मंगळवार, ३१ मे, २०१६

चालू घडामोडी : ३१ मे

सीएट क्रिकेट पुरस्कार २०१५-१६

  • मुंबईत झालेल्या सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार २०१५-१६ सोहळ्यात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना सुनील गावस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले.
  • यावेळी विराट कोहलीला सर्वोत्तम टी-२० खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. इंग्लंडचा फलंदाज जो रूटला वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार देण्यात आले.
  • रोहित शर्मा व आर. आश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • अजिंक्य रहाणेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला वर्षांतील सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार अनुक्रमे केन विल्यमसन आणि मार्टिन गप्तील यांना मिळाले.
  • या कार्यक्रमादरम्यान वेंगसरकर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि आॅस्टे्रलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी सीएट ड्रीम टीमचीही निवड केली. या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड झाली.

यूपीएससीच्या सदस्यपदी बी. एस. बस्सी

  • दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी. एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आप सरकारबरोबर वारंवार खटके उडाल्यानंतर आता या घटनात्मक जागेवर बस्सी पुढील पाच वर्षे कार्यरत राहणार आहेत. 
  • ६० वर्षीय बस्सी आता यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील. ते अरुणाचल प्रदेश गोवा आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या १९७७च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत.
  • फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.

उपराष्ट्रपती मोरोक्को आणि ट्यूनिशिया दौऱ्यावर

  • उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्यूनिशिया या आफ्रिकन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा ३० मे रोजी प्रारंभ झाला. त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचा समावेश आहे.
  • गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये दिल्लीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर परिषदेतून आफ्रिकन देशांसोबत निर्माण झालेल्या सौहार्द्रपूर्ण संबंधाचा राजनैतिक पातळीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न या भेटीतून होणार आहे.
  • मोरोक्कोचे पंतप्रधान अब्देलीलाह बेन्किरेन यांच्या निमंत्रणावरून भारताचे उपराष्ट्रपती ५० वर्षांनंतर प्रथमच या दोन देशांना भेट देत आहेत.
  • तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये या आफ्रिकन देशाचा केलेला दौरा पहिली उच्चस्तरीय भेट ठरली होती.
  • दिल्लीत आयोजित शिखर परिदेला मोरोक्कोचे राजे मोहम्मद (सहावे) हे भारताचे पहिले अधिकृत आफ्रिकन पाहुणे ठरले होते.
  • आधुनिक इतिहासात भारत-आफ्रिकन नेत्यांची सर्वात मोठी राजकीय परिषद म्हणून या शिखर परिषदेची नोंद झाली.

सुझुकी मोटर्सचा गुजरातमध्ये प्रकल्प

  • जपानची कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सचा संपूर्णत: स्वत:च्या मालकीचा गुजरातमधील प्रकल्प पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पावर कंपनीने १८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • सुझुकीच्या स्वत:च्या मालकीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. कंपनीच्या भारतातील शाखेला बाजूला सारून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
  • या प्रकल्पातून मारुती सुझुकीला गाड्या आणि सुटे भाग पुरविण्यात येणार आहेत. भारत या कंपनीसाठी सर्वांत मोठा बाजार आहे.
  • पहिल्या टप्प्यात गुजरातमधील प्रकल्पात वर्षाला २,५०,००० वाहने तयार करण्यात येतील. २०२२पासून सुझुकीचे भारतातील कार उत्पादन २ दशलक्ष युनिटवर पोहोचेल. सध्या ते १.४ दशलक्ष युनिट इतके आहे.
  • भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीमध्ये सुझुकी मोटर्सची हिस्सेदारी ५६ टक्के आहे.

सोमवार, ३० मे, २०१६

चालू घडामोडी : ३० मे

सनरायझर्स हैदराबाद आयपीएलचे विजेते

  • फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पराभूत करत आयपीएलच्या नवव्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
  • हैदराबादने प्रथम फलंदाजी करून २०८ धावा उभारल्यानंतर त्यांनी बँगलोरला २०० धावांवर रोखले. त्यामुळे २००९ व २०११ नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • आयपीएलच्या नवव्या सत्राचा हा अंतिम सामना २९ मे रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला.
  • कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, तर युवराज सिंग व बेन कटिंग यांनी केलेला तुफानी हल्ला या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बँगलोरला २०९ धावांचे मजबूत आव्हान दिले.
  • गेलच्या केवळ ३८ चेंडूंत ७६ धावा व कोहलीच्या ३५ चेंडूंत ५४ धावांव्यतिरिक्त बँगलोरचे इतर फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना २०० धावांपर्यंतच मजल गाठता आली.
 आयपीएल : ९ 
  • विजेता : सनरायजर्स हैदराबाद
  • उपविजेता : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
  • ऑरेंज कॅप : विराट कोहली (धावा : ९७३)
  • पर्पल कॅप : भुवनेश्वर कुमार (विकेट्स : २३)
  • सर्वाधिक झेल : एबी डी’व्हिलियर्स (झेल : १९)

‘आयपीएल’चे आतापर्यंतचे विजेते
वर्ष विजेता उपविजेता
२०१६ सनरायजर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२०१५ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१४ कोलकाता नाईट राईडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१३ मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१२ कोलकाता नाईट राईडर्स चेन्नई सुपर किंग्ज
२०११ चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२०१० चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स
२००९ डेक्कन चाजर्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
२००८ राजस्थान रॉयलर्स चेन्नई सुपर किंग्ज

सॉफ्टबॅंक भारतात १० अब्ज डॉलर गुंतवणूक

  • जपानमधील दूरसंचार आणि इंटरनेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॉफ्टबॅंक भारतात १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक आगामी ५ ते १० वर्षांत करणार आहे.
  • भारतातील सौरऊर्जा प्रकल्पामध्ये पहिल्यांदा ३५० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येईल. 
  • आतापर्यंत कंपनीने २ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, आणखी गुंतवणूक करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.
  • सॉफ्टबॅंक ही जपानमधील आघाडीची मोबाईल सेवा कंपनी आहे. अमेरिकेतील स्प्रिंट कॉर्पोरेशनमध्ये तिची भागीदारी आहे.
  • गेल्या वर्षी कंपनीने भारती एंटरप्रायझेस आणि तैवानमधील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप यांच्याशी एकत्रितपणे २० अब्ज डॉलरचा २० गिगावॉटचा अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

फिनमेक्कानिकाबरोबरील सर्व संरक्षण करार रद्द

  • ऑगस्टा-वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरीची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ही हेलिकॉप्टर बनविणारी कंपनी फिनमेक्कानिकाबरोबरील सर्व प्रकारचे संरक्षण करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्याचबरोबर सरकारने फिनमेक्कानिका आणि या कंपनीच्या नियंत्रणाखालील अन्य कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
  • एखाद्या कंपनीला काळ्या यादीत टाकल्यानंतर ती कंपनी पुढील अनेक वर्षे संबंधित देशात भांडवल खरेदी करू शकत नाही. 
  • फिनमेक्कानिका आणि तिच्या नियंत्रणाखालील कंपन्यांबरोबरचे खरेदीसंबंधीचे सर्व करार रद्द केले जाणार असून, कोणताही नवा संरक्षण करार केला जाणार नाही.
  • फिनमेकॅनिका व उपकंपन्यांची भांडवल खरेदी बंद करण्यात आली आहे. सुट्या भागांची आयात व निगा दुरुस्ती हे काम कंपनीकडे आधीच दिलेले काम तूर्त कायम ठेवण्यात आले आहे.
 रद्द केले जाणारे करार 
  • सरकारने यापूर्वीच डब्ल्यूएसएस कंपनीबरोबरचा स्कॉर्पिन पाणबुड्यांसाठी अवजड टॉरपीडो (पाणतीर) खरेदी करण्याचा करार रद्द केला आहे.
  • याविषयीचा करार कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात झाला होता. डब्ल्यूएसएस ही फिनमेक्कानिकाच्या नियंत्रणाखालील कंपनी आहे.
  • ओटोमेलारा ही फिनमेकॅनिकाची कंपनी असून १२७ एमएमच्या त्यांच्या तोफा या नौदल प्रशिक्षण शाळांसह अनेक नौदलतळांवर तैनात केल्या जाणार होत्या.
  • सेलेक्स इएस ही फिनमेकॅनिकाची उपकंपनी रडारचाही पुरवठा करणार होती, ते कोचिन शिपयार्डवरील विमानवाहू युद्धनौकावर बसवले जाणार होते.

भारताच्या पोलाद उत्पादनात वाढ

  • पोलाद उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताची लवकरच सर्वाधिक पोलाद आयात करणाऱ्या ‘टॉप टेन’ देशांत गणना होण्याची चिन्हे असल्याचे ‘वर्ल्ड स्टील असोसिएशन’ने (डब्ल्यूएसए) म्हटले आहे.
  • २०१५मध्ये भारत आणि चीनने अनुक्रमे १.३३ कोटी टन आणि १.३२ कोटी टन पोलादाची आयात केली.
  • ‘डब्ल्यूएसए’च्या आकडेवारीनुसार २०१५पर्यंत युरोपीय संघाने एकूण ३.७७ कोटी टन पोलादाची आयात करून अग्रक्रम पटकावला.
  • केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात पोलाद आयातीमध्ये २५.६ टक्क्यांची वाढ होऊन ते १.१७ कोटी टनांवर पोहोचले आहे.
  • याच वर्षात भारताने ७० लाख टन पोलादाची निर्यातही केली. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९३ लाख टन पोलादाची आयात करण्यात आली होती.

रविवार, २९ मे, २०१६

चालू घडामोडी : २९ मे

इलेक्ट्रॉनिक धोरण तयार

  • किमान मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करण्याच्या उद्योगाला केंद्र सरकार करसवलत देणार आहे. भारतातील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला १० वर्षांसाठी करसवलत देण्यात येणार आहे.
  • इलेक्ट्रॉनिक उद्योगांची स्थिती सुधारावी, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा तसेच या क्षेत्रात मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन सुरू होऊन निर्यातीला चालना मिळावी अशा विविध उद्देशांनी नीती आयोगाने इलेक्ट्रॉनिक धोरण तयार केले आहे.
  • हे धोरण दोन स्तरांवर आखण्यात आले आहे. यामध्ये एका स्तरावर देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात कशी वाढेल तर, दुसऱ्या स्तरावर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आयात कमी कशी करता येईल यावर भर देण्यात येणार आहे.
  • या धोरणात भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना जागतिक स्पर्धेशी टक्कर देता येण्याजोगे बनवण्यात येणार आहे.
  • तसेच आयात कमी करण्यासठी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने देशातच तयार करण्यासाठी या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • इलेक्ट्रॉनिक उद्योगात एक अब्ज डॉलर गुंतवणूक करणाऱ्या व २० हजार लोकांना रोजगार देणाऱ्या कंपनीला १० वर्षांची करसवलत देण्याचा विचार या धोरणामध्ये मांडण्यात आला आहे.

सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

  • भारताची आशियाई सुवर्णपदक विजेती थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. 
  • कॅलिफोर्नियातील (अमेरिका) सॅलिनास येथे चालू असलेल्या पॅट यंग्स थ्रोवर्स क्लासिक २०१६ स्पर्धेत तिने हे निकष पूर्ण केले.
  • रिओ ऑलिम्पिकसाठी ६१ मीटर अंतर हे निकष आहेत. ३२ वर्षीय सीमाने ६२.६२ मीटर थाळी फेकण्याची किमया साधली.
  • सीमाने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम साधताना अमेरिकेच्या स्टेफनी ब्राऊन-ट्रॅफ्टनला मागे टाकले. स्टेफनीने २००८मध्ये देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • सीमा यंदा तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. याआधी २००४ आणि २०१२मध्ये ती ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती.
  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी क्रीडा प्रकारांसाठी पात्र ठरलेली ती १९वी खेळाडू आहे. ‘टॉप’ योजनेंतर्गत मिळालेल्या निधीमुळे आता सीमा अमेरिकेत विशेष सराव करणार आहे.
  • हरयाणावासी सीमाने २००४मध्ये आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम थाळीफेक ६४.८४ मीटर अशी नोंदवली होती. 
 सीमाचे यश 
  • २००६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक.
  • २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक.
  • २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक.
  • २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक.

अर्णब डे यांना ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’

  • सिंगापूर येथील अर्णब डे या भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञास वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सिंगापूरच्या प्रतिष्ठित ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.
  • त्यांनी महत्त्वाच्या ‘ए-२०’ नावाच्या ट्यूमर संप्रेसर (ट्यूमरला विकसित होण्यापासून रोखणे)वर अभ्यास करण्यासाठी ट्रान्सजेनिक उंदराची निर्मिती केली.
  • अर्णब यांनी यापूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पेप्टाइड आधारित प्रोड्रग्स’चा विकास केला होता. यासाठी त्यांना अमेरिकेच्या पेप्टाइड सिम्पोसियममध्ये ‘तरुण संशोधक’ म्हणून सन्मानित केले होते.
  • शास्त्रज्ञ अर्णब यांचा प्रबंध न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाने प्रस्तावित केला होता. 
  • पीएचडी कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी नामांकित विज्ञान मासिक आणि पुस्तकांचे जागतिक स्तरावर प्रकाशन करणारी ‘स्प्रिंगर’ ही संस्था थिसिस (प्रबंध) पुरस्कार प्रदान करते. पुरस्कार विजेत्यास ५०० यूरो डॉलर रोख रक्कम दिली जाते. 

स्पेनच्या टॅल्गो ट्रेनची वेगचाचणी

  • बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पेनच्या टॅल्गो कंपनीच्या अत्याधुनिक नऊ डब्यांची पहिली वेगचाचणी २९ मे रोजी उत्तर प्रदेशात घेण्यात आली.
  • टॅल्गो डब्यांना भारतीय इंजिन जोडलेल्या या ट्रेनने बरेली ते मोरादाबाद या मार्गावर ताशी ११५ किमी वेग गाठला. भारतातील सर्वांत जलद दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग सरासरी ताशी ८५ किमी आहे. 
  • या प्रवासासाठी वेळ तर कमी लागलाच शिवाय टॅल्गो डबे वजनाने हलके असल्याने ३० टक्के कमी ऊर्जा लागली.
  • टॅल्गोचे डबे अशा प्रकारे बनवण्यात आले आहेत की, वळणावर देखील गाडीचा वेग कमी करावा लागणार नाही.
  • यानंतर ‘राजधानी’च्या मार्गावर मथुरा ते पालवाल दरम्यान ४० दिवस वेगचाचणी घेतली जाणार आहे. त्यावेळी बुलेट ट्रेन ताशी १८० किमीपर्यंत वेगाने चालविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • सध्या राजधानीला दिल्ली ते मुंबई हे अंतर कापायला १७ तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनने हे अंतर १२ तासांमध्ये पार करता येईल.

अदिती कृष्णकुमार यांना ‘स्कॉलेस्टिक एशियन बुक पुरस्कार’

  • भारतीय लेखिका अदिती कृष्णकुमार यांना सिंगापूरचा ‘स्कॉलेस्टिक एशियन बुक पुरस्कार’ मिळाला आहे.
  • ३२००० शब्दांचे हस्तलिखित असलेल्या ‘लव ऑफ इंडियन हिस्ट्री’साठी हा पुस्कार देण्यात आला आहे. 
  • अदिती कृष्णकुमार यांना या आठवड्यात त्यांचे हस्तलिखित असलेल्या ‘कोडेक्‍स : द लॉस्ट ट्रेजर ऑफ द इंडस’साठी दहा हजार सिंगापूर डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे.
  • अदिती या गेल्या तीन वर्षांपासून सिंगापूरला राहत आहेत. त्यांचे हे हस्तलिखित लवकरच स्कॉलेस्टिक आशियाकडून प्रकाशित होणार आहे.

शनिवार, २८ मे, २०१६

चालू घडामोडी : २८ मे

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारताने २९० किलोमीटर पल्ल्यावरील लक्ष्य भेदणाऱ्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची २८ मे रोजी यशस्वी चाचणी घेतली.
  • हवाई दलाच्या वतीने पोखरण येथे ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत अपेक्षेनुसार क्षेपणास्त्राने लक्ष्य गाठले.
  • ब्राह्मोसने जगातील सर्वांत श्रेष्ठ सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध केले आहे.
  • हवाई दलाने गेल्यावर्षीच क्षेपणास्त्र प्रणाली आत्मसात केली होती. जेणेकरून सीमेवरचे शत्रूंची रडार, संचार प्रणालीसारखी यंत्रणा नष्ट करता येईल. ही यंत्रणा नष्ट केल्यास शत्रुराष्ट्रांना आपल्या विमानांना लक्ष्य करता येणार नाही.

प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन

  • ‘समाजमनस्क समीक्षक’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ समीक्षक, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रावसाहेब गणपतराव जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
  • प्रा. जाधव यांचा जन्म बडोद्याचा; पण कार्यभूमी महाराष्ट्र. त्यांनी सुरवातीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी केली.
  • पुढे मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथील महाविद्यालयांत १२ वर्षे अध्यापन केल्यानंतर वाईच्या विश्वकोशात एका विभागाचे संपादक म्हणून त्यांनी १९ वर्षे कार्य केले. नंतर त्यांनी मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली.
  • गाढा व्यासंग असूनही त्यांनी त्याचे प्रदर्शन कधीही केले नाही; पण व्याख्यानांतून त्यांच्या व्यासंगाचे दर्शन व्हायचे. कविता, ललित, कोश अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले.
  • दलित साहित्याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवून समीक्षेच्या अंगाने या साहित्यप्रवाहाचे श्रेष्ठत्व समाजात रुजविण्याचे काम प्रा. जाधव यांनी केले.
  • ‘निळी पहाट’, ‘निळे पाणी’, ‘आनंदाचा डोह’, ‘चंदेरी चित्रहार’, ‘सांस्कृतिक मूल्यभेद’ या ग्रंथांमुळे साहित्यविशव ढवळून निघाले.
  • ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’ या आणि अन्य ग्रंथांमुळे मराठी साहित्याच्या समीक्षेला त्यांनी एक नवी दिशा मिळवून दिली.
  • औरंगाबाद येथे २००४मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते बिनविरोध अध्यक्ष झाले.
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन २७ मे १९९४ ला झाले. बरोबर त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनी डॉ. जाधव यांचेही देहावसान झाले.
साहित्यसंपदा
आनंदाचा डोह निळी पहाट पंचवटी हे मित्रवर्या
विचार शिल्प निळी क्षितिजे प्रतिमा कविता आणि रसिकता
वासंतिक पर्व निळे पाणी बापू समीक्षेतील अवतरणे

पुरस्कार
जी. ए. कुलकर्णी पारितोषिक ग्रंथोत्तेजक पुरस्कार
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यशवंतराव चव्हाण पुरस्कार
श्री. ना. बनहट्टी स्मृती पुरस्कार प्रियदर्शिनी पुरस्कार

सहा प्रादेशिक भाषांमध्ये PMO संकेतस्थळ

  • पंतप्रधानांचे इंग्रजीमध्ये असणारे संकेतस्थळ २८ मे रोजी सहा प्रादेशिक भाषांमध्ये सुरु करण्यात आले.
  • हे संकेतस्थळ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे जनता आता पंतप्रधांनांशी अधिक चांगल्या पद्धतीने संपर्क साधू शकणार आहे.
  • नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही संकेतस्थळांचे उद्घाटन केले. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे नेतृत्व गुरू जग्गी वासुदेव यांच्याकडे

  • आंतरराष्ट्रीय योगदिन २१ जूनला साजरा होत असून संयुक्त राष्ट्रातील कार्यक्रमात इशा फाउंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव नेतृत्व करणार आहेत.
  • पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन गेल्या वर्षी साजरा झाला होता. त्यावेळी सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून, श्रीश्री रविशंकर तसेच अमेरिकी काँग्रेसच्या सदस्या तुलसी गॅबार्ड सहभागी झाल्या होत्या.
  • आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी योग दिन सुरू करण्यात आला होता, त्याचा प्रस्ताव भारताने मांडला व तो संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला होता.

शुक्रवार, २७ मे, २०१६

चालू घडामोडी : २७ मे

प.बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी

  • पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • पश्चिम बंगाल विधानसभेतील २९४ जागांपैकी २११ जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत.
  • ममता बॅनर्जी यांच्यासह ४२ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी सर्व नेत्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • पश्मिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे विधानसभेत २११ आमदार, लोकसभेत ३५ खासदार आणि राज्यसभेत १२ खासदार आहेत.

एमएसएमईसाठी क्रिसिलची नवी पतमानांकन मार्गदर्शक तत्त्वे

  • अतिलघु, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) पतमानांकनासाठी केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
  • त्यानुसार, पतमानांकन संस्था असलेल्या क्रिसिलनेही एमएसएमईंसाठी नवी पतमानांकन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. याविषयीची माहिती क्रिसिलने आपल्या संकेतस्थळावरही दिली आहे.
  • या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पतमानांकन करून घेण्याचे प्रमाण वाढेल आणि याची उपयुक्तता एमएसएमई उद्योजकांच्या लक्षात येईल.
 नवी मार्गदर्शक तत्त्वे 
  • एमएसएमईंचे मूल्यांकन खालील तीन स्तरांवर करण्यात येणार आहे 
  1. तंत्रज्ञान, प्रक्रिया, ग्राहक, व्यवस्थापन अशा पाच मुद्द्यांवर एमएसएमईची कार्यक्षमता मोजली जाईल.
  1. आर्थिक नफाक्षमता, पत, रोकड तरलतेची जोखीम मोजण्यासाठी आठ गोष्टी विचारात घेऊन एमएसएमईची आर्थिक क्षमता मोजली जाईल.
  2. एमएसएमईंची विश्वासहर्ता मोजण्यासाठी आठ गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत.

‘मोस्ट मार्केटेबल प्लेअर’च्या यादीत विराट कोहली तिसरा

  • जागतिक स्तरावरच्या ‘स्पोर्ट्स-प्रो’ या मॅगझिनद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ‘मोस्ट मार्केटेबल प्लेअर’च्या यादीत विराट कोहलीला तिसरे स्थान मिळाले आहे.
  • या यादीत एनबीएचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू स्टीफन करी आणि जुवेन्टसचा फुटबॉलपटू पॉल पोग्बा अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहे.
  • ‘स्पोर्ट्स प्रो’कडून दरवर्षी प्रसिद्ध खेळाडूंचे बाजारातील मूल्य, वय, त्यांचा करिश्मा या निकषांवर संशोधन करून त्यांची पत ठरवली जाते.
  • आतापासून पुढील तीन वर्षांमधील क्रीडा व्यवसायातील खेळाडूंच्या मूल्याचा अंदाज घेऊन ही यादी तयार करण्यात आली.
  • या यादीत टेनिसपटू नोव्हाक जोकोविच २३व्या, फूटबॉलपटू लिओनल मेस्सी २७व्या आणि प्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट ३१व्या क्रमांकावर आहेत.
  • भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झानेही या यादीत पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
  • २०१४मध्ये या यादीत फॉर्म्युला वन ड्रायव्हर ल्युइस हॅमिल्टन अग्रस्थानी होता.

जाट आरक्षणाला स्थगिती

  • नव्याने तयार करण्यात आलेल्या मागासवर्गीय (सी) श्रेणीअंतर्गत हरियाणा सरकारने जाट आणि अन्य पाच जातींना दिलेल्या आरक्षणाला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
  • २९ मार्च रोजी हरियाणा राज्य विधानसभेत हरियाणा मागासवर्गीय (सेवेत आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश) कायदा २०१६ पारित करून जाट व अन्य पाच जातींना हे आरक्षण देण्यात आले होते.
  • या कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा स्थगनादेश दिला. 
  • या कायद्यातील ब्लॉक ‘सी’ रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, या ब्लॉक ‘सी’ अंतर्गत जाट आणि जाट शीख, मुस्लीम जाट, बिश्नोई, रोर आणि त्यागी या अन्य पाच जातींना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

फोर्ब्जच्या ‘ग्लोबल २०००’ यादीत ५६ भारतीय कंपन्या

  • फोर्ब्ज नियतकालिकाची ‘ग्लोबल २०००’ ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, या यादीत जगभरातील आकाराने मोठ्या आणि शक्तिशाली अशा दोन हजार कंपन्यांचा समावेश केला आला आहे.
  • त्यामध्ये मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सह ५६ भारतीय कंपन्यांनी स्थान पटकावले आहे.
  • पहिल्या दहा शक्तिशाली कंपन्यांच्या यादीत अमेरिका आणि चिनी कंपन्यांनी वर्चस्व राखले आहे. पहिले तिन्ही क्रमांक चीनच्या बँकांनी पटकावले आहेत.
  • यादीमध्ये  अमेरिकेच्या सर्वाधिक ५८६ कंपन्यांचा समावेश आहे. तरचीनच्या २४९ कंपन्यांचा समावेश आहे. त्यानतंर जपानच्या २१९, ब्रिटनच्या ९२, तर दक्षिण कोरियाच्या ६७ कंपन्यांचा समावेश आहे.
  • गेल्या वर्षीही यादीमध्ये समाविष्ट भारतीय कंपन्यांमध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’नेच अव्वल स्थान पटकावले होते. गेल्या वर्षीच्या यादीमध्ये १४२व्या क्रमांकावर असणारी ‘रिलायन्स’ यंदा १२१व्या स्थानावर पोहोचली आहे.

गुरुवार, २६ मे, २०१६

चालू घडामोडी : २६ मे

राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरण मंजूर

  • कारखानदारी क्षेत्राला गती देण्यासाठी, औद्योगिक उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रथमच भांडवली वस्तू क्षेत्रासाठी राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरण मंजूर केले आहे.
 या धोरणाचे उद्देश 
  • या धोरणाच्या अंमलबजावणीतून २०२५पर्यंत २.१ कोटी नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • देशांतर्गत उद्योगधंद्यातून २०२५पर्यंत सध्याच्या २.३ लाख कोटी रुपये उत्पादनात वाढ करून ७.५ लाख कोटी रुपयांचे एकूण उत्पादन गाठणे.
  • सध्या या क्षेत्रात ८४ लाख लोकांना रोजगार दिला जात असून हे प्रमाण ३ कोटींवर घेऊन जाणे.
  • थेट देशी रोजगार १४ लाखांवरून ५० लाख करणे व अप्रत्यक्ष रोजगार सध्या ७० लाख आहेत ते २.५० कोटी करणे. 
  • भांडवली वस्तूंचे देशांतर्गत मागणीतील प्रमाण ६० टक्क्यांवरून २०२५पर्यंत ८० टक्क्यापर्यंत वाढवणे.
  • यंत्रसामग्रीची निर्यात सध्या २७ टक्के आहे. ही निर्यात वाढवून एकूण उत्पादनाच्या ४० टक्के करणे. 
  • एकूण उत्पादनात भांडवली वस्तूंचा वाटा १२ टक्के आहे तो २०२५ पर्यंत २० टक्के करणे.
  • भांडवली वस्तू क्षेत्रातील आतापर्यंत वापरले न गेलेले सामर्थ्य वाढवून देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनविणे.

पी. विजयन केरळचे १२वे मुख्यमंत्री

    P Vijayan
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. विजयन यांनी २६ मे रोजी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी. सदाशिवम यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
  • विजयन के माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असून ते केरळचे १२वे मुख्यमंत्री आहेत.
  • विजयन यांच्यासह अन्य १८ मंत्र्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला. यामध्ये ‘माकप’चे ११ ‘भाकप’चे ४, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.
  • इलाथूर कोझीकोड मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. शशीधरन यांना विजयन यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
  • केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळाले असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली आहे. केरळमध्ये एलडीएफने ९१ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
  • नवे सरकार स्थापन होताच विजयन यांनी आर्थिक बचतीची घोषणा केली, यान्वये मंत्र्यांच्या घरांची डागडुजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच मंत्र्यांच्या मदतीस असणाऱ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० वरून २५ करण्यात आली आहे.
  • यापूर्वी ओमन चंडी यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि चेंबरचे लाइव्ह स्ट्रिमिंग होत असे, तेही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी

  • भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
  • जागतिक आणि आशिया खंडातील ६-रेड स्नूकरचे अजिंक्यपद पटकावणारा पंकज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
  • अंतिम लढतीत त्याने मलेशियाच्या किन होह मोहचा ७-५ असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताच्या आदित्य मेहतावर ६-१ असा विजय मिळवला होता.

बुधवार, २५ मे, २०१६

चालू घडामोडी : २५ मे

आसामचे १४वे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल

  • भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्वानंद सोनोवाल यांनी आसामचे १४वे मुख्यमंत्री म्हणून २३ मे रोजी शपथ घेतली. यानिमित्ताने पूर्वोत्तर राज्यात प्रथमच भाजपा सत्तारूढ झाला आहे. सोनोवाल आसामचे पहिले भाजप मुख्यमंत्री आहेत.
  • सोनोवाल यांच्यासह ११ जणांनी या वेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
  • राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
 सर्बानंद सोनोवाल यांची राजकिय कारकिर्द 
  • ३१ ऑक्टोबर १९६२ रोजी आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात जन्मलेले ५४ वर्षीय सोनोवाल यांनी महाविद्यालयीन राजकारण ते केंद्रीय मंत्रिपद असा प्रवास केला आहे.
  • १९९२ ते १९९९ या कालावधीत ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे (आसू) अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात आसुचा बराच प्रभाव असून आसूने सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व केले आहे.
  • त्यांनी ८ फेब्रुवारी २०११ रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रथम पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर राज्यात भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 
  • पुढे २०१२ मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आणि आजही ते या पदावर कायम आहेत.
  • सध्या सोनोवाल आसामच्या लखिमपूर मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते व ते केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रीपद सांभाळत होते.

मालदिवच्या माजी अध्यक्षांना ब्रिटनमध्ये आश्रय

  • मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नशीद यांना ब्रिटनने राजकीय निर्वासित दर्जा देण्यात आला. दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून नशीद यांना १३ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • नशीद यांना जानेवारी २०१६मध्ये पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी श्रीलंका, भारत आणि ब्रिटनने घडवून आणलेल्या वाटाघाटीनंतर दिली गेली होती.
  • उपचारानंतर ते मालदीवला परत जाणे अपेक्षित होते. परंतु त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळाला आहे.
  • नशीद हे ‘मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टी’ (एमडीपी) पक्षाचे नेते व मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते आहेत. 
  • मालदिवमध्ये २००८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पहिले अध्यक्ष आहेत.

करबुडव्यांची नावे होणार जाहीर

  • येत्या आर्थिक वर्षापासून प्राप्तिकर विभागाने एक कोटींहून अधिक कर बुडविलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षापासूनच करचुकवेगिरी करणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत ६७ जणांची नावे जाहीर केली आहेत.
  • मात्र, हे सर्व वीस ते तीस कोटी आणि त्याहून अधिक कर चुकविणारे आहेत. नव्या निर्णयामुळे एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
  • त्यामुळे अनेक लोकांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. ही नावे पुढील वर्षी ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येतील. 

मिशन मान्सून प्रकल्प

  • मान्सूनचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भू विज्ञान विभागाने ‘मिशन मान्सून’ हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • सध्या भारताच्या हवामान विभागाकडे दहा ते वीस दिवस व संपूर्ण मोसमाचा अंदाज देण्याचे कसब आहे. त्याद्वारे गेल्या दोन वर्षांत कमी पावसाचे अचूक भाकित हवामान विभागाने केले होते.
  • सध्या स्टॅटॅस्टिकल मॉडेल व डायनॅमिक मॉडेल दोन्हीचा एकत्रित वापर केला जातो. मात्र, लवकरच यासाठी डायनॅमिक मॉडेलचा वापर सुरू केला जाईल.
  • ग्रामीण कृषी मौसम सेवेअंतर्गत देशातील १.१ कोटी शेतकऱ्यांना प्रादेशिक भाषांमधून कृषी व हवामानविषयक इशारे-सल्ले मिळतात.
  • कृषी-हवामान आधारित सेवांचा लाभ ४२ हजार कोटी रुपये इतका होता. गहू, तांदूळ, ऊस, कापूस उत्पादक या सेवांचे प्रमुख लाभार्थी आहेत.

पोटॅशिअम ब्रोमेटवर बंदी?

  • अन्न मिश्रण म्हणून पोटॅशिअम ब्रोमेटवर केंद्र सरकार बंदी आणणार असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा जाहीर केले. 
  • सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट (सीएसई)ने नुकताच ३४ प्रसिद्ध ब्रॅंडमधील ८४ टक्के ब्रेड, बन व पावाचे नमुने सदोष आढळले असल्याचा दावा केला होता.
  • यामध्ये पोटॅशिअम ब्रोमेट व पोटॅशिअम आयोडेटचा अंश असल्याचे आढळून आले होते, जे की लोकांच्या आरोग्यास हानिकारक आहे.
  • यासोबतच ब्रेडमधील एका रसायनात २बी कार्सिनोजेन (कर्करोगाची शक्यता असणारा घटक) असल्याचा दावाही करण्यात आला होता. 
  • आरोग्य मंत्रालयाने भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणीकरण विभागाला (एफएसएसएआय) याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकार योग्य ती पावले उचलणार आहे. 
 कसा होतो पोटॅशिअम ब्रोमेटचा वापर? 
  • पोटॅशिअम ब्रोमेट हे उत्तम मिश्रण करणारा संमिश्रक आहे. बेकरी उत्पादन वाढविण्यासाठी व बेकरी मिश्रणे एकसमान करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  • पोटॅशिअम आयोडेट हे बेकरीतील पीठावर प्रक्रिया करणारा संयुग आहे. 
  • पोटॅशिअम ब्रोमेट हे ११ हजार अन्न मिश्रितांपैकी एक असून, त्याचा अन्न उत्पादनासंदर्भातील व्यवसायात वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • एफएसएसएआयने पोटॅशिअम ब्रोमेटला अन्न मिश्रितांच्या यादीतून वगळण्याची शिफारस केंद्राकडे केली असून, अन्न मिश्रितांच्या यादीतून पोटॅशिअम ब्रोमेटला वगळल्यानंतर त्यावर बंदी आणता येणार आहे.

मंगळवार, २४ मे, २०१६

चालू घडामोडी : २४ मे

नीट अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

  • राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २४ मे रोजी स्वाक्षरी केली.
  • या अध्यादेशामुळे राज्यात यंदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश सीईटीनुसार होतील. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश नीट परीक्षेद्वारे होतील. 
  • आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘नीट’बाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची परिहार्यता याची माहिती त्यांना दिली होती.
  • यानंतर राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली.  
  • यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार भारतीय वैद्यक परिषदेच्या १९५६च्या कायद्यानुसार घेतल्या जाणाऱ्या राज्यनिहाय वैद्यकीय प्रवेश परीक्षांऐवजी २०१७-१८ च्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर एकच परीक्षा (नीट) घ्यावी, अशी दुरुस्ती करणारा एक वटहुकूम न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ‘नीट’च्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला महाराष्ट्रासह सुमारे १५ राज्यांनी विरोध केल्यावर अध्यादेशाचा मार्ग सरकारने स्वीकारला.
 यापुढे काय होणार? 
  • आता वैद्यकीय आणि दंतवैद्यकच्या ८५ टक्के जागा भरण्यासाठी राज्ये स्वत:ची प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊ शकतात किंवा 'नीट' घेऊ शकतात. उर्वरित १५ टक्के जागा मात्र 'नीट'मार्फतच भरल्या जातील. 
  • खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांना 'नीट'मार्फतच प्रवेश द्यावे लागणार. 
  • सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी येत्या डिसेंबरमध्ये 'नीट' होईल.

ई-शंका निरसन योजना

  • करदात्यांच्या करविवरणपत्रांच्या (रिटर्न) व करविषयक शंकांचे निरसन तसेच करनिर्धारण संदर्भातील प्रश्न यांसाठी आयकर विभागाने ईमेल करनिर्धारण योजना सुरू केली आहे.
  • दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई कोलकाता व हैदराबाद या एकूण सात शहरांत ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे.
 काय आहे योजना? 
  • ई-शंका निरसन योजनेसंदर्भात सीबीडीटीने (Central Board of Direct Taxation) अधिकृत सूचना जारी केली आहे. त्यामध्ये करदात्यांकडून करनिर्धारण अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या ईमेलबाबत प्रक्रिया, त्याचे स्वरूप देण्यात आले आहे.
  • या योजनेद्वारे कर अधिकारी करदात्याला नोटिसा, समन्स इमेलने पाठवणार आहे. तसेच करदाते त्यांच्या समस्या ईमेलद्वारे आयकर विभागाला पाठवणार असून त्यांचे निरसन ईमेलद्वारेच करण्यात येणार आहे.
  • कर अधिकाऱ्यांकडून करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या सर्व ईमेलची किंवा ई-संवादाची नोंद आयकर विभाग ठेवणार आहे.

भारत-चीन सीमेवर महिलांची तुकडी

  • भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलातील १२ महिलांची तुकडी प्रथमच संरक्षण करताना दिसणार आहे.
  • भारत-चीन सीमेवरील चौक्या उंचीवर आहेत. याठिकाणी महिला कॉन्टेबलची १२ जणांची तुकडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे.
  • देशभरातील ५०० महिला कॉन्टेबलमधून या १२ महिलांच्या तुकडीची निवड करण्यात आली आहे. यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • अतिशय थंड आणि लहरी वातावरणात या महिला तुकडीवर १४ हजार फूट उंचीवर लडाखमधील लेह सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी असणार आहे. 
 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस 
  • आयटीबीपी या दलाची २४ ऑक्टोबर १९६२ला स्थापना करण्यात आली होती.
  • लडाखमधील काराकोरम पासपासून अरुणाचल प्रदेशातील जॅकेब-ला या ३४८८ किमी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे.

व्हिएतनामवरील बंदी अमेरिकेने उठवली

  • गेली काही दशके व्हिएतनामवर प्राणघातक शस्त्रांची विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवत असल्याची घोषणा अमेरिकेने केली.
  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाई कुआंग यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजन राईसही ओबामा आणि व्हिएतनामच्या अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.

सोमवार, २३ मे, २०१६

चालू घडामोडी : २३ मे

‘चाबहार’च्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

  • पंतप्रधान मोदी व इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांनी संयुक्त निवेदनाद्वारे तब्बल १३ वर्षे रखडलेला ‘चाबहार बंदर विकास’ या ऐतिहासिक कराराची घोषणा केली.
  • पाकिस्तानचं ‘ग्वादार’ बंदर विकसित करून हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या नीतीला भारताने इराणच्या मदतीने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. 
  • इराणशी झालेल्या करारानुसार, चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारत इराणमध्ये तब्बल ५०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
  • ‘चाबहार’बरोबरच मोदी व रोहानी यांनी आणखी १२ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात तेल, गॅस, रेल्वे, ऊर्जा आदी क्षेत्रांतील करारांचा समावेश आहे.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात २००३मध्ये चाबहार बंदर विकसित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र, पुढील सरकारने त्याचा पाठपुरावा केला नाही. मोदी सरकार आल्यानंतर मात्र या कराराला वेग देण्यात आला.
 ‘चाबहार’मुळे भारताला काय मिळणार? 
  • ‘चाबहार’ करारामुळे चाबहार’च्या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातील व्यापारात मोठी वाढ होणार आहे.
  • चाबहार बंदर हे इराण, भारत, मध्य आशिया, अफगाणिस्तान तसेच पूर्व युरोपला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • कांडला आणि चाबहार या बंदरांमधील अंतर हे कमी आहे. यामुळे भारताचा व्यापारी माल इराणमध्ये उतरवून त्यानंतर रेल्वे व रस्ते वाहतुकीद्वारे अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियात नेता येणार आहे. 
  • इराणकडे अत्यंत स्वस्त नैसर्गिक गॅस व वीज आहे. ही स्वस्त वीज व गॅस मिळवून ५० लाख टन क्षमतेचे अॅल्युमिनियम वितळविण्याचा व युरिया निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा भारतीय कंपन्याचा विचार आहे. 
  • भारत सरकार दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये युरियाच्या सबसिडीवर खर्च करते. या युरियाची निर्मिती चाबहारच्या मुक्त व्यापार क्षेत्रात केली गेली आणि कांडलामार्गे तो भारतात आणला तर सबसिडीवरील हा खर्च वाचू शकतो.
  • इरकॉन कंपनी चाबहार येथे रेल्वेमार्ग उभारणार आहे जेणेकरून भारताचा व्यापारी माल थेट अफगाणिस्तानात पोहोचवता येईल.

स्वदेशी बनावटीच्या अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच तयार केलेले स्वदेशी बनावटीचे रियूझेबल लॉंच व्हेइकल (आरएलव्ही) या अवकाशयानाचे श्रीहरीकोटा येथून २३ मे रोजी सकाळी यशस्वी उड्डाण केले.
  • आरएलव्ही टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’चा उद्देश पृथ्वीभोवतीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करून पुन्हा पृथ्वीवर परत येणे हा आहे.
  • हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या साह्याने केले गेले. या रॉकेटची लांबी ९ मीटर असून वजन ११ टन आहे.
  • थर्मल प्रोटेक्शन सिस्टिम (टीपीएस) च्या सहाय्याने या यानाने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा यशस्वीरित्या प्रवेश केला. हा सर्व प्रवास ७७० सेकंदाचा होता.
  • पुनर्वापर करता येण्यासारखे पंख हे या अवकाशयानाचे वैशिष्ट्य आहे. अवकाशयानाचे हे प्रारूप नियोजित अवकाशयानापेक्षा सहा पटींनी लहान आहे. हे अंतिम प्रारूप तयार करण्यासाठी १० ते १५ वर्षे लागणार आहेत. 
  • आरएलव्ही-टीडी यानाच्या निर्मितीसाठी ९५ कोटी रुपये खर्च झाला आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपाननंतर संचालित अवकाशयान पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
 आरएलव्ही टीडीचे फायदे 
  • एखादा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या यानाचा पुन्हा वापर करणे शक्य होणार.
  • या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे.
  • अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल.

भारत, थायलंड आणि म्यानमार रस्त्याने जोडले जाणार

  • भारत, थायलंड आणि म्यानमार हे एकत्रितपणे १४०० किलोमीटरचा महामार्ग तयार करीत असून, त्यामुळे भारत आणि आग्नेय आशिया या रस्त्याने जोडले जाणार आहे.
  • या महामार्गाची सुरवात भारताच्या पूर्वेकडील मोरेह येथून सुरवात होऊन तो म्यानमारच्या तामू शहरापर्यंत असेल. यामुळे तीनही देशांच्या व्यापार, संस्कृती यांच्या आदानप्रदानाला चालना मिळणार आहे. 
  • म्यानमारमधील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बांधलेल्या पुलांच्या पुनर्निमितीसाठी भारताने आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक सुरक्षितपणे होऊ शकेल.
  • आगामी दीड वर्षात या पुलाचे काम पूर्ण होईल त्यानंतर तीनही देशांसाठी हा महामार्ग खुला करण्यात येईल.
  • या महामार्गामुळे मालाची वाहतूक करण्यास सोपे होईल त्याचप्रमाणे ईशान्येकडील लघू आणि मध्यम उद्योगांना त्याचा फायदा होईल.
  • तीन देशांतील हा महामार्ग म्हणजे भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ या धोरणाचा भाग आहे. 

केरळमध्ये डिझेल वाहनांवर बंदी

  • राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष खंडपीठाने केरळमधील केरळमधील सहा प्रमुख शहरांमध्ये दिल्लीप्रमाणेच डिझेलवर चालणाऱ्या व १० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या सहा शहरांमध्ये तिरुअनंतपुरम, कोची, कोल्लम, थ्रिसूर, कोझीकोडे आणि कन्नूरचा समावेश आहे. 
  • २००० सीसी आणि त्यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या कोणत्याही वाहनाची नोंद न करण्याचे आदेशही केरळ सरकारला दिले आहेत.
  • याचबरोबर एका महिन्यानंतर दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेलच्या गाड्या आढळल्यास दहा हजार रुपयंचा दंड ठोठावण्यात यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे.
  • हा दंड वाहतूक पोलिस अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोळा करू शकतात. दंडाद्वारे जमा झालेल्या रकमेचा व्यवस्थित हिशोब ठेवून त्याचा उपयोग शहरातील पर्यावरणासाठी करायचा आहे.
  • खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीच्यावेळी राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय दिला.

जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

  • अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता विक्रमी सहाव्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. राज्यपाल डॉ. के. रोसैया यांनी जयललिता यांच्यासह २८ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली.
  • जयललिता सलग दुसऱ्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • जयललिता यांच्या कॅबिनेटमध्ये ५ महिलांना स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून यामध्ये ३ डॉक्टर तसेच ३ वकीलांचा समावेश आहे. 
  • विधानसभा निवडणूक निकालामध्ये जयललिता यांच्या पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत. प्रतिस्पर्धी करुणानीधी यांच्या डीएमकेला ८४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
  • १९८९ नंतर पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा सत्ता कायम राखण्यात जयललिता यांच्या पक्षाला यश आले आहे.

रविवार, २२ मे, २०१६

विधानसभा निवडणूक २०१६

  • संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकीचे १९ मे २०१६ रोजी निकाल जाहीर झाले. ते खालीलप्रमाणे :
आसाम
  • आसाम विधानसभेत गेल्या १५ वर्षापासून कॉँग्रेसची सत्ता गेली असून, तिथे भाजपच्या नेतृत्त्वाखाली सर्बानंद सोनोवाल यांचे सरकार येणार हे नक्की झाले आहे.
  • भाजपसाठी हा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल. कारण यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचा प्रवेश झाला आहे.
आसाम
बहुमतासाठी आवश्यक जागा : ६४
पक्ष जागा
भारतीय जनता पार्टी ६०
इंडियन नॅशनल कांग्रेस २६
आसाम गण परिषद १४
ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३
बोडोलैंड पीपल्स फ्रंट १२
अपक्ष
एकूण १२६

पश्चिम बंगाल
  • पश्चिम बंगालमध्ये पाच वर्षापूर्वी डाव्यांची ४२ वर्षाची राजवट उलथवून सत्तेवर आलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच वर्षे केलेल्या कारभारावर जनतेने पसंतीची मोहोर उठवली.
  • ममता बॅनर्जी यांना जवळपास दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. २०११ च्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेसला १८४ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा २९४ जागांपैकी २११ जागा तृणमूलने जिंकल्या.
  • त्यामुळे आता ममता बॅनर्जी सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
पश्चिम बंगाल
बहुमतासाठी आवश्यक जागा : १४८
पक्ष जागा
आल इंडिया तृणमूल कांग्रेस २११
इंडियन नॅशनल कांग्रेस ४४
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) २६
भारतीय जनता पार्टी
इतर १०
एकूण २९४

केरळ
  • केरळमध्ये परंपरेनुसार सत्ता बदल झाला असून, डाव्या पक्षांच्या एलडीएफचे सरकार येथे आले आहे. १४० जागांच्या विधानसभेेत एलडीएफला ८५, तर त्यांना पाठिंबा देणारे ८ अपक्ष निवडून आले आहेत.
  • त्यामुळे देशात या एकमेव राज्यात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता येणार आहे.
  • आसामसह केरळमध्येही काँग्रेसने सत्ता गमवली आहे. तर दक्षिणेतील या राज्यात भाजपला अवघी एकच जागा मिळाली.
केरळ
बहुमतासाठी आवश्यक जागा : ७१
पक्ष जागा
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्ससिस्ट) ५८
इंडियन नॅशनल कांग्रेस २२
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १९
इंडियन यूनियन मुस्लिम लीग १८
भारतीय जनता पार्टी
इतर २२
एकूण १४०

तामिळनाडू
  • तामिळनाडूत गेल्या अनेक दशकांपासून अण्णाद्रमुक व द्रमुकमध्ये अटीतटीची लढत होते. तेथील मतदार आलटून पालटून दोन्ही पक्षांना सत्तेवर बसवतात.
  • १९८४ मध्ये एमजीआर अर्थात एम. जी. रामचंद्रन यांनी सलग दुसऱ्यांदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भुषविले होते. त्यानंतर ३२ वर्षे येथे आलटूनपालटून अण्णाद्रमुक आणि करूणानिधी यांच्या द्रमुकचे सरकारे आली.
  • ही परंपरा यावेळी पहिल्यांदाच मोडली असून, तामिळनाडूच्या जनतेने अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जे. जयललिता यांना सलग दुसऱ्यांदा निवडून दिले आहे.
  • २३४ जागांपैकी १२६ जागा अण्णाद्रमुकने जिंकल्या असून द्रमुक-कॉँग्रेस युतीला १०३ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी कॉँग्रेस केवळ १० जागांवर विजयी झाली.
  • तर डीएमडीके हा विजयकांत यांचा पक्ष अपयशी ठरला असून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. खुद्द विजयकांत यांचा पराभव झाला.
तामिळनाडू
बहुमतासाठी आवश्यक जागा : ११८
पक्ष जागा
ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुन्नेत्र कड़गम १३४
द्रविड मुनेत्र कड़गम ८९
इंडियन नॅशनल कांग्रेस
इंडियन यूनियन मुस्लिम लीग
एकूण २३२

पुद्दुचेरी
  • पुद्दुचेरीत काँग्रेस-द्रमुकचे सरकार पुद्दुचेरी या छोट्या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस-द्रमुक आघाडीने विजय मिळविला आहे. विधानसभेच्या ३० जागांपैकी काँग्रेसला १५ तर, द्रमुकला २ जागा मिळाल्या आहेत.
  • एआयएनआरसी पक्षाचे एन. रंगास्वामी यांची सत्ता गेली आहे. त्यांच्या पक्षाला ८ जागा मिळाल्या. अण्णाद्रमुकला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे भाजपचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
पुद्दुचेरी
बहुमतासाठी आवश्यक जागा : १६
पक्ष जागा
इंडियन नॅशनल कांग्रेस १५
ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस
ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुन्नेत्र कड़गम
द्रविड मुनेत्र कड़गम
अपक्ष
एकूण ३०

या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातील काही लक्षवेधी घटना
  • देशभरात हळूहळू पण ठामपणे भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत आहे. सध्या देशात भाजपा ९ राज्यांमध्ये सत्तेवर असून ४ राज्यांमध्ये भाजपा भागीदारीमध्ये सत्तेत आहे. 
  • पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांत काँग्रेसची कामगिरी खालावली आहे. देशातील २९ पैकी फक्त ६ राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत असून केरळ, आसाममधील सत्ताही काँग्रेसने गमावली आहे. 
  • महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळच्या राजकारणात चंचू प्रवेश करत २ जागा जिंकल्या आहेत.
  • क्रिकेटच्या मैदानात फिक्सिंगच्या आरोपामुळे दरवाजे बंद झाल्यानंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या श्रीशांतचा काँग्रेस नेते व्ही. एस. शिवकुमार यांनी पराभव केला. 
  • गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला ओ. राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  
  • पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या रुपा गांगुली यांचा क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाकडून पराभव झाला. द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.

रविवार, २२ मे, २०१६

चालू घडामोडी : २२ मे

बीसीसीआय अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची एकमताने निवड झाली. ते बीसीसीआयचे आत्तापर्यंतचे सगळ्यात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
  • ४१ वर्षीय अनुराग ठाकूर हे भाजपचे खासदार असून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 
  • शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा ठाकूर घेतील.
  • सध्या पूर्व विभागाची अध्यक्षपदाची वेळ आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या उमेदवारीस सूचक तसेच अनुमोदक पूर्व विभागातील असणे आवश्यक आहे.
  • ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा तसेच नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित होती.
  • ठाकूर बिनविरोध अध्यक्ष झाल्यावर रिक्त झालेल्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीसी) अध्यक्ष अजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

किरण बेदी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल

    Kiran Bedi
  • माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मागील जवळपास दोन वर्षांपासून या राज्याचा अतिरिक्त भार अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होता. 
  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय झाला असून, त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या असलेल्या बेदी यांची नायब राज्यपाल पदावर नियुक्ती होणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
  • मोदी सरकारने सूत्रे स्वीकारताच पुद्दुचेरीचे तत्कालीन नायब राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांना हटविले होते. कॉंग्रेस आघाडीने कटारिया यांची या नियुक्ती केल्याला त्या वेळी फक्त एक वर्षच झाले होते.
  • यानंतर अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ले. जन. अजयसिंह यांना पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. 
 किरण बेदी यांच्याविषयी 
  • १९७२च्या तुकडीच्या किरण बेदी या भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असून, त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे नेतृत्व केले होते.
  • बेदी यांनी पोलिस सेवेतून २००७मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्या वेळी त्या पोलिस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावर होत्या.
  • क्रीडाप्रेमी आणि लेखिका असलेल्या बेदी यांना पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच, त्यांना यूएन पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

सेबीने पी-नोटचे नियम कडक केले

  • परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करता यावी यासाठी तयार करण्यात आलेली पार्टिसिपेटरी नोटची (पी-नोट) सुविधा वादात सापडल्यामुळे भांडवल बाजार नियंत्रक सेबीने अखेर पी-नोटचे नियम कडक केले आहेत.
  • काळ्या पैशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या शिफारसींनुसार सेबीने खालील नियम तयार केले आहेत.
  • पी-नोट घेणाऱ्या सर्व परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील काळा पैसा प्रतिबंधक कायद्याचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
  • पी-नोटच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनाला आल्यास या पी-नोट जारी करणाऱ्यांना त्याची माहिती तात्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • पी-नोट जारी करणाऱ्यांना यापुढे पी-नोटमधून देशात येणाऱ्या पैशाचा कालबद्ध आढावा घ्यावा लागणार आहे. हा आढावा घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला सेबीला देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
  • पी-नोट जारी करताना व त्याचा वापर करून देशात गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची ढिलाई यापुढे सहन केली जाणार नाही, असेही सेबीने बजावले आहे.

भारत आणि ओमान दरम्यान चार महत्त्वपूर्ण करार

  • भारत आणि ओमान यांनी आज द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
  • संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोहचल्यानंतर हे करार झाले.
  • ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली. त्याचप्रमाणे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमतीही दर्शविली.

शनिवार, २१ मे, २०१६

चालू घडामोडी : २० व २१ मे

अमेरिकी प्रतिनिधीगृहात पाकिस्तानविरोधी ‘एनडीएए २०१७’ विधेयक मंजूर

  • व्हाइट हाउसच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करताना रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधीगृहाने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले.
  • रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधिगृहात प्राबल्य असतानाही हा कायदा मंजूर झाला आहे. एनडीएए २०१७ (एचआर ४९०९) हा कायदा अमेरिकी प्रतिनिधिगृहाने २७७ विरूद्ध १४७ मतांनी संमत केला आहे.
  • या विधेयकांतर्गत हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईमध्ये अपयशी ठरल्यास पाकिस्तानला मिळणारी ४५ कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील कायदेमंडळ सदस्यांमध्ये पाकविरोधी भावना तीव्र असून त्यामुळे खालील तीन सुधारणा विधेयकांना मंजुरी मिळाली आहे, ज्या पाकिस्तानच्या विरोधात आहेत.
  1. नवीन संमत करण्यात आलेल्या कायद्यानुसार पाकिस्तानने हक्कानी गटाला पायबंद घातल्याचे ओबामा प्रशासनाने प्रमाणित केले तरच त्या देशाला ४५ कोटी डॉलर्सची मदत मिळणार आहे.
  2. काँग्रेसच्या सदस्या डॅना रोहराबॅचर यांनी कायद्यात आणखी दुरूस्ती सुचवताना पाकिस्तान दिलेल्या लष्करी मदतीचा वापर अल्पसंख्याक गटांवर करणार नाही याची हमी संरक्षण मंत्र्यांनी द्यावी अशी अट घातली आहे.
  3. पाकिस्तान सरकारने शकील आफ्रिदी यांना तातडीने सोडून द्यावे, अशी मागणी अमेरिकी काँग्रेसमध्ये करण्यात आली. 
  • राष्ट्रीय संरक्षण मान्यता विधेयक आता सिनेटमध्ये मंजूर होणे आवश्यक आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सहीसाठी हे विधेयक व्हाइट हाउसकडे पाठविले जाऊ शकेल. ओबामांच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा बनेल.

भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन यांच्याकडे नासाच्या मोहिमेचे नेतृत्त्व

  • आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.
  • नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एनईआयडी’ (नेड) या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने निवड केली आहे.
  • नेडची बांधणी २०१९मध्ये पूर्ण होणार आहे. अरिझोना येथे ३.५ मीटर डब्ल्यूआयवायएन दुर्बिणीवर हे उपकरण लावले जाईल. या प्रकल्पासाठी अमेरिकेने ९७ लाख डॉलर्सचा निधी दिला आहे.
  • नवी दुर्बिण डॉपलर रडारच्या मदतीने काम करणार आहे. ही दुर्बिण जगात पृथ्वीसारखाच एखादा दुसरा ग्रह आहे का?, याचा शोध घेईल.
  • ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांवर होणारे सौम्य कंपन (शास्त्रीय नाव वोबल) मोजण्याचे काम ‘नेड’ या उपकरणाद्वारे केले जाईल.
  • मागील २० वर्षात संशोधकांनी आपल्या सूर्यमालेबाहेरच्या ३ हजारांपेक्षा जास्त ग्रहांचा शोध लावला आहे. मात्र यातील एकही ग्रह मानवी जीवनासाठी योग्य नाही. या पार्श्वभूमीवर आता नव्या पद्धतीने हा शोध सुरू केला आहे.
 सुव्रत महादेवन 
  • सुव्रत हे मूळ अहमदाबादमधील असून त्यांचे आयआयटी मुंबई येथून शिक्षण झाल्यानंतर डॉक्टरेटच्या शिक्षणासाठी ते २०००साली अमेरिकेला गेले. ते सध्या अहमदाबाद भेटीवर आले आहेत.
  • सुव्रत हे सध्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.

बिहारमध्ये गुटखा व पानमसाल्यावर बंदी

  • दारुबंदीनंतर बिहार सरकारने आता गुटखा व पानमसालाच्या विक्री, वितरण, साठवण व प्रसिद्धिवर बंदी घातली आहे.
  • बिहार सरकारने अधिकाऱ्यांना छापे टाकुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
  • सार्वजनिक आरोग्यास होणारी हानी टाळण्यासाठी तंबाखु असलेले खाद्यपदार्थांवरील ही बंदी पुढील वर्षभरासाठी असणार आहे. या आदेशाचा परिणाम लहान व्यावसायिक व विक्रेत्यांवर होणार आहे.
  • नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने १ एप्रिल रोजी बिहारमध्ये दारुबंदी लागु करुन देशीदारु व हातभट्ट्यांवर विक्री व वापर बंदी जाहीर केली होती.
  • बिहारव्यतिरिक्त भारतात गुजरात, नागालँड, लक्षद्वीप व मणिपुरमध्ये दारुबंदी आहे. केरळमध्ये २०१४ पासून टप्प्या-टप्प्याने दारुबंदी लागू करण्यात येत आहे.

पेमेंट बँक स्थापनेतून दिलीप संघवी यांची माघार

  • नव्या धाटणीच्या ११ पेमेंट बँक परवान्यांसाठी रिझर्व्ह बँकेकडून तत्त्वत: मंजुरी मिळविणाऱ्यांपैकी एक असलेल्या दिलीप संघवी फॅमिली अँड असोसिएट्स (डीएसए) यांनी या प्रयत्नातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.
  • अन्य दोन भागीदारांसह सामूहिकपणे घेतला गेलेला हा माघारीचा निर्णय रिझर्व्ह बँकेलाही कळविण्यात आला आहे. 
  • भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले दिलीप संघवी हे औषधनिर्मिती क्षेत्रातील सन फार्मा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
  • गेल्या वर्षी त्यांनी पेमेंट बँकेसाठी रिझर्व्ह बँकेकडे व्यक्तिगत स्वरूपात अर्ज दाखल केला होता. सप्टेंबर २०१५ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून मंजुरीनंतर, त्यांनी टेलिनॉर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आयडीएफसी बँक अशा त्रिपक्षीय भागीदारीतून पेमेंट बँक स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते.

जागतिक कीर्तीच्या जाहिरात संस्थांमध्ये मुंबईची ‘फेमस इनोव्हेशन्स’

  • सर्जनाच्या क्षेत्रात कार्यरत जागतिक कीर्तीच्या १४ निष्पक्ष जाहिरात संस्थांमध्ये राज कांबळे यांनी स्थापित केलेल्या मुंबईस्थित ‘फेमस इनोव्हेशन्स’ या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे.
  • ‘द नेटवर्क वन’ने लंडनस्थित कॅम्पेन मॅगेझिनच्या सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणाअंती २०१६ सालासाठी ही जागतिक अग्रणी संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • रेड ब्रिक रोड (ब्रिटन), द सीक्रेट लिटिल एजन्सी (सिंगापूर) आणि द ज्युपिटर रूम (दक्षिण आफ्रिका) वगैरे अग्रणी कंपन्यांच्या सूचित स्थान मिळविणारी फेमस इनोव्हेशन्स ही एकमेव भारतीय जाहिरात कंपनी आहे.
  • अलीकडेच कॅम्पेनतर्फे दक्षिण आशियातील वर्षांतील सर्वोत्तम जाहिरात संस्था आणि यंग कान्स लायन यासारखे प्रतिष्ठेचे सन्मान मिळविणाऱ्या फेमस इनोव्हेशनला लाभलेला तिसरा बहुमान आहे.
  • डिसेंबर २०१२मध्ये सुरुवात करणाऱ्या या कंपनीची सध्या दोन कार्यालये आणि ७५ सर्जनशील (creative thinking) मनुष्यबळाचा ताफा आहे.

वास्को द गामा भारतात येण्याच्या घटनेला ५१८ वर्ष पूर्ण

  • युरोपातून थेट भारत भूमीवर दाखल झालेले वास्को द गामा पहिले युरोपियन प्रवासी आहेत. २० मे १४९८ रोजी वास्को द गामा भारतात दाखल झाले होते. या घटनेला ५१८ वर्ष पूर्ण झाली आहेत.
  • अटलांटिक महासागरातून प्रवास करत आलेले त्यांचे जहाज सर्वप्रथम कालिकत बंदरात थांबले. त्यांच्या आगमनानंतर युरोप आणि भारतामध्ये व्यापारी संबंधांची सुरुवात झाली. 
  • वास्को-द-गामा मूळचे पोर्तुगीज होते. जुलै १४९७ रोजी पोर्तुगालच्या लिसबनमधून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती.
  • कालिकत बंदरात उतरल्यानंतर तिथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांकडून वास्को-द-गामाला फारशी चांगली वागणूक मिळाली नाही. १४९९ मध्ये पुन्हा पोर्तुगालला परतताना त्यांची मुस्लिम व्यापाऱ्यांबरोबर लढाईही झाली होती. 
  • १५०२साली झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वास्को-द-गामा जहाजांचा ताफा घेऊन पुन्हा कालिकत बंदरात दाखल झाले.
  • १५२४ साली पोर्तुगालने त्यांना व्हॉईसरॉय बनवून भारतात पाठवले. भारतातच ते आजारी पडले आणि कोचिनमध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

शनिवार, २१ मे, २०१६

राज्यसेवा मुख्यपरीक्षा बदल


राज्यसेवा मुख्यपरीक्षा मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल