महाराष्ट्रात खरीप हंगाम २०१६पासून राष्ट्रीय कृषी विमा योजना रद्द करून त्या जागी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. यामध्ये पंधरा पिकांचा समावेश असून, यात पाच फळांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजना १९९९पासून सुरू होती, आता मोदी सरकारने ती बंद करून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे.
१० विमा कंपन्यांचा यात सहभाग असलेल्या या योजनेमध्ये तृणधान्ये व कडधान्ये याचा समावेश असून भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद यांचा समावेश आहे.
तर गळीत धान्यामध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळ आणि नगदी पिकात कापूस आदीचा समावेश आहे. तर संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू या फळांचाही समावेश आहे.
पिकांच्या कापणीनंतर १४ दिवसांपर्यंत संरक्षण या विम्याने मिळू शकते, तसेच खराब हवामानामुळे सरासरीच्या ५० टक्क्यापेक्षा कमी उत्पन्न येण्याचा प्राथमिक अंदाज असल्यास २५ टक्के नुकसानभरपाई आगाऊ मिळणार आहे.
आग, वीज पडणे, वादळ, गारपीठ, चक्रीवादळ, तापमानात वाढ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, रोग व किडीचा प्रादुर्भाव यासाठीही हा विमा मिळणार आहे.
यामध्ये खरिपासाठी २ टक्के रब्बीसाठी १.५ टक्के व व्यापारी पिकांसाठी ५ टक्के अशा प्रकारे उर्वरित रक्कम राज्य व केंद्र शासन समप्रमाणात देणार आहे.
स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय
केंद्र शासनाने स्वच्छ भारत मोहिमेबरोबरच आता ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम हाती घेतली आहे.
ज्या शाळांमध्ये स्वच्छतेबाबत सुविधा आहेत. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. अशा शंभर शाळांची राष्ट्रपातळीवर निवड करून त्यांना ग्रीन विद्यालयाचा दर्जा देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही मोहीम १ ते ३१ जुलै दरम्यान देशभर राबविण्यात येत आहे.
यात राष्ट्रीय पातळीवर १००, राज्य पातळीवर ४० व जिल्हा पातळीवर ४८ शाळा प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात निवडल्या जाणार आहेत. या शाळांसाठी अ ते ड अशा चार श्रेण्या ठरविल्या आहेत.
आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे, तो चांगला घडावा, बालवयातच स्वच्छतेचे धडे नवीन पिढीला मिळावेत या हेतूने शासनाने ‘स्वच्छ भारताला स्वच्छ विद्यालयाची’ जोड दिली आहे.
सिक्स पॅक बॅंडला ग्लास ग्रॅंड प्रिक्स पुरस्कार
६३व्या कान्स फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी स्पर्धेत भारतातील पहिल्या तृतीयपंथी बॅंड सिक्स पॅकने ग्लास ग्रॅंड प्रिक्स पुरस्कारावर आपले नाव कोरले.
जगभरातील हजारांहून अधिक बॅंड (संघ) या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी सिक्स पॅकने बाजी मारली. हा पुरस्कार जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ आहे.
या स्पर्धेत भारतातील आणखी चार बॅंडही सहभागी झाले होते.
हम है हॅप्पी या सिक्स पॅकच्या व्हिडिओ आठवडाभरात १.६ दशलक्ष लोकांनी पाहिला.
त्यानंतर बॅंडने आणखी चार व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्याचा एकूण २५ दशलक्ष जणांनी आनंद लुटला.
‘झिका’वरील लसीच्या निर्मितीमध्ये प्रगती
डासांमुळे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रादुर्भाव होत असून, याच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे.
त्यावरील प्रतिबंधक उपाययोजनांसाठी ‘सनॉफी’ ही फ्रान्समधील औषधनिर्माण कंपनीने संशोधन करीत आहे.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक लहान कंपन्या ‘झिका’ प्रतिबंधक औषधावर संशोधन करीत असल्या तरी, या क्षेत्रात काम करणारी ‘सनॉफी’ ही जगातील एकमेव मोठी कंपनी आहे.
अमेरिकेतील ‘वॉल्टर रिड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च’ (डब्ल्यूआरएआयआर) यांनी यासाठी कंपनीला मदतीचा हात पुढे केला आहे.
निष्क्रिय विषाणूंच्या मदतीने तयार या लसीची चाचणी उंदरांवर घेण्यात आली असून, त्याचे चांगले परिणाम सकारात्मक आले आहेत.
चीनचे सर्वात मोठे ‘वाय-२०’ विमान लष्करात दाखल
चीनने देशांतर्गत निर्मिती केलेले सर्वात मोठे ‘वाय-२०’ हे सैन्याची आणि मालाची दीर्घ पल्ल्यापर्यंत कोणत्याही मोसमात वाहतूक करणारे विमान लष्कराच्या ताफ्यात दाखल केले.
जवळपास २०० टन वजनाचे साहित्य नेण्याची या विमानाची क्षमता आहे. हे विमान कोणत्याही हंगामामध्ये सामान आणि सैनिकांना अतिशय दूर अंतरावर नेऊ शकते.
राष्ट्रीय सुरक्षेसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतकार्य करण्यासाठी तसेच सैनिकांच्या गरजा योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या विमानाची चीनला मोठी मदत होणार आहे.
या विमानाची तुलना रशियानिर्मित आयएल-७६ आणि अमेरिकेच्या सी-१७ सोबत करण्यात येत आहे.
सातवेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम
लेहक्पा शेर्पा या मूळच्या नेपाळच्या असलेल्या या ४२ वर्षीय महिलेने जगातील सर्वात उंच हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले.
हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले.
लेहक्पा यांनी सर्वप्रथम सन २०००मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केले होते, त्यावेळी त्या नेपाळमधील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या होत्या.
लेहक्पा या सध्या अमेरिकेच्या नागरिक असून त्यांनी सहाव्यांदा शिखर सर केल्यानंतर गिनिज बुकमध्ये त्याची नोंद झाली. या वर्षी त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे.
लेहक्पा यांच्या यशावर आधारित ‘डॉटर्स ऑफ एव्हरेस्ट’ नावाचा एक लघुपट तयार करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा