बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट नामकरण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
- मुंबई बरोबरच कलकत्ता हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट असे नाव बदलायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- १९९५ साली बॉम्बे शहराचे मुंबई असे नामकरण झाले. पण त्यानंतरही बॉम्बे हायकोर्टाच्या नावात बदल झाला नाही. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करावे अशी शिवसेनेची मागणी होती.
- महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे युती सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण झाले.
- ही उच्च न्यायालये १८६० मध्ये स्थापन झाली असल्याने १८६१ च्या कायद्यात नावे बदलण्याची तरतूद नाही. त्यामुळे यासाठी ‘द हायकोर्ट अल्टरेशन ऑफ नेम्स बिल २०१६’ मांडण्यात येणार आहे.
सरकारच्या निर्गुंतवणुकीकरिता सल्लागाराची नियुक्ती
- निर्गुंतवणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘डिपार्टमेन्ट ऑफ इन्व्हेस्टमेन्ट अॅण्ड पब्लिक अॅसेट मॅनेजमेन्ट’ (दिपम) या खात्याने केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या भविष्यातील निर्गुंतवणुकीकरिता एका अनुभवी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.
- असा सल्लागार ६५ वर्षांहून कमी वयाचा नसेल व त्याला सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा व शेअर बाजारांतील विक्री व्यवहारांचा दहा वर्षांहून अधिक अनुभव असावा अशी अपेक्षा आहे.
- यापूर्वी केंद्र सरकारने सरकारी उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम तब्बल १२ वर्षांपूर्वी अमलात आणला होता.
- केंद्र सरकारने २०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात आधीच्या निर्गुंतवणूक खात्याचे नाव ‘दिपम’ असे बदलले. सरकार चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीद्वारे एकूण ५६,५०० कोटी रुपये उभारू इच्छित आहे.
‘गुगल इंडिया’ कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कंपनी
- ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘गुगल इंडिया’ने अग्रस्थान पटकावले आहे.
- ‘गुगल इंडिया’ ही भारतातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कंपनी ठरली असून, अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
- भारतामध्ये नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या कंपन्यांची यादी ‘इकॉनॉमिक टाइम्स’तर्फे दर वर्षी जाहीर करण्यात येते. यंदाचे हे सर्वेक्षणाचे नववे वर्ष आहे.
- २०१५मध्ये ‘गुगल इंडिया’ या यादीत दुसऱ्या स्थानी होती. या वर्षी कंपनीने एका स्थानाने प्रगती केली आहे.
- दुसऱ्या स्थानावर ‘अमेरिकन एक्स्प्रेस’ ही अमेरिकेची क्रेडिट कार्ड कंपनी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीने दोन स्थानांनी झेप घेतली आहे.
- उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस या भारतीय कंपनीने तिसरे स्थान पटकावले असून, मागील वर्षीपेक्षा या कंपनीने तब्बल २४ स्थानांनी झेप घेतली आहे.
- या सर्वेक्षणामध्ये ७९१ कंपन्यांनी सहभाग घेतला होता आणि याअंतर्गत तब्बल १.५५ लाख कर्मचाऱ्यांची मते विचारात घेण्यात आली. भारतात अशा प्रकारे केले जाणारे हे सर्वांत मोठे सर्वेक्षण आहे.
- संस्थेवरील विश्वास, कर्मचाऱ्यांची मैत्री, कंपनीचे कर्मचारीकेंद्रित धोरण याचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
- त्याशिवाय तेथील कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली. त्यावरून कर्मचाऱ्यांचे समाधान आदींबाबत निरीक्षणे समोर आली आहेत.
या यादीतील सर्वोत्तम दहा कंपन्या | |||
---|---|---|---|
१. | गुगल इंडिया | २. | अमेरिकन एक्स्प्रेस इंडिया |
३. | उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस | ४. | टेलिपरफॉर्मन्स इंडिया |
५. | गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स | ६. | मॅरियट हॉटेल्स इंडिया |
७. | सॅप लॅब्ज इंडिया | ८. | ओबेरॉय समूह |
९. | लेमन ट्री हॉटेल्स | १०. | इंट्युट इंडिया प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सेंटर |
लिओनेल मेस्सीला २१ महिन्यांची शिक्षा
- जगातील सर्वोत्तम फुटबॉलपूट म्हणून पाच वेळा गौरवण्यात आलेल्या बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला कर चुकवेगिरी प्रकरणात स्पेनमधील बार्सिलोना न्यायालयाने २१ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
- काही दिवसांपूर्वीच फुटबॉलमधून निवृत्ती घेणाऱ्या अर्जेंटिनाच्या या माजी खेळाडूसह त्याचे वडील जॉर्ज यांना देखील न्यायालयाने २१ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
- या शिक्षेच्या विरोधात दोघांनाही स्पेनमधील सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.
- स्पेनमधील कायद्यानुसार दोन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यास ती नजरकैदेत राहून भोगता येते. त्यामुळे मेस्सी आणि त्याच्या वडिलांना तुरुंगात जावे लागण्याची शक्यता कमीच आहे.
- न्यायालयाने २१ महिन्यांच्या शिक्षेसह मेस्सीला २ मिलियन यूरो तर वडिल जॉर्ज यांना १.५ मिलियन यूरो इतका दंड ठोठावला आहे.
- मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
- २००७-०९मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप होता.
हॉकी जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानी
- लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
- ‘एफआयएच’ (इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन)च्या जागतिक रँकिंगमध्ये भारतीय संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
- या यादीत विश्व विजेता आणि चॅम्पियन्स स्पर्धेतील विजेत्या ऑस्टेलिया संघाने पहिले स्थान कायम राखले आहे. क्रमवारीत नेदरलँड, जर्मनी आणि इंग्लंड हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
- महिलांच्या क्रमवारीत नेदरलँड पहिल्या स्थानावर आहे. तर चॅम्पियन्स चषक विजेता अर्जेंटिनाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
- ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहेत. क्रमवारीत भारतीय महिला संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झाला नसून तो १३व्या स्थानावर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा