अरुणाचल प्रदेशमध्ये नाट्यमयरीत्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर चौना मेन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तास शिल्लक असताना विद्यमान मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी अचानक राजीनामा दिला, तर त्यांच्या जागी नवे नेते म्हणून पेमा खांडू यांची नियुक्ती करण्यात आली होती.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे सहा महिन्यांपूवी बंडखोरी करून पक्ष सोडून गेलेले काँग्रेसचे सर्व ३० आमदार स्वगृही परतले व त्यांनी खांडू यांचे नेतृत्त्व मान्य केले.
अरुणाचलच्या ६० सदस्यीय विधानसभेत आता आमदारांची संख्या ५८ असून खांडू यांनी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे ४७ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
विजेंदर सिंग डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक चॅम्पियन
भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॉक्सर केरी होप याचा पराभव करत ‘डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशीप’वर कब्जा केला.
हे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बॉक्सर म्हणून विजेंदरने यावेळी इतिहास रचला.
दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये सुमारे १० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजेंदरने तिन्ही पंचांच्या निर्णयानुसार ९८-९२, ९८-९२ १००-९० अशी गुणांच्या आधारे बाजी मारली.
याबरोबरच विजेंदरने आपली सलग सातवी व्यावसायिक लढत जिंकली आहे. तसेच नॉकआऊट किंग म्हणून फेमस असलेल्या विजेंदरने पहिल्यांदाच गुणांच्या आधारे लढत जिंकली आहे.
१० राउंडपर्यंत खेचल्या गेलेल्या या लढतीआधी विजेंदरने आपल्या सर्व सहा लढतींचा निकाल तीन राउंडमध्येच लावला होता.
तुर्कस्तानमध्ये लष्कराचा उठाव फसला
तुर्कस्तानमध्ये अध्यक्ष तय्यीप एर्दोगन यांचे सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर येथील सरकारने आतापर्यंत जवळपास तीन हजार सैनिकांना आणि हजारो न्यायाधीशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रणगाडे आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने केलेल्या उठावानंतर उसळलेल्या हिंसाचारात २६५ जणांचा बळी गेला आहे.
एर्दोगन यांनी सरकार स्थिर असल्याचा दावा करत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंडाला साह्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पश्चिम आशिया व एकंदरच जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रास जोडणाऱ्या तुर्कस्तानचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तुर्कस्तानमधील राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव आशिया व जगातील इतर भागांवर कायमच पडत आला असून वर्तमान स्थितीमध्येही या देशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे परिणाम जाणवू लागले आहेत.
व्हेनेझ्युएला आर्थिक संकटात
आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझ्युएलामधील हजारो नागरिक अन्न आणि औषधे खरेदी करण्यासाठी शेजारील कोलंबियामध्ये आले.
सुमारे वर्षभर बंद असलेली ही सीमा १७ जुलै रोजी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी अंशत: खुली केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तीस हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली.
२०१४मध्ये तेलाचे भाव कोसळल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला व्हेनेझ्युएला अद्यापही सावरलेला नाही.
त्यामुळे येथील लाखो नागरिकांचे सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार कोलमडले असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यात येथील सरकारला साफ अपयश येत असल्याने नागरिक संतप्त आहेत.
त्यामुळेच सरकारने कोलंबियाशी चर्चा करून १७ व १८ जुलै रोजी बारा तासांसाठी सीमा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे कोलंबियाच्या सीमा भागातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय अचानक तेजीत आला आहे. व्हेनेझ्युएलाच्या नागरिकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर वस्तूंचा साठा करण्यात आला आहे.
व्हेनेझ्युएलाचे अध्यक्ष : निकोलस माडुरो
पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिची हत्या
प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदिल बलोच हिची तिच्या भावानेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना मुल्तानमध्ये समोर आली आहे.
फेसबुकवर अश्लील व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यासाठी कंदिल प्रसिद्ध होती. यावरूनच तिचा भावाबरोबर वाद होत असे आणि त्यातूनच भावाने गोळ्या झाडून तिची हत्या केली.
कंदिलने मॉडेलिंग व अभिनय सोडावा, असा तगादा तिच्या भावाने लावला होता. एका मुस्लिम धर्मगुरूसोबत सेल्फी काढल्याने कंदिल प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
याबरोबरच तिने मार्चमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, तर न्यूड डान्स करण्याचे जाहीर केले होते.
तिचे खरे नाव फौजिया अजीम होते. प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असलेल्या कंदीलची ओळख ‘ड्रामा क्वीन’ अशीच होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा