पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिकेतील चार देशांच्या दौऱ्याला ८ जुलै रोजी मोझांबिकपासून सुरवात झाली. दोन्ही देशांदरम्यान, सुरक्षा, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत करार करण्यात आले.
जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा जगाला सर्वांत मोठा धोका असल्याचा इशारा मोदी यांनी यावेळी दिला.
अमली पदार्थ तस्करीसह अन्य गुन्ह्यांचा दहशतवादाशी परस्परसंबंध असून, याला रोखण्यासाठी मोझांबिकशी करार करण्यात आला आहे.
भारतात डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने मोझांबिकमधून डाळ खरेदी करण्याचा दीर्घ मुदतीचा करार करण्यात आला. या करारावर मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि मोदी यांनी स्वाक्षरी केली.
भारत आणि मोझाम्बिक हे हिंदी महासागराने जोडलेले देश असून, भारत हा मोझांबिकचा विश्वासू मित्र आणि भरवशाचा सहकारी आहे.
या देशाला एड्सशी लढण्यासाठी अन्य गरजेच्या औषधांचा भारत पुरवठा करणार आहे. आफ्रिकेतील या देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
बराक ओबामा युरोपच्या दौऱ्यावर
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या आठवड्यात नाटो शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी युरोपच्या दौऱ्यावर जाणार असून ते पोलंड आणि स्पेनला भेट देणार आहेत.
ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युरोप आणि अमेरिकेतील चर्चेद्वारे ब्रेग्झिटनंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
युरोपसमवेत ज्या विषयांवर सहकार्य करण्यात येत आहे त्याबाबतही चर्चा होणार आहे. त्यामध्ये दहशतवाद, स्थलांतर, आर्थिक प्रश्न आणि रशियाचा प्रश्न यावरही चर्चा होणार आहे.
संरक्षणात्मक उपाय म्हणून अमेरिका आणि दक्षिण कोरिया हे देश कोरियाच्या किनाऱ्यावर अत्याधुनिक ‘थड’ (टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स) क्षेपणास्त्रे तैनात करणार आहेत.
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिका एकत्र आले आहेत.
उत्तर कोरियाने वारंवार क्षेपणास्त्र चाचणी घेत अमेरिकेवरही थेट हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी ‘थड’ क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत.
केवळ उत्तर कोरियावरच वचक निर्माण करण्यासाठी ही योजना असून, इतर कोणत्याही देशाला यापासून धोका नसल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
ही क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याचा निर्णय झाला असला तरी ती कार्यान्वित करण्याचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या निर्णयाचा चीनने जोरदार विरोध केला आहे.
नरेंद्र मोदी आणि जेकब झुमा यांच्यात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी ८ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट घेतली.
यावेळी संरक्षणसामग्री, उत्पादन, खाणकाम व खनिज क्षेत्रातील संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतिशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शविली आहे.
संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण असून, प्रादेशिक व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील, यावर मोदी आणि झुमा यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा