मथुरा ते पलवल या मार्गावर घेण्यात आलेल्या चाचणीत स्पेनने तयार केलेली अतिवेगवान रेल्वे तासाला १८० किलोमीटर वेगाने धावण्यात यशस्वी ठरली.
मथुरा ते पलवल हे ८६ किलोमीटरचे अंतर या रेल्वेने केवळ ३९ मिनिटांत कापले. भारतीय रेल्वेच्या इतिहासात याआधी गतिमान एक्सप्रेस ही रेल्वे १६० किलोमीटर प्रति तास वेगाने धावली होती.
स्पेनमधील टॅल्गो या कंपनीची आणि लखनौच्या ‘स्टॅडर्ड्स असोसिएशन’मधील संशोधन व डिझाइन विभागातील इंजीनिअरच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली.
या रेल्वेमध्ये वाराणासीत तयार करण्यात आलेल्या ४५०० एचपी डिझेल इंजिनला नऊ मोकळे डबे जोडण्यात आले होते.
यानंतरची चाचणी मुंबई ते नवी दिल्ली या मार्गावर होणार असून, त्या मार्गावर २२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वेची चाचणी होईल.
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला
फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा केला जात असताना आतषबाजी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर भरधाव ट्रक घालून झालेल्या हल्ल्यात किमान ८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
‘बॅस्टिल डे’ (१४ जुलै) हा राष्ट्रीय दिन साजरा करत असताना निस येथील समुद्रकिनारी होणारी आतषबाजी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
त्याचवेळी हल्लेखोराने भरधाव ट्रक गर्दीत घुसविला. हा ट्रक दोन किलोमीटर आतपर्यंत माणसांना चिरडत पुढे जात राहिला.
पोलिसांनी ताताडीने ट्रकचालकाला गोळ्या घालून ठार केले. ट्रकमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रेही सापडली.
नोव्हेंबर २०१५मध्ये झालेल्या पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी देशात जाहीर केलेली आणीबाणी या हल्ल्यानंतर आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही आणीबाणी जुलैमध्ये समाप्त होणार होती.
मध्यप्रदेशमध्ये आनंद मंत्रालय
मध्यप्रदेश सरकारने राज्यात ‘आनंद’ विभाग स्थापन करण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.
‘आनंद’ विभाग असणारे मध्यप्रदेश हे भारताचे पहिले राज्य ठरणार आहे.
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या जनतेच्या मुलभूत गरजान्व्यतिरिक्त देखील समाजाच्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकार या विभागाची स्थापना करणार आहे.
जनतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन यावा, जनता समाधानी व्हावी, आयुष्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलावी हा या विभागाची स्थापना करण्यामागचा मूळ उद्देश आहे.
हा विभाग वेगळेगळे प्रयोग आणि उपाययोजना राबवून जनेतचे जीवन समृद्ध आणि समाधानी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ३.८० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
भारतात हा प्रयोग नवीन असला तरी याआधी लंडन, अमेरिकेमध्ये असे प्रयोग राबवण्यात आले आहेत. दुबईमध्ये देखील आनंद विभागाची स्थापना करून आणि एका महिलेकडे या विभागाचे मंत्रिपद देण्यात आले होते.
भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने फिडे वूमन ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तिचा हा ग्रांप्रीचा पहिलाच किताब आहे.
या स्पर्धेत ती अपराजित राहिली. तिने तीन विजय मिळवले, तर आठ लढती बरोबरीत सोडविल्या.
जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले.
भारताची आणखी एक ग्रँडडमास्टर कोनेरू हम्पीच्या खात्यावरसुद्धा ७ गुण जमा होते. सरस टायब्रेकच्या निकालांच्या आधारे हरिकाला विजेती म्हणून घोषित करण्यात आले.
हॉकीपटू जो अँटिक यांचे निधन
१९६०च्या रोम ऑलिम्पिकमधील हॉकी रौप्यपदक विजेत्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे आणि सेंटर हाफ म्हणून एक काळ गाजवणारेप्रसिद्ध हॉकीपटू जो अँटिक यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
१९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताची सुवर्णदौड पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवून रोखली होती. पाकिस्तानने तो सामना १-० असा जिंकला होता.
१९६२मध्ये जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्या संघाचेही अँटिक हे सदस्य होते.
१९८०च्या दशकात ते रेल्वेमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. ओमान संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले.
ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे नाईक यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार, नवशक्तीच्या माजी संपादिका, लोकप्रभा साप्ताहिकाच्या माजी कार्यकारी संपादिका वसुंधरा पेंडसे नाईक यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद, लोकप्रभा साप्ताहिक व अन्य काही नियतकालिकांचे संपादकपद त्यांनी भूषविले होते.
राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या. भारत निर्माण या संस्थेच्या त्या १९९९सालच्या टॅलेन्टेड लेडीज अवॉर्डच्या मानकरी होत्या.
वसुंधरा पेंडसे नाईक या एक मराठी लेखिका होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर नाईक हे त्यांचे पती होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा