सर्वोच्च न्यायालयाची लोढा समितीच्या शिफारशींना मान्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गव्हर्निंग कौन्सिलमध्ये मंत्री व आयएएस पदाधिकारी यांना स्थान असू नये ही न्यायमूर्ती लोढा समितीची प्रमुख शिफारस सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे.
बीसीसीआयपासून राजकीय व्यक्तींना दूर ठेवण्याची शिफारस मात्र कोर्टाने मान्य केलेली नाही.
त्याचबरोबर लोढा समितीने दिलेल्या बहुतेक सर्व शिफारशी स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे ‘बीसीसीआय’वर जरबच बसवली.
बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. तसेच याची अंमलबजावणी सहा महिन्यांत करण्याचेही आदेश दिले आहेत.
गोव्यात सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण
गोवा राज्यात सुमारे १८२ किमी सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकरणामुळे अंतर्गत जलमार्गांवर विकासाचा मार्ग खुला होणार आहे.
राष्ट्रीय जलमार्ग कायदा २०१६ अंतर्गत गोव्यात ज्या सहा जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण होणार आहे त्यात खालील जलमार्गांचा समावेश आहे.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत १०० कोटी रुपये सहयोगदान मंजूर
आर्थिक वर्ष २०१५-१६साठी अटल पेन्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने १०० कोटी रुपये सहयोगदान मंजूर केले आहे. या योजनेमध्ये ३१ मार्च २०१६पर्यंत नोंदणी झालेल्या व्यक्तींना या सहयोगदानाचा लाभ मिळणार आहे.
हे सहयोगदान संबंधित सदस्याच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा कमाल एक हजार रुपये असेल. २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांसाठी सरकार हे सहयोगदान देणार आहे.
या सहयोगदानाचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक सभासदाने मार्च २०१६पर्यंत स्वतःचे योगदान दिलेले असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास मात्र सभासदाला लाभ मिळू शकणार नाही.
सहयोगदानाचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक सभासदाने आपले अटल पेन्शन योजना खाते नियमित करावे, अशा सूचना भविष्यनिर्वाह निधी नियामक व विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) दिल्या आहेत.
अटल पेन्शन योजना सरकारी बँका व टपाल विभाग यांच्यामार्फत राबवली जाते. ३० जूनपर्यंत अटल पेन्शन योजनेचे ३० लाखांहून अधिक सभासद झाले आहेत.
सभासदांच्या या संख्येत दररोज किमान पाच हजार सभासदांची भर पडत आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिफारस केलेले राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्यानंतर सिद्धू हे आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसे झाल्यास पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
सिद्धू हे २००४च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अमृतसरमधून लोकसभेवर निवडून गेले होते.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची पत्नी व भाजपाच्या पंजाबच्या आमदार नवज्योत कौर यांनीही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.
२०१४च्या निवडणुकीत भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धू यांना डावलून अरुण जेटली यांना तिकीट दिले होते. तेंव्हापासून सिद्धू नाराज झाले होते.
दिल्लीमध्ये दहा वर्षांपूर्वीच्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द
राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आला घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दहा वर्षांपूर्वीच्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिल्ली वाहतूक प्राधिकरणाला दिले.
दिल्लीच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असून जगातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा क्रमांक वर आहे.
ही स्थिती बदलण्यासाठी जुन्या गाड्या बाद करणे, ‘सम-विषम’ योजना अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
डिझेलवर चालणाऱ्या जड वाहनांची नोंदणी करण्यास मज्जाव करून सर्व डिझेल टॅक्सींचे रूपांतर ‘सीएनजी’मध्ये करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या वर्षाच्या सुरवातीस दिला होता.
न्यायालयाने दिलेले आदेश किंवा सुचविलेले उपाय अमलात येत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
दक्षिण चीन समुद्रात चीनचा लष्करी सराव
चीनचा दक्षिण चीन समुद्रावरील दावा युनोच्या आंतरराष्ट्रीय लवादाने फेटाळून लावल्यानंतर चीनने तेथे लष्करी सरावाचे आयोजन केले आहे.
चीनच्या दक्षिण समुद्रात २१ जुलैपर्यंत लष्करी सराव करण्यात येईल. यासाठी या समुद्राचा काही भाग इतरांसाठी बंद ठेवण्यात येईल.
प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे निधन
‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’ या गीतासह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे निधन झाले.
१९४९ ते १९७२ या कालावधीत मुबारक बेगम यांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला होता. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली.
१९४९मध्ये ‘आईये’ या चित्रपटात लतादीदींसोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते.
‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
१४६ चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० हिंदी गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला होता.
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मुबारक बेगम या आयुष्याच्या शेवटच्या काळात पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा