चालू घडामोडी : २० जुलै
सरकारी बँकांमध्ये २२,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक
- देशातील बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी देणे, थकित कर्जांचे ओझे दूर करणे तसेच, बेसल-३ नियमांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने १३ सरकारी बँकांमध्ये २२,९१५ कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
- ही भांडवली गुंतवणूक केंद्राच्या 'इंद्रधनुष्य' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत करण्यात आली असून, आगामी चार वर्षांमध्ये बँकांमध्ये टप्प्याटप्याने ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेला ७,५७५ कोटी रुपयांची सर्वाधिक मदत मिळणार आहे.
- स्टेट बँकेपाठोपाठ सर्वाधिक मदत मिळविणाऱ्या बँकांच्या यादीत इंडियन ओव्हसीज बँक (३,१०१ कोटी) आणि पंजाब नॅशनल बँक (२,८१६ कोटी) यांचा समावेश आहे.
- चालू आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी अर्थसंकल्पात २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.
- बँकांना वितरित करण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी ७५ टक्के निधीचा वापर प्रत्येक बँकेने कर्जे देण्यासाठी तसेच बाजारातील रोखता (लिक्विडिटी) वाढविण्यासाठी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- बँकांना निधीचे वाटप करताना केंद्र सरकारतर्फे खालील निकष निर्धारित करण्यात आले होते.
- त्यामध्ये बँकांची गेल्या पाच वर्षांतील सरासरी क्रेडिट वाढ
- बँकांची कामगिरी आणि भविष्यातील वाढीविषयी त्यांची असणारी धारणा
बँकांना वितरित करण्यात येणारा निधी |
बँकेचे नाव |
निधी (कोटी रुपयांत) |
स्टेट बँक ऑफ इंडिया |
७,५७५ |
इंडियन ओव्हरसीज बँक |
३,१०१ |
पंजाब नॅशनल बँक |
२,८१६ |
बँक ऑफ इंडिया |
१,७८४ |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया |
१,७२९ |
सिंडीकेट बँक |
१,०३४ |
युको बँक |
१,०३३ |
कॅनरा बँक |
९९७ |
युनायटेड बँक ऑफ इंडिया |
८१० |
युनियन बँक ऑफ इंडिया |
७२१ |
कॉर्पोरेशन बँक |
६७७ |
देना बँक |
५९४ |
अलाहाबाद बँक |
४४ |
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा चौथा टप्पा
- सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा चौथा टप्पा १८ जुलैपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात सुवर्ण रोखे उपलब्ध करण्यात आले आहेत.
- भौतिक रूपातील सोन्याच्या ऐवजी सोन्यासारखाच मूल्यवृद्धीचा लाभ देणाऱ्या रोख्याशी निगडित व्यवहार मुंबई शेअर बाजारात सुरू झाले आहेत.
- सोन्याच्या ग्रॅममधील मूल्याच्या समकक्ष रोख्यांची योजना सरकारने सर्वप्रथम ३० ऑक्टोबर २०१५ मध्ये घोषित केली होती. सोने धातूचा वापर कमी होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
- सरकारने या योजनेसाठी चौथ्या टप्प्यात सोन्याचे मूल्य प्रति ग्रॅम ३,११९ रुपये ठरविले आहे. नव्या योजनेंतर्गत सोन्याच्या किमान खरेदीची मर्यादा आता एक ग्रॅम करण्यात आली आहे.
- तर एका व्यक्तीसाठी वा संस्थेसाठी ही मर्यादा अधिकाधिक ५०० ग्रॅम असणार आहे. यापूर्वी किमान मर्यादा ५ ग्रॅम होती.
- सर्व प्रमुख बँक शाखा, निवडक पोस्ट कार्यालय आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे हे व्यवहार होतील.
- या योजनेच्या अंतर्गत सरकार २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज देते. प्रत्येक सहा महिन्यांनंतर हे व्याज दिले जाते. या बॉण्डचा उपयोग कर्ज घेण्यासाठीही केला जाऊ शकतो.
- या योजनेचा अवधी आठ वर्षांचा आहे. तथापि, पाच, सहा आणि सात वर्षांनंतर आणि वेळेपूर्वी रक्कम काढून घेता येऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार
- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
- क्लेव्हलँड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव जाहीर करण्यात आले. ‘अमेरिकेला पुन्हा सुरक्षित बनवूया’ अशी थीम असलेल्या या अधिवेशनाचा कालावधी १८ ते २१ जुलै असा आहे.
- १६ उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक १२३७ मताधिक्य मिळवून उमेदवारीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची लढत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याशी होणार आहे.
- ट्रम्प यांच्या विजयासाठी ‘सिटीझन्स फॉर ट्रम्प’ ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
रोहित खंडेलवाल पहिला भारतीय मिस्टर वर्ल्ड
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मिस्टर वर्ल्ड’ हा किताब हैदराबादच्या रोहित खंडेलवालच्या याच्या रुपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकाविला आहे.
- साऊथपोर्ट (युनायटेड किंग्डम) येथे पार पडलेल्या ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’च्या स्पर्धेत जगभरातील एकूण ४७ स्पर्धक सहभागी झाले होते.
- यामध्ये रोहित खंडेलवाल याने ‘मिस्टर वर्ल्ड’ या किताबासह ५० हजार डॉलरचे पोरितोषिक मिळविले. हा बहुमान पटकवणारा तो पहिलाचा आशियाई, आणि पर्यायाने पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
- १२ दिवस चाललेल्या या पेजंटमध्ये ५ चॅलेंजेस होते. त्यापैकी ‘मिस्टर मल्टीमीडिया’ हा किताबही रोहितला मिळाला.
- रोहित खंडेलवालने २०१५मध्ये ‘प्रोवोग पर्सनल केअर मिस्टर इंडिया २०१५’ स्पर्धाही जिंकली आहे. तसेच रोहितने प्यार तुने क्या किया, ये है आशिकी सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे निधन
- भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व महान हॉकीपटू मोहम्मद शाहिद यांचे गुडगाव येथील एका रुग्णालयामध्ये मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
- अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेल्या शाहिद यांनी वयाच्या १९व्या वर्षी फ्रान्समधील युवा विश्वकरंडक स्पर्धेत खेळतानाच आपली छाप पाडली होती.
- शाहिद यांचा खेळ वेगवान होता व चेंडू ‘ड्रिबल’ करण्याची पद्धत अत्यंत प्रभावित करणारी होती.
- त्यांच्या नेतृत्वाखाली १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर १९८४ व १९८८च्या स्पर्धांमध्येही त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
- १९८२ व १९८६च्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य व कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते.
- शाहिद यांना १९८१ मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय, १९८६मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
- हॉकीमधून निवृत्ती घेतल्यानंतर शाहिद हे त्यांचे जन्मस्थान असलेल्या वाराणसीमध्येच भारतीय रेल्वेमध्ये काम करत होते.
माल्कम टर्नबुल ऑस्ट्रेलियाचे २९वे पंतप्रधान
- माल्कम टर्नबुल यांनी ऑस्ट्रेलियाचे २९वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानपदाची ही त्यांची सलग दुसरी टर्म आहे.
- अस्थिरतेच्या मुद्द्यावरून टर्नबुल यांनी देशामध्ये मतदान घेतले होते. यामध्ये येथील नागरिकांनी गेल्या अडीच वर्षांतील राजकीय अस्थिरता संपवत टर्नबुल यांच्या बाजूने कौल दिला होता.
- गेल्या अडीच वर्षांत ऑस्ट्रेलियामध्ये पाच पंतप्रधान झाले आहेत. टर्नबुल यांनी आपले पूर्वीचे मंत्री कायम ठेवले असून, नव्यानेही काही जणांचा समावेश केला आहे.
- २३ मंत्र्यांचा समावेश असलेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठ्या मंत्रिमंडळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते.
बाबरी खटल्यातील सर्वात जुने पक्षकार मोहम्मद अन्सारी यांचे निधन
- अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद खटल्यातील सर्वात जुने पक्षकार मोहम्मद हाशीम अन्सारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
- अयोध्येतील रामन्मभूमी आणि बाबरी वाद १९४९पासून सुरू आहे. अन्सारी हे १९६१ पासून या प्रकरणातील कायदेशीर लढाईचे साक्षीदार होते.
- मात्र, हा वाद अन्सारी यांनी न्यायालयापुरताच मर्यादित ठेवला होता. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कधी हा वाद आणला नाही.
- त्यामुळेच लखनऊमधील अनेक हिंदू नेते व साधू-संतांबरोबर त्यांचे उत्तम संबंध होते. अखेरपर्यंत या संबंधांमध्ये कधी दुरावा आला नव्हता.
- बाबरी मशिद व रामजन्मभूमीवरून होत असलेल्या राजकारणामुळे ते प्रचंड दु:खी होते. त्यामुळेच यापुढे हा खटला न लढण्याचा निर्णय त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा