सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा देश म्हणून भारताने जगात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
जगभरात सर्वत्र रासायनिक अवशेषमुक्त शेतीचे महत्त्व वाढत असताना, भारतानेदेखील या क्षेत्रात आपण मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
‘इंटर-फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रिकल्चर मूव्हमेंट’ (आयफोम) या सेंद्रिय शेती क्षेत्रातील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संघटनेने ही माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
२०१४पर्यंतच्या आकडेवारीचा आधार घेता सेंद्रिय शेती करणाऱ्यांच्या यादीत भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे.
जगात सर्वाधिक सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांची संख्या (साडेसहा लाख) भारतामध्येच असल्याचे अहवालात म्हटले आहे. युगांडा (१,९०,५५२) आणि मेक्सिको (१,६९,७०३) जगात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
जगातील सेंद्रिय उत्पादकांच्या एकूण संख्येतील बहुतांश म्हणजे ७५ टक्के शेतकरी आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेतील आहेत.
भारतीय सौरक्षेत्राला जागतिक बॅंकेची एक अब्ज डॉलरची मदत
सौरऊर्जेच्या वापरासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत जागतिक बॅंकेने या क्षेत्राच्या विकासासाठी एक अब्ज डॉलरची मदत जाहीर केली.
तसेच, भारताच्या नेतृत्वाखाली १२१ देशांच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबरही (आयएसए) बॅंकेने करार करत जागतिक स्तरावर सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले.
या करारामुळे जागतिक बॅंक ही ‘आयएसए’ची आर्थिक भागीदार बनली आहे. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम हे सध्या भारतात आले आहेत.
सौरक्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची जागतिक बॅंकेची ही पहिलीच वेळ आहे.
‘बराक ८’ची यशस्वी चाचणी
३० जून रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील संरक्षण तळावरून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘बराक ८’ची चाचणी घेण्यात आली.
सुरक्षेसाठी चाचणीच्या आधी ओडिशाच्या चंडीपूर रेंजजवळील ७ गावांमधील ३६०० लोकांना इतरत्र हलविण्यात आले आहे.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘बराक ८’ ची क्षमता ७० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची आहे. याची लांबी ४ मीटर असून यावर ६० किलोग्रॅम वजन लोड केले जाऊ शकते.
या क्षेपणास्त्रात ‘मल्टिफंक्शनल सर्व्हेलिअंस‘ ही प्रणाली असून हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही.भारत व इस्राईलने संयुक्तरीत्या या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
राज्यसभेतील नवनियुक्त ९६ टक्के खासदार कोट्यधीश
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) ने जाहीर केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार राज्यसभेतील नवनियुक्त ५७ खासदारांपैकी ५५ म्हणजेच ९६ टक्के खासदार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या मालमत्तेची सरासरी ३५.८४ कोटी रुपयांची आहे.
सध्याच्या खासदारांमध्ये २५२ कोटींपेक्षाही जास्त संपत्ती असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत.
तर कॉंग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्याजवळ २१२.५३ कोटी व बसपाचे सतीश चंद्र मिश्रा यांच्याजवळ १९३ कोटींची मालमत्ता आहे.
राज्यसभेवर ५७ सदस्यांची नव्याने निवड झाली आहे. यामध्ये भाजपचे १७, कॉंग्रेसचे ९, समाजवादी पक्षाचे ७, अण्णाद्रमुकचे ४ तर बिजू जनता दलाचे ३ सदस्य निवडून गेले आहेत.
यासह संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम, बहुजन समाजवादी पक्ष व तेलगू देसम पक्षाचे प्रत्येकी दोन खासदार आहेत.
अकाली दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना तथा वायएसआर कॉंग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य निवडून गेले आहेत. सध्याच्या राज्यसभा सदस्यांमध्ये एका अपक्ष उमेदवाराचाही समावेश आहे.
एकूण ५५ नव्या कोट्यधीश खासदारांपैकी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे केवळ दोन खासदार वगळता बाकी १५ राज्यसभा सदस्य कोट्यधीश आहेत.
भारताच्या पहिल्या एकात्मिक संरक्षण दळणवळण यंत्रणेचे उद्घाटन
केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताच्या पहिल्या एकात्मिक संरक्षण दळणवळण यंत्रणेचे उद्घाटन केले.
यामुळे लष्कर, हवाई दल, नौदल आणि विशेष दले यांच्यात माहितीची तातडीने देवाणघेवाण होऊन निर्णयप्रक्रिया वेगवान होण्यास मदत होणार आहे.
अत्यंत सुरक्षित आणि धोरणात्मक असलेल्या संरक्षण दळणवळण यंत्रणेची (डीसीएन) व्याप्ती लडाख आणि ईशान्य भारतापासून ते सर्व बेटांपर्यंत असणार आहे.
तीनही दलांमध्ये आपापली दळणवळण यंत्रणा असताना तिघांना जोडणारी ही पहिलीच यंत्रणा आहे.
सर्व संरक्षण दलांमध्ये योग्य संपर्क आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने सहाशे कोटी रुपये खर्च करून प्रयत्नपूर्वक ही यंत्रणा तयार केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा