रस्ते व महामार्ग वाहतूक राज्यमंत्री पोन्नी राधाकृष्णन यांनी लोकसभेत अपघातांबाबत दिलेल्या माहितीनुसार, देशात २०१५मध्ये तमिळनाडूमध्ये सर्वाधिक अपघात (६९,०५९) झाले. त्यात १५,६४२ जणांचा बळी गेला.
२०१५मध्ये महाराष्ट्रात ६३ हजारांहून अधिक अपघात झाले असून, त्यात १३,२१२ जणांचा बळी गेला. अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र देशात दुसरा असून, बळींच्या संख्येमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याउलट देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात झालेल्या अपघातांची संख्या तुलनेने कमी (३२,३८५) आहे. मात्र, तेथे मृत्युमुखींची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६६ आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ अपघातांची संख्येमध्ये मध्य प्रदेश व कर्नाटक अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहे.
२०१५मध्ये भारतात एकूण ५,०१,४२३ अपघात झाले आणि त्यात १,४६,१३३ जणांचा मृत्यू झाला.
अपघातांची वाढती संख्या पाहून रस्ते व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय रस्ते निधीचा (सीआरएफ) १० टक्के हिस्सा रस्ते सुरक्षेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा
इस्तंबूल येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.
त्यानुसार युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगड व सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष यांचा समावेश आहे.
नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे.
याशिवाय पॅरिस येथील स्थापत्य विशारद ले कोर्बिझीयर यांनी मांडणी केलेल्या चंडीगडला वारसा ठिकाणात स्थान मिळाले आहे. १९५०मध्ये त्यांनी या शहराची रचना केली होती.
सिक्कीम नॅशनल पार्कचाही वारसा ठिकाणात समावेश केला आहे. माउंट कांचनजुंगा हे पर्वतशिखर त्यातच येते. काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडित आहेत.
या बैठकीत एकूण ७ देशातील १७ ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत दीपिका व सौरवला विजेतेपद
बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने स्पर्धेच्या जेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवली.
मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्ना चिनप्पावर ३-१ असा विजय मिळवला.
पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस रक्कम नसल्याने दीपिकाने २०११नंतर राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
बक्षीस रकमा समान झाल्याने खेळणाऱ्या दीपिकाने १४ राष्ट्रीय जेतेपदे नावावर असणाऱ्या जोश्नाला नमवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
या स्पर्धेत भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल याने पुरुष गटाच्या अंतिम फेरीत हरींदरपाल सिंग संधूला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले.
सौरवने हरींदरपालला ३-२ असे पराभूत करताना ११व्य्यांदा राष्ट्रीय जेतेपद पटकावले.
उत्तर कोरियाची तीन क्षेपणास्त्रांची चाचणी
उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विरोध झुगारुन पूर्व किनाऱ्यावर तीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ५०० ते ६०० किलोमीटरपर्यंत आहे.
उत्तर कोरियाने नुकतेच पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे.
उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवू शकत नाही, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला आहे.
मुशर्रफ यांची बॅंक खाती व संपत्ती गोठविण्याचे आदेश
पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची सर्व बॅंक खाती आणि इतर संपत्ती गोठविण्याचे आदेश पाकिस्तानमधील विशेष न्यायालयाने दिले आहेत.
मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. याप्रकरणी मुशर्रफ यांना हजर राहण्याबाबत अनेकदा नोटीस बजावूनही त्याचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मुशर्रफ यांनी शरणागती पत्करेपर्यंत अथवा त्यांना अटक होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी स्थगित करत असल्याचेही न्यायालयाने सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा