चालू घडामोडी : २७ जुलै

रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१६

  • सामाजिक कार्यकर्ते बी. विल्सन आणि संगीतकार टी.एम.कृष्णा या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा २०१६ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे.
    Bezwada Wilson and T M Krishna
 टी. एम. कृष्णा 
  • चेन्नईचे टी. एम. कृष्णा यांना संगीताच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • कर्नाटकी संगीताचे पुरस्कर्ते असलेल्या कृष्णा यांनी संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक सर्वसमावेशकता व सामाजिक समरसता वाढवण्याचा प्रयत्न केला.
  • एका वर्गापुरते बंदिस्त असलेले शास्त्रीय संगीत दलितांसह इतर वर्गांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कृष्णा यांनी केला. त्यांच्या या कामाची दखल मॅगसेसे फाउंडेशनने घेतली आहे.
 बेझवाडा विल्सन 
  • बेझवाडा विल्सन हे मूळचे कर्नाटकमधील असून दलित कुटुंबात जन्मले आहेत. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी ते सातत्याने लढत असतात.
  • त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी मैला साफ करणाऱ्या दलित, अस्पृश्य कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद केला.
  • कायद्याने मानवी मैला डोक्यावर वाहून नेण्यासाठी बंदी असताना सरकारकडूनच याचे उल्लंघन होत असल्याची बाब विल्सन यांनी उघड केली होती.
  • मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला.
 इतर पुरस्कार विजेते 
  • फिलिपिन्समधील कोकिंथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियातील डॉम्पेट दुआफा यांनाही हा सन्मान जाहीर झाला आहे.
  • लोकांच्या मनात कायद्याप्रती विश्वास निर्माण केल्याबद्दल कारपिओ-मोरालेस यांना सन्मानित केले जाणार आहे.
  • तर मुस्लिमांमधील धार्मिक कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जकात’मध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलाबद्दल दुआफा यांचा गौरव केला जाईल.
  • संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या लाओस येथील ‘व्हिएतियन रेस्क्यु’ आणि ‘जपान ओव्हरसीज कोऑपरेशन’या दोन संस्थांनादेखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 रॅमन मॅगसेसे पुरस्कार 
  • आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे ॲवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
  • फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
  • सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • आतापर्यंत विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अरूणा रॉय यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

इरोम शर्मिला निवडणूक लढविणार

  • ईशान्य भारतात लागू असलेला अफ्स्पा कायदा हटविण्याची मागणी करत मागील १६ वर्षांपासून उपोषण करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला या ९ ऑगस्टला उपोषण सोडणार आहेत.
  • आपल्या लढ्याला वेगळे वळण देत २०१७मध्ये मणिपूरमध्ये होणारी विधानसभा निवडणूकही लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
  • उपोषण करून आत्महत्या केल्याच्या आरोपावरून गेल्या काही वर्षांत शर्मिला यांना अनेकदा अटक होऊन सुटकाही झाली आहे. दर पंधरा दिवसांनी शर्मिला यांना न्यायालयात हजेरी द्यावी लागते.
  • उपोषणाच्या मार्गाने ‘अफ्स्पा’ हटवून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे शर्मिला यांचे म्हणणे आहे.
  • पुढील वर्षी मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणून उतरणार आहेत. 
 अफ्स्पा 
  • १९५८मध्ये आर्म्ड फोर्सेस (स्पेशल पॉवर) ॲक्ट (अफ्स्पा) संमत केला गेला. हा कायदा ईशान्येतील सात राज्यांसह आणि जम्मू-काश्मीरमध्ये लागू आहे.
  • या कायद्यांतर्गत लष्कराला विशेषाधिकार मिळून ते कोणत्याही घराची झडती घेऊन संशयावरून व्यक्तीला अटक करू शकतात.
  • दहशतवाद आणि बंडखोरी मोडून काढण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
  • मात्र, हा कायदा नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात असल्याचे सांगत शर्मिला यांनी ४ नोव्हेंबर २०००पासून उपोषण सुरू केले आहे.
 मणिपूरची लोहमहिला 
  • पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ उपोषण करून जगातील सर्वाधिक उपोषण करणारी व्यक्ती ठरलेल्या इरोम चानू शर्मिलाला ‘मणिपूरची लोहमहिला’ संबोधले जाते.
  • त्यांचा जन्म १४ मार्च १९७२ रोजी झाला. नागरी हक्कांसाठीची लढवय्यी, राजकीय कार्यकर्ती, कवी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.
  • त्यांना मानवी हक्कासाठीच्या आशियाई मानवी हक्क आयोग, ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या पारितोषिकांनी गौरवले आहे. 
  • २०१४मधील निवडणुकीत देऊ केलेली उमेदवारीही त्यांनी नाकारली होती.

बालकामगार प्रतिबंध विधेयक मंजूर

  • कुठल्याही उद्योग-व्यवसायात १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवल्यास संबंधित उद्योग-व्यवसायाच्या मालकास यापुढे दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार आहे.
  • मात्र, १४ वर्षांखालील मुलांनी कौटुंबिक उद्योग-व्यवसायात मदत केल्यास ती कृती शिक्षेच्या कक्षेत येणार नाही. 
  • १४ वर्षांखालील मुलांना कामावर जुंपणे हा दखलपात्र गुन्हा ठरवणारे ‘बालकामगार प्रतिबंध व नियंत्रण दुरुस्ती विधेयक’ लोकसभेने २६ जुलै रोजी मंजूर केले.
  • यामध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना धोकादायक क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत कामावर ठेवण्यासही बंदी घातली आहे.
  • नियमभंग करणाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा २० हजार ते ५० हजार रु. दंड किंवा दोन्ही शिक्षा एकाचवेळी होतील.
  • मात्र, १४ वर्षांखालील मुलांना काम करण्यास सरसकट बंदी घालून केंद्र सरकारने दोन पावले पुढे टाकली असली तरी ‘कौटुंबिक उद्योगा’तील कामाची मुभा देऊन त्यांचे पाय पुन्हा एकदा 'मजुरीत' अडकवले आहेत.
  • शाळेच्या वेळेआधी आणि नंतर कुटुंबातील उद्योगात काम करण्याची मुभा मुलांना देण्यात आली असून, त्यासाठी 'धोकादायक'ची अटही नाही. 

चिरंतन विकास निर्देशांकात भारत ११०वा

  • चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११०वे आहे. स्वीडन जगात सर्वोच्च स्थानी आहे.
  • चिरंतन विकास समाधान नेटवर्क (एसडीएसएन) आणि बर्टल्समॅन स्टिफगंग यांनी संयुक्तरीत्या ‘चिरंतन विकास निर्देशांक’ सादर केला आहे.
  • या क्षेत्रात प्रत्येक देशाने केलेली प्रगती आणि उत्तरदायित्व निश्चित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे.
  • १४९ देशांची आकडेवारी तपासून हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. २०१६मधील कामगिरीचा आढावा त्यात घेण्यात आला आहे.
  • जागतिक पातळीवर १७ उद्दिष्टांना श्रेणी देऊन विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. या उद्दिष्टांत आर्थिक विकास, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणपूरकता आदींचा समावेश आहे.
  • या यादीत स्वीडन पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या स्थानी डेन्मार्क आणि तिसऱ्या स्थानी नॉर्वे हे देश आहेत.
  • जर्मनी ६व्या स्थानी, ब्रिटन १०व्या स्थानी आहे. अमेरिका २५व्या स्थानावर, रशिया ४७ व्या, तर चीन ७६व्या स्थानावर आहे. 
  • भारत ११०व्या स्थानी, पाकिस्तान ११५व्या स्थानी, म्यानमार ११७व्या स्थानी, बांगलादेश ११८व्या स्थानी, तर अफगाणिस्तान १३९व्या स्थानी आहे.
  • गरीब आणि विकसनशील देश या निर्देशांकात सर्वांत खालच्या पातळीवर आहेत. सर्वांत शेवटच्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि लायबेरिया हे देश आहेत.

‘सोलर इम्पल्स-२’ची जगप्रदक्षिणा पूर्ण

  • सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर इम्पल्स-२ या विमानाने २७ जुलै रोजी इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • मागील वर्षी ९ मार्च रोजी या विमानाने उड्डाण करताच संपूर्ण जगाचे लक्ष आकाशाकडे लागले होते. अपारंपरिक ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला होता. 
  • सोलर इम्पल्स-२चा प्रवास १७ टप्प्यांत झाला. या विमानाने जवळपास ४२ हजार किलोमीटरचे अंतर पार करत चार खंड, तीन समुद्र आणि दोन महासागरांना गवसणी घातली.
  • या विमानाने जपानमधील नागोया ते हवाईदरम्यानचे ८,९२४ किमी अंतर ११८ तासांत पूर्ण केले. यामुळे वैमानिक आंद्रे बोर्शबर्ग यांच्या नावे सर्वाधिक काळ ‘सोलो फ्लाइट’चा विक्रम नोंदविला गेला. 
  • पिक्कार्ड आणि बोर्शबर्ग हे दशकभरापेक्षाही अधिक काळपासून ‘सोलर इम्पल्स’च्या प्रकल्पावर काम करत होते. या अनोख्या प्रवासामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात १९ विश्वविक्रमांची नोंद झाली.
  • हे विमान मोटारीपेक्षा जास्त जड नसून त्याचे पंख मात्र बोईंग ७४७ विमानाएवढे आहेत. त्याला चार इंजिने असून त्याच्या पंखात १७००० सौर घट बसवलेले आहेत.
  • ताशी ८० किलोमीटर वेगाने हे विमान जाते. त्यात वैमानिक श्वसनासाठी ऑक्सिजन टाकीचा वापर करतात.
  • सोलर इम्पल्स-२ बद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘व्हेरिझॉन’कडून ‘याहू’चे अधिग्रहण

  • अमेरिकेची व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्स मोजून इंटरनेट विश्वातील महत्त्वाची कंपनी असलेली ‘याहू’ची खरेदी करणार आहे.
  • त्याद्वारे डिजिटल जाहिरात आणि माध्यम व्यवसायात मोठी वाढ होण्याची आशा व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सने व्यक्त केली आहे.
  • व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनीने गेल्या वर्षी ‘एओएल’ची ४.४ अब्ज डॉलर्सना खरेदी केली होती. ‘एओएल’च्या इंटरनेट व्यवसायाला चालना देण्यासाठी याहू आणि एओएल यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
  • व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स आणि याहू यांचा हा व्यवहार २०१७च्या सुरुवातीला पूर्ण होईल. या व्यवहाराला समभागधारक आणि नियामक संस्थेची मंजुरी मिळेपर्यंत याहू ही स्वतंत्र कंपनी म्हणून कायम राहील.
  • याहूच्या खरेदीसाठी एटी अ‍ॅण्ड टी कंपनी, टीपीजी कॅपिटल आणि अन्य कंपन्या उत्सुक होत्या. मात्र व्हेरिझॉनने या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत याहूच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले.
  • याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी : मेरिसा मेयर

एचडीएफसी बँक व बँक ऑफ बडोदाला दंड

  • ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) अंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला २ कोटी तर बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदातील ६,१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर, बँकेच्या ताळेबंदाचा हिशेब केल्यानंतर बँकेवर ५ कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे.
  • ‘केवायसी’चे पालन न होता अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. याबाबत खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांना याबाबत रिझर्व्ह बँकेने सूचित केले होते.

हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार

  • डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे.
  • हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध दर्शवला होता. परंतु नंतर त्यांचा विरोध मावळला.
  • हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री होत्या. अमेरिकेतल्या प्रभावी व्यक्तीमत्वांपैकी त्या एक आहेत. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
  • नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन विरूद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी चुरस रंगणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा