आर्थिक अडचणीमुळे कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुलभ करणारे, कर्मचाऱ्यांना भरपाईचा अधिकार देणारे आणि अशा कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकांनाही अधिकार देणारे ‘इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड’ अर्थात दिवाळखोरी प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.
अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी दिवाळखोरी प्रतिबंधक विधेयक अत्यंत महत्त्वाचे विधेयक आहे.
विद्यमान कायद्यांपैकी काही कायदे १०० वर्षांपूर्वीचे आहेत, जे कालौघात बदलणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर हा कायदा दिवाळखोरीसंदर्भातील सध्याच्या वेगवेगळ्या १२ कायद्यांची जागा घेईल.
याबाबतच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीने सुचविलेल्या सुधारणांचा विधेयकात समावेश करण्यात आला आहे.
भौगोलिक माहिती नियामक विधेयक २०१६
भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्यास आता सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि शंभर कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.
जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे अनुक्रमे पाकिस्तान आणि चीनचा भाग असल्याचे काही संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाल्याच्या घटना घडल्याने केंद्र सरकारने याबाबतचा कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी ‘भौगोलिक माहिती नियामक विधेयक २०१६’ तयार करण्यात आले आहे. या कायद्याच्या मसुद्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :
भारताच्या कोणत्याही भागाची उपग्रह, विमाने, ड्रोन यांच्या साह्याने प्रतिमा घेऊन अतिरिक्त माहितीसह भौगोलिक माहिती प्रसिद्ध करण्यासाठी अथवा वितरीत करण्यासाठी सरकारकडून परवानगी घेणे बंधनकारक.
हा कायदा मोडणाऱ्यास एक कोटी ते शंभर कोटी रुपयांपर्यंत दंड आणि सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
गैरप्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्याचाही केंद्र सरकारचा विचार आहे. या आयोगामध्ये सहसचिव दर्जाचा अधिकारी आणि तज्ज्ञांचा समावेश असेल.
गुगलसारख्या कंपनीला भारतामध्ये गुगल मॅप्स अथवा गुगल अर्थ चालविण्याकरिता सरकारकडून परवाना घेणे आवश्यक ठरणार आहे. या कंपन्यांना परवाना देऊनही त्यांनी नियमभंग केल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.
नियामक मंडळाने परवानगी दिल्याशिवाय देशाची नकाशासह भौगोलिक माहिती प्रसिद्ध करता येणार नाही. माहिती प्रसिद्ध करताना सरकारची परवानगी असल्याचे प्रमाणपत्र दिसणे आवश्यक.
हा प्रस्तावित कायदा संपूर्ण भारतासह परदेशात राहणारे सर्व भारतीय, सरकारी नोकरदार, विमाने आणि जहाजांमधील भारतीय नागरिक अथवा नोंदणीकृत संस्था यांना लागू असेल.
केंद्र सरकारच्या विविध विभागांना मात्र हे विधेयक लागू होणार नाही. एखाद्या कंपनीकडून ही चूक झाल्यास संबंधित सर्व लोकांना जबाबदार धरले जाणार.
यामुळे भारताबाबत कोणतीही चुकीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनेटद्वारेही प्रसिद्ध न होण्याची काळजी घेतली जाणार आहे.
एस अगेन्स्ट ऑड्स : सानिया मिर्झाची आत्मकथा
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आपल्या वडिलांच्या मदतीने लिहिलेल्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’या आत्मकथेचे प्रकाशन करणार आहे.
येत्या जुलै महिन्यात हे आत्मचरित्र प्रकाशित होणार असून हार्पर कॉलिन्स हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
सानियाने तिचे वडील इम्रान मिर्झा व क्रीडा पत्रकार शिवानी गुप्ता यांच्यासह हे पुस्तक लिहिले आहे.
जगातील सर्वोत्तम शंभर विद्यापीठांची यादी प्रसिद्ध
‘टाइम्स’ या संस्थेने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शंभर विद्यापीठांची या वर्षासाठीची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
जगातील १३३ देशांमधील दहा हजार तज्ज्ञांच्या साह्याने ही यादी तयार केली जाते.
प्रतिष्ठीत विद्यापीठांच्या या यादीत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या विद्यापीठाने सलग तिसऱ्या वर्षी हा मान मिळविला आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरही अमेरिकेमधील विद्यापीठे असून, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टॅनफोर्ड यांना तो मान मिळाला आहे.
ब्रिटनमधील जगप्रसिद्ध केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे. भारतातील एकाही विद्यापीठाला या यादीत नाव आणता आलेले नाही.
आशियातील १८ विद्यापीठे या यादीत आहेत. जपान विद्यापीठ यादीत बाराव्या क्रमांकावर असून, चीनमधील दोन विद्यापीठांनीही १८ आणि २१वे स्थान पटकाविले आहे.
चीनमधील एकूण पाच विद्यापीठांचा, तर रशियाच्या तीन विद्यापीठांचा यादीत समावेश आहे. यादीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
ब्राझीलमध्ये व्हॉट्सअॅपवर ३ दिवस बंदी
ब्राझीलमध्ये न्यायाधीशांनी सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना व्हॉट्सअॅपवर ७२ तासांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
अमली पदार्थांच्या तस्करीचा तपास करण्यासाठी हवी असलेली माहिती पुरवण्याच्या बाबतीत व्हॉट्सअॅपने अलिप्ततेची भुमिका घेत नकार दिल्याने ही बंदी आली आहे.
फेसबुकने २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले आहे. दोन व्यक्तींच्या दरम्यान झालेली संदेशाची देवाण घेवाण सर्वस्वी गुप्त ठेवण्याच्या फेसबुकच्या पॉलिसीमुळे गुंता निर्माण होत आहे.
कारण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हाही आम्हाला व्हॉट्सअॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबुकची भुमिका आहे.
याने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा विस्तार झाला पण सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हिताचा संकोच झाला आहे. याच भुमिकेतून न्यायालयाने बंदीचा आदेश दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा