आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टांझानियाचे अध्यक्ष जॉन पोम्बे जोसेफ मगुफुली यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी मिळून पाच द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
त्यात साधन व्यवस्थापन, अधिकारी व राजनैतिक व्हिसा माफी, झांजीबार येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यावरच्या करारांचा समावेश आहे.
भारत सरकारने टांझानियाच्या झांझिबार येथील पाणीपुरवठा प्रणाली पुनर्वसन आणि सुधारणेसाठी ९.२ कोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले.
टांझानियाच्या इतर १७ शहरांमध्येदेखील पाणीपुरवठा प्रणालीच्या कार्यासाठी भारत मदत करणार आहे. त्यासाठी भारत सवलतीच्या दराने ५० कोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
टांझानियाला औषधे आणि त्या संबंधित वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यास भारत सरकार प्राधान्यक्रम देणार आहे.
मोदी यांनी ग्रामीण भागात सौर कंदिलाचा वापर करणाऱ्या ‘सोलर ममाज’ म्हणजे सौर मातांची भेट घेतली. भारताने दिलेल्या निधीअंतर्गत त्यांनी सौर कंदील निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण करून खेडी प्रकाशित केली आहेत.
पोर्तुगालने पहिल्यांदाच युरो चषक जिंकला
युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोर्तुगालने फ्रान्सवर १-० अशी मात केली.
२००४नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या पोर्तुगालने इतिहास रचला व पहिल्यांदाच युरो चषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.
अंतिम सामन्यातील पहिला भाग पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुर्दैवी दुखापतीमुळेच गाजला. या लक्षवेधी अंतिम सामन्याच्या पूर्वार्ध तसेच उत्तरार्धात गोलशून्य बरोबरी कायम राहिली.
९० मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सकडून अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोर्तुगालचा गोलकिपर लुइस पेट्रीश्योने जबरदस्त किपिंग करीत फ्रान्सचे आव्हान परतवून लावले.
अतिरिक्त वेळेमध्ये एडरने २५ यार्डांवरून केलेल्या गोलच्या जोरावर पोर्तुगाल संघाने फ्रान्सवर १-० ने विजय मिळविला.
अँडी मरेचे दुसरे विम्बल्डन जेतेपद
ब्रिटनच्या अँडी मरेने कॅनडाच्या मिलॉस रावनिचचा ६-४,७-६(७/३), ७-६ (७/२) असा पराभव करत दुसऱ्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचा खिताब पटकावला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मरेचे हे कारकिर्दीतील तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही पटकावले होते.
मरेने २०१२मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१३मध्ये विम्बल्डनचे विजेतपद मिळविले आहे. २०१२मध्ये मरेला विम्बल्डन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
भारतीय कंपन्या जगात सर्वाधिक पारदर्शी
‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने पारदर्शी व्यवहाराच्या निकषावर केलेल्या एका सर्वेक्षणात भारतीय कंपन्या जगात सर्वोत्कृष्ट असून चीनमधील कंपन्या या यादीत तळाला असल्याचे समोर आले आहे.
या संस्थेने जगात वेगाने विकसीत होणाऱ्या १५ देशांतील एकूण शंभर कंपन्यांची पाहणी केली. भारत आणि चीनसह ब्राझील, मेक्सिको आणि रशिया या देशांमधील कंपन्यांचाही यामध्ये समावेश होता.
यामध्ये त्या त्या देशांच्या कंपनी कायद्याचे पालन करत एकूण व्यवहार आणि गुंतवणूकीबाबत पारदर्शकता हा निकष तपासला गेला.
तपासल्या गेलेल्या भारताच्या सर्व १९ कंपन्यांना संस्थेने ७५ टक्क्यांहून अधिक गुण देत यादीत त्यांना वरचे स्थान दिले. याउलट चीनच्या कंपन्यांची कामगिरी मात्र फारच खराब असल्याचे निदर्शनास आले.
भारत सरकारकडून कायद्याची होणारी कडक अंमलबजावणी, कागपदत्रांची सखोल छानणी, उपकंपन्यांच्या व्यवहारांवरही नजर यामुळे पारदर्शकतेत वाढ झाली आहे.
भारतीय कंपन्यांमध्ये भारती एअरटेल या कंपनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
गंगाजल योजनेचे पाटणा येथे उद्घाटन
गंगोत्री आणि ऋषिकेश येथून आणलेले गंगाजल लोकांना रास्त किमतीमध्ये घरपोच देण्याची ‘गंगाजल’ या योजनेचे केंद्र सरकारच्या वतीने पाटणा येथे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय टपाल सेवेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पोस्टमन पवित्र गंगाजल घरपोच देणार आहेत.
पवित्र मानले जाणारे गंगेचे पाणी घरपोच देण्याची योजना यापूर्वीच काही ई-कॉमर्स संकेतस्थळांनी राबविली आहे. गोमुखातून आलेले एक लिटर पाणी २९९ रुपयांना देण्यात येते.
‘नेपार्टक’ चक्रीवादळाचा चीनमध्ये विध्वंस
चालू मोसमातील सर्वांत घातक अशा ‘नेपार्टक’ या चक्रीवादळाचा चीनमध्ये विध्वंस सुरू आहे.
या चक्रीवादळाच्या तडाख्याने १,००० पेक्षाही जास्त घरांचे नुकसान झाले असून ४.२८ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थानी पोचविण्यात आले आहे.
या चक्रीवादळामुळे देशातील विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
१० जुलै रोजी दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी आलेल्या नेपार्टकचा वेग १०० किलोमीटर प्रतितास इतका होता. ८ जुलै रोजी १९० किलोमीटर प्रतितास वेगाने ‘नेपार्टक’ पूर्व तैवान प्रांतात पोहचले होते.
वसंतराव पाटील यांचे निधन
बेळगाव, कारवारसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी राजकीय लढाई लढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार वसंतराव पाटील यांचे ११ जुलै रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
वसंतराव पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय तालुका बोर्डाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते.
शालेय जीवनातच त्यांनी सीमालढ्यात उडी घेतली होती. गेल्या २२ वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते अध्यक्ष होते. सीमप्रश्नासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा