चालू घडामोडी : २८ व २९ फेब्रुवारी


‘बॅंक बोर्ड ब्यूरो’च्या अध्यक्षपदी विनोद राय

    Vinod Rai
  • सरकारी क्षेत्रातील बँकांना सध्या भेडसावणाऱ्या थकित, बुडित कर्जांच्या समस्येवर उपाययोजना सुचविण्यासाठी तसेच, सरकारी बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत सल्ला देण्याची मोदी सरकारने ‘बॅंक बोर्ड ब्यूरो’ची स्थापना केली. माजी महालेखा नियंत्रक (कॅग) विनोद राय हे या ब्यूरोचे अध्यक्ष असतील.
  • ‘ब्युरो’च्या अन्य सदस्यांमध्ये ‘आयसीआयसीआय बँके’चे माजी संयुक्त व्यवस्थापकीय संचालक एच. एन. सिनोर, बँक ऑफ बडोदाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल खंडेलवाल आणि पतनिर्धारण संस्था ‘क्रिसिल’च्या माजी प्रमुख रुपा कुडवा यांचा समावेश आहे. अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल.
  • राय यांनी जानेवारी २००८ ते मे २०१३ दरम्यान महालेखापाल म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्याच कारकीर्दीत ‘टू जी’ आणि कोळसा घोटाळा उघडकीला आला होता. ‘युपीए २’च्या कार्यकालात अनेक प्रकरणांत राय यांनी घेतलेले निर्णय गाजले होते.

‘ब्रिक्स’ बँकेचे पहिले कर्ज भारताला

  • सदस्य विकसनशील देशांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’ बँके’तर्फे पहिले कर्ज भारताला वितरित करण्यात येणार आहे. या कर्जाचा विनियोग ‘ग्रीन सोलर एनर्जी प्रोजेक्ट’ उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. 
  • चालू वर्षासाठी भारताला दीड अब्ज डॉलरचे कर्ज वितरित करण्यात येणार आहे. गेले सहा महिने बँकेच्या व्यवस्थापनासंबंधी काम पूर्ण केल्यानंतर आता कर्ज वितरण आदी बाबींकडे पाहिले जाणार आहे.
  • भारताशिवाय लवकरच ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका आदी देशांनाही कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.
  • ‘ब्रिक्स’ बँकेचे अध्यक्ष : के. व्ही. कामत
 ‘ब्रिक्स’ बँक 
  • ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ जिला ब्रिक्स बँक असेही संबोधले जाते ही एक बहुराष्ट्रीय वित्तसंस्था असून ती ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांच्या बनलेल्या ब्रिक्स गटाद्वारे चालविली जाते.

अम्मा कायपेसी योजना

  • तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी ‘अम्मा’ ब्रॅंडखाली सुरू केलेल्या लोकप्रिय योजनांच्या यादीत मोफत मोबाईल फोनची ‘अम्मा कायपेसी (मोबाईल फोन)’ या योजनेची भर पडली आहे. 
  • या योजनेची घोषणा जयललिता यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केली होती. महिलांच्या स्व-मदत गटांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे.
  • या योजनेनुसार राज्यातील स्व-मदत गटातील प्रशिक्षणार्थींना सॉफ्टवेअरसह मोफत मोबाईल फोन पुरविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २० हजार प्रशिक्षणार्थींना फोन देण्याचे नियोजन आहे.
  • गटाच्या बैठका, सभासद शुल्क, अंतर्गत काम, बचत व कर्जपुरवठा व अन्य कामासंबंधीच्या अनेक नोंदी या प्रशिक्षणार्थींना ठेवाव्या लागतात. याबाबतची सर्व माहिती एकत्र ठेवण्यासाठी व त्याचे जतन करणे सहज शक्य व्हावे, यादृष्टीने या मोबाईलसाठी तमीळ भाषेतून विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. 
 स्व-मदत गट 
  • राज्यातील गरीब व महिलांच्या उद्धारासाठी जयललिता सरकारने २००५ मध्ये जागतिक बॅंकेच्या सहकार्याने ‘तमिळनाडू न्यू लाइफ स्कीम’ ही योजना सुरू केली.
  • तसेच, दारिद्र्यनिर्मूलनासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी १९९१मध्ये महिलांच्या स्व-मदत गटांची स्थापना केली. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.
  • याअंतर्गत एकूण सहा लाख स्व-मदत गट स्थापन झाले असून, सदस्य संख्या सुमारे ९३ लाख आहे.  

अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी

  • देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने तामिळनाडूत एका राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
  • ‘अब्दुल कलाम व्हिजन इंडिया पार्टी’ असं या पक्षाचं नाव असून कलाम सरांचे साहाय्यक वी पोनराज यांनी हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. 
  • डॉ. अब्दुल कलाम यांच्या कबरीवर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पोनराज यांनी पक्षाची घोषणा केली. हा पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तरुणांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देऊन निवडणुकीचे तिकीट देणार आहे.

अर्थसंकल्प २०१६, रेल्वे अर्थसंकल्प २०१६ तसेच आर्थिक पहाणी २०१५-१६ यावर स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करण्यात येतील.

चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी


एफडीआयमध्ये दिल्ली आघाडीवर

    FDI in India
  • गेल्या दोन वर्षांत थेट परकीय गुंतवणुकीत दिल्ली आघाडीवर असून, महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. थेट परकीय गुंतवणुकीत दिल्ली आणि महाराष्ट्रात जवळपास १० टक्क्यांचे अंतर आहे.
  • दिल्लीत दोन वर्षांत १६२७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली असून, महाराष्ट्रात याच काळात ११२३ कोटी डॉलर्सची गुंतवणूक झाली.
  • ‘मेक इन इंडिया’मध्ये जास्तीतजास्त परकीय गुंतवणुकीबाबत राज्याने प्रयत्न केले, परंतु विदेशी गुंतवणूकदारांना दिल्लीचे जास्त आकर्षण असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
  • एप्रिल ते नोव्हेंबर या काळात देशात एकूण ३४.८ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक झाली. गतवर्षी याच काळात (२०१४) २७.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती.
  • थेट परकीय गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात सर्वाधिक एकूण गुंतवणुकीच्या १७.८ टक्के गुंतवणूक झाली आहे.
  • सेवा क्षेत्र, बँकिंग व वित्तीय सेवा (१६.५ टक्के), ट्रेडिंग क्षेत्र (१०.५ टक्के), वाहन उद्योग (६.७ टक्के), दूरसंचार (४ टक्के), पायाभूत सुविधा क्षेत्रात (५.५ टक्के) गुंतवणूक झाली आहे.
  • एकूण परकीय गुंतवणुकीत सिंगापूर आणि मॉरिशस या दोन देशांमधूनच भारतात ६० टक्के गुंतवणूक झाली आहे. करांमध्ये सवलत मिळण्याकरिता काही पाश्चात्त्य राष्ट्रांमधील कंपन्यांनी या दोन देशांमधून गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे.
एफडीआयमध्ये आघाडीवरील राज्ये व त्यांचा एकूण वाटा
(एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१५)
१. दिल्ली २९.२० टक्के
२. महाराष्ट्र २०.१६ टक्के
३. कर्नाटक १२.०४ टक्के
४. तामिळनाडू १०.२४ टक्के
५. गुजरात ५.१३ टक्के
६. आंध्र प्रदेश ३.७३ टक्के

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकची जेआयटी

  • पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी व तपास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाच सदस्यांच्या संयुक्त चौकशी पथकाची (जेआयटी) नियुक्ती केली आहे.
  • या हल्ल्यात पाकमधील जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा भारताचा आरोप आहे. तसेच, त्याबाबतचे काही पुरावेही पाकिस्तानला दिले होते.
  • याप्रकरणी पाकने प्राथमिक माहिती अहवाल दाखल (एफआयआर) केला असून त्यात पाकिस्तानच्या जैश ए महंमद या संस्थेचा अतिरेकी मसूद अझर याचा समावेश नाही.
  • पंजाब प्रांताचे दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहंमद ताहिर हे जेआयटीचे समन्वयक आहेत. हे पथक पुरावे गोळा करण्यासाठी मार्चमध्ये पठाणकोटला भेट देऊ शकते.
  • पथकामध्ये महंमद ताहीर यांच्याव्यतिरिक्त पोलिस उपमहासंचालक महंमद अझीम अर्शद, आयएसआयचे तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा, तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.

मोदी ‘वर्ल्ड सुफी फोरम’च्या परिषदेत सहभागी होणार

  • देशाला जिहादींपासून वाचविण्यासाठी आणि देशातील मुसलमांनापर्यंत पोहोचण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वर्ल्ड सुफी फोरम’च्या चार दिवसीय परिषदेत सहभागी होणार आहेत.
  • ‘सुफीझम’वर चर्चा करण्यासाठी होणारी ही परिषद १७ मार्च २०१६ला दिल्लीत भरणार आहे. सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अध्यात्मिक गुरू आणि विद्वान असे एकूण २०० लोक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
  • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुफी व सुन्नी मौलवींच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान मोदी यांना भेटून त्यांना परिषदेची कल्पना दिली होती. त्याचवेळी मोदी यांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता.
  • पंतप्रधान मोदी परिषदेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

‘सॅन्टिना’ची विजयी घोडदौड खंडित

  • भारताची टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांची सलग ४१ सामने जिंकण्याची विजयी घोडदौड कतार ओपनमध्ये खंडित झाली.
  • जागतिक क्रमवारीतील नंबर वन असणाऱ्या सानिया आणि हिंगीस या जोडीचा एलेना वेस्निना आणि दारिया कसात्किना या रशियन जोडीने २-६, ६-४, १०-५ असे पराभूत केले.
  • महिला दुहेरीतील सलग तीन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या ‘सॅन्टिना’ला गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सिनसिनाटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
  • दोहामध्ये पराभूत होण्यापूर्वी मार्टिना-सानिया जोडीने महिला दुहेरीचे सलग तीन ग्रँण्डस्लॅम किताब जिंकले आहेत. 
  • या पराभवामुळे महिला दुहेरीत सर्वाधिक विजयाचा विश्वविक्रम रचण्याची त्यांची संधी हुकली. १९९०च्या दशकात जाना नोवोटना आणि हेलेना सुकोव्हा या जोडीने सलग ४४ सामने जिंकले होते.

अहमदाबाद शहराला ६०५ वर्षे पूर्ण

  • ऐतिहासिक वारसा असलेल्या गुजरातमधील अहमदाबाद शहराला २६ फेब्रुवारी रोजी ६०५ वर्षे पूर्ण झाली. सुमारे ६५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचा शोध अहमदशाहने १४११मध्ये २६ फेब्रुवारीला लावल्याची नोंद इतिहासात आहे.
  • अहमदाबादचा शोध लागण्यापूर्वी येथे सोळंकी व त्यानंतर मुघलांची, मराठ्यांची आणि अखेर ब्रिटिशांची सत्ता होती.
  • एकेकाळी भारताची कापड उद्योगाची प्रमुख बाजारपेठ असलेले हे शहर आज मेट्रो सिटी म्हणून उदयास येत आहे.
  • इतिहासकार मिरात-ए-अहमदी यांच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार हा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असून, अहमदशाहने शहराचा शोध लावल्यामुळेच त्याला अहमदाबाद असे नाव पडल्याची आख्यायिका आहे.
  • आज संपूर्ण देशात औद्योगिक क्षेत्रात अहमदाबाद आघाडीवर आहे, तसेच महात्मा गांधी यांनी येथे स्थापन केलेल्या साबरमती आश्रमामुळे याला स्वातंत्र्यलढ्याचाही वेगळा इतिहास आहे.
  • यामुळेच नरेंद्र मोदी सरकारने अहमदाबाद हे शहर जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यासाठी शिफारस केली आहे. आतापर्यंत २८७ शहरांचा या यादीत समावेश झाला असून, यामध्ये भारताशेजारील नेपाळमधील भक्तीपूर आणि श्रीलंकेतील गल्ले या शहरांचा समावेश आहे.
  • युनेस्कोकडून याबाबतची घोषणा जून २०१७ पर्यंत होण्याची शक्यता असून, अहमदाबाद हे भारतातील पहिले जागतिक वारसा शहर होऊ शकते.

मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला

  • पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात २००७मध्ये घटना बाजूला सारल्याबद्दल त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालविण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • या प्रकरणाच्या चौकशीतून आपल्याला वगळण्याची मागणी पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश अब्दुल हमीद डोगर यांनी केली होती. ही मागणी मान्य करून फक्त मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
  • मुशर्रफ हे पाकिस्तानच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी २००७मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. या प्रकरणी घटनेला बाजूला सारल्याचा आरोप ठेवत मुशर्रफ यांच्याविरोधात २०१३मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • या प्रकरणातून माजी सरन्यायाधीश डोगर यांच्यासह इतर दोघांची नावे वगळून फक्त मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी


आरबीआयद्वारे कर्जवसुलीचे नियम शिथील

    Reserve Bank of India
  • देशभरातील बॅंकांना कर्जवसुली करणे सोपे जावे या उद्देशाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जवसुलीचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कर्जवसुलीसाठी बॅंकांना थकबाकीदार कंपन्या अधिग्रहित कराव्या लागतात. शिथील केलेल्या नव्या नियमानुसार अधिग्रहित केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनात बॅंकेला बदल करावे लागणार आहेत.
  • त्याद्वारे एसडीआर अंतर्गत यापूर्वी आवश्यक असलेली ५१ टक्के हिस्सेदारी विकण्याची अटही शिथील करण्यात आली असून आता केवळ २६ टक्के हिस्सेदारी विकणे पुरेसे ठरणार आहे. 
  • याशिवाय बॅंकांना सामूहिक कर्ज वसुलीचे नियम देखील शिथील करण्यात आले असून आहे. एकाच कंपनीला अनेक बॅंकांनी कर्ज दिले असल्यास कर्जवसुलीसाठी यापूर्वी सर्व बॅंकांपैकी किमान ७५ टक्के बॅंकांची मान्यता घेणे आवश्यक होते. ही अट शिथील करून यापुढे केवळ ५० टक्के बॅंकांची सहमती असल्यास कर्जवसुली करता येणे शक्य होणार आहे.

भविष्यनिर्वाह निधीच्या नियमांत बदल

  • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्यनिर्वाह निधीच्या (पीएफ) नियमांत बदल केले असून नव्या बदलानुसार पीएफ काढून घेण्यासाठी असलेली आताची वयाची अट ५४ वरून ५७ वर्षे करण्यात आली आहे. 
  • कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे देशभरात ५ कोटी पीएफ भागधारक आहेत. ज्येष्ठ नागरिक पेन्शन वीमा योजनेअंतर्गत ५४ वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९० टक्के पीएफची रक्कम काढता येवू शकत होती. मात्र, आता यात बदल करण्यात आला असून ५७ वर्ष पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम काढता येऊ शकते.
  • याआधी निवृत्तीवयाची मर्यादा ५५ किंवा ५६ वर्षे होती. ही वयोमर्यादा ५८ वर्ष झाल्याने या नियमात बदल करण्यात आला आहे.
  • याशिवाय पीएफमधून काढण्यात आलेली रकमेची ज्येष्ठ पेन्शन वीमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी असलेली वयाची अटदेखील ५५ वरून ५७ वर्ष करण्यात आली आहे.

विजय मल्ल्यांचा यूएसएल अध्यक्षपदाचा राजीनामा

  • किंग ऑफ गुड टाईम म्हणून ओळखले जाणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी युनायटेड स्पिरीटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेल्या यूबी ग्रुपवर आता जगातील सर्वात मोठी मद्य कंपनी दियाजियोचे नियंत्रण आहे.
  • तसेच युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या (यूएसएल) अध्यक्षपदाची सूत्रे कंपनीच्या लेखापरिक्षण समितीचे अध्यक्ष एम. के. शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहेत.
  • मल्ल्या यांनी राजीनामा देताना दियाजियोबरोबर करार केला आहे त्यानुसार पुढची पाच वर्ष दियाजियो मल्ल्या यांना ५१५ कोटी रुपये देणार आहे.
  • यूएसएल ग्रुपमधील एका कंपनीकडे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाची मालकी आहे. या कंपनीच्या संचालकपदावर विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थला कायम ठेवण्यात येणार आहे. 
  • काही बँकांनी मल्ल्या यांचा कर्ज थकबाकीदारांच्या यादीत समावेश केला आहे. मल्ल्या यांनी बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी कर्ज घेतले होते. 
  • मल्ल्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर बाजारात यूनाटेड स्पिरीटच्या समभागांच्या मुल्यामध्ये वाढ झाली आहे. 

मुंबई संघाला ४१वे रणजी विजेतेपद

  • पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात सौराष्ट्र संघावर एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवत मुंबई संघाने ४१व्यांदा रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. 
  • मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे सौराष्ट्र संघाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभी करता आली नाही. तर मुंबईकडून शतकी खेळी करणाऱ्या श्रेयश अय्यर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
  • धवल कुलकर्णी (७ बळी), शार्दूल ठाकूर (८ बळी) आणि  श्रीकांत अय्यर (११७ धावा) हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 

चिनी लष्करामध्ये झियांगतान फ्रिगेट दाखल

  • चिनी लष्करामध्ये स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रवाहू ‘फ्रिगेट’ दाखल झाली असून, चीनच्या नौदलाच्या आधुनिकीकरणाचा हा एक भाग आहे. झियांगतान असे या फ्रिगेटचे नाव आहे.
  • या चिनी फ्रिगेटचे वजन तब्बल चार हजार टन एवढे असून, ती दूरपर्यंत टेहळणी करू शकते तसेच लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याची क्षमताही या फ्रिगेटमध्ये आहे.
  • सध्या चीनची लष्करी महत्त्वाकांक्षा मोठ्या प्रमाणावर वाढली असून, दक्षिण चिनी समुद्र आणि भारतीय महासागरामध्ये प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन सरकारने नौदलाचे आधुनिकीकरण सुरू केले आहे. यासाठी चीनने स्वदेशी शस्त्रनिर्मिती उद्योगामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.
  • दक्षिण चिनी समुद्रातून होणाऱ्या जलवाहतुकीमधून चीनला दरवर्षी तब्बल ५ ट्रिलीयन डॉलरचा निधी मिळतो. या समुद्रातील चीनच्या सागरी मक्तेदारीला व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई, फिलिपाईन्स आणि तैवान या देशांनी कडाडून विरोध केला आहे. 

फिफाच्या अध्यक्षपदी गियानी इन्फॅन्टिनो

    Fifa president election 2016
  • स्वित्झर्लंडचे गियानी इन्फॅन्टिनो यांची जागतिक फुटबॉल संघटनेच्या (फिफा) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी दुसऱ्या फेरीच्या मतदानात बहरिनचे शेख सलमान बिन अब्राहम अल खलिफा यांना २७ मतांनी पराभूत केले.
  • गियानी यांना २०७ पैकी ११५ मते मिळाली, तर शेख सलमान ८८ मतांसह दुसऱ्या स्थानी आले. प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना चार मते मिळाली. जेरोम कँपेन यांना एकही मत मिळाले नाही. टोकियो सेक्सवेल यांनी मतदानापूर्वी माघार घेतली.
  • फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गिलानी इन्फॅन्टिनो यांच्यासह पाच जणांमध्ये ही लढत होती. मात्र खरी लढत युएफाचे सरचिटणीस गिलानी इन्फॅन्टिनो आणि आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांच्यात होती.
  • प्रक्षेपण हक्क वितरण, आर्थिक हितसंबंध, विश्वचषक आयोजन अधिकार वितरण तसेच तिकीट विक्री भ्रष्टाचार प्रकरणी अध्यक्षपद सोडावे लागलेले सेप ब्लाटरही स्वित्झर्लंडचे होते.
  • ४५ वर्षीय गियानी युरोपियन फुटबॉल महासंघाचे महासचिवसुद्धा आहेत. ते सॅप ब्लाटर यांच्या जागी फिफाच्या अध्यक्षपदाची जागा सांभाळतील. 
  • युएफाचे सरचिटणीस असताना इन्फँटिनो यांनी आर्थिक पारदर्शकता धोरण राबवले होते. युरो अजिंक्यपद स्पर्धेत संघांची संख्या १६वरून २४वर नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इन्फँटिनो यांच्यावर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे वेळापत्रक सोयीनुसार बदलण्याचा आरोप आहे. 

जोकोविकचा ७००वा विजय

  • जगातील नंबर वन नोवाक जोकोविकने आपल्या करिअरमध्ये ७००व्या विजयाची नोंद केली. त्याने दुबई ओपन टेनिस स्पर्धेत या विक्रमी विजयाला गवसणी घातली.
  • यासह तो आता सर्वाधिक सामने जिंकण्याच्या ऑल टाइम यादीत १२व्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिकेचा जिमी कोनर्स करिअरमध्ये सर्वाधिक १२५४ विजयासह अव्वल स्थानावर आहे. तर फेडरर (१०६७) दुसऱ्या स्थानी आहे.
  • सक्रीय खेळाडूंच्या यादीनुसार रॉजर फेडरर (१०६७) आणि राफेल नदाल (७७५) यानंतर जोकोविक तिसऱ्या स्थानी आहे.
  • पुरुष एकेरीत ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीवर मात करत जोकोविकने दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

चालू घडामोडी : २५ फेब्रुवारी


डेबिट, क्रेडिट कार्डवरील उपकर रद्द

    Cashless Payments
  • रोखीचे व्यवहार कमी करण्यासाठी कार्ड किंवा इतर डिजिटल पर्यायांद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी आता अधिभार, सेवा शुल्क आणि वापर शुल्क (कन्व्हिनिअन्स फी) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • रोख रकमेत करण्यात येणाऱ्या व्यवहारांना आळा बसावा, कॅशलेस संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी हा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे.
  • या निर्णयामुळे रक्कम देण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा अपारंपारिक पद्धतींचा अवलंब करण्याकडे कल वाढेल. तसेच करचुकवेगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढविण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.
  • सध्या देशात कॅशलेस व्यवहारांपेक्षा रोख व्यवहारांचे प्रमाण मोठे आहे. त्यातून काळ्या पैशाची नाहक निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला धोका पोहोचतो. हे थांबविण्यासाठी डिजिटल पेमेंट आणि कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरील उपकर आणि सेवा कर माफ करण्याचे धोरण अंगीकारण्यात आले आहे.
  • विशिष्ट मर्यादेपुढील पेमेंट कार्ड किंवा डिजिटल मार्गाने करणे अनिवार्य करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

ग्लोबल रिच लिस्ट २०१६

  • चीनमधील नियतकालिक ‘हुरून’च्या ‘ग्लोबल रिच लिस्ट २०१६’ अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. अंबानी यांच्या संपत्तीमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. 
  • मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण २६ अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच १.७८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगात त्यांच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये २१वा क्रमांक लागतो. यानंतर १.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दिलीप संघवी ४६व्या व पलोनजी मिस्त्री ६९व्या क्रमांकावर आहेत.
 या अहवालातील ठळक मुद्दे 
    Hurun-Global-Rich-List-2016
  • सध्या जगात २,१८८ अब्जाधीश (अतिश्रीमंत) आहेत. त्यातील १११ अब्जाधीश भारतात असून त्यांची एकत्रित संपत्ती ३०८ अब्ज डॉलर आहे.
  • अब्जाधीशांच्या या यादीत बिल गेट्स ८० अब्ज अमेरिकी डॉलरसह पहिल्या स्थानावर आहे. १०० अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असणारे बिल गेट्स जगातील पहिली व्यक्ती आहे. त्यांनी त्यातील २० अब्ज डॉलरची संपत्ती दान केली आहे.
  • या यादीत ५६८ अब्जाधीशांसह अमेरिकेला मागे टाकत चीन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ५३५ अब्जाधीशांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
  • गेल्या एक वर्षात भारतातील अब्जाधीशांची संख्या चौदाने वाढली असून आता भारतातील अब्जाधीशांची संख्या ९७ वरून १११ झाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत चीन व अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
  • भारतातील अब्जाधीशांच्या संयुक्त संपत्तीमध्ये यादरम्यान १६ टक्क्यांनी वाढ झाली आणि ती १८.२१ लाख कोटी रुपयांवरून वाढून २१.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
अब्जाधीश (संपत्ती अब्ज डॉलरमध्ये)
भारत
क्र. नाव संपत्ती
२१ मुकेश अंबानी २६
४६ दिलीप संघवी १८
६९ पालोनजी मिस्त्री १३
७८ शिव नाडर १२
१४९ सायरस पुनावाला ८.१
जग
क्र. नाव संपत्ती
१. बिल गेट्स ८०
२. वॉरन बफे ६८
३. अमांसिओ ऑर्टेगा ६४
४. जेफ बेझोस ५३
५. कार्लोस स्लिम हेलू ५०

राजेंद्रसिंह तटरक्षक दलाचे नवे महासंचालक

  • तटरक्षक दलाचे नवे महासंचालक म्हणून राजेंद्रसिंह यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • परंपरेनुसार नौदल अधिकारी या दलाचे महासंचालक होतात; पण राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीमुळे प्रथमच या दलाच्या महासंचालकपदी सागरी सुरक्षा दलातील अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नियुक्तीचा आदेश जारी केला.
  • राजेंद्रसिंह सध्या तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. व्हाइस ऍडमिरल एच. सी. एस. बिश्त यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. एच. एल. दत्तू

  • माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द पाच वर्षांसाठी असेल. 
  • के. जी. बालकृष्णन यांच्या निवृत्तीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून हे पद रिक्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील समितीने एच. एल. दत्तू यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड केली.
  • न्या. दत्तू २ डिसेंबर २०१५ रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. २८ सप्टेंबर २०१४ ते २ डिसेंबर २०१५ या काळात ते देशाचे सरन्यायाधीश होते.
  • त्यांनी १९७५ पासून वकिलीला सुरुवात केली. १९९५ मध्ये ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. फेब्रुवारी २००७ मध्ये ते छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते.

भारताचा बांगलादेशमध्ये वीज प्रकल्प

  • भारत बांगलादेशमध्ये १.६ अब्ज डॉलरचा वीज प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी अनेक वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. या करारावर येत्या २८ फेब्रुवारी रोजी उभय देश स्वाक्षऱ्या करतील.
  • यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) १,३२० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प दक्षिण बांगलादेशातील खुलना येथे उभारणार आहे.
  • या प्रकल्पासाठी भारताची चीनच्या हर्बीन इलेक्ट्रिक इंटरनॅशनल कंपनीसोबत अत्यंत कडवी अशी व्यावसायिक स्पर्धा होती. त्यात या भारताने चीनला मागे टाकत हा करार मिळविला.

कर टाळण्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यात करार

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीद्वारे प्राप्त उत्पन्नावर दुहेरी कर टाळण्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यातील एका करारावर स्वाक्षऱ्या करायला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात ही मान्यता देण्यात  आली.
  • या करारानुसार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक परिचालनाद्वारे प्राप्त नफ्यावर केवळ एकाच देशात कर लागू करण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित उद्योग ज्या देशातील असेल, त्या देशाला तो कर देय राहिल.
  • या करारामुळे भारत आणि मालदीव या देशातील हवाई उद्योगांना कर निश्चितीचा दिलासा मिळणार आहे.

अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु यांची स्थापना

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नीती आयोगामध्ये अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु यांची पुरेसे मनुष्यबळ वापरुन स्थापना करण्यास मंजूरी देण्यात आली. 
  • अटल नाविन्यता मोहीम आणि संचालनालयाच्या स्थापनेमुळे, या मोहिमेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल.  हा देशातील नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीचा केंद्रबिंदू ठरेल.
 याविषयीचा तपशील 
  • १) अटल नाविन्यता मोहीम आणि सेतु या संदर्भातील मुख्य आव्हाने, पुरस्काराची रक्कम तसेच अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती निर्णय घेईल आणि मार्गदर्शन करेल.
  • २) नीती आयोग मोहिम संचालक आणि इतर योग्य मनुष्यबळाची तरतूद नीती आयोग करेल.
  • ३) मोहिमेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असेल.

इन्फोसिसच्या सीईओपदी विशाल सिक्का यांची फेरनिवड

  • देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. सिक्का हे आता या पदावर पुढील पाच वर्षे म्हणजे २०२१ पर्यंत कार्यरत राहतील.
  • सिक्का यांची यापूर्वीची मुदत २०१९ पर्यंत होती. सिक्का यांच्या नियुक्तीनंतर इन्फोसिसने गेल्या काही तिमाहीत वाढीव नफा नोंदविला आहे.
  • कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या समूहातील पुनरागमनानंतर इन्फोसिसमध्ये मोठय़ा प्रमाणात कर्मचारी गळती होऊ लागली होती. ती विशाल सिक्का यांनी धुरा हाती घेताच काहीशी थोपविली गेली.
  • कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनपूरक योजना सिक्का यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत राबविल्या. सिक्का यांच्या रुपात कंपनीने प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीची प्रमुखपदी नियुक्ती केली होती.
  • यापूर्वी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद हे इन्फोसिसच्या समूह सह संस्थापकांपैकी एकाकडेच असे. अथवा समूहातील कनिष्ट अधिकाऱ्याला बढती दिली जात असे.

झुकेरबर्ग व डोर्सी यांना ठार मारण्याची धमकी

  • इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटेनेने मार्क झुकेरबर्ग व जॅक डोर्सी या फेसबुक व ट्विटर या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.
  • इसिसची फेसबुक व ट्विटरवरील काही अकाऊंट्‌स नुकतीच बंद करण्यात आली आहे. यामुळे इसिसकडून हा इशारा देण्यात आला आहे.
  • फेसबुकवर सध्या इसिसची १० हजारपेक्षा जास्त अकाउंट्‌स, सुमारे १५० गट (ग्रुप) आणि ट्विटरवर सुमारे ५ हजार अकाऊंट्‌स असल्याचे इसिसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २४ फेब्रुवारी


नऊ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन

  • महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या नऊ मार्चपासून सुरू होणार असून, १८ मार्च २०१६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.
  • विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील तात्पुरते कामकाज ठरविण्यासाठी विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात झाली.
  • या बैठकीत ९ मार्च ते १७ एप्रिलदरम्यान अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. याशिवाय अधिवेशनात शासकीय व अशासकीय कामकाजाबरोबरच प्रस्तावित सहा विधेयके व तीन अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ
पद विधानसभा विधानपरिषद
सभापती हरिभाऊ बागडे रामराजे नाईक-निंबाळकर
उपसभापती पद रिक्त वसंत डावखरे
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील धनंजय मुंडे

एनएसईचे पाच नवीन निर्देशांक

    National Stock Exchange
  • राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने पाच नवीन निर्देशांकांना सुरुवात करण्यासह, विद्यमान निफ्टी-५० निर्देशांकाच्या रचनेतही फेरबदल येत्या १ एप्रिलपासून अमलात आणत असल्याचे घोषित केले आहे.
  • एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लि. (आयआयएसएल)ने नव्याने अमलात येणाऱ्या पाच निर्देशांकासह एनएसईवर एकूण ११ निर्देशांकांच्या रचनेची घोषणा केली आहे.
  • नव्या निर्देशांकांनुसार कोणतीही कंपनी केवळ एकाच म्हणजे लार्ज, मिड व स्मॉल या श्रेणीत समाविष्ट असेल.
  • निफ्टी मिडकॅप १५०, निफ्टी स्मॉलकॅप २५०, निफ्टी फुल मिडकॅप १००, निफ्टी स्मॉलकॅप ५० आणि निफ्टी फुल स्मॉलकॅप १०० असे पाच नवीन निर्देशांक एप्रिलपासून कार्यान्वित होतील.
  • तर विद्यमान सहा निर्देशांक निफ्टी ५००, निफ्टी १००, निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप ५० आणि निफ्टी २०० जमेस धरल्यास एकूण ११ निर्देशांक असतील.
  • नव्याने दाखल होणाऱ्या निफ्टी स्मॉलकॅप ५० निर्देशांकामुळे आता प्रत्येक श्रेणीत ५० समभागांचा निर्देशांक अस्तित्वात येईल.

‘आयएनएस अरिहंत’ नौदलात समावेश होण्यास सज्ज

    INS Arihant
  • अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रधारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.
  • सर्व चाचण्या ‘आयएनएस अरिहंत’ने यशस्वीपणे पूर्ण केल्या असून नौदलात दाखल करण्याबाबत सरकारी पातळीवरील निर्णय होताच ती नौदल ताफ्यात सामील होईल.
  • विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ची बांधणी केली गेली व गेल्या पाच महिन्यांपासून रशियाच्या मदतीने तेथेच तिच्या खोल सागरी सफरीच्या चाचण्या सुरू होत्या.
  • ‘एसएसबीएन’ या तांत्रिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘अरिहंत’च्या वर्गातील एकूण पाच आण्विक पाणबुड्या बांधण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
  • सध्या भारतीय नौदलात ‘अकुला’ वर्गातील ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे. ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली आहे. म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी असेल.
  • याच वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांचे काम सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या पाणबुड्या ‘अरिहंत’हून अधिक मोठ्या व अत्याधुनिक असतील.
  • तसेच भविष्यात नौदलात दाखल होणाऱ्या सर्व आण्विक युद्धनौका व पाणबुड्यांसाठी पूर्व किनाऱ्यावर काकिनाडाजवळ ‘आयएनएस वर्षा’ हा नवा सामरिक तळ उभारण्याचे कामही प्रगतिपथावर आहे.
 ‘आयएनएस अरिहंत’ची वैशिष्ट्ये 
  • वजन : ६,००० टन.
  • आखूड पल्ल्याची के-१५ अथवा बीओ-५ क्षेपणास्त्रे तैनात आहेत. मारक क्षमता ७०० कि.मी.हून अधिक.
  • के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे. मारकक्षमता ३५०० कि.मी.पर्यंत.
  • पाण्याच्या आतून आणि पृष्ठभागावरून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता.
  • पाण्यात असताना एखाद्या विमानालाही लक्ष्य करू शकते.

रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ‘व्हिएन्ना’

  • डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना शहर रहाण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • या यादीत व्हिएन्नानंतर स्वित्झर्लंडमधील झ्युरिच, न्यूझीलंडमधील ऑकलंड, जर्मनीतील म्युनिक आणि कॅनडातील व्हॅन्कुव्हर या शहरांचा समावेश आहे.
  • मर्सर क्वालिटी ऑफ लाईफ या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील २३० शहरांचा अभ्यास केला. हे अशा प्रकारचे १८वे सर्वेक्षण आहे.
  • यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
  • व्हिएन्ना शहराची लोकसंख्या १७ लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात. इतर शहरांची तुलनेत येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
  • एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले इराकची राजधानी बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.
  • या यादीत पहिल्या १०० शहरांत भारतातील एकाही शहराचा समावेश नाही, मात्र हैदराबाद १३९, पुणे १४४, बंगळुरु १४५, चेन्नई १५०, मुंबई १५२, कोलकाता १६० आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली १६१व्या क्रमांकावर आहे.
  • लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या जगप्रसिध्द शहरांना पहिल्या तीसमध्येही स्थान मिळवता आलेले नाही.

इस्माईल महंमद यांना फ्रान्स सरकारचा नाइटहूड किताब

  • आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल इस्माईल महंमद या भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांना फ्रेंच राजदूताने ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर’ हा किताब दिला.
  • फ्रान्स सरकारकडून १९५७ पासून हा किताब दिला जात आहे. कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कलाकारांना हा किताब दिला जातो.
  • अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते नाट्यलेखकही आहेत.

चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी


जीएसटीविषयक समितीच्या अध्यक्षपदी अमित मित्रा

  • वस्तू व सेवा करविषयक राज्यांच्या अर्थमंत्र्यांची कृती समितीचे अध्यक्ष म्हणून अमित मित्रा यांची नियुक्ती झाली आहे. 
  • पूर्वाश्रमीचे उद्योगपती मित्रा हे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) दाखल झाले होते. वस्तू व सेवा करासाठी केंद्र सरकार व राज्यांमधील संपर्क तसेच दोन पातळीवरील कर सामंजस्याकरिता ही समिती तयार करण्यात आली आहे. 
  • केरळाचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर या समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नोव्हेंबरपासून हे पद रिक्त होते.
  • मित्रा हे ‘फिक्की’ या उद्योग संघटनेचे काही वर्षे सरचिटणीस होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे शासन स्थापित होताच ते या पक्षात जाऊन राज्याचे अर्थमंत्रीही बनले.
  • मित्रा यांच्या रुपाने समितीवर चौथ्यांदा अध्यक्ष नेमण्यात आला आहे.

पाकिस्तान संसदचे संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर

  • पाकिस्तान संसदचे संपूर्ण कामकाज सौरऊर्जेवर चालविण्यात येत असून सौरऊर्जेवर कामकाज चालणारी ती जगातील पहिली संसद ठरली आहे.
  • पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अत्यंत साध्या समारंभात संसदच्या इमारतीमधील सौरऊर्जेची कळ दाबून ही सेवा सुरू केली.
  • राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन २०१४मध्ये करण्यात आली होती. यासाठी मित्र देश असलेल्या चीनकडून ५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.
  • संसदेमधील सौरऊर्जा प्रणाली ८० मेगावॉट ऊर्जानिर्मिती करणार आहे. संसदचे कामकाज चालण्यासाठी ६२ मेगावॉट विजेची गरज असून उर्वरित १८ मेगावॉट वीज राष्ट्रीय ग्रीडमध्ये देण्यात येणार आहे.

लावजीभाई बादशाह यांनी केले २०० कोटी रुपये दान

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिधान केलेला वादग्रस्त सूट ४.३१ कोटी रुपयांना खरेदी करणारे उद्योगपती लावजीभाई बादशाह यांनी देशातील १० हजार मुलींना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे, म्हणजेच एकूण २०० कोटी रुपये दान करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 
  • लावजीभाई हे सूरतमधील बडे हिरे व्यावसायिक आहेत. बांधकाम क्षेत्रातही त्यांचा दबदबा आहे. खासगी विमान कंपनीचे ते मालक आहेत.
  • येत्या १३ मार्चला सूरतमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात देशातील निवडक दहा हजार मुलींच्या पालकांना बोलावणार असून त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देणार असल्याचं लावजीभाईंनी सांगितले.
  • या आर्थिक मदतीमुळे गरीब, दुर्बल पालक आपल्या मुलींना चांगल्या पद्धतीने वाढवू शकतील, त्यांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च भागवू शकतील. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या केंद्र सरकारच्या योजनेसाठी दिलेला हा खारीचा वाटा असल्याचे ते म्हणाले.
  • गेल्या वर्षी त्यांनी गुजरातमधील पाटीदार समाजातील ५००० चिमुरड्या मुलींना त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बॉण्ड्स दिले होते. या मुली २१ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना ही रक्कम मिळणार आहे. त्यासाठीचा दोन कोटी रुपयांचा प्रीमिअम बादशाह यांनी भरला होता.

चालू घडामोडी : २२ फेब्रुवारी


आर-अर्बन मिशन

  • गावांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आर-अर्बन मिशन’ला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे २२ फेब्रुवारीपासून प्रारंभ केला.
  • या माध्यमातून ३०० गावांचा शहरांच्या धर्तीवर विकास केला जाणार असून, २०२२ पर्यंत गरिबांसाठी पाच कोटी घरे बांधली जाणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली.
  • पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचीही घोषणा केली. आजही पाच कोटी लोकांकडे स्वत:चे घर नाही. पैसे आणि जमीन नसल्याने त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही; पण प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

पामपोर चकमकीत पाच जवान शहीद

  • श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गजवळ गेल्या तीन दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले.
  • परंतु या चकमकीत कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन, जवान ओम प्रकाश, १४४ बटालियनचे जवान जी. डी. भोला प्रसाद, ७९ बटालियनचे कॉन्स्टेबल-चालक आर. के. रैना हे पाच जवान शहीद झाले.
  • या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
  • पामपोर येथे १९ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला. त्यानंतर दहशतवादी ईडीआयच्या इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश केला तेव्हा तेथे १०० नागरिक होते. सुरक्षा दलांनी प्रथम सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

कालबाह्य कायदे रद्द करण्याचा निर्णय

  • स्वातंत्र्यपूर्व काळात अमलात आलेले आणि आता कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय महराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
  • त्या अनुषंगाने राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र कोडअंतर्गत सध्या वापरात नसलेल्या सुमारे १७० कायद्यांची यादी बनवली आहे. ते कायदे रद्द करावेत की नाही, यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
  • हे काम अंतिम टप्प्यात असून आगामी अधिवेशनात कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्याचा विधी व न्याय विभागाचा मानस आहे. यापूर्वी १९८३ मध्ये काही निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले होते. 
  • हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास ‘महाराष्ट्र कोड’मधील निम्मे कायदे रद्द होतील.

जाट आरक्षणासाठी एम. वेंकय्या नायडू समिती

  • जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंकष अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
  • राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
  • गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते.
  • जाट आंदोलनामुळे व्यापार, वाहतूक ठप्प पडल्याने उद्योगजगताचे अंदाजे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा असोचॅम या उद्योग आणि वाणिज्य संघटनेने केला आहे.
  • बस, खासगी वाहने, रेल्वेस्थानक, पोलीस ठाणे, मॉल आणि अनेक हॉटेलची जाळपोळ करण्यात आल्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे या संघटनेने नमूद केले आले.

भारतातील वायु प्रदुषणाची पातळी चीनपेक्षा जास्त

  • जागतिक हवामानबदल व पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेने २०१५ या वर्षात  भारतामधील वायु प्रदुषणाची पातळी ही चीनपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे. 
  • ग्रीनपीसच्या विश्लेषकांनी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाच्या माहितीच्या विश्लेषणानंतर हा निष्कर्ष काढला आहे.
  • चीनने वायुप्रदुषण आटोक्यात आणण्यासाठी राबविलेल्या कठोर उपाययोजनेमुळे येथील हवेमध्ये सुधारणा झाली; तर याउलट भारतामधील वायुप्रदुषणाने गेल्या दशकभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे. 
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, जगातील सर्वाधिक प्रदुषित २० शहरांपैकी १३ शहरांचा केवळ भारतामध्येच समावेश असल्याचे ग्रीनपीसने सांगितले आहे.

देशामध्ये सर्वाधिक बेरोजगार ख्रिश्चनधर्मीय

  • देशामध्ये सर्वाधिक बेरोजगार ख्रिश्चनधर्मीयांमध्ये असल्याचे केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ख्रिश्चनांच्या खालोखाल मुस्लिम धर्मीयांमध्ये बेरोजगार असल्याचे हा अहवाल सांगतो. 
  • २०११-१२ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भारतात ख्रिश्चन धर्मीयांमध्ये बेरोजगारीचा दर ४.५ टक्के इतका असून शहरी भागात तो ५.९ टक्के आहे.
  • मुस्लिमांमध्ये ग्रामीण भागात ३.९ टक्के, तर शहरी भागात २.६ टक्के इतकी बेरोजगारी आहे. ग्रामीण भागात सर्वधर्मीयांमध्ये बेरोजगारी वाढल्याचे या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.
  • २००४-०५ साली ग्रामीण भारतात सर्वसाधारण बेरोजगारीचा दर १.६ टक्के इतका होता. २०११-१२ मध्ये हा दर १.७ टक्के इतका झाल्याचे हे सर्वेक्षण करणाऱ्या नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशन (एनएसएसओ) या संस्थेने म्हटले आहे.
  • बेरोजगारीचे प्रमाण अधिक असले, तरी देशात सर्वाधिक पदवीधरही ख्रिश्चनधर्मीयांमध्ये असल्याचे हा अहवाल सांगतो. शहरी भागामध्ये शीखांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे १.३ टक्के इतके असून हिंदू धर्मीयांमध्ये हे प्रमाण ३.३ टक्के इतके आहे.
  • शहरांमध्ये स्वयंरोजगार कमावणाऱ्या पुरुषांमध्ये मुस्लिम आणि शीखांचे प्रमाण सर्वाधिक ५२.८ टक्के, तर महिलांमध्ये मुस्लिंमांचे प्रमाण सर्वाधिक ६१.३ टक्के इतके आहे.
  • नोकरदार वर्गामध्ये पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाण ख्रिश्चनांचे (४९.४ टक्के) असून महिलांमध्ये ख्रिश्चन नोकरदार (६४.७ टक्के) सर्वाधिक आहेत.

मोदींनी ‘बीएचयू’ची पदवी नाकारली

  • बनारस हिंदू विद्यापीठाने देऊ केलेली डॉक्टरेट ही पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाकारली आहे. अशा पदव्या स्वीकारणं, आपल्या धोरणामध्ये बसत नसल्याचे सांगत मोदी यांनी ही पदवी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला आहे.
  • याआधीही मोदींनी अशा प्रकारचा बहुमान स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. अमेरिकेमध्ये २०१४मध्ये मोदी गेले असता, लुईसियाना विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देण्याची ईच्छा व्यक्त केली होती.
  • गुजरातमध्ये महिलांच्या व अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट देण्याचा लुईसियाना विद्यापीठाचा मानस होता. परंतु, मोदींनी त्यांनाही नकार दिला होता.
  • तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदाने गौरवण्याचे प्रस्ताव आले होते, जे मोदींनी धोरणात्मक निर्णय म्हणून नाकारले होते.

‘फायर अ‍ॅट सी’ला गोल्डन बेअर पारितोषिक

  • युरोपमधील निर्वासितांच्या समस्येचे भीषण चित्रण असलेल्या ‘फायर अ‍ॅट सी’ या माहितीपटाने बर्लिन चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे सर्वोच्च पारितोषिक पटकावले आहे.
  • गेल्या दोन दशकांपासून युरोपात स्थलांतराच्या प्रयत्नात भूमध्य महासागरातील लॅम्पेडुसा या बेटावर आलेल्या हजारो लोकांच्या जीवनाचे चित्रण इटलीचे चित्रपट दिग्दर्शक गियानफ्रँको रोसी यांनी या माहितीपटात केले आहे.

चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी


नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर

    Narendra Modi KP Oli meet
  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सहा दिवसांच्या भारतभेटीसाठी आले आहेत. पदावर आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
  • ओली यांच्याबरोबर ७७ सदस्यांचे एक शिष्टमंडळही असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्वांचे विमानतळावर स्वागत केले.
  • मधेशींच्या आंदोलनामुळे सध्या दोन्ही देशांत काहीसे तणावाचे संबंध आहेत. तत्कालीन पंतप्रधान बाबूराम भट्टराय यांनी २०११ मध्ये भारताला भेट दिली होती, तर सुशील कोईराला पंतप्रधानपदी असताना मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमास आले होते.
  • यावेळी भारत आणि नेपाळदरम्यान विविध क्षेत्रांशी निगडित सात करारांवर सह्या करण्यात आल्या. 
  • सर्व बाजूंनी भूप्रदेशाने वेढलेल्या नेपाळला भारतातील विशाखापट्टणमसह काही बंदरे व्यापारासाठी खुली करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
  • याशिवाय भूकंपामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी डॉलर, रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, दोन्ही देशांमधील संगीत आणि नाटक अकादमींमध्ये करार, बांगलादेशमार्गे दळणवळण व्यवस्था निर्माण करणे या बाबींचा या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे.
  • ओली यांच्या उपस्थितीत मुझफ्फरपूर-धालकेबार वीज पारेषण मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले. यामुळे नेपाळला तत्काळ ८० किलोवॉट वीज मिळणे सुरू झाले आहे.

खवले मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर

  • ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड डाटा बुक’नुसार नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आला आहे.
  • खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. मांस, चिनी औषधे व बुलेट प्रुफ जॅकेटसाठी जगभर त्याची हत्या होत आहे. ही प्रजाती अत्यंत धोक्यात आली आहे.
  • महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात आढळणाऱ्या खवले मांजराला वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
  • दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक खवले मांजर दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी २० फेब्रुवारी रोजी ‘जागतिक खवले मांजर दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
 खवले मांजर 
  • मुंगुसासारखा दिसणारा पण खवले असणारा हा प्राणी साधारणत: सर्व प्रकारच्या जंगलात आढळतो. फेलिडोटा कुटुंबातील हा प्राणी असून, तो निशाचर आहे. खवले मांजर हा खवले असणारा एकमेव सस्तन प्राणी आहे.
  • तो मांसाहरी वर्गातील असून वाळवी, मुंग्या व वारुळात राहणारे इतर जीव हे त्याचे मुख्य खाद्य असते. खवले मांजराला दात नसल्यामुळे ते खाण्यासाठी १० ते १२ इंच लांब जिभेचा उपयोग करते.
  • खवले मांजर वर्षभरात ७० ते ८० कोटी ककडे वर्षभरात खाते आणि निसर्गचक्राचा तोल सांभाळते. खवले मांजरापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
  • भारतीय खवले मांजराची लांबी (डोके व धड) ६०-७५ सेंटीमीटर असते. शेपूट ४५ सेंटीमीटर लांब असते. डोके लहान, तोंड लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. भारतीय खवले मांजर साधारणत: ८ ते ३५ किलोपर्यंत वाढते.
  • त्याच्या अंगावर असलेले खवले हे किराटीन नामक द्रव्यापासून तयार होतात. पाय, पोट, कपाळ असा काही भाग सोडल्यास संपूर्ण अंगभर हे खवले असतात. धोक्याची जाणीव होताच खवले मांजर स्वत:च्या शरीराचा गोल भाग करून घेते. यामुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते.
  • खवले मांजराच्या अशिया खंडात चार आणि आफ्रिकेत चार अशा आठ प्रजाती सापडल्या आहेत. भारतीय खवले मांजर हिमालयाच्या दक्षिणेस मैदानी प्रदेशात व डोंगरांच्या उतरणीवर, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळते.

फिजी देशास विन्स्टन वादळाचा फटका

  • प्रशांत महासागरामधील द्वीपकल्प असलेल्या फिजी देशास विन्स्टन या अत्यंत शक्तिशाली वादळाचा फटका बसला असून, या वादळात आतापर्यंत १० जणांचे निधन झाले आहे.
  • फिजीच्या इतिहासामधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असून यामुळे देशातील हजारो घरे अक्षरश: उध्वस्त झाली. याचबरोबर, देशामधील काही गावे पूर्णत: उध्वस्त झाली आहेत.
  • विन्स्टनमुळे वाहिलेल्या वाऱ्यांचा वेग ताशी ३२० किमीपेक्षाही जास्त होता; तसेच किनारपट्टीवर सुमारे १२ मीटर (४० फुट) उंचीच्या लाटा उसळल्या.

इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे निधन

  • प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचे १९ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते.
  • अम्बेर्टो इको यांची ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी खुप गाजली होती. अम्बेर्टो इको त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी नेहमीच वाचकांच्या आठवणीत राहतील.
  • त्यांनी लिहिलेल्या ‘फाउकॉल्ट्स पेन्डुलम’, ‘द आइलँड ऑफ द डे बिफोर’, ‘बाउदोलिनो’ आणि ‘द प्राग सेमेटरी’ या कादंबऱ्या खुपच लोकप्रिय झाल्या.
  • मात्र ‘द नेम ऑफ द रोज’  या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. ‘द नेम ऑफ द रोज’ या कादंबरीच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. याच कादंबरीवर आधारीत १९८६मध्ये चित्रपटदेखील बनवण्यात आला होता.

चालू घडामोडी : २० फेब्रुवारी


कालिखो पुल अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री

  • कॉंग्रेसचे बंडखोर नेते कालिखो पुल यांनी अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. पी. राजखोवा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • राज्यातील राष्ट्रपतीराजवट उठल्यानंतर काही तासांतच पुल यांचा शपथविधी झाला. पुल यांनी याआधी राज्याचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.  
  • सध्याच्या पुल सरकारला भारतीय जनता पक्षाचे ११, अपक्ष दोन आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा पाठिंबा आहे.
  • राज्य विधानसभेत ६० सदस्य असून, काँग्रेसचे ४७ सदस्य आहेत. त्यातील २१ सदस्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्यातील १४ जणांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

इस्रोची स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वीपणे घेतली आहे. क्रायोजेनिक सीई २० असे या इंजिनाचे नाव आहे.
  • महेंद्रगिरी येथे घेण्यात आलेली ही चाचणी ६४० सेकंदांची होती. जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकासाठी हे इंजिन वापरले जाणार आहे.
  • या इंजिनाच्या अल्पावधीच्या दोन चाचण्या यापूर्वी यशस्वी झाल्या आहेत. मिक्स्श्चर रेशो कंट्रोलरसह ही चाचणी केली आहे. या चाचणीमुळे भारतीय अवकाश संशोधनाच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळणार आहे.
  • इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार

मॅकलमचे कसोटीमधील सर्वात वेगवान शतक

    Brendon McCullum Fastest Test Century
  • न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकलमने ५४ चेंडूत शतक झळकावित कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करण्याचा मान मिळविला आहे. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही आपल्या नावावर नोंदविला.
  • ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना मॅकलमच्या कारकिर्दीतील १०१वा व अखेरचा सामना आहे.
  • या सामन्यात मॅकलमने आपल्या आक्रमक शैलीत ५४ चेंडूत १६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवताना ७९ चेंडूत २१ चौकार व ६ षटकारांसह १४५ धावा केल्या. 
  • मॅकलमने वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा उल हक यांचा यापूर्वीचा ५६ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला.
  • रिचर्ड्स यांनी १९८५-८६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ५६ चेंडूंत शतक केले होते. त्यांचा हा विक्रम गेल्या ३० वर्षांत कुणालाही मोडता आला नव्हता. मिस्बाहने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात या विक्रमाशी बरोबरी केली होती. 
  • याबरोबरच मॅकलमने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मोडला आहे. त्याने आत्तापर्यंत १०६ षटकार मारले आहेत. हा विक्रम याआधी १०० षटकार मारणाऱ्या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.
  • याशिवाय मॅकलमने  न्यूझीलंडतर्फे अखेरच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमावरही त्याने नाव कोरले.
  • मॅकलमने कसोटी कारकिर्दीत १२ शतके झळकाविली आहेत. त्यामध्ये एका त्रिशतकाची समावेश आहे. मॅकलमने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होत आहे.

द प्रेसिडेंन्शिअल अर्ली करिअर अॅवॉर्ड

  • अमेरिकेतील तरुण संशोधकांसाठीच्या सर्वोच्च अशा ‘द प्रेसिडेंन्शिअल अर्ली करिअर अॅवॉर्ड’साठी सहा भारतीय वंशाच्या संशोधकांची निवड झाली आहे.
  • स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या एकूण १०६ युवा संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार होणार करण्यात येईल.
  • युवावस्थेतच संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
निवड झालेले सहा भारतीय
मिलिंद कुलकर्णी पर्ड्यू विद्यापीठ
किरण मुसुनुरू हार्वर्ड विद्यापीठ
सचिन पटेल वॅंडरबिल्ट विद्यापीठ
विक्रम श्याम नासा
राहुल मंगारम पेनसिल्वानिया विद्यापीठ
श्वेतक पटेल वॉशिंग्टन विद्यापीठ

प्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती

  • दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ (एआयआर)चे प्रसारण करणाऱ्या प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • ती नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्धवेळ सदस्य राहणार आहे. प्रसार भारतीची २४ फेब्रुवारीला बैठक होणार असून, या बैठकीला काजोल उपस्थित राहील. 

उत्तर कोरियावर आणखी र्निबध

  • उत्तर कोरियाने अलीकडेच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी तसेच उपग्रह सोडण्याच्या नावाखाली केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी या दोन घटनांमुळे त्या देशावर आणखी र्निबध जारी करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली आहे.
  • दक्षिण कोरिया, फिलिपीन्स व जपान हे देश उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांनी संतप्त झालेले आहेत. त्याशिवाय अमेरिकेनेही तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
  • ओबामा यांनी उत्तर कोरियाविरोधात अमेरिकी काँग्रेसने मंजूर केलेल्या दंडात्मक उपायांच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार त्या देशाला महासंहारक अस्त्रे तयार करण्याची सामग्री व तंत्रज्ञान निर्यात तसेच आयात करणाऱ्या देशांवर कारवाई होऊ शकते.
  • चीनने उत्तर कोरियाविरोधी कारवाईत जागतिक समुदायाला पाठिंबा देण्यात कुचराई केली आहे, त्यामुळे उत्तर कोरिया विरोधातील कारवाईत सुरक्षा मंडळातच मतैक्य नाही असे चित्र समोर आले आहे.

पुलित्झर विजेत्या नेली हार्पर ली यांचे निधन

  • ‘टू कील अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीसाठी पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
  • अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या १९४९ मध्ये न्यूयॉर्कला गेल्या. जुलै १९६० मध्ये त्यांच्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. या पुस्तकावर १९६२ मध्ये चित्रपटही निघाला.
  • या पुस्तकाचा ‘गो सेट अ वॉचमन’ नावाचा दुसरा भाग २०१५ साली प्रसिद्ध झाला होता.

चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी


शेतमालासाठी डिजिटल बाजार

  • शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना आपला माल देशभरात कुठल्याही बाजारपेठेत विकता येईल, असा डिजिटल प्लॅटफॉर्म येत्या १४ एप्रिलला म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
  • सरकार राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय कृषी बाजारपेठ सुरू करत असून ती प्रत्यक्ष आणि डिजिटल अशी दोन्ही स्वरूपात असेल. 
  • या प्लॅटफॉर्मवरून शेतकरी मोबाइल फोनचा वापर करून आपला शेतमाल चांगल्या भावात देशभरातील बाजारपेठांपर्यंत पोहचवू शकतील.
  • 'ई अॅग्री' प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत २०१८पर्यंत देशभरातील ५८५ कृषी उत्पन्न बाजार समित्या टप्प्याटप्प्याने जोडल्या जाणार असून त्यासाठी आत्तापर्यंत २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • येत्या मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात २०० बाजार समित्या जोडल्या जातील, तर २०१७ पर्यंत २०० आणि २०१८ पर्यंत उरलेल्या बाजार समित्या जोडल्या जाणार आहेत. 

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा समारोप

  • देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित समारोप झाला.
  • या सप्ताहात स्मार्ट सिटी, पायाभूत सेवासुविधा, कृषी, वाहन, संरक्षण या क्षेत्रांत १५.२ लाख कोटींची गुंतवणूक झाली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्राने मिळविली आहे. त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांना गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश आले.
  • मेक इन इंडिया सप्ताहात महाराष्ट्र राज्य सरकारने २५९४ सामंजस्य करार केले. यातून राज्यात ७.९४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, तीस लाख रोजगार निर्माण होतील.
  • एकूण करारांपैकी २०९७ करारांमुळे मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांना चालना मिळणार आहे. एकूण गुंतवणुकीच्या ३० टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांकडून आली आहे.
  • एमएमआरडीए मैदानावर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश

  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांनी भारत विरोधी घोषणा दिल्याने मोठे वादळ उठले असताना केंद्र सरकारने देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश जारी केले आहेत.
  • स्मृती इराणी यांच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. सर्व विद्यापीठांसाठी हा आदेश बंधनकारक आहे. झेंड्यासाठी २०७ फूट उंच खांब असावा आणि १२५ किलो वजनाचा तिरंगा असावा, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा झेंडा कायमस्वरूपी फडकवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे.
  • देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहावी, यासाठी इराणी यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे याची सुरुवात दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठातून करावी, असे या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले.
  • कुलगुरूंच्या या बैठकीमध्ये बिहार विद्यापीठाचे कुलगुरु हरीशचंद्र सिंह राठौर यांनी हा प्रस्ताव मांडला. यावेळी ४६ केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसह मंत्री स्मृती इराणी यासुद्धा सहभागी झाल्या होत्या.

तामिळनाडूमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना

  • तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजनेची घोषणा केली आहे. सुरवातीला ही योजना चेन्नईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून, त्यानंतर प्रतिसाद पाहून ती संपूर्ण राज्यात लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
  • या योजनेनुसार राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक सरकारी बससेवेचा मोफत लाभ घेऊ शकणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला जयललिता यांचा वाढदिवस असून, त्या दिवसापासून ही योजना कार्यान्वित होईल.
  • २०११च्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जाहीरनाम्यातील वचनपूर्ती करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्या.

अरुणाचलमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

  • अरुणाचलमधील स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आपला यापूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने तेथे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
  • अरुणाचल विधानसभेतील काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांची अपात्रता गुवाहटी हायकोर्टाने कायम ठेवण्याच्या निर्णयावर आम्ही समाधानी असून अरुणाचलमध्ये जैसे थे स्थिती ठेवण्याबाबत आम्ही यापूर्वी दिलेला निर्णय रद्द करत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
  • ६० सदस्यांच्या अरुणाचल विधानसभेत काँग्रेसचे ४७ तर भाजपचे ११ आमदार आहेत. मात्र काँग्रेसच्या २१ आमदारांनी बंडखोरी केल्याने नाबाम तुकी यांचे सरकार अल्पमतात गेले.
  • या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने २६ जानेवारीला अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांपैकी १४ जणांना विधानसभेचे अध्यक्ष नाबाम रेबिया यांनी अपात्र ठरवल्याने यातील गुंता वाढला आहे.

उस्ताद अब्दुल राशिद खान यांचे निधन

  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान यांचे १८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०७ वर्षांचे होते.
  • खान यांना २०१३मध्ये पद्भभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
  • अब्दुल रशीद खान गेली २० वर्षे आयटीसी संगीत अकादमीत संगिताचे निवासी गुरु होते. प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांचे अध्यापनाचे कार्य अव्याहतपणे सुरु होते.

मेस्सीचे ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ३०० गोल

  • बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनाल मेस्सी याने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ३०० गोलचा टप्पा पार केला. स्पोर्टिंग गिनोज संघाला ३-१ असे हरविताना त्याने २ गोल केले. ला लिगामध्ये ३०० गोल करणारा मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे.
  • सामन्याच्या २५व्या मिनिटाला मेस्सीने नोंदविलेला गोल हा त्याचा ला लिगामधील ३००वा गोल ठरला. मेस्सीचा हा ३३४वा ला लिगा सामना होता. आता त्याचे ३०१ गोल झाले आहेत.

चालू घडामोडी : १८ फेब्रुवारी


सचिनच्या आत्मचरित्राचा लिम्का बुकमध्ये समावेश

    Playing it my way
  • सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचिरित्र कथा (फिक्शन) आणि गैरकथा (नॉन फिक्शन) प्रकारात सर्वात जास्त विकले गेलेले (बेस्टसेलर) पेपरबॅक पुस्तक बनल्यामुळं त्याची नोंद ‘लिम्का बूक ऑफ रेकॉड्स’मध्ये झाली आहे.
  • सचिनच्या आत्मचित्रानं डॅन ब्राउन यांचे ‘इनफर्नो’, वॉल्टर इसाकसन यांचे ‘स्टीव्ह जॉब्स’ आणि जे. के. रॉलिंग यांचे ‘कॅज्युअल व्हॅकेन्सी’ यांना मागे टाकत सर्वोच्च स्थान प्राप्त केले.
  • हे पुस्तक ६ नोव्हेंबर २०१४ ला हॅचेट इंडियाने पब्लिश केले. तसेच या आत्मचरित्रासाठी सचिन तेंडुलकर शिवाय क्रिकेट एक्सपर्ट बोरिया मजूमदार यांनीही लेखन केले आहे.
  • या आत्मचरित्रासाठी पहिल्याच दिवशी आलेली मागणी आणि लाइफटाइम विक्री अशा दोन्ही प्रकारांमध्ये हे आत्मचरित्र सर्वात पुढे आहे. अत्तापर्यंत ‘प्लेइंग इट माय वे’च्या तब्बल १ लाख ५० हजार २८९ विकल्या गेल्या आहेत.
  • सचिनच्या आत्मचरित्राने किरकोळ विक्रीमूल्यामध्ये देखील रेकॉर्ड बनवले असून त्याची किंमत ८९९ रूपये इतकी आहे. या विक्रीतून तब्बल १३ कोटी ५१ लाख रूपयांची कमाई झाली आहे.

अमेरिकेकडून भारत घेणार हॉवित्झर तोफा

    155mm M777 Howitzer
  • बीएई सिस्टिम्सने भारतीय कंपनी महिंद्राशी ‘एम ७७७ हॉवित्झर’ तोफांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, १४५ तोफांचा हा करार सुमारे ७० कोटी डॉलरचा असणार आहे.
  •  ‘एम ७७७ हॉवित्झर’ या तोफांची दुरुस्ती, सुटे भाग आणि दारूगोळा भारतीय कंपनीसोबत भागीदारीत भारतातच उत्पादित करण्यात येणार आहे.
  • भारतीय लष्कराला १४५ ‘एम ७७७ हॉवित्झर’ तोफा खरेदी करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली होती. बीएईने भारतातील ‘असेंब्ली, इंटिग्रेशन ऍण्ड टेस्ट’ केंद्रासाठी महिंद्रा कंपनीची निवड केली आहे.
 हॉवित्झर तोफची वैशिष्ट्ये 
  • हॉवित्झर तोफचे वजन इतर तोफच्या तुलनेत कमी असते. तोफची निर्मित्ती करण्यासाठी टाइटेनियमचे वापर करण्यात येतो. या तोफमध्ये २५ किलोमीटर अंतरावरील शस्त्रूचा वेध घेण्याची क्षमता आहे.
  • चीनशी दोनहात करण्यासाठी ही तोफ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

व्हेनेझुएलाने केले चलनाचे अवमूल्यन

  • व्हेनेझुएलाने सरकारी चलन बोलिव्हरचे ३७ टक्के अवमूल्यन केले असून, कच्च्या तेलाच्या भावात घसरण होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ‘ओपेक’ देशांनी सुरू केलेल्या उपाययोजनांचा हा भाग आहे.
  • याआधी अमेरिकी डॉलरचा भाव ६.३ बोलिव्हर होता. तो आता १० बोलिव्हरपर्यंत जाणार आहे. हा भाव कायम बदलत राहणार असून, तो जीवनावश्यक वस्तू आणि औषधांसाठी लागू राहणार आहे.
  • व्हेनेझुएलाची ९५ टक्के अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या भावातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याने सरकारने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. तसेच, देशात प्रथमच २० वर्षांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
  • ‘ओपेक’ तेल उत्पादक देशांची संघटना आहे. कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील १९ महिन्यांपासून घसरण होत आहे.
  • त्यातच इराणवर आण्विक कार्यक्रमामुळे लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले आहेत. यामुळे इराणकडून पुरवठ्यात वाढ झाल्याने भावात सातत्याने घसरण होत आहे. याचा परिणाम म्हणून ‘ओपेक’ सदस्य देशांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
  • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष : निकोलाय मडुरो

केवळ २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन

  • रिंगिंग बेल या नोएडास्थित मोबाइल उत्पादक कंपनीने ‘फ्रीडम २५१’ या सर्वांत स्वस्त स्मार्टफोनचे दिल्लीत लॉंचिंग केले. नावाप्रमाणेच सर्वांनाच स्मार्टफोन वापरण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून, याची किंमत केवळ २५१ रुपये (४ डॉलर) आहे.
  • दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या फोनचे अनावरण केले. ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत फोनची डिलेव्हरी देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  • या फोनमध्ये वुमन सेफ्टी, स्वच्छ भारत यांसारखी अनेक अॅप्स प्रीलोडेड असून, एक वर्षांची वॉरंटी आहे. कंपनीची ६५० सर्व्हिस सेंटर आहे.
  • फ्रीडम २५१ साठी रिंगिंग बेल या कंपनीने www.freedom251.com ही स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे.