेऊन पुन्हा कालिकत बंदरात दाखल झाले.
१५२४ साली पोर्तुगालने त्यांना व्हॉईसरॉय बनवून भारतात पाठवले. भारतातच ते आजारी पडले आणि कोचिनमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा